Hoy, mich to apradhi - 2 in Marathi Moral Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | होय, मीच तो अपराधी - 2

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

होय, मीच तो अपराधी - 2

२) होय, मीच तो अपराधी!
"मायलॉर्ड..." जेवणाच्या मध्यंतरानंतर कामकाज सुरू झाले न झाले की, नलिनीचा आर्त स्वर ऐकून सर्वांचे लक्ष नलिनीकडे गेले. ती पुढे म्हणाली, "माफ करा. काही वेळापूर्वी आपण या अपराध्याचे म्हणणे ऐकले. या नराधमाला असे म्हणायचे आहे का, की या देशात होणारे बलात्कार केवळ मुलींच्या पोशाखांमुळे आणि वागण्यामुळे होतात काय? प्रत्येक वेळी मुलीच दोषी आहेत का? करून सवरून... मजा मारणाऱ्या मुलांचा काहीच दोष नाही?"
"मी असे म्हणालोच नाही. सद्यस्थितीत मुले कशी बळी पडताहेत हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. जजसाहेब, आजची प्रसारमाध्यमे, त्यावरील कार्यक्रम, उत्तान जाहिराती आणि मुलींचे असे वागणे हे..हे.. जे एक चक्रव्यूह निर्माण झाले आहे ना, त्यात पुरुष आणि तरुण अडकत आहेत. वाहिन्यांच्या कार्यक्रमातून, भडक जाहिरातींमधून स्त्रीयांचे शरीर दाखविल्यामुळे त्यांचा टीआरपी वाढत असेल पण त्यामुळे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा आलेखही उंचावतो आहे त्याचे काय? मला हेही सांगितले पाहिजे की, मुलींच्या आणि महिलांच्या मनातही ते येत नसेल... नक्कीच नाही परंतु नकळतपणे घडणाऱ्या गोष्टी मग तो पोशाख असो, त्यावर लिहिलेल्या रचना असोत किंवा मुलींचे वागणे असो त्यातून त्यांच्या नकळत तसे वातावरण निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात आणि मग अशा घटना घडतात. महोदय, आज सर्वत्र मुलींचे कौतुक होते आहे. शिक्षणात असेल, नोकरीत असेल किंवा राजकारणात असेल सर्वत्र स्त्रीयांसाठी राखीव जागा आहेत. मुली शिकताहेत, अर्थार्जन करीत आहेत हे निश्चितच चांगले आहे पण हे करताना मुलांच्या आशा- आकांक्षांचा बळी जातो आहे. एका मुलाखतीसाठी दोन मुले आणि एक मुलगी गेले तर ती नोकरी मुलीलाच मिळते. कदाचित त्यावेळी ती नोकरी आपणास मिळाली तर घरची चूल पेटण्याची ददात मिटेल या आशेवर तिथे आलेल्या दोन्ही मुलांच्या आकांक्षांची होळी होते. अनेकदा प्रत्येक मुलीस नोकरीची गरज असतेच असे नाही. घेतलेल्या शिक्षणाचा सदुपयोग व्हावा यादृष्टीने अनेक तरुणी नोकरीकडे वळतात. त्याचवेळी 'बेकार' हा शिक्का बसलेल्या मुलांच्या मनात मुलींविषयी असूया निर्माण होते. नोकरी करणाऱ्या अनेक मुली 'आपण भले नि आपले काम भले' या संस्कारात वाढलेल्या असतात परंतु अनेक तरुणी 'पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात' यापुढे जाऊन 'मुलांच्या मांडीला मांडी लावून काम करतात' याप्रमाणे वागतात. याठिकाणी मला स्त्रीयांचा अपमान करायचा नाही तर महिलांमध्ये आलेला... नकळत असेल परंतु नको तेवढा आलेला मोकळेपणा अधोरेखित करायचा आहे. हाच मोकळेपणा आणि वाढती लगट पुरुषांना 'पुढचे' किंवा अनैतिक पाऊल उचलण्यासाठी बाध्य करते. मी पुरुषांना मुळीच पाठीशी घालत नाही. त्यांचा वहशीपणा, रानटीपणा झाकून ठेवत नाही. मुळात अनादि काळापासून पुरुषांची भ्रमरवृत्ती सर्वांनीच दाखवून दिली आहे. स्त्री हा मानवाचा विक पॉईंट..."
