मायाजाल- ९
इंद्रजीतला गुंडांनी असा काही मार दिला होता की, त्याच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा दिसत नव्हत्या; पण मुका मार लागल्यामुळे वेदना खूप होत होत्या. अंग आणि चेहरा काळा - निळा पडला होता. उठून उभं रहाण्याची ताकत त्याच्यात राहिली नव्हती.
त्याने प्रज्ञाला फोन करून घरी बोलावून घेतलं. प्रज्ञा जेव्हा त्याला भेटायला गेली; तेव्हा त्याची अवस्था बघून घाबरली,
" इंद्रजीत! हे सगळं कसं झालं? तुझ्या गाडीचा अॅक्सिडेंट झाला की काय? किती लागलंय तुला!"
"त्या दिवशी सिनेमावरून घरी येताना चार गुंडांनी माझी गाडी अडवली----" आणि त्याने तिला घडलेला सगळा प्रकार सांगितला.
त्याने तिला त्या गुंडांनी दिलेल्या धमकीविषयी सांगितलं. तेव्हा प्रज्ञा आश्चर्याने म्हणाली,
" हे जे कोणी लोक आहेत; त्यांचा अापल्या लग्नाशी काय संबंध? माझं डोकं सुन्न झालंय! त्यांनी तुला परत त्रास दिला तर?--- मला असं वाटतं की आपण पोलिसात तक्रार करायला हवी!"
" मी तक्रार केली आहे! पण खरं सांगू? मला वाटतं की; त्यांना चोरी करायची होती; आणि चोरीला वेगळा रंग देण्यासाठी ते मुद्दाम काहीतरी बोलून गेले. तू उगाच घाबरून जाऊ नकोस! आणि माझ्या घरी यातलं काही सांगू नकोस नाहीतर माझे आई - बाबा उगाच घाबरतील! ' ते चोर होते' ; एवढंच मी त्यांना सांगितलंय!” प्रज्ञाने होकारार्थी मान हलवली. पण मनातून ती खूप घाबरली होती. विचार करत होती,
“हे कोण आहेत?? आमच्याशी त्यांचं काय वैर आहे? आणि आमचं लग्न होऊ नये असं त्यांना का वाटतंय?
ते लोक चोर होते; हा इंद्रजीतचा तर्क चुकीचा होता; हे लवकरच सिद्ध झालं!
*******
एक महिना गेला.गंभीर दुखापत झालेली नव्हती; त्यामुळे इंद्रजीतच्या प्रकृतीत सुधारणा लवकर झाली होती. मधल्या अवधीत काही विशेष घडलं नव्हतं. त्याने त्याच्या कामाला सुरूवात केली.
तो एक दिवस हॉस्पिटल मधून घरी येत होता. गाडीतलं पेट्रोल खूपच कमी झालं होतं; म्हणून त्याने पेट्रोल पंपाच्या दिशेने गाडी वळवली. त्याच्या लवकरच लक्षात आलं की त्याच्या गाडीचा स्पीड कमी होत नव्हता. त्याने ब्रेक लावून पाहिला.... ब्रेक लागत नव्हता ---जबरदस्त वेगाने गाडी रस्त्यावरून धावत होती. "काही दिवसांपूर्वीच गाडीचं सर्व्हिसिंग करून घेतलं होतं! ब्रेक फेल होणं कसं शक्य आहे?" जीत विचार करत होता --- पण आता विचार करून उपयोग नव्हता -- त्याच्या जिवावर बेतलं होतं --
सुदैवाने दुपारची वेळ असल्यामुळे रस्त्यावर पादचा-यांची फारशी गर्दी नव्हती. पण मागे पुढे वेगाने धावणा-या गाड्या चुकवताना, इंद्रजीत घामाघुम झाला होता. सुदैवाने काही वेळाने त्याच्या गाडीचा स्पीड आपोआपच कमी होत गेला आणि गाडी थांबली. खाली उतरून त्याने पाहिलं गाडीतलं पेट्रोल संपलेलं होतं आणि त्यामुळे गाडी थांबली होती. जर रहदारीच्या वेळी गाडी रस्त्यावर असती तर? आज काय होऊ शकलं असतं; या विचाराने इंद्रजीतच्या अंगावर काटा आला! त्याने मेकॅनिकला फोन केला आणि गाडी गॅरेजमध्ये पाठवली. घरी जाण्यासाठी त्याने टॅक्सीला हात केला; आणि त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. अनोळखी नंबर होता. समोरून जड आवाज आला ...." नशीबवान आहेस! आज परत वाचलास! पण पुढच्या वेळेची मात्र गॅरंटी नाही. परत एकदा सांगतो ---- जिवंत रहायचं असेल तर त्या मुलीचा नाद सोड. हकनाक बळी जाऊ नकोस."
