Aajaranch Fashion - 24 in Marathi Moral Stories by Prashant Kedare books and stories PDF | आजारांचं फॅशन - 24

Featured Books
Categories
Share

आजारांचं फॅशन - 24

स्पर्धेचे तीन क्रमांक जाहीर होणार होते, सुरवात तिसऱ्या क्रमांकाच्या घोषणेने झाली.

समीक्षकांनी त्यांच्या हातातल्या पेपर वर नजर फिरवली आणि बोलले.

“तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी आहेत आर्थोपेडिक आणि स्पाईन फिल्डचे डॉक्टर बिपीन सोलंकी"

टाळ्यांचा कडकडाट झाला, बिपीन सोलंकी ने झाडाचे खूप छान चित्र काढून त्याच्या खोडाच्या जागी पाठीच्या मणक्याची रचना करून मणक्याचे महत्त्व आणि त्याची निगा राखणे आणि त्यासाठी योग्य ते उपचार घेणे किती गरजेचे आहे हा संदेश त्यांच्या चित्रातून दिला होता.

"दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी आहेत अनिल गोरे ज्यांनी सायकॅट्रिक क्षेत्राचे प्रभुत्व केले आहे"

टाळ्या वाजल्या आणि सगळ्यात जोरात आणि खुश होऊन डॉक्टर माधव ने टाळ्या वाजवल्या

"आणि पहिल्या क्रमांकाचे मानकरी आहेत पीडियाट्रिक म्हणजेच शुशू वैदकीय क्षेत्राचे प्रभूत्व करणाऱ्या श्रीमती सुमित्रा साळवे"

ह्या वेळेस टाळ्या खूप जोरात वाजल्या, सुमित्रा साळवे यांनी आई आणि मुलाचे ऋणानुबंध दाखवणारे आणि बाळाच्या आवश्यक त्या सगळ्या लसीकरण करणे किती अनिवार्य आणि महत्वाचे आहे हे त्यांच्या चित्रातून खूप बारकाईने आणि सुंदर रित्या दर्शवले होते.

डॉक्टर माधव यांनी अनिलची पाठ थोपटून त्यांचे अभिनंदन केले, पण अनिल थोडासा उदास होता.

"काय झालं तुम्ही खुश नाही आहात?

डॉक्टरांनी अनिलकडे पाहत विचारले.

"तसं नाही डॉक्टर पण मी पहिले पारितोषिक नाही मिळवू शकलो"

अनिल थोड्या उदासीनतेने बोलला.

त्यावर डॉक्टर माधव हसत हसत बोलल्या

"आहो त्यात काय झालं, आनंद माना की तुम्ही एवढ्या लोकांमध्ये दुसरे आलात, मी तर खुप खुश आहे तुमच्या साठी, दुसरं येणंहि खूप मोठी गोष्ट आहे, दुसरं असणं आपल्याला नेहमी जमिनीवर ठेवतं, ते आपल्याला शिकवत की आपण परिपूर्ण नाही आहोत आणि आपल्या मध्ये अजून सुधार करण्याचा वाव आहे आणि हीच भावना आपल्याला सदैव कार्यरत ठेवते. आणि तुम्हाला माहित आहे का, शाळा, कॉलेज, ऑफिस अथवा कुठल्याही स्पर्धेत प्रथम येणाऱ्याला नेहमी भीती कुणाची वाटते? दुसरा येणाऱ्याची, कारण त्याची जागा जर उद्या कुणी घेऊ शकत तर फक्त तोच जो आज दुसरा आलाय. म्हणून हसा, खुश व्हा, आणि हे सर्टिफिकेट आणि ट्रॉफी घेऊन सगळ्यात पहिले तुमच्या पत्नी कडे जा, बघा ती किती खुश होईल आणि किती अभिमान वाटेल तिला तुमचा"

डॉक्टरच्या बोलण्याने अनिलच्या चेहऱ्यावर शब्दांनी व्यक्त न करता येणारा आनंद आला आणि तो लगेच बाहेर पडला, बाईक चालू केली आणि सविताच्या माहेरच्या दिशेने सुसाट वेगात निघाला.

