varvanta in Marathi Short Stories by Shirish books and stories PDF | वरवंटा

The Author
Featured Books
Categories
Share

वरवंटा


" वरवंटा... "


" सखे...ऐ सखे.. कुठं मेलीस? " तो आजही फुल्ल दारू पिऊन आला होता. झुलत झुलतच घरात घुसला अन् आरडाओरडा- गोंधळ करू लागला. दुर्गा नुकतीच शाळेतून आली होती. ती बापासमोर आली," आई, रानात गेलीय. रोजंदारीच्या कामावर.. आली नाही अजून.. "
" अजून नाही आली? मी आलो अन् ती कस्काय नाही आली? " तोल सावरत तो बाजावर बसला," कशाला मरायला जाती ही कामावर... म्या हाय ना कमावता मरद.. ऐ काट्टे.. पानी आण मला.. " त्याला जरा जास्तच चढली होती. बसल्या बसल्याही त्याचा झोक जाऊ लागला. तो कुणीकडेही कलंडू लागला. दुर्गानं तांब्यात पाणी आणलं. बापाच्या हातात दिलं. त्याने ते घटाघटा घशात ओतलं. रिकामा तांब्या दूर भिरकावला. त्याचा खणखणाट बराचवेळ घुमत राहिला.
" येक पोरगं दी मनलं सालीला.. तर चार पोट्ट्या पैदा केल्या डूकरीणीनं " डोळे फिरवत तो स्वतःशीच बडबडू लागला. बोलता बोलताच बाजेवर आडवा झाला. मान जराशी उचलली अन् ओरडला," ऐ काट्टे, इकडं इ.. "
दुर्गा थरथरतच समोर आली. तो एका वेगळ्याच गलिच्छ नजरेने स्वतःच्या पोटच्या पोरीकडे बघू लागला. ती आठवीत होती. उमलायला लागण्याचं वय तिचं. खाण्यापिण्याची आबाळ होती तरी तिचं शरीर मात्र वयाच्या मानाने चांगलंच पोसलेलं होतं. त्याची गिधाड-नजर तिच्या सर्वांगावरून भिरभिरत होती. दुर्गाला आपल्याच बापाची भिती वाटायला लागली. घरात दुसरं कुणीच नव्हतं. दोन्ही लहान बहिणी खेळायला गेलेल्या. आई अन् तान्ही बहिण शेतात. दुर्गाला दरदरून घाम फुटला.
" ऐ काट्टे, इकडं इ.. पाय दाब महे.. " बापानं आदेश सोडला. दुर्गा जागेवरची हललीच नाही. तो आणखीच चिडून ओरडला," आयकू न्हाई आलं का भयरे तुला? "
कुणीतरी ढकलल्यासारखी ती बळंच बापाजवळ गेली. घाबरत - थरथरतच त्याचे पाय चेपू लागली. त्याची नजर तिच्यावरच खिळलेली होती. कधी चेहऱ्यावर, कधी छातीवर, कधी कमरेवर.
" अंगात बळ असल्यावानी दाब ना मुरळे... जोर लाव जरा.. " तिच्या पोटावर लाथ हाणत तो वसकला," वर दाब जरा... "
पोरगी पुरती घामाघूम झाली होती. ती रडकुंडीला आली. पण रडावं तर बाप आणखीच मारायचा. तिनं सगळी भिती, सगळं रडू आतल्या आत गिळलं.
" ऐ पांढरतोंडे, वर दाब ना जरा... वर आजूक वर... आजूक वर... " त्याची अधाशी नजर जणू तिचे लचके तोडत होती. भेदरलेली दुर्गा मान खाली घालून बापाचे पाय, मांड्या चेपू लागली. तो लाळघोट्या आवाजात पुन्हा म्हणाला, "आजूक जरासक वर.. दाब.."
अन् बाहेर खेळणाऱ्या पोरी धावतच घरात आल्या. त्यांना पाहून दुर्गाच्या जीवात जीव आला.
"मी भाकरी टाकते" असं म्हणून ती गडबडीनं आतल्या घरात गेली. 'त्या चिमुरड्यांमुळे आपण आज बापाच्या तावडीतून सुटलो,' असं तिच्या मनात आलं.
