मायाजाल--- ७
गणपत भगताला भेटायचं आहे; हे कळल्यावर मुलं थोडी नर्व्हस झाली.
"अरे इंद्रजीत! हा इथल्या रहिवासी लोकांचा प्रश्न आहे! आपण त्यात कशाला पडायचं?" एक जण म्हणाला.
"आपण चार दिवसांचे पाहुणे! आपलं काम करू; आणि निघून जाऊ! उगाच भांडणं कशाला?" दुसरा म्हणाला.
"जीत! तो खूप भयंकर माणूस आहे! लखू काय म्हणाला ऐकलंस नं? त्याच्या नादाला न लागलेलं बरं! आणि आता तर लखू आपल्याबरोबर यायला तयार झालाय! मग काय गरज आहे गणपतला भेटायची? " प्रज्ञाने इंद्रजीतला समजावायचा प्रयत्न केला.
" तुम्ही सगळे पॅनिक होऊ नका! आपण त्याच्याशी भांडणार नाही आहोत! त्याला समज देणार आहोत. हा प्रश्न फक्त लखूपुरता मर्यादित नाही; तो अनेकांना अशाच धमक्या देत असेल! ज्याला लोक इतके घाबरतात; तो माणूस आहे कसा; हे मला बघायचं आहे! काळजी करू नका! मी भांडण काढणार नाही!" इंद्रजीत हसत म्हणाला.
बाहेर खेळणा-या मुलांना त्यांनी गणपतचा पत्ता विचारला.
" त्याला घर नाही! तो देवळातच रहातो. या वाटेने सरळ जा! तुम्हाला देऊळ दिसेल; आणि तिथेच गणपतसुद्धा भेटेल!"
आणि सगळे देवळाकडे निघाले.
गणपत देवळाच्या बाहेर विडी फुंकत बसला होता. बाजूला दोन गावगुंड होतेच. गणपतचे लाल डोळे--- कपाळावरचा टिळा--गळ्यातल्या चित्र- विचित्र मळा--आणि एकंदर अवताराकडे बघून प्रज्ञा थोडी घाबरलीच! पण त्याच्या भेसूर रूपाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत इंद्रजीतने विचारलं,
" गणपत बाबा तुम्हीच का? तुमच्याविषयी इथल्या लोकांकडून खूप काही ऐकलं; म्हणून मुद्दाम भेटायला आलो."
"मीच गणपत! काय काम आहे? आणि तुम्ही इथले दिसत नाहीत! इतके सगळेजण कुठून आला आहात?" गणपतने जरबेच्या स्वरात विचारलं.
"आम्ही सगळे मुंबईहून आलो आहोत! इथे आमच्या काॅलेजतर्फे वैद्यकीय शिबिर आयोजित केलं आहे; त्यासाठी आलो आहोत!" इंद्रजीत त्याच्याशी आदराने बोलत होता.
"माझ्याकडे काय काम आहे; तुम्ही सागितलं नाही! " गणपत त्यांना लवकरात लवकर वाटेला लावायला बघत होता!
"तुम्ही इथल्या लोकांवर उपचार करता असं ऐकण्यात आलं----" इंद्रजीतचं बोलणं मध्येच तोडत गणपत म्हणाला,
"लोकांची जमेल तेवढी सेवा करतो ; साहेब! इथे डाॅक्टर मिळण्याची सोय नाही! मला थोडं गावठी औषधाचं ज्ञान आहे! त्याचा लोकांसाठी उपयोग करतो!" गणपत म्हणाला.
"चांगलं काम करताय तुम्ही! शिवाय देव- देवस्की सुद्धा करता म्हणे! आणि मी तुमच्याविषयी असंही ऐकलंय की; लोकांनी तुमच्याशिवाय कुठे जाऊ नये; म्हणून त्यांना धमक्या देता!"
