भाग १०
अरविंदा रात्री घरी आला आणि दररोजची कामे सुरू केली.काम करता करता त्याला आज चहाला गेल्यानंतर देशमानेने केलेली त्याची मस्करी आठवली....
देशमाने अरविंदाला म्हणत होता ....
“ एखादी बाईच ठेव ना घरकामाला...!”
“ नाहीतर, अरविंदा, तू अजून एक गोष्ट करू शकतोस....दुसर लग्नच करून टाक ना! सगळेच प्रश्न मिटतील तुमचे!”
“काय म्हणाला तो?”
“दुसर लग्न...?”
नकळत देशमानेनी अरविंदाच्या मनात एक वेगळाच विचार पेरला होता!
लग्न करायच्या त्या विचाराभोवती त्याचं मन आता नको नको म्हणत असतानासुध्दा पिंगा घालायला लागलं होत. देशमानेनी खरंच एक वेगळा मार्ग अरविंदाला दिला होता... त्याने स्वतःच दुसरं लग्न करायचं! तो आता त्याच विचारांच्या द्वंद्वात फसला होता...
त्याचं एक मन म्हणत होते....
”खरच काय हरकत आहे?”
“लग्न ?” “आता या वयात?”
“लोक काय म्हणतील?”
“वसंता काय विचार करेल?”
दुसर मन मात्र प्रतिवाद करत होते...
”लोकांचा मी का आणि कशासाठी विचार करायचा? माझा कुठे कधी कुणी विचार केलाय?”
त्याचेही खरेचं होते की! त्याचा लाडका मुलगा वसंता आंधळा झाला, त्याची बायको सीता त्याला आणि मुलांना सोडून हे जग सोडून गेली, त्याचा दुसरा मुलगा गुणवंता त्याचं लग्न झाल्यावर मदत करायला नको म्हणून कृतघ्न होउन बायकोला घेऊन घर सोडून गेला; तेव्हा लोकांनी कोरडी सहानुभूती व्यक्त करण्यापलीकडे काय मदत केली होती?
तो सतत विचार करत राहिला...
“प्रत्येकवेळी मी संकटाच्या खाईत असताना हेच लोक माझी लांबून मजा बघत होते.त्या लोकांच्या मताला मी का किंमत द्यावी? ते काय म्हणतील याचा विचार कशासाठी करायचा? ते काही नाही मला जे योग्य वाटेल ते मी करणार!”
अचानक त्याला सीतेची- आपल्या बायकोची प्रकर्षाने आठवण झाली.
”आज कित्येक दिवस झाले सीता आपल्याला सोडून गेली, तिनेही जाताना मी एकटा पुढे मुलांची जबाबदारी कशी घेणार याचा विचार नाही केला! सरळ माझ्यावर जबाबदारी टाकून ती निघून गेली! त्या जबाबदारीच्या ओझ्याखाली मी अक्षरश: दबून गेलो, आपल्या आंधळ्या भावाची जबाबदारी घ्यायला नको म्हणून लग्नाला तयार केलेला दुसरा मुलगा बायकोचं ऐकून घर सोडून गेला. या आंधळ्या वसंताच करता करता मी माझ जगणच विसरलोय! काय अर्थ आहे अशा जगण्याला? त्यापेक्षा देशमानेनी सुचवलेला पर्याय काय वाईट आहे?
मी लग्न केले तर वसंताला आईची माया मिळेल, माझे घरकाम वाचेल आणि ......”
अरविंदा स्वत:शीच चक्क लाजला.....
”खरच,आधी का नाही हे सुचल आपल्याला?”
सीतेच्या अकाली जाण्यामुळे कित्येक दिवस त्याला स्रीसुख मिळालेलं नव्हत. खूप दिवसानंतर आज अरविंदाची ‘ती’ भूकही जागी झाली होती.
“आता तर कुठे आपण पंचावन्न वर्षाचे झालोय! काय हरकत आहे दुसर लग्न करायला!”
आपल्या विचारांच्या तंद्रीतच त्याने समोरची कामे उरकली.उत्साहाच्या भरातच त्याने वसंताला फिरवून आणले. आज कित्येक दिवसानंतर त्याला एकदम मस्त झोप लागली.
झोपेत त्याला सुंदर सुंदर स्वप्ने पडत होती.....
“ त्याची दूसरी बायको लग्न करून त्याच्या घरी आली होती.रात्रंदिवस ती अरविंदाच्याभोवती प्रेमाने पिंगा घालत होती.वसंताची खूप जीव लावून देखभाल करत होती, तो ऑफिसला निघाला तेंव्हा प्रेमाने त्याचा टिफिन त्याच्या हातात देता देता मुद्दाम त्याच्या हाताला हात लावून काहीतरी सुचवत होती! ऑफिसमधुन आल्या आल्या गरम वाफाळता चहाचा कप हातात मिळत होता.गरमागरम जेवण आग्रह करून करून त्याला ती वाढत होती. रात्री तिला मिठीत घेवून अरविंदा आकंठ सुखात न्हावून निघाला होत!”
स्वप्नातली ती प्रसन्न रात्र संपली आणि अरविंदा हवेत तरंगतच झोपेतुन जागा झाला. त्याला वास्तव जीवनाची जाणीव झाली रात्री पाहिलेल्या स्वप्नांनी आज त्याच्या जगण्यात उल्हास भरला होता! झपाटयाने नेहमीची कामे आवरून अरविंदा कामावर गेला......
आज देशमानेना आपला निर्णय सांगायचा....
“ हा अरविंदा आता दुसरे लग्न करायला तयार आहे, तुम्हीच एखादी वधू शोधा!”
अरविंदा आता हवेत विहरत होता......
(क्रमश:)
©प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020