mayajaal - 8 in Marathi Fiction Stories by Amita a. Salvi books and stories PDF | मायाजाल - ८

Featured Books
Categories
Share

मायाजाल - ८

मायाजाल -- ८
नेहमीचं कॉलेज रुटीन चालु झालं पण इंद्रजीतचं प्रज्ञाच्या घरी येणं-जाणं मात्र चालू राहिलं. खरं तर आता वाढलं! त्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. तो सीनियर असल्यामुळे प्रज्ञाला अभ्यासासाठी त्याचं मार्गदर्शन मिळत होतं. बऱ्याच वेळा काॅलेजमधून घरी जाताना दोघं एकत्र जात होते.
त्यांची सलगी हर्षदच्या डोळ्यात खटकत होती ; पण सध्या तरी तो काही करू शकत नव्हता.
इंद्रजीतला प्रज्ञाविषयी सांगून त्याचं मन कलुषित करण्याचा त्याचा प्रयत्न फसला होता. आता तो प्रज्ञाला त्याच्या रंगेल स्वभावाविषयी सांगून तिला सांभाळून रहाण्याचा सल्ला सतत देत होता. पण प्रज्ञाला इंद्रजीतच्या वागणुकीत काहीही वावगं दिसत नव्हतं; उलट त्याच्या वागण्या-बोलण्यात परिपक्वता होती--चांगले संस्कार होते; त्यामुळे तिने हर्षदच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं होतं. त्या दोघांमध्ये भिंत उभी करण्याचे हर्षदचे सगळे प्रयत्न वाया गेले होते. तिने एकदा त्याला विचारलं,
"इंद्रजीत तुझा मित्र आहे नं? त्याच्याविषयी तू एवढं वाईट का बोलतोस? तो तर तुला त्याचा मोठा भाऊ म्हणतो!"
" मित्र म्हणून तो मला प्रिय आहे! पण मला तुझी काळजी आहे; म्हणून मी तुला सावध करण्याचा प्रयत्न करतोय! माझं कर्तव्य मी केलं आहे; माझ्यावर विश्वास ठेवायचा; की त्याच्यावर, हे तुझं तूच ठरव!" हर्षदने तिला समजावण्याचा आणखी एक असफल प्रयत्न केला.
पण शिबिराच्या वेळी प्रज्ञाने इंद्रजीतच्या स्वभावातले असे पैलू पाहिले होते; की हर्षदचं म्हणणं तिला पटणं शक्यच नव्हतं.
इंद्रजीतमुळे प्रज्ञाचा बुजरेपणा आता ब-याच अंशी कमी झाला होता. काॅलेजमध्ये ती सगळ्यांशी मिळून मिसळून वागत होती. हास्यविनोदात भाग घेत होती. तिचा अभ्यासही तितकाच जोमानं सुरू होता.
********
इंद्रजीतने फायनल एक्झॅममध्ये चांगलं यश मिळवलं. उत्तम मार्क्स असल्यामुळे मुंबईच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याला इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. हे कळलं; तेव्हा तो प्रथम प्रज्ञाला भेटायला आला.
" मला वाटलं होतं, कुठेतरी बाहेरगावी जावं लागेल. पण नशीब! इथेच इंटर्नशिप करायला मिळतेय . " तो उत्साहाने प्रज्ञाला सांगत होता.
" हो! बाहेरगावी एकटं रहाणं खूप त्रासदायक असतं. आता तुला घरापासून दूर जायची भीती नाही. तुला हाॅस्पिटल खूप चांगलं मिळालंय. भरपूर अनुभव मिळेल! तुझं मनःपूर्वक अभिनंदन!" प्रज्ञाने मनापासून त्याचं अभिनंदन केलं.
" सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आता तुझ्यापासून दूर जावं लागणार नाही!" तो प्रज्ञाच्या डोळ्यात पाहत म्हणाला.
प्रज्ञाची नजर खाली गेली पण तिच्या ओठांवर हसू होतं. काही न बोलता तिने प्रेमाची कबूली दिली होती! त्याचं मन तिने कधीच जाणलं होतं पण तो इतक्या सहजपणे त्याचं मन मोकळं करेल असं तिला वाटलं नव्हतं. ओळख झाल्या पासून काही ना काही निमित्ताने तो सतत तिच्या सहवासात रहाण्याचा प्रयत्न करत होता; आणि जरी तिने कधी बोलून दाखवलं नाही; तरी तो दिसला नाही की तिचंही मन बेचैन होत होतं. मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं दोघांनाही कळलं नव्हतं.