" मी कशाला धमक्या देऊ? ते लोक उगाच घाबरतात! आणि डाॅक्टर--- माझं पोट या व्यवसायावर अवलंबून आहे! त्यांनी माझ्याकडे येत रहावं, म्हणून थोडा जुगाड करावा लागतो! लोक इथे आले तर मला चार पैसे मिळतात! त्यानी नेहमी येत रहावं म्हणून थोडे दैवी उपायसुद्धा करावे लागतात; कारण पिढ्यान् - पिढ्या ह्या देव- देवस्कीच्या गोष्टी त्यांनी ऐकलेल्या असतात. माझ्याकडे आर. एम. पी. सर्टिफिकेट आहे; पण यांचा डाॅक्टरी औषधांवर विश्वास नाही, पण गंडे - दोरे, उतारे यांच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवतात! याच उपायांच्या आडून कधी अंगा-यातून तर कधी मंतरलेल्या पाण्यातून औषधे देऊन मी त्यांच्यावर जुजबी उपचार करतो. मी काहीही बेकायदेशीर करत नाही." गणपत हुशार माणूस दिसत होता. सहजासहजी कोणाचं ऐकेल; असं वाटत नव्हतं.
"एखाद्याला टी. बी. असेल तर तुमच्याकडे औषध आहे का हो?" त्याला थांबवत इंद्रजीतने विचारलं.
गणपतने नकारार्थी मान हलवली. "तुम्ही तर डाॅक्टर! टी बी चं औषध तुम्हाला माझ्याकडून कशाला पाहिजे?" त्याने आश्चर्याने विचारलं.
"तो लखू उपचारासाठी तुमच्याकडे येतो; असं म्हणत होता! त्याला टी बी आहे! तुम्ही त्याला नक्की काय आहे, याचा शोध न घेता अनेक दिवस त्याच्यावर उपचार करत आहात! त्याला जर योग्य औषधं वेळेवर मिळाली नाहीत, तर त्याच्या जिवावर बेतू शकतं --" गणपतची प्रतिक्रिया अजमावत इंद्रजीत पुढे बोलू लागला,
"--त्याचा जीव गेला, तर तुम्हाला काहीच फरक पडत नाही; खरं ना? पण तुम्हाला माहीतच असेल, टी बी संसर्गजन्य रोग आहे ; गावातल्या लोकांना -- तसंच तो सतत तुमच्या संपर्कात आला, तर तुम्हालाही टी. बी. होऊ शकतो. "
हा डोस मात्र गणपतवर चांगलाच लागू पडला. तो चाचरत म्हणाला,
" मला वाटलं; त्याला साधा कोरडा खोकला आहे! असं काही असेल; याची कल्पना नव्हती! यापुढे मी नाही त्याला इकडे बोलावणार!" तो मनातून घाबरला होता.
"मग तो बरा कसा होणार?" विचारलं.
"शहरात टी बी वर चांगले उपाय निघालेयत! तुम्हीच द्या त्याला औषधं! नसती ब्याद माझ्या मागे नको!" गणपत हात झटकत म्हणाला.
"या पुढे अशा लोकांना चुकीचे उपचार करत अडकवून ठेऊ नका! जर गावात साथी पसरल्या; तर तुम्ही सुद्धा गावातच रहाता- आणि तुम्हीही माणूसच आहात --तुम्हीही साथीचे शिकार ठरू शकता; हे विसरू नका! गूण येत नाही असं वाटलं, की त्यांना शहरातल्या सरकारी दवाखान्यात पाठवत जा! " तो आता कडक शब्दांत बोलत होता. इंद्रजीतचं हे बोलणं गणपतला पटलं नाही,
"इथून मुंबई लांब आहे! तिथपर्यंत जाणं लोकांना शक्य होत नाही!" तो म्हणाला,
" मुंबई इथून जवळ नाही; हे खरं आहे! पण देशातल्या अनेक दूरदूरच्या भागांमधून. दीड- दोन दिवस प्रवास करून लोक ट्रीटमेंटसाठी मुंबईला येतात. दुःखाची गोष्ट आहे, की आपले लोक मात्र सरकारने दिलेल्या या सोईंचा लाभ घेत नाहीत. गावात तुमच्या शब्दाला किंमत आहे! ही जागृती लोकांमध्ये तुम्हीच केली पाहिजे. " तो पुढे म्हणाला,
" तुम्हाला जे ज्ञान आहे त्याचा लोकांच्या हितासाठी उपयोग करा. त्यातच लोकांचं, आणि तुमचं ही हित आहे. तुम्ही आर. एम. पी. आहात; सरकारशी संपर्क ठेऊन इथल्या दुर्लक्षित लोकांसाठी काम करा! बघा! आता जे लोक तुम्हाला घाबरतात; तेच तुमचा आदर करू लागतील!"
इंद्रजीतच्या या बोलण्यावर गणपतने होकारार्थी मान हलवली. इंद्रजीतने त्याला असा काही हरभ-याच्या झाडावर चढवला होता; की तो मनातून खुष झाला होता.