"म्हणून काय तिची अशी अवस्था करायची? हा अधिकार तुला कुणी दिला? तुझ्या हव्यासापोटी माझा अख्खा जन्म कलंकित झाला त्याचे काय? आमच्या हुशारीने आम्ही सारे मिळवितो त्याचे तुम्हाला वैषम्य वाटण्याचे कारण काय? गेल्या काही वर्षातील निकाल पाहिले तर प्रत्येक क्षेत्रात मुलींची सरशी झाल्याचे दिसून येईल. त्या निकालांमुळे तुमचे डोळे दिपत नाहीत तर आग ओकतात. तुझ्यासारखी मुले केवळ निकालात नाही तर पुढे जीवनातही..."
"अगदी बरोबर! मागे पडल्यामुळे एकदा का नैराश्याने घेरले की, डोक्यात वेगळेच विचार थैमान घालतात. समोर येणाऱ्या मुलींची हुशारी लक्षात राहत नाही कारण ती अदृश्य असते. दिसते तो त्यांचा पोशाख, शरीर! मग सुरू होतात कॉमेंट्स, पाठलाग, छेडछाड आणि.. आणि.. नलिनी..."
"खबरदार! माझे नाव उच्चारशील तर. जजसाहेब, तुम्हाला हात जोडून विनंती की, हा खटला लवकरात लवकर संपवा. वाटल्यास या.. या नराधमाची निर्दोष मुक्तता करा कारण या निकालानंतर किंवा या नराधमाला कोणतीही कठोर शिक्षा दिली तरीही माझी गेलेली लाज तर परत येणारच नाही परंतु त्या घटनेनंतर माझ्यावर होणारे बलात्कार..."
"काय म्हणतेस नलिनी तू?" न्यायाधीशांनी विचारले.
"होय. त्या घटनेनंतर समाजातील प्रत्येकाची ... विशेषतः पुरुषांची माझ्याकडे पाहण्याची तीच एक दृष्टी आहे. भेटायला येणारा प्रत्येक जण त्याच चष्म्यातून पाहत असतो. दिसणारी सहानुभूतीची नजर मात्र मला नरकयातना देणाऱ्या या धटिंगणाचीच असते. दया, कणव म्हणून माझ्या शरीरावर स्थिरावणारा प्रत्येक हात... मग तो माझ्या नातेवाईकाचा असला तरीही माझ्यासाठी तो या राक्षसाचा होता. त्या स्पर्शापेक्षाही माझ्या वेदनांवर मीठ चोळत होते ते प्रत्येकाचे शब्द नि प्रश्न! त्यातून या दानवाने केलेल्या प्रत्येक कृत्याची जाणीव आणि वेदना सातत्याने होत असायच्या. तो एकच प्रसंग मी वारंवार अनुभवत होते. त्या घटनेनंतर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत तीच तीच चर्चा आहे. त्याच घटनेचे रवंथ होते आहे. निघणारे मोर्चे, दिली जाणारी भाषणे, तावातावाने केल्या जाणाऱ्या चर्चा यासाठी ती घटना केवळ निमित्तमात्र आहे. इथे प्रत्येकाला स्वतःचे उखळ पांढरे करायचे आहे. कुणाला स्वतःला स्त्रीयांचा मसिहा सिद्ध करायचे आहे. कुणाला स्वतःचे मत कॅमेऱ्यासमोर मांडून प्रसिद्धीची हौस भागवायची आहे तर अनेकांचा डोळा येणाऱ्या निवडणुकीत स्त्रीयांच्या मतांवर आहे. एक फार मोठ्ठे पोलीस अधिकारी असे म्हणाले की, स्त्रीयांनी तिखटाची पूड घेऊन बाहेर पडावे. कशासाठी? बलात्कारानंतर त्या नराधमाने तेच तिखट स्वतः केलेल्या महिलेच्या जखमांवर चोळण्यासाठी? घडू पाहणाऱ्या प्रसंगाची जाणीव झालेल्या स्त्रीला तिखटाची आठवण येईल का? जो गुंड तिला बचावाची संधी मिळू देत नाही तो तिखटाची पूड बाहेर काढू देईल? या देशातले एक राज्य सरकार माझा सारा औषधोपचार खर्च करण्याची तयारी दर्शविते. दुसऱ्या एका राज्य शासनाने मला फ्लॅट देऊ केलाय. एक मंत्री मला नोकरी देऊ इच्छितात. महोदय, या साऱ्या दानशूरांना