*********
इंद्रजीत डाॅक्टर झाला; आणि अनेक उपवर मुलींसाठी विचारणा होऊ लागली. " सगळ्याच मुली सुशिक्षित आणि घरंदाज आहेत! तू अगोदर फोटो पसंत कर! मग मुली पहाण्याचं बघू!" आई त्याला समजावत होती.
"मला एवढ्या लग्न करायचं नाही. आणि फोटोही पहायचे नाहीत!" इंद्रजीत म्हणाला.
"एवढा का नाराज होतोयस? तू आमच्यासाठी सून अगोदरच पसंत केली नाहीस नं?" आईच्या या प्रश्नावर इंद्रजीत हसला,
"हो! पसंत केलीय! तू ओळखतेस तिला! पण हे लग्नाचं एवढ्यात बोलू नकोस! अजून मी शिकतोय ! थोडे दिवस मला मोकळा ठेव!" तो म्हणाला.
" पण ती कोण आहे; हे तर सांग!" आईच्या या बोलण्यावर इंद्रजीतला प्रज्ञाविषयी सांगावंच लागलं.
इंद्रजीतचे आई वडील एकुलत्या एका मुलाच्या आनंदात आनंद मानणारे होते. इंद्रजीतने एवढी चांगली मुलगी पसंत केल्याबद्दल त्यांना आनंदच झाला. त्यांनी प्रज्ञाच्या घरी जाऊन रीतसर मागणी घातली. लग्नाचा प्रस्ताव दोन्ही घरांमध्ये मान्य झाला. अविनाश आणि स्नेहलताईनी लगेच लग्न ठरवल्यामुळे इंद्रजीत मनातून घाबरला होता, की लग्नाची तारीखसुद्धा लगेच ठरवली जाईल! पण प्रज्ञाचे वडील तिचं एम. बी. बी. एस. पूर्ण होण्याआधी तिचं लग्न करून देण्याच्या विरोधात होते. प्रज्ञालाही त्यांचं म्हणणं पटत होतं त्यामुळे लग्न ती डाॅक्टर झाल्यावरच करायचं असं ठरलं! मधे कधीतरी वर्षभरात साखरपुडा करून घ्यायचा;असं नक्की झालं.
महिन्यापूर्वीच हर्षद एम. बी. ए. उत्तम रीतीने पास झाला होता. मोठ्या कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू देत होता.
एके दिवशी संध्याकाळी एका मोठ्या इंटरनॅशनल कंपनीत नोकरी मिळाल्याची बातमी आणि मिठाईचा बाॅक्स घेऊन तो प्रज्ञाकडे आला. तिथे प्रज्ञाच्या आईने त्याच्या हातावर पेढा ठेवत प्रज्ञाचं लग्न ठरल्याची बातमी त्याला दिली. हर्षदचा चेहरा कसानुसा झाला. पण वरकरणी त्याने प्रज्ञाला शुभेच्छा दिल्या.
तो तिथून बाहेर पडताना मनाशी म्हणत होता.
"इंद्रजीत मला भाऊ मानत होता; पण मला अंधारात ठेऊन इथपर्यत मजल मारली. लग्न ठरल्याचं मला कळवावं असंही त्याला वाटलं नाही. प्रज्ञापासून दूर रहा असं अनेक वेळा सांगूनही त्याने माझं ऐकलं नाही! आता मलाही मैत्रीची कदर ठेवण्याची काहीच गरज नाही. हे लग्न कसं होतं; ते मी बघून घेईन! मी ठरवलं होतं, बेकायदेशीर कामे आणि वाईट मित्रांची संगत सोडून द्यायची; पण त्याला धडा शिकवायला ;आता त्यांचीच साथ घ्यावी लागणार. माझे दोस्त वाईट असले; तरी जिवाला जीव देणारे आहेत. अजूनपर्यंत मला खूप उपयोगी पडले; यापुढेही ते नक्कीच मला मदत करतील."
