१२. संग्राम (रँग्नारॉक)...
हिमांशूला इंटेरोगेशन रूममध्ये बसवले गेले होते. त्याचे दोन्ही हात समोरील टेबलच्या दोन टोकांना इंचभर साखळी असलेल्या बेड्यांना बांधले होते.
हिमांशू वाट पाहत होता... पुढं काय होतंय याची... कोण प्रवेशणार...? काय विचारणार...?
पण काही का विचारेनात हिमांशू उत्तरं ठरवून बसला होता...!
आता त्याच्या डोक्यातील विचलन थंड झालं... तो कोणातरी येण्याची वाटच पहात होता...
आणि जो प्रवेशाला; तो शक्ती! शक्तीला पाहून हिमांशूने मनमस्तिष्क मध्ये बांधलेले सारे इमले क्षणांत धाराशाही झाले!
त्याने स्वतःला कितीही तयार केलं असलं, तरी त्याला ही अपेक्षा नक्कीच नव्हती की शक्ती आत येईल...!
"सरप्राईज! सरप्राईज!" शक्ती त्याच्यासमोर बसत म्हणाला!
"तू?" कोरड्या चेहऱ्याने हिमांशू उद्गारला.
"डॅनियलचा मोबाईल अनट्रेसेंबल आहे. नम्याला माहीत असलेल्या ठिकाणी तो असण्याची शक्यता नाही. तुलाच त्याचं वेअरअबाऊट माहीत असेल म्हणून आलो. बोल!" शक्तीने थेट मुद्दा उचलला.
"तुला वाटतं मी बोलेन?" तोंडावर घृणीत मग्रूरी आणत हिमांशू उद्गारला.
"तुझ्या माहितीसाठी सांगतो! इथले सगळे कॅमेरे बंद आहेत! त्यामुळे इथं मी तुझ्याशी काहीही केलं, तरी कोण मला विचारणार नाही! आणि विचारलंच तर सांगेन आत्मरक्षेसाठी मारलं!"
"आणि तुला वाटतं हे लोक तुझ्यावर विश्वास ठेवतील?"
"जे लोक मला इथं एक्सेस देऊ शकतात, ते मी सांगेन ते मान्यही करू शकतात. ते खोटं आहे हे माहीत असून...!" शक्तीने खंडन केले!
आणि त्याने आपली मॅग्नम काढून टेबलवर ठेवली.
"ही काय करू शकते हे माहीत असेलच तुला!" शक्तीने धमकावत विचारलं. शक्तीच्या चेहऱ्यावर कुटील हास्य होतं.
हिमांशू मात्र डोळ्यांतून आग ओकत होता...
हेडकॉर्टर्सच्या सेकंड फ्लोअरवरून शक्ती काचेतून बाहेरील रहदारी पाहत उभा होता! पहाट होण्यास फार वेळ नव्हता. तरी आभाळात सूर्याची किरणं पसरण्याऐवजी ते अधिक गडद झालं होतं...
"सर, जुना राजवाडा पोलिसांनी हिमांशूने सांगितलेल्या को-ओर्डीनेट्सवर छापा मारला. पण तिथं कोणी सापडलं नाही! पन्हाळ्याच्या पोलीसांना पण तिथलं फार्म हाऊस रिकामं मिळालं.
"तुम्ही सांगितल्या प्रमाणे कोल्हापूर बाहेर जाणारे सगळे रस्ते सील केलेत. विमानतळ आणि रेल्वे स्टेशन्सवर वॉच ठेवला आहे. तिथेही डॅनियलचा काही स्ट्रेस नाहीत!" एसपी शक्तीला माहिती पुरवत बोलला.
"इन दॅट केस, तो एकाच ठिकाणी असू शकतो!" बाहेर पहातच शक्ती बोलला आणि त्याने एसपीकडे पाहिलं!
