मायाजाल--६
ठरल्याप्रमाणे काॅलेजचे विद्यार्थी आणि डाॅक्टर्स डोंगराच्या कुशीत वसलेल्या त्या आदिवासी वस्तीत पोहोचले. डोंगर कपा-यांमध्ये पिढ्या-न-पिढ्या जणू स्थानबद्ध झालेल्या आदिवासी बांधवांपर्यंत शहरी सुखसोयी पोचल्या नव्हत्या. तिथल्या जंगलांमध्ये जमवलेल्या मध, मेण, काही जंगली औषधी वनस्पती, किंवा तांदूळ कडधान्या सारख्या काही वस्तू घेऊन विकण्यासाठी जवळच्या बाजारपेठेत जात; तोच त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क! -- रात्रंदिवस जंगलात किंवा लहानशा शेतजमिनीवर राबणारे पुरुष आणि दळण कांडणापासून सगळी कामे आणि उरलेल्या वेळात दुरून पाणी आणणे एवढेच जीवनाचे इति कर्तव्य असणाऱ्या इथल्या स्त्रिया----. स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला लागणाऱा वेळ आणि पैसा या दोन्हींचा इथे अभाव होता. दोन वेळचं जेवण मिळणं मुश्कील होतं. चौरस आहार तर दूरच राहिला! पोट खपाटीला गेलेली वृद्ध माणसं. हातापायाच्या काड्या झालेली मुलं आणि अशक्त --अकाली प्रौढत्व आलेल्या स्त्रिया----, इथली प्रत्येक व्यक्ती पेशंट आहे असं वाटत होतं.
डाॅक्टरनी त्यांच्यातल्या काही पुढारी मंडळींशी संपर्क करून त्यांना या शिबिराच्या आयोजनाचे महत्व सांगितले होते. त्यांनी ग्रामस्थांची सभा घेऊन ज्यांना काही आजार असतील त्यांनी आलेल्या डॉक्टरांकडून औषध पाणी करून घ्यावं असं समजावून सांगितलं होतं. पण तरीही बरेच जण दुरूनच शहरातून आलेल्या लोकांची टेहळणी करत होते. जवळ येऊन काही विचारायला मात्र घाबरत होते.
आलेले स्टुडंट्स पिकनिकला आल्याप्रमाणे घोळका करून एका झाडाखाली गप्पा मारत बसले होते.
बरोबर आलेले मोठे डाॅक्टर त्यांना हवी तशी व्यवस्था करून घेत होते. पेशंटची बसण्याची व्यवस्था,तपासणीची खोली, गरज पडल्यास पेशंटना निदान चार- पाच काॅटची तात्पुरती व्यवस्था- बरोबर असलेली उपकरणे ठेवण्यासाठी जागा--- सगळं काटेकोरपणे ठरवत होते.
इंद्रजीत सराईत असल्याप्रमाणे त्यांना मदत करत होता. डाॅक्टरांच्या सूचनेप्रमाणे नीट काम होत आहे; की नाही, इकडे लक्ष देत होता. प्रज्ञा त्याला जमेल तशी मदत करत होती. आत सर्व मनासारखं झाल्यावर तो प्रज्ञाला म्हणाला,
" इथलं काम व्यवस्थित झालंय! आल्यापासून काम करून मी तर थकून गेलोय! चल! बाहेर हवेत बसूया!" प्रज्ञाने हसून मान डोलावली.
इंद्रजीत थकवा आलाय असं म्हणाला, पण बाहेर येऊन स्वस्थ बसला नाही.
लांब उभे राहून शहरातले लोक काय करतायत; याचं निरीक्षण करत आपसात चर्चा करणा-या लोकांना त्याने जवळ बोलावलं. त्यांची नावं विचारली. त्यांच्याशी इकडतिकडच्या गप्पा मारू लागला. त्यांच्या बरोबर असलेल्या लहान मुलांना चाॅकलेट दिली.
"उद्या तुमच्या मित्रांना घेऊन या! तुम्हाला चित्राची पुस्तकं देणार आहे!" तो त्यांना म्हणाला.
"तू त्यांच्यासाठी पुस्तकं घेऊन आलायस? " प्रज्ञाने आश्चर्याने विचारलं.
" फक्त पुस्तकंच नाही! वह्या पेन्सिली -- एवढंच नाही; वेगवेगळ्या मापांचे शर्ट्सुद्धा आणलेयत! त्या निमित्ताने मुलं इथे येतील; त्यांचा जुजबी मेडिकल चेक-अप करता येईल. वेगवेगळ्या वयाच्या मुलांचा साधारण आकडा विचारून घेतला होता; त्याप्रमाणे आम्ही सगळं घेऊन आलो आहोत!" इंद्रजीत म्हणाला.