"चला आपून पप्पाचे पाय दाबू " असं म्हणत दोन्ही लहान पोरी बाजेवर चढल्या. बापाच्या अंगावर दणादण उड्या मारू लागल्या. संतापलेल्या बाबूरावनं दोन्ही पोरींच्या पाठीत एक एक धपाटा टाकला. पोरी रडत विव्हळत एका कोपऱ्यात जाऊन बसल्या.
बापाच्या अशा वागण्याची ही चौथी-पाचवी वेळ असेल. दुर्गाला बापाची किळस यायला लागली होती. दारू पिऊन आल्यानंतर, घरी कुणी नसल्यावर तो असंच करायचा. कधी जवळ घ्यायचा, सगळ्या अंगावरून हात फिरवायचा,कधी फ्रॉक ओढायचा, कधी मांडीवर बसवायचा. दुर्गाला खूप राग यायचा. 'बाप आपल्याशी काहीतरी घाणेरडं वागतोय हे तिला कळायचं. आईला सांगावं असं वाटायचं. पण आईसाठी तिचा नवरा म्हणजे पती परमेश्वर. एक तर तिला हे पटणारच नाही. पटलं तरी ती काहीही करणार नाही. उलट मलाच गप्प राहायला सांगील.' असा विचार करून दुर्गा आजपर्यंत सगळं सहन करत राहिली. पण आज मात्र या विषयावर आईशी बोलायचंच असं तिनं मनोमन ठरवलं.चुलीतला जाळ खूप वाढला होता. तिनं तव्यावर टाकलेली प्रत्येक भाकरी करपायला लागली होती.
संध्याकाळी आई घरी आली. दारू पिलेला बाप शुद्ध गमावून बाजेवर पडलेला होता. दोन्ही पोरी भिंतीला खेटून शाळेत दिलेला अभ्यास पूर्ण करत होत्या. दुर्गानं सगळा स्वैपाक करून ठेवला होता. आईनं हातपाय धुतले. दुर्गानं तिच्यासाठी चुलीवर चहा ठेवला. पदरानं चेहरा पुसत आई चुलीपुढे येऊन बसली, "कव्हा आले गं हे घरी?"
"दुपारीच.. " दुर्गा कोरडेपणाने उत्तरली.
" काय झालं? हाणमार केली का तुला? " आईनं काळजीनं विचारलं. दुर्गाच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं. ते पापणीतच जिरवत ती म्हणाली," मला नाही.. त्या दोघीला मारलं.. " चुलीवरचा चहा उकळायला लागला होता. दुर्गानं त्यात दूध ओतलं.
" आई, आपण इथून निघून जाऊ ना.. "
" निघून? कुठं जातीस? "
" मामाकडं.. तिथं राहू.. आम्ही चौघी अन् तू "
" अन् तुहा बाप...? "
" त्यालाच सोडून... "
" सोडून? नवरा सोडून द्याया लावतीस व्हय गं मला... "
" असून तरी काय उपयोग आहे त्याचा? "
" दुर्गे, थोबाड संभाळ... बाप हाये त्यो तुझा.. " आई आता संतापली होती. चुलीवरचा चहा पुन्हा एकदा खळाखळा उकळायला लागला.
