"दीपा, आजकाल तु खुप उदास असतेस. तुझे काहीतरी बिनसले आहे हे माझ्या लक्षात आले आहे. पण काय तेच कळत नाही. तुला आईची आठवण येते का? घरी जायचे आहे का?" अभिजीतने काळजीपूर्वक विचारले.
" तसं काही नाही रे अभी, आईची तर रोजच बोलणं होतं. पण माझे मलाच कळत नाहीये की मला नक्की काय होत आहे. आयुष्यात एक वेगळीच पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटते आहे." दीपाने उदासपणे उत्तर दिले.
दीपाच्या मनाला काहीतरी खटकते आहे हे अभिजितला कळत होतं. पण नेमकं काय झालं आहे याबद्दल खूप विचार करूनही त्याला कारण सापडत नव्हतं.
वास्तविक दोघांचे लग्न होऊन फक्त दोन महिने झाले होते. दीपा आणि अभिजीत एकाच ऑफिसमध्ये कामाला होते. जेमतेम सहा महिन्यातली त्यांची ओळख. दोघेही एकमेकांना आवडू लागले. भेटीगाठी वाढल्या आणि लगेच लग्नाचाही निर्णय घेतला.
दीपाकडे तिची आई आणि ती असे दोघींचेच विश्व. दीपाच्या आई-बाबांचा ती लहान असतानाच घटस्फोट झाला होता. नंतर बाबांनी दुसरे लग्नही केले. त्यामुळे अगदी लहानपणी जेवढा बाबांशी संबंध आला तेवढाच त्यांचा सहवास होता. आई बँकेत नोकरीला असल्याने आर्थिक परिस्थिती तशी चांगली होती. आईने एकटीनेच दीपाला वाढवले होते.
याउलट अभिजीतचे घर म्हणजे जणू गोकुळच. आई वडील, लहान बहीण आणि भाऊ असे पाच लोकांचे कुटुंब. शिवाय इतर नातेवाईकही जवळपासच रहात असल्याने सणवार, मंगल कार्य आणि सुट्ट्यांचे दिवस असे काही असले की घरात नुसता धुमाकूळ असायचा. या सगळ्यांचं एकमेकांना चिडवणे, मोठमोठ्याने हसणे- खिदळणे हे सर्व दीपाला खूप नवीन होतं. त्यामुळे ती तशी गप्प गप्पच असायची. आपण हे बोलावे की नाही, कोणाला काय वाटेल अशा विचारांनी ती हो, नाही आणि कमी बोलणंच पसंत करायची. तसे घरातले सर्व तिला पदोपदी सांगायचे की मोकळी बोलत जा, मोकळी रहा, पण दीपाला ते काही जमायचे नाही.
आईकडे एकदम शिस्तबद्ध असे आयुष्य जगलेलली आणि एवढी माणसं, एवढा गोंधळ कधीही न बघितल्याने ती बावरल्या सारखी झाली होती. पण तिला हे वातावरण खूप आवडत होतं. बेडरूम मध्ये गेल्यावर अभीशी ती अगदी भरभरून बोलायची. त्या दोघांत मात्र एकमेकांशी खूप थट्टा, चेष्टा मस्करी चालायची. अभिजीतही तिला खूप सांगायचा की घरातही तू आता मोकळेपणे वावरत जा. सगळी आपलीच माणसं आहेत. दीपाला काही ते अजून जमत नव्हतं.
अभीचा छोटा भाऊ हिमांशू आणि बहीण निकिता हे देखील दीपाची चेष्टा-मस्करी करायचे; पण थोडं सांभाळूनच. कारण त्यांनाही आपल्या वहिनीच्या स्वभावाचा नीट अंदाज येत नव्हता.
हळूहळू जसे दिवस सरत होते तसे दीपाची कळी खुलण्याऐवजी जास्तच कोमेजू लागली. ही गोष्ट अभिजीतला जाणवत होती. आता काहीही करून या मागचे कारण जाणून घेतलेच पाहिजे अभिजीतने ठरवले.