अल्प पळातच पाच कोल्हापूर पोलिसांच्या फोर व्हीलर्स कोल्हापूर मध्यवर्ती रस्त्यावर धावत होत्या. सर्वांत पुढं डॅनियलची गाडी होती... जी त्याने शक्तीला दिली होती...
या गाड्या सिराज नाईट क्लबला लागल्या.
गाड्यांतून शस्त्र सज्ज टेररीजम सेल ऑफिसर्स बाहर पडले आणि गन्स उंचावूनच सहा ऑफीसर्स बूटांच्या टाचांचा टापांसारखा आवाज करत सिराज नाईट क्लबमध्ये शिरले!
बाकी सहा कव्हरसाठी बाहेरच तैनात राहिले. आणि चार ड्रायव्हिंग सीटवर तयार!
आत नेहमीच्या राजेशाही थाटात डॅनियल समोरच्या सोफ्यावर बसला होता. एक पाय समोरील टेबलवर.
धाडधाड् आत आलेल्या आणि त्याला घेरलेल्या ऑफिसर्सना पाहून डॅनियल घाबरायचं सोडून हसला.
शक्ती निवांतपणे खिशात हात घालून ऑफिसर्स मागून आत प्रवेशला.
"मला माहित होतं, तू माझी इथंच वाट पाहत असणार!" शक्ती आत आल्या आल्या त्याला म्हणाला.
शक्तीला पाहून तर डॅनियलच्या मुखावरच हास्य अधीकच खुललं!
तो जागचा उठला. सर्व ऑफिसर्सना वाटलं, तो काही करण्याच्या विचारत आहे म्हणून सगळे अधिकच सतर्क झाले. त्यांच्या गन्सवरील पकडी अधिकच घट्ट झाल्या आणि नेम डॅनियलवर पक्का केला.
पण त्यांच्या कल्पनेनुसार काही झालं नाही. डॅनियल वळून पश्चिमेला तोंड करून हाफ सोफ्यावर बसला.
मावळतीला तोंड करून त्याने आपली हार पत्करल्याचा संकेत दिला होता. शक्ती त्याच्यासमोर पूर्वेला तोंड करून बसला.
बाहेर सूर्य उगवत होता आणि आत त्याच्या विजयाचा सूर्य उदयोन्मुख होता...
काही पळ डॅनियल काहीच बोलला नाही! तो फक्त स्मित ओठांवर घेऊन प्रसन्न चेहऱ्याने शक्तीला न्याहाळत होता.
शक्ती काय ते समजला. त्याने आपल्या साथीदारांना बाहेर जाण्याचा इशारा केला. ऑफिसर्स मागे पाऊलं टाकत गन्स पॉइंटेड ठेऊनच क्लब बाहेर गेले.
"मला खूप गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. म्हणून हा खेळ अजून खेचायचा होता... पण तुला घाई होती! सो बी विथ इट! आता डायरेक्ट तुलाच विचारतो!" शक्ती बोलला.
"मला खूप कमी लोकं इम्प्रेस करू शकतात!" मग्रुरीचं हास्य करत डॅनियल बोलला.
हा! पण त्याला मूळ विषयाला बगल नक्कीच द्यायची नव्हती!
"मला आनंद आहे मी त्यांतील एक आहे!" शक्ती कोरडा चेहरा ठेऊन ओठांवर स्मित आणत बोलला.
डॅनियल अजूनच प्रसन्न हसला.
"तू जर मला जॉईन झालास, तर आपण जगावर राज्य करू! विल मेक अ ग्रेट फॉर्च्युन!" डॅनियलने ऑफर दिली.
"नॉट इंटरेस्टेड्!" शक्तीने डॅनियलच्या प्रस्तावाचं खंडन केलं.
"आपली लोकं याच मेंटॅलिटीने मागे पडतात! समोर आलेली संधी त्यांना दिसतच नाही! दिसली तर घेण्याची हिंमत नसते!"
"मुद्याचं बोलूया?" शक्तीने बाकी बातचीत कट केली!
"बोल! काय पाहिजे?" डॅनियलने हसून विचारलं.
