Shahana in Marathi Short Stories by Manas Gadkari books and stories PDF | शहाणा - 1

Featured Books
  • ખજાનો - 86

    " હા, તેને જોઈ શકાય છે. સામાન્ય રીતે રેડ કોલંબસ મંકી માનવ જા...

  • ફરે તે ફરફરે - 41

      "આજ ફિર જીનેકી તમન્ના હૈ ,આજ ફિર મરનેકા ઇરાદા હૈ "ખબર...

  • ભાગવત રહસ્ય - 119

    ભાગવત રહસ્ય-૧૧૯   વીરભદ્ર દક્ષના યજ્ઞ સ્થાને આવ્યો છે. મોટો...

  • પ્રેમ થાય કે કરાય? ભાગ - 21

    સગાઈ"મમ્મી હું મારા મિત્રો સાથે મોલમાં જાવ છું. તારે કંઈ લાવ...

  • ખજાનો - 85

    પોતાના ભાણેજ ઇબતિહાજના ખભે હાથ મૂકી તેને પ્રકૃતિ અને માનવ વચ...

Categories
Share

शहाणा - 1

शहाणा

भाग 1 – रस्त्यावरचा वेडा

श्री. गंगाधर साठे यांचे निवासस्थान

आज रविवार, सुट्टीचा दिवस. मस्त खा प्या लोळत राहा. मला काय खरेतर सगळॆ दिवस सारखेच. थोडे दिवस झाले आता निवृत्त होऊन. 25 वर्षांपूर्वी शिक्षक म्हणून लागलो आणि कशी वर्षे सरली कळलेच नाही. शाळा, शाळेतील मुले ह्यातच पूर्ण आयुष्य वेचलं. शाळेतील मुले पण असाधारण, मतिमंद म्हणू नये स्पेशल चाईल्ड. दया यायची त्यांच्याकडे बघून, त्यांच्या पालकांना पाहून. पण जबरदस्त आकलन क्षमता आणि मेहनत घेणारी मुले. तेवढीच निरागस, गोंडस. त्यांच्यामागे आयुष्य गेल्याचे समाधान वाटते कुठेतरी.

संध्याकाळी घरी आल्यावर मुलाचा म्हणजे प्रसादचा अभ्यास मलाच घ्यायला लागायचा. ही तिचे ऑफिस आणि स्वयंपाकाचे बघायची. कामे वाटून घेतली होती. दिवसामागून रात्री पटापट जाऊ लागल्या. नंतर प्रसाद मोठा झाला, लग्न लावून दिले. छान चालू आहे त्याची नोकरी, संसार. माझा काय वेळ असाच जातो बातम्या बघण्यात, बेडवर पडून किशोर, रफीची जुनी गाणी ऐकण्यात. काहीच नाही तर खिडकीत बसायचे, गल्लीमधली मुले खेळत असतात, मजा येते ते बघून.

आज मात्र रविवार असला तरी पडायला मिळणार नाही. पाहुणे येणार आहेत घरी. मुलाचे बॉस आहेत म्हणे. ते आणि त्यांचे कुटुंब जेवायला येणार आहे. हिची आणि सुनेची तारांबळ उडाली आहे मघासपासून. मी मदत करू का काही विचारले तर नको, आम्ही करतो सगळे. बर करा मग मला काय, मी खिडकीत बसून पेपर वाचतो. अधे मध्ये बाहेर लक्ष जात होते, असेच.

गेल्या काही दिवसापासून त्याच्यावर नजर आहे माझी. नाक्यावर उभा असतो हातवारे करत, काहीतरी बडबडत. वेडा आहे म्हणे. गल्लीतील लहान मुले त्याच्या वाटेला जातात, “वेडा वेडा” म्हणून दगड मारला एकदा त्यांनी. मी फटकारतो त्यांना खिडकीतुन. तो पण त्यांच्यामागे धावून जातो कधीतरी. त्याने पण त्या मुलांना दगड मारले तर, लागेल ना. आई वडील पण मुलांना असेच सोडून देतात खेळायला, अजिबात लक्ष देत नाहीत. असो.

