भाग ११
“आजच देशमानेशी आपल्या लग्नाबद्दल चर्चा करायची.थट्टा करता करता आपल्याला त्यांनी आपल्या सुखी भविष्याचा मार्ग दाखवला आहे!” विचारांच्या तंद्रीतच अरविंदा ऑफिसला पोहोचला.त्याने देशामानेना ताबडतोब भेटायला बोलावले. काल ज्या हॉटेलात त्यांनी चहा घेतला होता तेथेच देशमाने अरविंदाला भेटायला आले.अरविंदा आज भलताच खूष होता ....
खूप दिवसानंतर आज अरविंदांच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव होते.अरविंदाचा तो खुललेला चेहरा बघून देशमानेना खूप बरं वाटलं.
" काय अरविंदा काय विशेष? आज आनंदात दिसताय? "
देशमाने अरविंदाकडे बघत मस्करीच्या मूडमध्ये बोलले...
" काही नाही असंच!"
" अरविंदा मी आज ओळखतो का तुला? तुझा चेहरा वाचायची मला एवढी सवय झालीय की न बोलताच तुझे मन मला वाचता येते! नक्कीच काहीतरी छान घडलं आहे किंवा घडणार आहे, माझ्यापासून तू काहीच लपवू शकत नाहीस!"
" हो साहेब अजून काही चांगलं घडलेलं नाही;पण तुम्ही म्हणता तसं काहीतरी घडू शकतं अशी आशा मात्र आहे, यासाठीच तुमच्याकडे आलोय!"
देशमाने काल बोलले होते ते सगळं विसरून गेले होते.त्यांनी आठवले आणि काल केलेली मस्करी त्यांना आठवली.
ते गंभीर झाले....
" नक्की काय चाललंय डोक्यात अरविंदा? "
अरविंदा आता गंभीर होऊन पुढे बोलू लागला...
“ देशमाने साहेब, बोलता बोलता तुम्ही मला माझ्या समस्येवर उत्तम तोडगा सुचवलात बघा! मी लग्न केले तर वसंताची काळजीच मिटून जाईल. त्याची माझ्याकडून खूप आबाळ होते आहे. माझ्या लग्नाने त्याला आई मिळेल.घराला पुन्हा घरपण येईल!
त्याचा बोलताना फुललेला चेहरा बघून देशामानेनाही गंमत वाटली.ते विचार करत होते....
“ माणसाची आशा किती वाईट असते नाही? या माणसाच्या आयुष्यात इतके उतार चढाव आले,एवढी संकटे आली; पण अरविंदाने हार मानलेली नव्हती.नव्या उमेदीने तो नवे डाव मांडत होता.
त्यांनी अरविंदाला सपोर्ट करायचे ठरवले...
“ अरविंदा,तुझ्या लग्न करायच्या निर्णयाबद्दल अभिनंदन!”
पुढे ते म्हणाले....
“अरविंदा ,मित्रा तुझे आयुष्य म्हणजे मला नेहमी एक मोठा गुंता वाटत आले आहे, सुटला सुटला म्हणेपर्यंत तू अजूनच या गुंत्यात अडकत जातो,हे मी अनेक वर्ष पहातो आहे. आतापर्यंत तुझ्या घरात जे काही घडले आहे त्यावर चर्चा करण्यात तसा अर्थ नाही, जे झाले ते झाले,त्याला इलाज नाही; पण हा गुंता सोडवण्यासाठी तू ज्या धैर्याने नेहमी प्रयत्न करतोस, त्याबद्दल तुला मानावेच लागेल! तुझा हा नवा डाव यशस्वी होवू दे अशीच मी ईश्वराकडे प्रार्थना करतो!”
“आता एक काम कर, तुझी माहीती एखाद्या लग्न जुळवणाऱ्या संस्थेला दे,तुझ्या अपेक्षा सांग,आणि योग्य अशी जोडीदारीण मिळाली की लग्न उरकून घे! मला वाटते की तुझ्या समस्येवर हा उत्तम उपाय ठरेल.! पाहीजे तर मी येतो तुझ्याबरोबर!”
देशमानेनी दिलेल्या प्रोत्साहनाने अरविंदाला खूपच बरे वाटले.
त्याच दिवशी ते दोघेजण शहरातल्या ‘मंगलगाठी’ या संस्थेत नाव दाखल करायला गेले.अरविंदाने आपली सगळी खरी परिस्थिती तेथे नमूद केली.अपेक्षा हा रकाना भरताना त्याने स्पष्टपणे वसंताची देखभाल व घरातील सर्व जबाबदाऱ्या घेण्याची अट घातली....
आठवडाभरातच त्याला संस्थेकडून निरोप आला आणि त्याला एका विवाहेच्छूक विधवा बाईंचा प्रस्ताव मिळाला!
बाई पाचेक वर्षानी अरविंदापेक्षा लहान होत्या. त्यांचे पती एका अपघातात वारले होते आणि पदरात दहा वर्षाचा मुलगा होता.देशमानेच्या मदतीने अरविंदाने त्या बाईशी संपर्क साधला.
देशमानेच्या मध्यस्तीने समोरासमोर भेट ठरली....
समोर भेटल्यावर एकमेकांच्या माहितीची देवाणघेवाण झाली. त्या बाईंचे नाव सुनंदा!
तर,या सुनंदाचे आधीचे यजमान खाजगी नोकरीत होते.रात्रपाळीवरून घरी येत असताना तिच्या नवऱ्याला एका रात्री कुठलाशा अज्ञात वाहनाने ठोकर मारली आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला.सुनंदा व् त्याच्या मुलावर हा फार मोठा आघात होता. सुनंदासमोर तर संपूर्ण आयुष्य होते.पदरात एक छोटा मुलगा होता त्याचे संगोपन कसे करायचे?हातातोंडाची गाठ कशी घालायची?, घराचे भाड़े कसे भरायचे? असे प्रश्नच प्रश्न तिच्यासमोर आ वासून उभे होते........
अरविंदा सुनंदाच्या तोंडून तिचे पूर्वायुष्य जीवाचे कान करून ऐकत होता .....
( क्रमश:)
©प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020