त्यादिवशी तो ऑफिस मधून थोडा लवकर घरी आला. दीपाने लग्नासाठी म्हणून जवळजवळ तीन महिन्यांची सुट्टी घेतली असल्याने ती घरीच होती. अभीला लवकर घरी आलेले बघून तिला आश्चर्यच वाटले.
" दीप, चल आपण जरा बाहेर जाऊ! मला आज
ऑफिसमध्ये खूप कंटाळा आला होता, म्हणून लवकर घरी आलो आहे. चल आवर लवकर!!" अभिजीतने दीपाला तयार होण्यास सांगितले.
" आत्ता? यावेळेस??? बरा आहेस ना तू? घरचे काय म्हणतील?? “ दीपाने आश्चर्याने विचारत सासू कडे पाहिले.
" अगं, तो म्हणतो तर जाऊन या दोघेही बाहेर!! मी आहे घरातले बघायला." सासूने आनंदाने परवानगी दिली.
दोघेही तयार झाले आणि अभिजीत तिला लग्नाआधी ते दोघे जिथे नेहमी भेटायचे, ज्या ठिकाणी त्यांनी खूप गुजगोष्टी केल्या होत्या आणि जिथे त्याने तिला प्रपोज केले होते तिथे घेऊन गेला.
ते टेकडीवरचे ठिकाण म्हणजे दीपाची अतिशय आवडती जागा होती.
“ अभी, आज काय झाले आहे तुला? तू मला या ठिकाणी घेऊन आलास? अरे, कितीतरी दिवसांनी आपण इथे असे भेटत आहोत.” दीपाला खूप आनंद झाला होता.
सर्व गप्पाटप्पा झाल्यावर अभिजीतने हळूच मुख्य विषयाला हात घातला ,"दीप, तुला एक विचारू? तू अगदी खरं खरं सांगशील?”
“ बोल ना, तुला कधीपासून माझ्याशी बोलण्यासाठी परवानगी लागायला लागली आहे? बोल काय म्हणतोय,” दिपाली उत्सुकतेने विचारले.
“ दीप गेले काही दिवस मी बघतोय की तू थोडीशी उदास, आपल्याच विचारात हरवलेली आणि कुठेतरी दुखावली गेलेली वाटतेस. आज मला यामागचे खरे कारण जाणून घ्यायचे आहे. तुला कोणी काही बोलले आहे का? तू कोणाकडून दुखावली गेलीस का? नक्की काय आहे ते अगदी मोकळेपणे बोल." अभिजीतने दीपाला विचारले.
" तसं काही नाही रे अभी, मी अपेक्षाही केली नाही एवढे तुम्ही सर्व लोक चांगले आहात. पण माझ्या घरचे वातावरण आणि इथले वातावरण यामध्ये खूपच फरक आहे. मी जेव्हा तुम्हा दोघा भावांचा निकिताशी चालत असलेला खोडकरपणा, तिला चिडवणे, तिचे लाड करणे आणि मस्ती करणे हे सर्व बघते, तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यात हे काहीच मिळाले नाही याचे खूप वाईट वाटते. तुम्हा तिघांचे नाते मला खूप भावते. पण आपल्या आयुष्यातून काहीतरी निसटले गेले या जाणिवेने वेगळीच पोकळी माझ्या मनात निर्माण झाली आहे.
ही जी मला जाणवणारी पोकळी आहे ना, ती कशी भरून काढावी हेच मला समजत नाहीये.
त्यामुळे सुखासुखी असतानाही कितीही आनंदी राहायचे म्हटले तरीही मला तसे रहातच येत नाही.