" बाप?... आमचा बाप.. " दुर्गाच्या मनात फसफसणारं सगळं तेजाब बाहेर पडण्याची वाट शोधू लागलं. कदाचित तिच्या शब्दांची तेजाबवर्षा झाली असती तर त्यात तिची माय होरपळून गेली असती. म्हणूनच की काय ओठांशी आलेले शब्द तिने तिथूनच परत पाठवले अन् आईच्या मनाला जखमा होणार नाहीत अशा भाषेत बोलू लागली, " कधी बापाची माया लावलीय गं त्यांनी आम्हाला? त्यांना हवा होता मुलगा अन् जन्म घेत गेलो आम्ही मुली... आमच्याबद्दल द्वेषच आहे त्यांच्या मनात.." "आसं काही नाही गं पोरी, " माय समजावू लागली," खानदानीचं नाव पुडं चलवाया पोरगं पायजे. ते व्हत न्हाई म्हणून चिडत्यात ते.. बाकी काही न्हाई.. समद्या पोरीत लय जीव हाय त्येंचा.. "
" अन् तुझ्यात? " उकळलेला चहा स्टीलच्या ग्लासात ओतीत दुर्गा बोलली,"आई, तुझ्यापेक्षा दारूची बाटली जास्त मोलाची वाटते त्यांना... उन्हातान्हात राबतेस तू.. कमवतेस तू.. अन् तू आणलेला पैसा ते हिसकावून घेतात. तुझ्याच पैशांची दारू पितात आणि वरून तुलाच मारहाण करतात. तरीही तुला काहीच वाटत नाही. सगळं सहन करतेस. कोणत्या मातीची बनलेली आहेस गं तू आई? "
" हे बघ पोरी, " चहाचा घोट घेता घेता आई बोलू लागली," तू आता शिकती पोर हायस. पुस्तकं वाचून हूशार झाल्याली. मला लय तर काही कळत न्हाई पर.. पावसानं भिजविलं अन् नवऱ्यानं मारलं तर गपगुमान सहीन करावा असं जुने लोकं म्हंतेत.. अन् नवरा म्हंजी बाईचा देव असतू.. मंग त्यो कसा का आसंना.. " तिचा चहा संपला.
" अगं आई तुला देव आणि दानव यातला फरकच कळत नाहीये. देव देव म्हणून ज्याचे पाय धुवून ते तीर्थ मानून तू पीतेस ना... तो राक्षस आहे.. राक्षस!! " दुर्गा मनातली सगळी चीड एकवटून बोलली.
अन् आईने खाडकन तिच्या गालावर चार बोटं उमटवली. आईचे डोळे लालबुंद झाले होते."पुन्हा मह्या नवऱ्याबद्दल असं काही बोललीस तर नरडीचा घोट घेईन मी तुह्या.." दुर्गाच्या नजरेत नजर रोवून कठोर आवाजात ती बोलली. चुलीपासून उठली. बाहेर गेली.
चुलीतला जाळ आता विझला होता.दुर्गा विझलेल्या कोळशांकडे बघत होती. तिच्या डोळ्यांत बरंचसं पाणी साठलं होतं.तिनं ते बाहेर पडू दिलं नाही. पापणीतच थिजवलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच ती शाळेला गेली. बाप झोपेतून उठायच्या आधीच. तो नऊला उठायचा. 'काहीही झालं तरी आता बापाच्या समोर यायचंच नाही', असं तिनं मनाशीच ठरवलं होतं. म्हणून शाळा सुटल्यावरही जरा रमतगमतच उशिराने घरी आली. दाराशी पोचली. समोरच खेटरं सोडलेले होते म्हणजे बाप घरातच असणार. दोन्ही लहान बहिणींची शाळा सुटलेली होती. पण दोघीही बाहेर खेळताना दिसल्या नाहीत. घरातून दोघींच्याही हसण्या-खेळण्याचा आवाज येत होता. दुर्गाला जरा आधार वाटला. सगळ्याजणी घरी असल्या म्हणजे तो चाळे करत नाही. तिने दार लोटले. घरात गेली. दारूचा उग्र वास आला. तिने नाकाला हात लावला. तो बाजेवरच पसरलेला होता.. आणि...
आणि लहानग्या दोन्ही पोरी त्याच्या मांडीवर!!
दुर्गाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तिचे डोळे आग ओकू लागले. तिच्या नजरेला नजर भिडवण्याची हिंमत बापाच्या डोळ्यांत नव्हती. तिने आपल्या दोन्ही बहिणींना उचलले. घराबाहेर पडली. थेट गावाबाहेरच्या मंदिरासमोरच्या पटांगणात आली. याच वाटेने तिची आई शेतातून परत यायची. दुर्गाने बहिणींना खेळण्यासाठी मोकळे सोडले. स्वतः डोळे बंद करून देवळाच्या पायरीवर बसली. तिची रक्त अजूनही आतल्या आत उकळत होतं. 'या माणसाच्या नरडीचा घोट घ्यावा' असे विचार वारंवार तिच्या मनात येत होते. पण क्षणातच 'आपण काहीही करू शकत नाही' याची जाणीवही व्हायची. 'आईला कितीही सांगितले तरी ती विश्वास ठेवणार नाही. आणि दुसरीकडे हा लांडगा आपल्याच पिलांचे लचके तोडू पाहतोय. मी मला स्वतःला कसेही वाचवले असते पण आज त्या गिधाडाची हिंस्र दृष्टी या निरागस छकुल्यांवर पडलीय. त्यांना काहीच कळत नाही. माझ्या निष्पाप बहिणी...' दुर्गाच्या डोक्यात विचारांची असंख्य वादळं घोंघावत होती. आणि त्याबरोबरच तिला स्वतःच्या अगतिकतेचा, हतबलतेचा रागही येत होता.