"हे सगळं का?" शक्तीने थेट विचारलं.
"ज्या अर्थी तू इथपर्यंत आला आहेस, त्या अर्थी तुला तुझी उत्तरं मिळाली असतील!" डॅनियल स्मित ओझरू न देता बोलला.
"मला तुझं कारण हवं आहे!" शक्ती बोलला.
डॅनियलने मन डोलावली. तो बोलण्यास सज्ज झाला...
"तेल; विसाव्या शतकातील सार्वभौम ताकत! आणि इन्फॉर्मेशन ही एकविसाव्या शतकातली! विचार कर; या दोन मोठ्या ताकदी एकाच ठिकाणी केंद्रीत झाल्या, तर काय होईल?! संपूर्ण जग मुठीत!
"तेल आणि इन्फॉर्मेशन दोन मोठे ताकदीचे सोर्स. हे दोन्ही ज्यांच्या हाती असतील, दे विल रुल द एंटायर वर्ल्ड् टू दि इन्फिनिटी! आणि हे पोटेन्शियल भारतात आहे. मी फक्त त्यासाठी पार्श्वभूमी तयार करतोय!
"आज आपण अमेरिकेला साथ नाही दिली, तर कोणी दुसरं देईल! पण हे होईल हे नक्की! भारत हा असिमीत संभावनांचा देश आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये आपण सरस आहोत. भारताच्या टॉप टू इंडस्ट्रीज मध्ये आयटी सेक्टर येतं! अमेरिका भारताच्या टू थर्ड आयटी सर्व्हिसवर विसंबून आहे! आणि म्हणूनच मला हा चान्स दुसऱ्या कोणाला द्यायचा नाही! आय विल मेक माय इंडिया सुपर पावर!"
"बट एट व्हॉट कॉस्ट? सक्सेसफुल होण्यासाठी शॉर्टकट निवडला, की उन्नती पटकन होते हे खरं, पण अधोगतीही तेवढ्याच लवकर होते! लॉन्गटर्मचा रस्ता लांब पल्ल्याचा, किचकट नक्कीच असेल, पण त्यातून मिळणारं यश हे अनंत काळ टिकणार आहे! स्वार्थ व अधिकारवादातून तर अहंकार निर्माण होतो आणि अहंकारातून पुढे संघर्ष!
"तू किंवा जनमानसचे नेते, इतर राष्ट्रं; इंक्लुडिंग इंद्रदत्त वाचस्पती, जे जे लोक या इंटरनॅशनल कॉन्स्पिरिसीमध्ये सामील आहेत हे सगळे खूनी आहात! फक्त खूनी!" शक्ती शांतपणे आपलं म्हणणं जोरात मांडत म्हणाला.
"प्रत्येकाच्या दृष्टीत समोरच्याचा मार्ग चुकीचाच असतो!" डॅनियल दुर्दैवी बोलला.
"तू काय बोलतोय कळतंय तुला? मिडल ईस्टमध्ये तुम्ही युद्ध घडवून आणलीत! हजारो माणसं मेलीत तिथं! त्याने पण काम होत नाही म्हणून तुम्ही तुम्हालाच साथ देत असलेल्या नेत्याला मारून टाकलं! मग ते सत्य कोणासमोर येऊ नये म्हणून मृत्यूची मालिका रचत गेलात! लाज वाटते बोलायला?" शक्तीमध्ये आवेश भरला.
"नथिंग इज पर्सनल हिअर ब्रदर्! जे काही आहे, ते देश प्रगती पथावर नेण्यासाठी! त्यासाठी शक्ती निर्माण करण्यासाठी!" डॅनियलने पुन्हा आपली भूमिका सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
"ओके! तुझ्या दृष्टिकोनातून तू जे केलंस, ते भारताला सुपरपावर बनवायला; पण मला सांग, तू ज्यांची साथ घेतलीस त्यांनाचाही सेम मोटिव्ह होता? छाती ठोकपणे सांगू शकतोस तू हे?"