"उद्या येऊन मोठ्या डाॅक्टरना भेटतो! बघतो काय म्हणतात ते!" तो मनापासून म्हणाला.
तिथून बाहेर पडल्यावर इंद्रजीत हसत म्हणाला,
" गावातल्या लोकांनी फक्त माझ्याकडेच आलं पाहिजे; अशी जबरदस्ती हा आता करणार नाही-- लखूच्या कुटुंबाला त्रास देणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे; आपल्या शिबिरात विघ्न आणणार नाही."
प्रज्ञाला त्याच्या हुशारीचं कौतुक वाटलं. इतका मोठा कळीचा मुद्दा त्याने अगदी सहजपणे सोडवला होता.
******
लोकांना तपासताना डॉक्टरांच्या लक्षात आले की तिथे काही वयस्कर लोकांना मोतिबिंदूच्या ऑपरेशनची गरज आहे. लवकरच डोळ्यांच्या इलाजासाठी आम्ही तज्ज्ञ डाॅक्टरना घेऊन लवकरच येऊ असं आश्वासन त्यांनी लोकांना दिलं. डाॅक्टरनी तिथल्या तरूणांना एखादा सरकारी दवाखाना वस्तीमध्ये सुरू व्हावा; यासाठी प्रयत्न करण्यासाठीही त्यांनी मार्गदर्शन केले.
" आजूबाजूला अनेक मैलांवर कुठेही दवाखाना नाही. तुमच्या प्रयत्नांना जर यश आलं; तर सरकार इथे डाॅक्टर नेमेल आणि तुमच्याबरोबरच पंचक्रोशीतल्या अनेक गावांना औषधपाण्याची सोय मिळेल. शिवाय सरकारने चालू केलेल्या आरोग्यविषयक योजनांचा लाभ इथल्या लोकांना मिळेल!" ते त्यांना समजावत होते.
डाॅक्टरांनी आपलं जीवन पेशंटच्या सेवेेसाठी समर्पित केलं आहे; हे प्रज्ञाने ऐकलं होतं; पण तिथे ती प्रत्यक्ष पहात होती.
तिथून निघताना प्रज्ञा आनंदात होती. डॉक्टरी पेशातले अनेक बारकावे तिला तेथे पाहायला मिळाले. खूप मोठा अनुभव गाठीशी आला. लोकांची सेवा करण्यातला आनंद तिला अनुभवायला मिळाला. डाॅक्टरना लोक देवाच्या जागी का मानतात; हे तिला मोठ्या डाॅक्टरांची कामावरील निष्ठा बघून कळत होतं. यापुढचं शिबीर चुकवायचं नाही असा निश्चय तिने मनाशी केला.
खरं म्हणजे तिला आश्चर्य वाटत होत ते इंद्रजीतचं! बरोबर आलेले इतर विद्यार्थी तिथे नाइलाजास्तव रहावं लागतंय; अशा आविर्भावात वावरत होते; पण इतक्या ऐष- आरामात राहण्याची सवय असलेला इंद्रजीत मात्र तिथल्या वातावरणात अगदी सहज मिसळून गेला होता. तो सिनियर असल्यामुळे त्याच्यावर अधिक जबाबदारी होती; पण तो लोकांच्या आजारावर उपचार करणं, इतकंच स्वतःचं कर्तव्य समजत नव्हता; तर लोकांच्या समस्या समजून घेणे -- त्यांना स्वच्छता- योग्य आहार यांचे महत्व समजावणे , मुलांना शिक्षणाचे महत्व सांगणे---- अनेक गोष्टी करत होता. तो त्यांना सांगत होता, " मुलं शिकून हुशार होत नाहीत, जग बघत नाहीत, तोवर तुमची ही हालखीची परिस्थिती बदलणं शक्य नाही. घरातली, जंगलातली आणि शेतीची कामं करून घेण्यासाठी मुला-मुलींची शिक्षणं थांबवू नका. तुम्ही थोडे जास्त कष्ट घ्या, पण त्यांना शिकवा." तिथल्या गरीब आदिवासींबरोबर बोलतानाही त्याच्या वागण्यात आपलेपणा होता, कळकळ होती. प्रज्ञाच्या मनातला इंद्रजीतविषयीचा आदर वाढत होता.
--------********-------- contd---- part VIII