तिथे आलेल्या लोकांशी बोलता बोलता त्याने कोणाला काही आजार आहे का; याची चौकशी केली. ज्यांना काही प्रकृतीचे प्राॅब्लेम होते; त्यांना थोडा वेळ थांबून डाॅक्टरांकडून तपासून घेण्याची विनंती केली. त्यांची नावे लिहून घेऊन केस पेपर्स तयार केले. हे सगळं करत असताना गावात कोणी जास्त दिवसांपासून आजारी आहे का? असेल तर उद्या त्यांना घेऊन या; असं आवर्जून सांगायला विसरला नाही.
" या लोकांना कसं समजावायचं; तुला चांगलंच माहीत आहे!" आश्चर्याने प्रज्ञा त्याला म्हणाली.
" इथे मी पहिल्यांदाच आलोय; पण अशा शिबिरांना २-३ वेळा उपस्थिती लावलीय! त्यामुळे इथे येऊन काय करायचं; मला चांगलंच माहीत आहे. हे लोक डाॅक्टरना खूप घाबरतात! थोडं त्यांच्या कलाने घेऊन त्यांची भीती घालवावी लागते. काही ठिकाणी तर घरोघरी जाऊन आजारी माणसं शोधावी लागतात. त्या मानाने इथे चांगला प्रतिसाद मिळाला! हे थांबायला तयार झाले आहेत; म्हणजे आपल्या शिबिराचा श्रीगणेशा झाला!"
**********
दुसऱ्या दिवशी मात्र आजूबाजूच्या परिसरात मोठे डॉक्टर तिथे आल्याची बातमी पसरली. आणि हळूहळू आजूबाजूच्या गावांमधूनही लोक येऊ लागले. थंडीचे दिवस असल्यामुळे फ्लू- आणि मलेरियाची साथ चालू होती. त्यामुळे बरीच गर्दी झाली.
"आपण अगदी योग्य वेळी शिबिराचं आयोजन केलं! अनेकांना ट्रीटमेंटची गरज होती." इंद्रजीत प्रज्ञाला म्हणाला.
गावातल्या मुलांचा मेडिकल चेक-अप झाला. त्यांना वह्या- पुस्तकं- कपडे मिळाले.
"हा इंद्रजीत खरंच किती मोठ्या मनाचा आहे! गेल्या वर्षीही शिबिराला असंच सगळ्या गोष्टीचं वाटप त्याने केलं होतं." एक विद्यार्थी -- गिरिराज कौतुक करत होता.
प्रज्ञाला वाटलं होतं; की मुलांना काॅलेजतर्फे वस्तू दिल्या जाणार आहेत; पण हे सगळं इंद्रजीतने आणलंय, हे तिला आता कळत होतं.
काल प्रज्ञाशी बोलताना, "मी एवढं सगळं करतोय!" असा अहंभाव इंद्रजीतच्या बोलण्यात जराही दिसला नव्हता.
तिने अजूनपर्यंत पाहिलेले बरेचसे तरूण आत्मकेंद्रित होते. उपेक्षितांचा एवढा विचार करणारा इंद्रजीत हा पहिलाच मुलगा तिने होता!
आलेल्या लोकांशीही तो हसतमुखाने बोलत होता. लोकांची भिती हळूहळू कमी होत होती!
आलेल्या लोकांपैकी एकजण डाॅक्टरना म्हणाला,
“डॉक्टर! खोकून खोकून त्या लखूच्या बरगड्या दिसायला लागल्या आहेत. पण त्याचा विश्वास इथल्या गणपत भगतावर जास्त आहे. रोज देवदेवस्की करतोय पण गुण काही येत नाही. त्याने भरपूर लुबाडलाय लखूला! शहरात जाऊन डॉक्टर ना तब्येत दाखव म्हणून किती समजावलं; पण ऐकत नाही. माझा लहानपणापासूनचा सवंगडी आहे! त्याच्याकडे बघून वाईट वाटतं! आज सकाळी त्याच्याकडे गेलो होतो. इकडे येण्यासाठी खूप समजावलं; पण त्याने आपला हेका सोडला नाही."
तो कळकळीने बोलत होता. आपल्या डोळ्यासमोर मित्राची तब्येत इतकी बिघडताना पाहून न राहवून त्याने घाबरत घाबरत डाॅक्टरांकडे विषय काढला होता.
त्याची कळकळ बघून डाॅक्टरनाही त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करता येईना!
"आजारी लोकांनी औषधपाण्यासाठी शहरात येण्यापेक्षा इथे जर एखादं लहानसं सरकारी हाॅस्पिटल --- निदान दवाखाना सुरू झाला तर फार बरं होईल. सरकारतर्फे मोफत औषधं दिली जातात; चांगले डाॅक्टर्स पाठवले जातात! मी इथल्या लोकांशी बोलणार आहे. आणि तुमच्या मित्राची काळजी करू नका! त्याचा पत्ता देऊन ठेवा; मी संध्याकाळी त्याच्या घरी जाऊन त्याला काय झालंय ते बघतो. आम्ही इथे त्यासाठीच तर आलो आहोत ! तुमचा मित्र लवकरच बरा झालेला तुम्ही बघाल! " डाॅक्टर त्याला धीर देत म्हणाले.