"वाचस्पतीचा नक्कीच होता. म्हणून तर तो लोकप्रिय होता आणि म्हणूनच त्याला मरावं लागलं!
"अपोजिशनचा मोस्ट फेमस लीडर मेल्यावर सहानुभूती कुणाकडे जाणार?" डॅनियल हसून म्हणाला.
"यु गाईज आर सिक!" शक्ती ओरडला.
डॅनियल नुसताच हसला!
"आता काय मला अटक करणार?" त्याने विचारलं.
"असंच नाही! तुला असं अटक करून मी तुझा अपमान नाही करणार!" शक्ती उठला!
डॅनियल काय ते समजला.
"ओ! सो वॉन्ट टू गिव्ह मी अ चान्स टू फाईट! हं? इव्हन दो यु नो, आय वोन्ट एबल टू इस्केप! तुला मी इतका लाचार वाटलो?" डॅनियल कीव करत हसला.
त्याने थोडा विचार केला,
"बट नो! आय विल टेक द अपॉर्च्युनिटी! बिकॉज आय डोन्ट वॉन्ट यु टू डिसपॉईंट!" तो उभारत गुडघ्यांवर सरकलेली पॅन्ट खाली सरकवत बोलला.
इतक्यात मागे दुसऱ्या मजल्यावरून खाली आलेला क्लबचा तो मॅनेजर (अमेरिकन सीआयए एजंट) खालच्या दोन पायऱ्या न उतरता उभारला.
"व्हॉट आर् यु डुईंग डॅनियल?" तो ओरडला!
डॅनियलने मागे न पाहता त्याला गप्प होण्यासाठी हात केला.
पण डॅनियल आपल्याला हुकूम देतोय ही भावनाच त्याला सहन झाली नाही! त्याने आपली पिस्टल खेचण्याचा प्रयत्न केला.
इतके दिवस सोबत राहिल्याने डॅनियल त्याला ओळखून होता. डॅनियलने विजेच्या चपळाईने आपली पिस्टल बाहेर खेचून त्याने सीआयए एजंटच्या हातातील पिस्टल उडवली.
सीआयए एजटचा हात जखमी झाला. पिस्टल पायऱ्यांखाली घरंगळत येऊन फ्लोअरवर दूरपर्यंत घसरत जाऊन स्थिरावली होती!
डॅनियलने हातातील पिस्टल नाचवूनच त्याला खाली बसण्यास सांगितलं.
मघाशी अपमान वाटलेला हा सीआयए एजंट आता मात्र एका बछड्यासारखा पायरीवरचा खाली बसला.
आणि त्याच्या समोर शक्ती आणि डॅनियलचं तुंबळ युद्ध सुरू झालं...
दोघेही तोडीस तोड! कोणीही माघार घेणारं नव्हतं!
शक्ती आणि डॅनियल एकमेकांना पुरजोर टक्कर देत होते...
तो सीआयए एजंट हे घमासान पहात बसून होता... काही करण्याचा विचारही त्याच्या मनाला शिवला नाही... याला कारण होतं त्याच्या पुढं घडणाऱ्या शक्ती - डॅनियलच्या विद्युतवेगी हालचाली!
शक्ती व डॅनियल दोघांचीही श्रीमुखं सुजलेली होती.
शक्तीच्या ओठांतून रक्त वाहत होतं... तर डॅनियलला देखील बराच मुका मार बसला होता.
कोणी हरतंय की नाही याची शक्यताच दिसत नव्हती... आणि हे युद्ध कधी थांबेल की नाही याचीच शंका उद्भवली होती...
सीआयए एजंट्स नुसताच पहात होता...
बराचवेळ मुष्टियुद्ध झाल्यानंतर दोघेही थकले. एकमेकांपासून लांब पण डोळ्यांत डोळे घालून ते पाहत होते...