आमच्या घरी कसं आई आणि मी दोघीच असायचो. त्यातून घटस्फोटाचा आईच्या मनावर खूप परिणाम झाला होता. त्या परिस्थितीतून एकमेकींना सावरायला मदत करताना माझ्या नकळतपणे माझ्यात पोक्तपणा येत गेला. कधी कसला हट्ट नाही, चेष्टा मस्करी करायलाही कोणी नाही. अगदी शिस्तबद्ध आणि आखीव-रेखीव असे आयुष्य जगलेे मी! अर्थात त्या आयुष्यातही मी आनंदी होते. आईने कधीच काही कमी पडू दिले नाही. अभ्यासात हुशार, चांगल्या गुणांनी पास होत पदवीधर झाले आणि चांगले नोकरीही लागली. त्यामुळे कधी कसलीच कमी अशी जाणवली नाही.
पण आज तुम्हां भावंडांचे आणि आई वडिलांचे असे हलकंफुलकं नातं पाहून असे वाटते की अरे, आपण असे कधी जगलोच नाही.
जगण्याची ही बाजू कधी अनुभवलीच नाही. या विचारांनी एवढ मला गुरफटलं आहे की आज मला मिळत असलेल्या सुखाचा उपभोग मी घेऊ शकत नाहीये.” दीपाने मोकळेपणाने मनातले साचलेले सर्व व्यक्त केलं.
“ अरे, एवढेच ना, मग त्यात काय एवढे? अभी तो बुढी होने तक बहुत टाइम है तेरे पास !!! तो चल, जी ले जिंदगी। करते हैं हम कुछ।" असा फिल्मी डायलॉग मारत अभिजीतने दीपाला जवळ घेतले.
दीपाने इतके दिवस थोपवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. नंतर दोघेही मनोसक्त भटकले आणि बाहेरच जेवण करून रात्री उशिरा घरी पोहोचले.
आज सकाळी उठल्यापासूनच दीपाला खूप हलकं हलकं वाटत होतं. तिच्या मनातली खंत बोलून टाकल्यामुळे तिला बरं वाटत होतं.
संध्याकाळी दीपाचा दीर, हिमांशू, अचानक तिच्याकडे आला आणि तिला म्हणाला, “ वहिनी, यावेळी तूच सांग ना मी राखीपौर्णिमेला निकितासाठी काय घेऊ?"
" अरे, आता तिला काय आवडते तुलाच जास्त माहिती असणार! मी काय सांगू त्यात?" अचानक विचारलेल्या प्रश्नाने दीपा खूप गोंधळून गेली.
" नाही वहिनी, यावेळेस तूच सांगणार आहेस. मला सांग, भावाकडून तुला कोणती भेट घ्यायला आवडली असती?" हिमांशू मागेच लागला.
" मला? दीपा थोडी विचारात पडली आणि लगेच म्हणाली, मला तर बाबा एक मोठी कॅडबरी, पांढराशुभ्र गाऊन आणि त्यावर मॅचिंग अशी भरपूर कप्पे असलेली पांढरीशुभ्र पर्स असे काहीतरी आवडले असते. अरे, पण आता विषय निकिता चालला आहे ना? मग तिच्याबद्दल मी कसे सांगू?"
" ठीक आहे वहिनी, जाऊ दे, तू काही सांगणारच नाही, त्यापेक्षा मी निकितालाच विचारतो." असे म्हणत हिमांशू तिथून निघून गेला.
हिमांशूने निकिताला काही विचारलेच नाही. निकिता रोज दोघा भावांना राखीला काय देणार म्हणून विचारायची. पण कोणी काहीच सांगत नव्हते. त्यावरून त्या बहीण-भावांचे होणारे भांडण, वादविवाद सर्वकाही पाहून दीपाला खूप वेगळेच वाटायचे. एरवी कोणत्याही सणावारांचे महत्व वाटत नसणाऱ्या दीपाला यावेळेस मात्र उगाचच राखी पौर्णिमेसाठी आपल्यालाही एखादा हक्काचा भाऊ असावा असे वाटत होते. आपणही भावाशी असेच खेळलो असतो, मस्ती केली असती आणि खूप खोड्या काढल्या असत्या असे तिला वाटू लागले.