दुस-या दिवशी मेकॅनिकने सांगितलं; की ब्रेक - फेल कोणीतरी मुद्दाम केले होते.
आता मात्र इंद्रजीतच्या हृदयाचा ठोका चुकला. " हा कोण माणूस आहे? समोर येत का नाही? माझ्याशी याची काय दुश्मनी आहे? आणि प्रज्ञाशी याचा काय संबंध?" आता तो ह्या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करू लागला,
" कोणीतरी जाणूनबुजून माझ्या मागे लागलाय! हे प्रकरण वाटत होतं तितकं सोपं नाही! काहीही करून हा माणूस कोण आहे; याचा शोध घ्यावा लागेल!"
जेव्हा प्रज्ञाला हे सर्व त्याने सांगितलं तेव्हा ती हादरून गेली,
"म्हणजे ते गुंड चोर नव्हतं! हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. तू पुढे काय ठरवलंयस? आपण काही दिवस भेटणे बंद केलेलं बरं! तुला या सगळ्याचा फार त्रास होतोय, जीत!" ती काळजीच्या स्वरात म्हणाली.
"हा माणूस आता एवढा त्रास देतोय लग्नानंतरही तुला असा त्रास देत राहिला तर काय करायचं? आपल्या डोक्यावर सतत टांगती तलवार असेल!" आपल्या मनातली भिती तिने बोलून दाखवली.
" तो कोणीही असो आपल्याला घाबरण्याचं कारण नाही! मी सगळा विचार करून ठेवलाय! आपलं लग्न झालं, की आपणा ऑस्ट्रेलियाला किंवा लंडनला सेटल होऊ. मी तसा प्रयत्न करायला सुरुवात केली आहे.माझी इन्टर्नशिप लवकरच पूर्ण होतेय; त्यानंतर मी तिकडे जाऊन सगळी व्यवस्था करेन, आणि लग्नासाठी येईन तेव्हा तुला तिकडे घेऊनच जाईन. " इंद्रजीत तिला धीर देत म्हणाला.
प्रज्ञाला आता जीतची काळजी वाटू लागली होती. हाॅस्पिटलच्या ड्युटीमुळे त्याला रात्री उशीर होणं; ही नेहमीची बाब होती. त्या लोकांनी रात्री रस्त्यात त्याला परत गाठलं तर? आता प्रज्ञाने त्याच्याबरोबर बाहेर जाणं कमी केलं. अभ्यासाची सबब सांगून ती त्याला टाळू लागली. बरेच दिवस दोघं एकत्र दिसली नाहीत; तेव्हा हर्षदने तर्क केला; "जीत बहुतेक घाबरून गेलेला दिसतोय! काही दिवसांनी नक्कीच लग्न मोडल्याची बातमी येईल! चला! माझं काम झालं."
**********
बघता बघता काळ पुढे गेला. प्रज्ञाची फायनल एक्झॅम जवळ आली! इंद्रजीतला 'एम. एस.' साठी प्रवेश मिळाला होता. पण त्याच बरोबर तो हाॅस्पिटलमध्ये पार्ट - टाइम जाॅब करत होता. बऱ्याच वेळा नाईट- शिफ्ट करावी लागत होती. त्यामुळे दोघांची भेट फारशी होत नव्हती. फार फार तर फोनवर बोलणं होतं. त्यामुळेच की काय, त्याच्यावरचे हल्ले थांबले होते. त्याने घाबरून प्रज्ञाला भेटणं बंद केलं असावं अशी हर्षदची आता खात्री पटली होती.