शक्तीच्या आधी डॅनियलने स्वतःला सावरलं. हवा तेवढा ऑक्सिजन त्याने फुफ्फुसांत भरून घेतला आणि तो शक्तीच्या दिशेने धावला. शक्तीने अजून स्वतःला कंपोज केलेलं नव्हतं. त्यामुळे डॅनियलची ही पेहेल डॅनियलच्या दृष्टीने निर्णायक ठरणार होती.
त्याने वार केला. शक्ती लडखडला, पण त्याने वार अडवला. दोघांमध्ये पुन्हा हँड टू हँड कॉम्बॅट सुरू झालं...
शक्ती कितीवेळ असं लढत राहणार होता... त्याला काही करून आता ही लढाई थांबवायची होती!
त्याच्या या लढाईत क्लब खळला होता... फर्निचर, ग्लास, बाटल्या यांचे खच्च च्या खच्च क्लबभर पसरले होते.
नाही! तो दमला होता, असं नाही. लढायला तो अजून खूप सक्षम होता; पण अजून कितीवेळ असंच झुंजत रहायचं होतं...
आपल्या सॅटिस्फिकेशनसाठी आपण टेररिसम सेल ऑफिसर्सना वेठीस ठेवलं आहे याची शक्तीला आता खंत वाटू लागली होती...
आता त्याला हा संग्राम थांबवायचा होता... म्हणून मग जसं त्याच्या संघर्षानं क्लबमधील वस्तू फुटून छिन्नभिन्न झाल्या होत्या, त्याप्रमाणे डॅनियलला देखील त्याने छिन्नभिन्न करण्याचं ठरवलं...
आणि शक्तीने आता आपली फायटिंग स्टाईल बदलली. आतापर्यंत तो वेस्टर्न बॉक्सिंग व मिक्स्ड् मार्शल आर्ट या प्रकारांचा वापर करत होता, पण डॅनियल या सर्व प्रकारांचा जाणकार असल्याने शक्तीला विजय मिळवणं कठीण जात होतं... म्हणून आता त्याने खास भारतीय कुस्तीचे डाव टाकायला सुरवात केली...
अचानक झालेल्या या मेथड चेंजमुळे डॅनियल पुरता बावचळला. त्याला शक्तीचे दाव वाचता येईनात. त्यामुळे ते रोखता येईनात. प्रतीवार करता येईना. शक्तीला याचा फायदा होताना सहज दिसत होतं...
अखेर शक्तीने पुन्हा आपला प्रकार बदलला आणि तो हनुमंती कुस्तीचे डाव खेळू लागला... 'बल' आणि 'बुद्धी'चा संगम म्हणजे ही हनुमंती कुस्ती!
शक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचं सार म्हणजे हा कुस्ती प्रकार!
हा प्रकार डॅनियलसाठी अगदीच अनोळखी होता... शिवाय यात शक्तीची ताकद आणि बुद्धी दोन्ही मिळालेली! डॅनियलला हरवायला इतकं पुरेसं होतं आता...
शक्तीने 'उभा कलाजंग' डाव टाकून डॅनियलची पाठ शेवटी जमिनीला टेकवली.
शक्तीने डॅनियलच्या समोर उभा राहून त्याने डॅनियलचा उजवा दंड धरला, क्षणात आपला एक हात त्याच्या मांडीच्या आत घालून शक्ती गुडघ्यावर बसला. डॅनियल त्याच्या पाठीवर ज्या क्षणी आला त्याक्षणी शक्तीने त्याला उचलून स्वतःच्या शरीराला तिरपं केलं होतं आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्याला, डॅनियलला पाठीवर चितपट केलं होतं!
डॅनियलला भारतीय कुस्ती हा प्रकार कमी जाणकारीचा असला, तरी तो इतकं जाणून होता, की यात पाठ टेकली, की हार निश्चित!
मग त्याने आपले प्रयत्न थांबवले. आपली हार पत्करली. मान्य केली. त्याला जखडून ठेवलेल्या शक्तीला डॅनियलने आपले प्रयत्न थांबवले आहेत हे ध्यानात आले. तोही मग बाजूला होऊन दोन्ही गुडघ्यांवर हात घेऊन ते बांधून बसला.