प्रेमाची भावना एकतर्फी असून चालत नाही; हे हर्षद विसरून गेला होता.
********
त्या दिवशी रविवार होता. इंद्रजीत सिनेमाची दोन टिकिटे घेऊन आला.
" इराॅसला छान सिनेमा लागलाय. सहाचा पिक्चर आहे. लवकर तयार हो ! नाहीतर उशीर होईल." तो खूपच घाईत होता.
"आता इतक्या लांब जायचं? घरी परतायला उशीर होईल! आपण पुढल्या रविवारी जाऊ!" प्रज्ञा टाळाटाळ करू लागली.
"पुढच्या रविवारपर्यंत हा सिनेमा रहाणार नाही.आई ! आता तुम्हीच सांगा हिला. हाउसफुल्ल सिनेमाची टिकिट्स मिळाली आहेत! इंद्रजीतने नेहमीप्रमाणे नीनाताईंकडे वशिला लावला. त्या त्याचा शब्द कधीच खाली पडू देत नसत; हे त्याला चांगलंच माहीत होतं.
" तो एवढं म्हणतोय तर जा गं! अभ्यास रोजचाच आहे! ते पुस्तक बाजूला ठेव पाहू! " आईने त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याला साथ दिली.
आता मात्र प्रज्ञा काही न बोलता तयारीला लागली. लग्न ठरल्यापासून प्रथमच ती इंद्रजीतबरोबर बाहेर निघाली होती. इंद्रजीत आज नेहमीसारखाच बोलेल आणि वागेल; की तो आता बदललेला असेल? ती मनातून थोडी घाबरली होती; म्हणूनच सिनेमाला जायचं टाळत होती.
"आम्ही हाॅटेलमध्ये जेवून येऊ! थोडा उशीर झाला तर काळजी करू नका!" इंद्रजीत बाहेर पडताना म्हणाला.
" फार उशीर करू नका!" अनिरुद्ध जरा कडक शब्दात म्हणाले.
"होय बाबा! काळजी करू नका!"म्हणत इंद्रजीत प्रज्ञाला घेऊन बाहेर पडला.
"तिच्या मनात जायचं नव्हतं ; तर कशाला तिला पाठवलंस?" ती दोघं गेली आहेत याची खात्री करून घेत बाबा नीनाताईंना म्हणाले. ते जरा रागावलेले वाटत होते.
"तुमच्या मुलीला अभ्यासाशिवाय काही सुचत नाही. आता तिचं लग्न ठरलंय--- तिनं थोडं बदलायला हवं! नशिबानं आपल्याला इंद्रजीतसारखा हौशी जावई मिळालाय! त्याच्या आवडीनिवडी जपायला नकोत का?" आईने त्यांना समजावलं.
" हो! पण आपल्या मुलीची किंमत नको ठेवायला? ती बरोबर बोलत होती! एवढ्या उशीरा जाण्यापेक्षा नंतर कधी तरी सिनेमाला जाऊ शकले असते!"
यावर नीनाताईंकडे उत्तर नव्हतं. त्यांनी काहीतरी निमित्त काढून किचनमध्ये जाणं पसंत केलं.

********
घरी येताना बरीच रात्र झाली होती. प्रज्ञाला घरी सोडून इंद्रजीत निघाला. एका निर्मनुष्य बोळातून गाडी जात असताना दोन अनोळखी माणसं अचानक् समोर आली. इंद्रजीतने ब्रेक लावला; आणि गाडी थांबवली.
"भाऊ! रस्त्यावर जरा सांभाळून चाला! आता ब्रेक वेळेवर लागला नसता तर गाडीखाली आला असतात, आणि लोकांनी मलाच जबाबदार धरलं असतं!" तो चिडून म्हणाला.
"ए! जास्त शाणपत्ती करू नको! चल! खाली उतर!" त्यांच्यापैकी एक डाफरला.
इंद्रजीतला त्यांनी खाली उतरायला भाग पाडलं आणि त्याला मारहाण करायला सुरुवात केली. रक्तबंबाळ स्थितीत त्याला तिथेच सोडून जाताना एकाने वॉर्निंग दिली,
“त्या मुलीचा नाद सोड! नाहीतर---- पुढच्या वेळी जिवंत राहणार नाहीस!”
******** Contd---- part lX