“पुरे झाले आता. हे सर्व सहन करण्यापलीकडचे आहे. आपण आपले वेगळे घर घेऊन राहू.” राधिकाने मनोहरपंतांना फर्मान काढले.
“काय झाले? आजही परत मानसीशी वादावादी झाली का? काय हे? तुला किती वेळा सांगितले कि ती नवीन आहे आपल्या घरात, थोडे समजून घेत जा ना.”
“हो..हो..मीच समजून घेत आले आजवर. आधी सासरच्यांना आणि आता सुनेला! मला मेलीला माझे असे काही आयुष्यच नाही.” राधिकाचा त्रागा चालूच होता.
शेवटी मनोहरपंत समजुतीच्या स्वरात म्हणाले,” बरं, आता झोप शांतपणे. आपण उद्या सकाळी जाऊ नवीन घर शोधायला.”
“तुमचा उद्या कधी उजाडणार आहे कोण जाणे!!! पण आता मी माघार घेणार नाही.” असे म्हणत राधिका रागारागातच अंथरुणात शिरली.
सकाळी मनोहरपंत उठायच्या आधीच राधिका सर्व आवरून तयार होऊन बसली होती. नाईलाजाने मनोहरपंतांनी आवरले आणि ती दोघे वेगळे घर शोधण्यासाठी बाहेर पडली.
रस्त्यात राधिकाचे लक्ष एका अनोख्या दुकानाकडे गेले. दुकानाचे नावं होते ‘दिव्यदृष्टी’. दुकानाच्या पाटीखाली लिहिले होते की आमच्याकडे सर्व नातेसंबंधाचे चष्मे मिळतील. आपले नातेसंबंध टिकवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे चष्मे मिळण्याचे एकमेव ठिकाण.
जे नातं ठिणगी पडली कि पेट घ्यायला सज्ज असतं अशा नात्यांमध्ये सुधारणा करणारे चष्मे आमच्याकडे मिळतील.
सासू- सुनेचा चष्मा, नवरा-बायकोचा चष्मा, नणंद- भावजयीचा चष्मा, आई-वडील-मुलाचा/ मुलीचा चष्मा,घर मालकीण-मोलकरणीचा चष्मा. तसेच ऑफिसाठी खास कार्पोरेट चष्मे मिळतील. ह्यामध्ये बॉस आणि इतर नोकरदार ह्याचे संबंध विकसित करणारे चष्मे मिळतील.
असे आगळे वेगळे दुकान पाहून राधिका लगेच त्या दुकानात शिरली. पाठोपाठ मनोहरपंतही दुकानात शिरले.
दुकांदाराने विचारले,” सुनेचा चष्मा देऊ का?”
“तुम्हाला कसे समजले?” राधिकाने आश्चर्याने विचारले.
“अनुभवाचे बोल!” दुकानदार हसत बोलला.
“पण ह्या चष्म्याने नाते कसे चांगले होते?” राधिकाचा अजूनही विश्वास बसत नव्हता.
“ तुम्हाला ज्या व्यक्तीशी जुळवून घ्यायचे आहे त्या व्यक्तीच्या नावाचा चष्मा लावायचा. म्हणजे ती व्यक्ती कशी आहे, तिची जडण घडण कशी आहे, तिचा स्वभाव, तिचे विचार हे सारे काही समजण्यास मदत होते. एकदा का ती व्यक्ती पूर्णतः समजली की तिच्याबद्दलचे आपले मत आपोआप बदलते आणि नातेसंबंध मजबूत होतात.” दुकानदाराने व्यवस्थित माहिती दिली.
“अग्गोबाई, खरं की काय?” राधिका एकदम खुष झाली आणि तिने दुकानदाराकडे आपल्या सुनेचा म्हणजे मानसीचा चष्मा मागितला.
“चष्मा तर मी देतो तुम्हाला, पण चष्मा लावल्यावर काही प्रश्न रोज स्वतःला विचारणे आवश्यक आहे. नाव काय म्हणालात सुनेचे?”
“मानसी.” राधिकाने सांगितले.