"आई आली... आई आली.." माती खेळणाऱ्या पोरींना आई दिसल्यावर त्या धावतच आईकडे गेल्या. तिच्या कमरेला मिठी मारली.
" इकडं कस्काय आल्या पोरीहो तुम्ही? " आईने नवलाने विचारले.
" ताईसंगं आलोत... खेळायला.. "
दुर्गाही उठून आईजवळ आली. आईच्या डोक्यावरचं टोपलं स्वतःच्या डोक्यावर घेतलं.
" इकडं कामून आलीस... भाकरी न्हाई केल्या का आज? " आईनं विचारलं.
" नाही.. कंटाळा आला आज मला.. " आईकडे न बघता दुर्गा उत्तरली. त्यानंतर आईच्या मागेमागे चालू लागली.
त्या घरी पोचल्या. बायको समोर येताच तो खेकसला," लौकर येता येत न्हाई का घरी.. कवाची भूक लागली मला.. भाकरी कर लौकर.. "
" होव.. ताबडतोबीनं करून देते.. " आईनं गडबडीने हात धुतले. चुलीजवळ जाऊन बसली.
" धा मिन्टात येतो मी भायरून तवरक आटपलं पायजी तुव्हं.. " खांद्यावर रूमाल टाकून दाराबाहेर पडता पडता तो धमकावून गेला.
आईनं चूल पेटवली. आज स्वतःसाठी चहासुद्धा करून घेतला नाही. चुलीवर तवा मांडला. त्यात मिरच्या टाकल्या. वरून तेल सोडलं. चांगल्या भाजल्यावर ताटात काढल्या. ताट दुर्गापुढे सरकवत म्हणाली," मी भाकरी थापते.. तव्हर तू ह्या मिरच्या रगडून घी पाट्यावर.. "
खरं तर आज दुर्गा काहीच करण्याच्या मनःस्थितीत नव्हती. तरीही आईला कामात मदत करण्यापासून ती स्वतःला रोखूच शकत नव्हती. भिंतीला टेकवून ठेवलेला दगडी पाटा तिने समोर घेतला. कोपऱ्यात वरवंटा पडलेला होता. पाटा - वरवंटा दोन्ही नीट धुवून घेतले. पाट्यावर मिरच्या टाकल्या. मीठ टाकलं आणि रगडायला सुरूवात केली. आईच्या दोन भाकरी भाजणे होईपर्यंत दुर्गाने मिरच्यांचा ठेचा तयार करून ठेवला. हात धुतला. तो आला, आणखी एक बाटली रिचवून. आईने पाट मांडला. ताट मांडलं. तो झुलतच जेवायला बसला.
"दुर्गे, वाढ त्यास्नी... " आईने सांगितले.
दुर्गा थांबली नाही. घराबाहेर गेली. जाताना म्हणाली," मैत्रिणीकडे चालले. अभ्यास करायला.. "
रात्री जरा उशीराच परत आली. तो ढाराढूर झोपला होता. आई जेवायला थांबली होती. मायलेकींनी जेऊन घेतले. भांडी घासली. अंथरूण घातले. दुर्गाला लवकरच झोप लागली.
मध्यरात्र उलटली असेल. दुर्गाला स्वप्न पडलं. ती आणि तिच्या बहिणी शाळेत गेलेल्या होत्या. आई आज रानात गेली नव्हती. पाटलीणबाईंनी तुरीची दाळ करण्यासाठी आईला घरीच बोलावून घेतले. तो घरीच होता. आईनं तान्हीला त्याच्याकडे सोपवलं आणि ती कामासाठी गेली. आणि संधीचा फायदा घेऊन त्यानं त्या तान्ह्या चिमुरडीला....