"इंद्रजीत किती भित्रा आहे; मला चांगलंच माहीत आहे! काही दिवसांनी नक्कीच लग्न मोडल्याची बातमी येईल." हर्षद स्वतःची पाठ थोपटत होता.
यानंतर काही दिवस चांगले गेले.
********
इंद्रजीतचे आई-वडील लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी घाई करत होते. अनेक वर्षांपासून एकुलत्या एका मुलाच्या लग्नाची स्वप्नं त्यांनी पाहिली होती; ती सत्यात उतरताना पहाण्याची त्यांची इच्छा गैरवाजवी नव्हती.
त्या दिवशी रविवार होता त्यामुळे प्रज्ञा घरीच होती. हर्षदला सुट्टी होती. तो प्रज्ञाच्या घरी आला त्यावेळी सगळे चहा पीत होते. हर्षदलाही आईने चहा आणून दिला.
" काय प्रज्ञा! तुझे शेवटचं वर्ष आहे ना? अभ्यास कसा चाललाय? " त्याने गप्पांच्या ओघात सहज म्हणून विचारलं.
" पुढच्या महिन्यात परीक्षा झाली, की तिच्या लग्नाच्या तयारीला लागायचं आहे. इंद्रजीतचे आई-बाबा लग्नाचा मुहूर्त लवकर काढा, असं म्हणतायत!" आई तिच्या दृष्टीने हर्षदला आनंदाची बातमी देत होती. पण हर्षद मनातून किती संतापलेला आहे; याची तिला कल्पना नव्हती. तो वरकरणी म्हणाला,
" ठरलेलं लग्न लवकर झालेलं बरं! पण जीत तयार आहे का? त्याला 'एम. एस.' करायचं आहे - आॅर्थोपेडिक सर्जन होणार; असं म्हणत होता! त्यानंतरच लग्न करायचं असं त्यानं ठरवलं होतं. "
" लग्न झाल्यावर लंडनला स्थाईक होणार, असं म्हणतोय. त्याच्या वडिलांचा बिझनेस तिकडे आहे त्यामुळे त्यांना तो देश परका नाही. पुढचं शिक्षण-राहाणं--- प्रॅक्टिस --सगळी व्यवस्था छान होईल ,असं तो म्हणतोय." हे सगळं हर्षदला सांगण्याचा पुढे काय परिणाम होईल याची कल्पना आईला नव्हती.
" पण प्रज्ञा तर नेहमी म्हणायची; की, ' मी कितीही शिकले, तरी भारताबाहेर जाणार नाही!' ; तिला हे कबूल आहे?" हर्षदने आश्चर्याने विचारलं.
" काय करणार? लग्न झालं, की इंद्रजीत जिथे जाईल तिथे मला गेलंच पाहिजे!" प्रज्ञा हसत म्हणाली.
देश सोडण्याचं खरं कारण हर्षदला सांगणं तिला योग्य वाटत नव्हतं.
हर्षद मनातून खवळला होता.
"असा प्लॅन आहे तर! बरं झालं; मला वेळीच कळलं!" तो स्वतःशी म्हणाला.
" मला जरा महत्वाचं काम आहे, मी आता निघतो." म्हणत तो घाईघाईत बाहेर पडला. रागाने त्याचे डोळे लाल झाले होते. चेह-याचे स्नायू ताणले गेले होते! स्वतःशीच पुटपटत होता,
" अजूनपर्यंत मित्र म्हणून जीतची गय केली. आता मात्र त्याला जन्माची अद्दल घडवली पाहिजे! बघतोच-- कसा प्रज्ञाला घेऊन लंडनला आणि आॅस्ट्रेलियाला जातो ते! जीत! यापुढे तू चार पावलं चालूही शकणार नाहीस. परदेशी जाणं तर दूरच राहिलं. "
तो मनाशी काही तरी ठरवत होता; आणि ते नक्कीच भयंकर होतं.
******** contd --- part x