“हा विशेष चष्मा लावून पुढील प्रश्न उत्तरे मिळेपर्यंत रोज विचारायची.”असे म्हणत दुकादाराने दिव्यदृष्टी देणारे प्रश्न सांगितले.
१. मानसीला स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या? आणि त्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही तिला मदत केली का?
२. मानसीला स्वतःला न आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या? त्या गोष्टी न होण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न केलेत?
३. तुम्हाला मानसीच्या आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या? त्या तिला किती वेळा सांगितल्या?
४. तुम्हाला मानसीच्या न आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या? त्या तिला किती वेळे स्पष्टपणे सांगितल्या?
५. मानसीला तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत?
६. तुम्हाला मानसीकडून काय अपेक्षा आहेत? हे तिला सांगितले का?
७. मानसीचे चांगले गुण?
८. मानसीचे अवगुण? मी ते दुर्लक्षित करू शकते का?
आणि सर्वात शेवटी विचारण्याचा प्रश्न म्हणजे मानसी माझ्याशी अशी का वागते?
हा प्रश्न मात्र अगदी शेवटी विचारला तरच खरे उत्तर मिळेल.
“ बाप रे, तुम्ही प्रत्येकासाठी असे प्रश्न तयार केले आहेत? किती मेहनत घ्यावी लागली असेल ना?” राधिका हरखून गेली होती.
“खरं सांगू का, सर्वांसाठी म्हणजे अगदी कार्पोरेट जगासाठी देखील प्रश्न हेच आहेत. फक्त त्या त्या व्यक्तीचे नाव प्रश्नात घालायचे. प्रत्येक व्यक्तीला आपण आपल्या चष्म्यातून न बघता त्या व्यक्तीचा चष्मा लावून बघितले पाहिजे. हे जर जमले तर कोणाशीही नातं जुळवणे खूप सोपे होते. म्हणूनच हे दुकान मी काढले आहे.”
“आता बघा एखाद्याला आपल्या बॉसचा खूप राग येत असेल तर त्याने बॉसचा चष्मा लावायचा आणि वरील प्रश्नांवर सराव करायचा. काही दिवसांनी तोच बॉस ऑफिसला गेल्या गेल्या म्हणेल,” किती वाजले?” पाच मिनिट उशीर झाला.”
अशावेळी नेहमीप्रमाणे त्या नोकरदाराच्या मनात येईल पाचच मिनिट उशीर झाला ना. मी काय रिकामटेकडा आहे का तुमच्यासारखा. पण बॉस चा चष्मा उत्तर देईल,” हा माणूस शिस्तप्रिय आहे. त्यामुळे त्याचे बरोबर आहे.” मग तो माफी मागून मोकळा होईल.
तसेच बॉसने एखाद्या कामाविषयी विचारले आणि त्याच्या हाताखालच्या माणसाने सांगितले की मेल पाठवली आहे. तेव्हा बॉस म्हणतो,” मला येऊन थोडक्यात तोंडी सांगा.”
अशावेळी पहिला विचार येतो कि मला काय नौकर समजता काय? कि मला दुसरे काही कामधाम नाही. पण बॉसचा चष्मा सांगेल,” त्यांना वयानुसार वाचायचा कंटाळा येतोय किंवा वाचत बसायला वेळ नसेल.” मग तो शांतपणे सांगू शकतो. अशा प्रकारे जीवनात कोणतेही नातं हाताळताना त्या त्या नात्याचा चष्म्या वापरल्यास नात्यातले खरे सुख काय असते त्याची अनुभूती नक्की मिळेल. मग लावताय ना सुनेचा चष्मा?” दुकानदाराने राधिकाला विचारले.
राधिकाने खूप खुष होऊन चष्मा खरेदी केला. घरी जाऊन घाईघाईने डोळ्यांवर चढवला आणि यादीप्रमाणे प्रश्नांची उत्तरे शोधण्यास सुरुवात केली. तेव्हा तिला अचानक लक्षात आले की याची उत्तरे ती लिहू शकतच नव्हती.