डॉक्टरनी लखू च्या घरचा पत्ता लिहून घेतला. आणि बरोबर एका ग्रामस्थाला घेऊन, संध्याकाळी त्याला भेटायला गेले. बरोबर आलेले विद्यार्थी सोबत होतेच! लखु ची तब्येत खरोखरच नाजूक होती. त्याला टी. बी. झाला होता. आणि अनेक दिवस उपचार न मिळाल्यामुळे पुढच्या स्टेजला गेला होता. त्याला हाॅस्पिटलमध्ये देखरेखीखाली ठेवण्याची गरज होती. डॉक्टरनी त्याच्या मुलाला त्याला शहरातील सरकारी इस्पितळात अॅडमिट करण्याचा सल्ला दिला.
" मी स्वतः त्याच्याकडे लक्ष देईन! " असं आश्वासन त्यांनी दिलं. लखूचा मुलगा त्याला शहरात घेऊन जायला तयारही झाला; पण लखू मात्र घाबरलेला दिसत होता.
"मी जर तुमचं औषध घेतलं, तर मी देवळातल्या बाबावर अविश्वास दाखवण्यासारखं होईल, आणि जर त्यांचा कोप झाला तर तो माझ्या घराचा सत्यानाश करेल! माझा जीव गेला तरी चालेल पण माझ्या मुलाबाळांवर कोणाची वाईट दृष्टी नको! तो बाबा--गणपत मांत्रिक महाभयंकर आहे. काहीतरी करणी - प्रयोग करेल, आणि माझी तब्येत आणखी बिघडेलच; पण माझ्या अख्ख्या घराची तो वाट लावेल! " लखू च्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती.
" तू त्याला घाबरण्याचं काहीही कारण नाही. तो तुझ्या - माझ्यासारखाच सामान्य माणूस आहे! देव नाही! आज संपूर्ण गाव आमच्यावर विश्वास ठेवून आमचे उपचार घेतंय! त्याला घाबरत असते तर कोणी आमच्याकडे आलं असतं का? मग तूच का एवढा भेदरून गेलायस? मनातली भिती काढून टाक! तुझ्यावर लगेच उपचार चालू करण्याची गरज आहे. एकदा तू धडधाकट झालास; की तुझ्या मुलाबाळांवर वाकडी नजर टाकायची त्याची हिंमत होणार नाही.
" तुम्ही त्याला ओळखत नाही; म्हणून असं बोलताय! एकदा त्याला पाहिलंत तर कळेल; मी असं का बोलतोय ते! कर्णपिशाच्च वश आहे त्याला! आता आपण इकडे काय बोलतोय ते त्याला तिकडे कळत असेल! तुम्ही सुद्धा सांभाळून रहा त्याच्यापासून!" लखू थरथरत म्हणाला.
लखूशी बराच वेळ वाद - विवाद करावा लागला, पण शेवटी डाॅक्टरना यश आले आणि तो त्यांच्याबरोबरच शहरात जाऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला तयार झाला. तोपर्यंत घेण्यासाठी काही औषधं डॉक्टरनी त्याला दिली. आणि विश्रांतीचा सल्ला दिला.
. "हा तिकडून येताना बरा होऊन आला, की तो स्वतःच भगताकडे न जाता , डॉक्टरी उपचार घेण्याचा सल्ला इथल्या लोकांना देईल! पुढच्या वेळी आपण इथे येऊ तेव्हा लोकांचा यापेक्षाही चांगला प्रतिसाद आपल्याला मिळेल." त्याच्या घराबाहेर पडल्यावर डॉक्टर हसत बरोबरच्या विद्यार्थ्यांना म्हणाले.
"सर! तुम्ही दिवसभर खूप काम केलंय! जाऊन थोडा वेळ आराम करा. आम्ही जरा गावात फिरून येतो!" इंद्रजीत त्यांना म्हणाला.
"आम्ही पण दमलोय आता! हे गावात फिरायचं फॅड कुठून काढलंस? " डाॅक्टर गेल्यावर सगळेजण वैतागून इंद्रजीतला विचारू लागले.
"आपण आता त्या गणपतला भेटायला जाणार आहोत! आपलं शिबीर नीट पार पडायला हवं असेल; तर त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे! इंद्रजीत हसत म्हणाला. त्याच्या हसण्यात मिश्किलपणा होताच; पण आत्मविश्वासही तेवढाच जाणवत होता.
********* contd.----- part 7.