श्रावणात घन निळा बरसला
रिमझिम रेशिमधारा !
उलगडला झाडांतुन अवचित
हिरवा मोरपिसारा !
‘पाडगावकरांचे गीत, ते ही लता दिदींच्या आवाजात ऐकण्याचा आनंदच वेगळा ना?'
"वर्षा झालं का तुझं? निघायच का?" घनश्यामने रेडीओचा आवाज कमी करत हाक दिली. बाहेर मुसळधार पाऊस फेर धरुन तांडव करत होता.’
'आज काय झालय काय याला? वर्षभराच एकदाच पडून घेतोय वाटत.' त्याच्या मनात विचार आला. "वर्षा झालं का गं? " त्याने परत आतल्या दिशेने पाहत विचारले. पण काहीच उत्तर मिळाले नाही.
'हिचा आपला नेहमीचा उशीर. एवढ्या दिवसांनंतरही काही बदल झालेला नाही. आहे तशीच आहे.' म्हणत घना किचनकडे वळणार तेवढ्यात टेलिफोनची रिंग वाजली.
"हॅलो!"
"घना तात्या बोलतोय." पलिकडून चाचपडत्या आवाजात.
"हा, तात्या बोला ना! कसे आहात?"
"मी ठिक रे, ते हॉस्पीटलमध्ये वर्षा...." तात्या मधेच अडखळले.
"हो काका, आम्ही तिथेच निघालोय चेकपसाठी. एक, एकच मिनिट ह... " म्हणत त्याने रिसिव्हर बाजुला करुन पुन्हा एकदा वर्षा असा आवाज दिला.
"तुला केव्हा समजलं? फार वाईट झाल रे! वर्षा..." तात्या फोनवरती रडायला लागले. त्यांचा रडण्याचा आवाज घनाला अगदी स्पष्ट ऐकू येत होता.
"काका झालं तरी काय? बोला ना! वर्षाला फोन देऊ का?"
"वर्षाला फोन कसा देणार? ती गेली ना रे. आपल्याला सोडून गेली रे ती... कायमचीच!" काका पुन्हा हमसून हमसून रडू लागले होते. ते काय बोलत आहेत ते ऐकून घनाचे तर आवसानच गळून पडले.
"वेड्यासारख काय बोलताय काका... कस काय शक्य आहे? ती... ती तर काल रात्रीच इथे आली... आम्ही आत्ता हॉस्पिटलमध्ये निघालो आहोत."
"घना... तू ठीक आहेस ना? तुला शॉक लागला असेल ऐकून, लागणार म्हणा, एकत्र राहत नसलात तरीही शेवटी तुझी बायको होती ती ... पण हेच खर आहे. वर्षा आता आपल्यामध्ये नाही आहे."
काकाचे शेवटचे वाक्य, आणि घनाला दरदरुन घाम फुटला होता. हातातले रिसिव्हर गळून पडले. दुसर्याच क्षणी त्याने किचनकडे धाव घेतली.
'वर्षा!'
'वर्षा!'
खुप वेळा आवाज दिला, सैरभेर शोधल त्याने, पण वर्षा घरी कुठे दिसेना. गोठून टाकणारा गारवा हवेत पसरला होता, बाहेर घनघोर पाऊस आणि याच्या मस्तकावरुन मात्र घामाचे ओघळ लागले होते.
'काल रात्रीच तर आली ती. मध्यरात्री... त्या बाहेरच्या जुईच्या झुडपाखाली उभी होती माझी वाट पाहत. केवढी भिजली होती. मला पण घरी यायला उशीर झाला होता. आल्या-आल्या माझ्या मिठीत शिरून खुप-खुप रडली वेडी. किती गप्पा मारल्या आम्ही... मग एकदास ठरवुन टाकलं, यापुढे भांडायचे नाही. मी अगदी शुल्लक गोष्टीवरुन भांडत बसायचो, एकदा ती रागावून माहेरी निघून गेली ती ६-७ महिने आलीच नाही, आणि मी पण हट्टी... तिला आणायला ही गेलो नाही. ना फोन... ना भेट. पण काल आली ती. हो कालच आली... लवकरच मी बाबा होणार आहे हे सांगायला. मला पक्क आठवतंय. मी काय वेडा नाही. तिचे काका काहीही बोलतात. बेडरुममध्ये असेल.... असेलच....'
त्या बाहेरच्या पावसासारखाच बेभान झालेला घना बेडरुमकडे वळला.