हे युद्ध कुणाच्या मृत्यूसाठी नव्हतेच. ते होते एकमेकांना सम्मान देण्यासाठी! आणि तो उद्देश पुरा झाला होता!
डॅनियल जमिनीवर पडूनच होता. दोघे खर्च झालेली शक्ती पुन्हा भरून घेत होते... जास्तीत जास्त प्राणवायू शोषत ते तिथेच तसेच आहे त्या स्थितीत थांबले.
आतून हालचाल बंद झाली आहे हे बाहेरील ऑफिसर्सना लक्षात आलं होतं. मघासची सहा जणांची टीम पुन्हा आत प्रवेशली होती.
दोघांनी पुढे होऊन त्यांनी त्या सीआयए एजंटला हाताला धरून बाहेर खेचून घेऊन गेले...
अजून दोघांनी डॅनियलला उचललं व त्यालाही ढकलत बाहेर नेलं गेलं. बाहेर जातानाही डॅनियलची नजर शक्तीवर खिळली होती.
न बोलताही हजारो शब्द तो शक्तीला बोलला होता... आणि शक्ती ही ते समजला होता... त्यांच्यातील तो मूकसंवाद त्यांच्यापुरताच होता...
दोघांनीही स्वतःसाठी होऊ शकणाऱ्या चांगल्या मित्रांना गमावलं होतं... कारण होतं... दोघांची वेगवेगळी विचारधारा...
डॅनियलची विचारसरणी अशी होती, ज्यातून निष्पन्न काही होणार नव्हतं, नवं काही निर्माण होणार नव्हतं... आणि झालंच तर तो फक्त विनाश!
आणि शक्ती! त्याची धरणा सर्वसमावेशक होती... आपल्या उन्नतीसाठी एखाद्या विशिष्ट वर्ग समूहाच्या नष्ट होण्याची आवश्यकता नाही! तर त्यांना सोबत घेऊन आपण परस्पर त्याग व प्रेमाने एकत्रच उन्नत होऊ ही शक्तीची विचारधारा होती! यातून निर्माण झालाच, तर तो सामाजिक बंधुभाव निर्माण होणार होता! म्हणून तर त्याने सगळं नष्ट करून पुनः निर्मिती करण्याच्या डॅनियलच्या प्रस्तावाला नाकारलं होतं... आणि हे करून शक्तीने घातकी व्यक्तित्वाशी बंधुभाव नाकारला होता...!
सर्व गेले, तरी शक्ती बराचवेळ तसाच तिथं थांबला होता...!
काही आठवणीरुपी गोष्टी हृदयात साठवून तो त्या क्लबमधून बाहेर पडला...!
शक्तीची डॅनियलने त्याला दिलेली गाडी रस्त्यावर धावत होती... आणि शक्तीचे विचार त्याच्या गाडीच्याही वेगाला लाजवत त्याच्या मस्तिष्कात गोंधळ घालत होते...
'इथं कोणाला वाईट म्हणायचं? प्रत्येकाला आपल्या देशाला उत्कर्ष बिंदूवर पहायचं आहे! पण यासाठी प्रत्येकाने निवडलेले मार्ग पूर्णतः वेगळे. भिन्न टोकाचे. पण! कोण बरोबर, कोण चूक? हे ठरवणं तसं अवघड नाही... ध्येयं योग्य असली, तरी ती साध्य करण्यासाठी आपण कोणता मार्ग अवलंबतो यावर ते यशस्वी होईल की नाही हे आणि त्या ध्येयाची शुद्धता टिकून असते! शुद्ध ध्येयाच्या आवरणाखाली आपण गुन्हे करत राहिलो, तर ते क्षम्य का असावेत? आशा लोकांना शिक्षा ही झालीच पाहिजे! डॅनियललाही होईल! आणि त्याला साथ देणाऱ्या प्रत्येकाला!'