सविताच्या माहेरी पोहचून पाहिलं तर दाराला कुलूप होते, त्याने बाजू च्या घरी विचारले तर त्यांना देखील माहित नव्हते कि घरातले कुठे गेले आहेत आणि दाराला कुलूप का आहे.

अनिल उदास झाला, त्याचा हसरा चेहरा पडला आणि गुपचूप मान खाली घालून तो घराकडे निघाला, बाईक लावली आणि घरात जायला लागला, दार उघडेच होते, त्याच्या लक्षात आले कि कदाचित सकाळी घाई गडबडीत दार बंद करायचे तो विसरून तसाच निघून गेला.

आत जाऊन तो सोफ्यावर बसला आणि एक मोठा श्वास घेतला, आतून ठाणं करून भांड पडण्याचा आवाज आला.

"मरतुकडी मांजर"

ओरडत अनिल किचन कडे जायला उठला आणि तितक्यात दोन्ही मुले आतून पप्पा पप्पा करत अनिल कडे धावून आले, अनिलला कळेना की त्यांच्या कडे बघून चकित होऊ की त्याना काळजाला लावू, त्याने गुढघ्यावर बसून दोन्ही मुलांना मिठीत घेऊन त्यांचे पापे घ्यायला लागला, थोड्या वेळाने सावरला आणि मान वर करून पहिले तर मुलांच्या मागे सविता उभी होती, तो उभा राहिला आणि सविता कडे बघून एकच शब्द बोलला.

"आलीस ना परत नकट्या मेंडकुळे"

अनिलचे भावनेने भरलेले स्वर ऐकून सविताचा बांध तुटला आणि ती सरळ अनिलच्या गळ्यात पडली आणि दोघे जण सैरा वैरा होऊन लहान मुलांसारखे रडायला लागले, हे मिश्र अश्रू होते, एवढ्या दिवसांच्या विरहाच्या दुःखाचे आणि परत एकदा एकत्र आल्याच्या आनंदाचे. थोड्या वेळाने दोघांनी अश्रू पुसले आणि शांत झाले. सविताने आतून पाण्याचा ग्लास भरून आणून अनिलला दिला आणि विचारले.

"कशी होती चित्रकलेची स्पर्धा?

"तुला कसे माहित?

अनिलने ग्लास टेबलवर ठेवत आश्चर्याने सविताकडे बघत विचारले

"सगळं माहित आहे मला तुमच्या बद्दल, तुमच्या उपचारांबद्दल आणि तुमची आज स्पर्धा होती हे मला एक आठवड्या पूर्वी पासूनच माहित होतं, सांगा कशी होती स्पर्धा, जिंकले की नाही का असेच आले तोंड वर करून?

सविताचे पहिल्या सारखे शब्द ऐकून अनिलने हसत हसत सर्टिफिकेट आणि ट्रॉफी तिच्या हातात देत दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषक मिळाले म्हणून सांगितले.

सविता खूप खुश झाली, तिचा आनंद आणि अनिल बद्दलचा अभिमान तिच्या डोळ्यातून येणारे अश्रू स्पष्ट सांगत होते. मुलानें तिच्या हातातली ट्रॉफी आणि सर्टिफिकेट हिसकले आणि 'आमच्या पप्पांला प्राईज मिळालं, आमच्या पप्पांला प्राईज मिळालं" ओरडत बाहेर पळाले.

सविता पुन्हा एकदा अनिलच्या गळ्यात पडली आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बोलली.

"आहो मला तुमचं ते पारितोषिक मिळालेलं चित्र बघायचंय"

अनिल ने सविताच्या खांद्यावर हात ठेवला आणि समाधानाचा एक मोठा श्वास घेतला आणि हळुवारपणे बोलला.

"हा बघ ना, नक्की बघ, पान पालट आणि बघ......