'कपाटाच्या इथे? नाही... नाही... तिला तयार व्हायला वेळ लागतो ना, आरश्याच्या इथे असेल... नाही, मग बाथरुममध्ये?' अख्खे घर शोधून झाले, तेव्हा हताश घना डोक हाताने गच्च धरुन पलंगावर बसला. काय चालल आहे हे त्याच त्यालाच कळेना. आसमंत बडबडला, तडफडला, खुप रडला. अगदी बरसणार्या पावसासारखा. बाजूला असेलेल्या टेलीफोनची रिंग वाजून-वाजून थकली, एक... दोन, तीन वेळा... कितीतरी वेळ फोन वाजतच राहीला होता.
एका घटीकेचा अवधी हा हा म्हणता सरला होता. कडाडून विजेने आपण आल्याची वर्दी दिली. ढगांचा नाद सुरु झाला आणि पुन्हा पावसाने जोर धरला. वादळवार्याने एकाकी बंद खिडकी खडखडून उघडली होती. त्या आवाजाने शुद्धीवर येऊन घना पलंगावरून उठला. बाजूचा फोन उत्तराच्या अपेक्षेने अजून ही अधूनमधून वाजतच होता. घनाने तो सुन्नपणे कानाला लावला.
"घना तू ठिक आहेस ना? आम्ही वाट पहातोय रे हॉस्पिटलमध्ये. येतोयस ना?" तात्या मलुल आवाजात बोलत होते.
"सारच संपलं. आता काय बाकी आहे काका. माझ्यासाठी संपलं सगळ."
"अरे अस म्हणू नकोस. त्या लहान जिवासाठी तरी. तुझी वर्षा एक छोटी कळी मागे सोडून गेली आहे. इथून कायमचेच निघून जाण्याआधी तिने काल एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि मध्यरात्री अचानक जीव सोडला."
"म्हणजे काका... मला मुलगी झाली..." पुढे घनाच्या तोंडातून एकही शब्द फुटेना.
आता त्याला एकत्रीतपणे मिळालेला आनंद आणि त्याबरोबरच आलेले दुखः या दोन्ही गोष्टी पचविणे जड झाले होते. अवाक होऊन तो पुन्हा जागच्या जागीच कोसळला. बाजूच्या धडधडणार्या खिडकीतून अचानक आतमध्ये सपकन थोड्या जनधारांचा मारा झाला होता. त्यासरशी बाहेरुन आत डोकावू पहाणार्या जाईच्या वेलीची ओंजळभर ताजी टवटवीत फुले त्या लालसोनेरी चादरीच्या घडीवर येऊन विखुरली. तिचं चादर, जी सभोवती लपेटून वर्षा त्याच्या कुशीत शांत निजली होती. काल रात्री...कदाचित कायमचीच...स्वप्नात की सत्यात?
पलिकडून तात्या फोनवरती बडबडत होते. "तुला माहिती आहे. वर्षाने तर बाळाच नाव सुद्ध्या ठरवून ठेवल होत रे. मुलगा झाला तर विहंग... आणि मुलगी झाली तर जाई. तुझी जाई तुझी वाट बघतेय. येतोस ना?."
त्या जाईच्या फुलांसकट ती चादर उराशी लावून घना खिन्न मनाने उठला. तसेच रडविले नेत्र पुसत घाईघाईने निघालाही, त्याच्या जाईला भेटायला. सकाळपासून सुरु असलेली पावसाची रिपरिप ही थांबली होती.
कधीही न थांबण्यासाठी एक चिरंतन पाऊस आता घानाच्या आत बरसू लागला. आत... मनात... खोलवर...
त्याच्या आणि वर्षाच्या विरहाचा पाऊस.
समाप्त
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुर्वप्रसिद्धी - "रेशिमधारा" पावसाळा ई विशेषांक २०२० https://drive.google.com/file/d/1axoKzr6csU5YUmYhOGrm7wk_BtzyCjvM/view?u...
©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन.
https://siddhic.blogspot.com
समाप्त
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुर्वप्रसिद्धी - "रेशिमधारा" पावसाळा ई विशेषांक २०२०
https://drive.google.com/file/d/1axoKzr6csU5YUmYhOGrm7wk_BtzyCjvM/view?u...
©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
काही ग्रामीण शब्द -
मिरग-मृग नक्षत्र.
पानांची चंची- खाऊचे पान व सुपारी कात हे ठेवण्याचा डब्बा.
बेडे- अंगणाबाहेर बांबूचे कुंपण असते त्यावरील बांबूचा गेट.