मला एकच विचारायचे आहे की, कुणाकुणाचा खर्च भागविणार आहात? कुणा-कुणास नोकरी देणार आहात? किती पीडित स्त्रीयांना घर देणार आहात? कारण माझ्यावर ओढवलेल्या प्रसंगानंतर आजपर्यंत देशात पन्नासपेक्षा अधिक बलात्काराची प्रकरणे पुढे आली आहेत. दिल्ली गँगरेप प्रकरणी देशात एवढा गहजब माजलेला असताना, माझी घटना ताजी असताना बलात्कार थांबलेले नाहीत. ठोस पावले उचलायची सोडून आपली सरकारे अशीच दानशूर होत राहिली तर महोदय, घटनेत बदल करून 'बलात्कारास बळी पडलेल्या स्त्रीयांसाठी नोकरीत राखीव कोठा' अशी व्यवस्था करावी लागेल. त्या घरामध्ये माझ्यासारखी बलात्कारित मुलगी राहायला गेली तर त्या घराच्या भिंती कायम ओरडत राहतील, मला सारखी आठवण देत राहतील की, मी या नराधमाच्या बलात्काराला बळी पडले म्हणून मला हे घर मिळालेले आहे. चार दोन वर्षांनी नवपरिचित मित्र किंवा मैत्रीण भेटायला आले आणि त्यांनी त्या फ्लॅटची किंमत विचारली तर मी काय सांगू? मी बलात्कार पीडित असल्यामुळे शासनाने फुकटात हे घर दिलंय म्हणून सांगू? जे मंत्री मला नोकरी देऊ इच्छितात ती नोकरी मिळताच माझ्या सर्व्हीस बुकमध्ये माझी विशेष पात्रता 'बलात्कार पीडित' अशी नोंदवू? देशात होणारे अधिकांश बलात्कार हे नेत्यांसाठी काम करणाऱ्या माणसानेच केलेले असतात. महोदय, उद्या जर या राक्षसाचा संबंध एखाद्या राजकीय नेत्याशी आहे हे समोर आले तर करतील ही माणसे मला मदत? दुर्दैवाने माझ्यावर आलेला प्रसंग कुणावरही येऊ नये. जजसाहेब, दिल्ली गँगरेप काय किंवा माझ्यावर झालेल्या अत्याचारानंतर जे मोर्चे निघाले, चर्चा झाल्या त्यामध्ये या घटनेच्या विरोधात या नराधमाच्या एका तरी नातेवाइकाने भाग घेतला? याचा निषेध केला? या - या गुंडाला पोलीस ठाण्यात भेटायला आलेल्या प्रत्येकाने याला 'घाबरू नकोस. तुझ्या सुटकेचे प्रयत्न करु..' असाच धीर दिला असेल. याच्या घरच्यांनी, परिचितांनी, मित्रांनी याच्याशी असलेले संबंध तोडून निषेध केला का? का नाही केला? त्यादिवशी तिथे प्रत्यक्ष घटना पाहणारांनी याला थांबविण्याचा का प्रयत्न केला नाही. मूकपणे तो प्रकार बघणारे, चिंध्या चिंध्या होणारे माझे शरीर पाहणारेच नंतर निघालेल्या मोर्चांमध्ये, चर्चांमध्ये सहभागी झाले असतील. तिथे जो जत्था जमला होता त्यामध्ये का हा एकटाच मर्द होता? बाकी सारे का नामर्द होते? षंढ होते? त्या घटनेच्या सुरुवातीलाच कुणाचे रक्त का तापले नाही? घडलेली घटना निर्मनुष्य ठिकाणी तर घडत नव्हती? ते एक गजबजलेले उद्यान होते. शेकडो बघ्यांपैकी एक-दोघांनी जरी याला अडविले असते तर पुढले सारे टळले असते. उलट काही जण मोबाईलवर घटनेचे चित्रीकरण करीत होते. मी काही रेवपार्टी किंवा डान्सबारमध्ये गेले नव्हते. तरीही मोर्चा, चर्चा किंवा इतरत्र मला एक प्रश्न विचारल्या जातोय की, त्या सायंकाळी मी एकटीच त्या उद्यानात का गेली होती?" नलिनी म्हणाली. ती स्वतःच्या श्वासावर नियंत्रण मिळवत खाली बसत असताना मा. न्यायमूर्तींनी त्या दिवसाचे कामकाज संपविले...
०००
नागेश सू. शेवाळकर