पण
राधिकाचे डोळे पाण्याने भरून आले. आजवर आपण आपल्याला सून कशी हवी आणि आपल्याला तिच्याकडून काय अपेक्षा आहेत एवढंच बघितले. पण मानसीला काय हवे आहे ह्याचा फारसा विचार न करता इतर सुनांशी तिची तुलना करत तिला दोष देत राहिलो याचे राधिकाला खूप वाईट वाटले. त्या दिव्यदृष्टीच्या चष्म्याने तिच्या डोळ्यांत जणू अंजन घातले आणि आपल्या सुनेकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोनच बदलला. अजूनही वेळ गेलेली नव्हती. आपल्याला लाभलेल्या दिव्यदृष्टीचा उपयोग करून सुनेशी जमवून घेण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे असे राधिकाने ठरवले.
“राधिका, अग उठतेस ना? किती वेळ झालाय बघ. उन्हे डोक्यावर आली, उठ आता. बरे वाटत नाही का तुला?” मनोहरपंत काळजीने राधिकाला उठवत होते.
राधिका एकदम दचकून जागी झाली.
“स्वप्न होते म्हणायचे!!! पण खरी जाग आणली ह्या स्वप्नाने.” असे म्हणत राधिका घाईत उठली.
“आज जायचे आहे ना घर बघायला? आवर लवकर.” मनोहर पंतानी आठवण दिली.
"थांबा ओ जरा, सकाळी सकाळी काय तुम्हाला सुचतेय घरं बघायचे. शिफ्ट ड्युटीमुळे मानसीला रोज रात्री किती काम पुरतं माहिती नाही का तुम्हाला? मला आधी स्वयंपाकाचे बघू द्या आणि शिवाय मला आधी काही प्रश्नांची उत्तरे मिळवायची आहेत मग घराचे बघू.” असे म्हणत राधिका स्वयंपाक घराकडे वळाली.
मनोहरपंत खूप आश्चर्यचकित झाले. हेच आपण हिला दररोज समजावत होतो तर पटत नव्हते आणि आता कसा काय हा बदल झाला त्यांना काहीच समजत नव्हते.
थोड्यावेळाने मानसी उठायला उशीर झाला म्हणून नेहमीप्रमाणे अपराधी भावनेने उठून आली आणि राधिकेला विचारले,” आई, आज नाश्त्याला काय करायचे?”.
आज राधिका सुनेला तिच्या चष्म्यातून बघत होती. त्यामुळे तिची अपराधी नजर, काहीतरी करण्याची धडपड राधिकेला अगदी स्पष्ट दिसली. त्यामुळे सुनेच्या ह्या प्रश्नावर, ”झाले आहे सर्व, आता फक्त वेळेत खाऊन घ्या म्हणजे झालं ,मला जेवणाची तयारी करायची आहे” असे नेहमीप्रमाणे उत्तर न देता राधिका हसतमुखाने मानसीला म्हणाली,” रात्री उशीर झाला ना झोपायला? रोजच्या प्रमाणे अमेरिकेचे कॉल्स घ्यावे लागले असतील. तुमचे आयटी कंपन्यांचे काम असेच ग बाई. पण झोपली असतीस अजून तरी चालले असते. नाश्ता तयार आहे. तू आधी शांतपणे खाऊन घे नंतर आपण जेवणाचे बघू.” असे म्हणत राधिकाने अगदी प्रेमाने नाश्त्याचे वाढले आणि अगदी प्रसन्न मुद्रेने चहा ठेवला.
आज आपल्या सासूला काय झालेय हे काही मानसीला कळलेच नाही. पण आज खूप वर्षांनी मानसीने आनंदात नाश्ता केला. ज्या प्रेमाच्या उबेची भूक मानसीला होती ती ऊब मिळाल्याने मानसीची सकाळ खूप प्रसन्न झाली हे मात्र खरे.
आपल्या बायकोतला बदल पाहून मनोहर पंतही मनोमन खूप सुखावले.
सौ. मंजुषा श्याम देशपांडे,पुणे.
msdeshpande05@gmail.com