पण हे वाटणे खूप निरर्थक आहे याची तिला जाणीव होती. त्यामुळे डोक्यातले विचार झटकून ती पुढच्या कामाला लागली.
बघता बघता राखी पौर्णिमेचा दिवस आला. त्यादिवशी निकिता तर अगदी सकाळपासूनच तयार होऊन बसली होती. दोघे भाऊ आवरून आल्यावर पाटावर बसले. निकिताने त्यांचे औक्षण केले, नारळाच्या बर्फीने तोंड गोड केले आणि दोघांनाही राख्या बांधल्या. दोघा भावांनी मिळून तिला हवा असलेला लॅपटॉप भेट म्हणून दिला. ती भेट बघून निकिता आनंदाने हुरळून गेली.
रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडल्यावर दीपाने सर्व आवरायला सुरुवात केली.
तेवढ्यात हिमांशूने तिला थांबवले आणि म्हणाला, “ वहिनी, थांब, तू नाही का भावाला राखी बांधणार?”
दीपा एकदम चमकली. तिला काय उत्तर द्यावे तेच समजेना. तरी कसेबसे म्हणाली," हिमांशू, अरे मी कोणाला राखी बांधणार?? खरं सांगू का लहानपणी तरी मानलेले भाऊ असायचे आणि त्यांना राखी बांधायचे. नंतर मात्र काळाप्रमाणे सगळं आपोआप मागे पडत गेलं."
" वहिनी भाऊ नाही असे का म्हणतेस ग तू? मी आहे ना तुझ्यासाठी भाऊ. दिराशी नाते हे भावासारखं असते. चल, बांध बघू मला राखी.
आणि हो, मला माहितीच आहे तू काही माझ्यासाठी राखी आणलेली नाहीस. त्यामुळे मीच माझ्या पसंतीची राखी घेऊन आलो आहे. हा, पण या राखी चे पैसे मात्र तुझ्याकडून घेणार बरं का!!!" असे म्हणत हिमांशू ने दीपा च्या हातात राखी दिली.
ती राखी हिमांशूला बांधताना दीपा चे हात थरथरत होते. अनपेक्षित अशा धक्क्याने तिला काही सुचतच नव्हते. औक्षण करतानाच तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले.
राखी बांधल्यानंतर हिमांशू ने दीपाला भेटवस्तू दिली आणि ते आत्ताच उघडून बघ असा तिला आग्रह केला.
दीपाने ती भेटवस्तू उघडून बघितली आणि आश्चर्यमिश्रित आनंदाने ती रडू लागली.
हिमांशू ने तिला तिच्या आवडीच्या तोच पांढरा गाऊन, पांढरी पर्स आणि मोठे अशी कॅडबरी दिली होती.
स्वतःला सावरत दीपा हिमांशूला म्हणाली,” तुला खरं सांगू का हिमांशू, आजवर आयुष्यात खूप मोठ्या मोठ्या भेटवस्तू मिळाल्या. पण आज तुझ जे काय मला दिलं आहेस ते खूप अनमोल आहे. तू मला फक्त भेटवस्तू नाही दिलीस, तर त्यासोबत दिलं एक हक्काचं नातं, ज्याची मला आयुष्यात खूप कमी जाणवत होती"
" पण वहिनीसाहेब हे नातं प्रकरण काही सोपं नाही बर का! कारण आता वहिनी आणि बहीण असं दुहेरी नातं निर्माण झाला आहे त्यामुळे चिडवण्याचा आणि खोड्या काढण्याचा डबल धमाका होणार आहे!!! तू फक्त तयार रहा." असे म्हणत हिमांशूने तिच्या डोक्यात एक टपली मारली आणि तो पळू लागला.
" थांब, बघतेच तुझ्याकडे!" असे म्हणत दीपा ही त्याच्या मागे पळाली.
अभिजीत दुरूनच सर्व गंमत बघत होता. आपल्या दिपची कळी खुललेली पाहून तोही खूप खुश झाला.
मंजुषा देशपांडे, पुणे.