दुर्गा दचकून उठून बसली.तान्ही कुठे आहे याचा ती आधी शोध घेऊ लागली. लाईट गेलेली होती. अंधारात काहीच दिसेना. अंदाजा - अंदाजाने तिने आगपेटी शोधली. कंदील पेटवला. सगळेजण गाढ झोपेत होते. ती तान्हीजवळ गेली. तिच्या चेहर्‍यावरून मायेने हात फिरवला. समोर बाजेवर तो घोरत पडला होता. कंदीलाच्या उजेडात त्याचा चेहरा तिला अधिकच आक्राळविक्राळ वाटला. ती घाबरली. डोळे बंद करून, तोंडावर पांघरूण घेऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिला झोप येईना. डोळे बंद केले की तो दिसायचा. तो.. कधी तिच्या छातीवरून हात फिरवायचा, कधी लहानीला मांडीवर बसवायचा तर कधी तान्हीच्या....
दुर्गाने पुन्हा दचकून डोळे उघडले . तिला दरदरून घाम फुटला होता. तिने अंगावरचं पांघरूण दूर फेकलं. उठली. कंदीलाची ज्योत कमी केली. मघाशी ठेचा वाटून कोपऱ्यात ठेवलेला वरवंटा हातात घेतला. तो झोपलेल्या बाजेजवळ गेली. त्याच्या चेहऱ्याकडे एकदा बघितले. आणि दोन्ही हातांनी वरवंटा उचलून त्याच्या दोन्ही पायांच्या मधोमध आपटला. दोनदा.. तीनदा.. चारदा.. ती ठेचतच राहीली.
तो वेदनेनं कळवळला. ओरडला. विव्हळला. तिने वरवंटा बाजेखाली टाकला. कंदील विझवून टाकला. गडबडीने तिच्या गोधडीत जाऊन झोपली. त्याच्या कर्कश ओरडण्याचा आवाज ऐकून आई जागी झाली. अंधारात तिला काहीच दिसेना. आगपेटी शोधायला आणि कंदील पेटवायला तिला बराच वेळ लागला. तोपर्यंत तो बेशुद्ध पडला होता. आई एका हातात कंदील घेऊन नवऱ्याजवळ गेली. त्याला हलवू लागली. 'काय झालं' ते विचारू लागली. तो काहीच बोलेना. आई घाबरली. तिने दरवाजा उघडला. शेजाऱ्यांकडे गेली. त्यांचं दार ठोठावून त्यांना मदतीला बोलावलं. ते ही आले. तो बेशुद्धावस्थेतच होता. शेजाऱ्यांनी जीप बोलावली. त्याला जीपमध्ये टाकलं. आईने दुर्गाला जागं केलं. पांघरूणाच्या आत ती जागीच होती. आईने हलवून उठवताच तोंडावरचं पांघरूण दूर केलं.
"तुह्या बापाला दवाखान्यात न्यायले.. पोरीकडं ध्यान ऱ्हावू दी.. " आई म्हणाली. दुर्गानं नुसती मान हलवली. आई गेली. दुर्गा दार बंद करून झोपली. आता तिला गाढ झोप लागली.
सकाळी आई परत आली. डॉक्टरांनी त्याला काही दिवस दवाखान्यातच ठेवायला सांगितलं होतं. पैशांची तडजोड करायची म्हणून आईला घरी यावं लागलं. घरी आल्यानंतर ती इकडे तिकडे काहीतरी शोधू लागली. बाजेखाली वरवंटा दिसला तेव्हा तिने दुर्गाकडे बघितले. आईच्या नजरेत बरेचसे प्रश्न होते. दुर्गाने नजर झुकवली. मान खाली घातली. आईला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली.
" काय झालं हो तुमच्या मालकाला?" शेजारच्या काकू आईकडे विचारपूस करायला आल्या.
"काही नाही हो... फाळीवरचा दाळीचा भरलेला डब्बा उंदरानं पाडला... त्येंची बाज नेमकी फाळीखाली होती... पडला डब्बा त्येच्या अवघड जाग्यावर... घरबसल्या दुखणं आलं " येणाऱ्या जाणाऱ्याला आई आता असंच सांगू लागली होती.
काहीही न बोलता दुर्गाला आई कळली होती... अन् आईला दुर्गा!!

शिरीष पद्माकर देशमुख
मो. 7588703716