मी मात्र त्याला बघतोय काही दिवस, एकटाच उभा असतो दिवसभर. कधी गाड्या आडवं, कधी कुत्र्याला मार. चेहरा नीट दिसत नाही पण तसा तरुण वाटतो, कपडे पण साधारण स्वच्छ असतात. जवळच कुठेतरी राहत असावा. काय खात असेल हा, घरी कोणी असेल का त्याचे? वेडा असला तरी काय झाले शेवटी माणूसच ना. तसेपण मला विशेष सहानुभूती होती अशा लोकांबद्दल, मतिमंद मुलांच्या शाळेत इतकी वर्ष शिकवले म्हणून असेल कदाचित पण दया येते, काहीच चूक नसते ह्यांची, नशीबच फुटके आणखी काय. असेच मी एकदा निरखत होतो त्याला, त्या क्षणी त्याने पण खिडकीपाशी बघितले. दोन क्षण नजरानजर झाली आमची आणि तो मला पाहून खुदकन हसला, हात वर केला त्याने जणू काही ओळख दाखवायला. सरसरून काटा आला माझ्या अंगावर. मी पटकन खिडकी बंद केली.

आज पण तो तिथे उभा आहे. काहीतरी पुटपुटतो आहे. रस्त्यावरचे कागद उचलतो आहे. कसे असते बरे वेड्याचे आयुष्य? कसा झाला असेल त्याच्या डोक्यावर परिणाम? नातलगांनी टाकुन दिले असेल का? आता पुढे काय होणार ह्याचे? ठीक होईल का कधी? हॉस्पिटलमध्ये का नाही ठेवले ह्याला? मी काही मदत करू शकेन का त्याला? खरेतर दया येत होती त्याची पण काय करावे, घरचे म्हणतील तुम्हाला कशाला हवे आहेत नसते उद्योग. बसा ना चुपचाप. असे कितीतरी लोक आहेत जगात जे एकटेच जगतात, सगळ्यांची जबाबदारी घेणार का? त्यामुळे आपण आपले शांत बसावे.

भाग 2 – मी

ह्याला खरे आयुष्य जगणे म्हणतात. नाहीतर बाकीच्या लोकांसारखे ऑफिसमध्ये जा, काम करा, घरी कामे करा. माझे कसे मजेचे आयुष्य. डोक्याला काही ताप नाही, व्याप नाहीत. तर माझे नाव कल्पेश. कल्पेश नारायण पाटील, बाकीचे लोक मला लाडाने कल्प्या म्हणतात आणि काही ‘वेडा’ म्हणतात.

बारा वर्षांचा होतो मी. तेव्हापासून कंटाळा यायचा शाळेत जायचा, अभ्यास करायचा. मोठ्यांना बघायचो, एक तर ऑफिस नाहीतर घरच्या जबाबदाऱ्या. काय बेकार दिवस असतात ह्या लोकांचे.
मला असे जगायचेच नव्हते, हालअपेष्टा सहन करत. पण कसा मार्ग काढावा कळत नव्हते. देवाकडे रोज प्रार्थना करायचो मला लॉटरी लागू दे म्हणून. आणि अखेर मला लॉटरी लागलीच आयुष्यभर पुरेल इतकी.

11 जुलै 2015 ची रात्र होती. मित्रांबरोबर बाहेर फिरायला गेलो होतो, म्हणजे इकडेच गल्लीच्या टोकापर्यंत. एकाएकी जोरदार पाऊस चालू झाला. छत्री होती माझ्याकडे पण उघडली नाही मी. मनमुराद भिजायचे होते पावसात. मित्र ओरडत होते, अरे कल्प्या आडोशाला ये. पण मला कोणाचेही ऐकायचे नव्हते. चिंब भिजलो त्या पावसात आणि तसाच घरी आलो थंडीने कुडकुडत.

बाबांनी विचारले “कुठे फिरत होतास रात्रीचा इतक्या पावसात?”. मी काहीच बोललो नाही. आणि खाडदिशी कानफटात ठेऊन दिली त्यांनी माझ्या. अंग थरथर कापायला लागले. माझी शुद्ध हरपली. काही वेळाने शुद्धीवर आलो पण डोळे बंदच ठेवले होते. माझ्या मनात विचारांचे थैमान चालू झाले, हाच तो क्षण, निर्णय घेण्याची वेळ, ज्याने माझे जीवन पूर्ण पलटून जाईल.

मी बेशुद्धीत राहण्याचे नाटक केले. मला सर्व काही ऐकायला येत होते, कळत होते, पण मी तसाच पडून राहिलो. आई बाबांच्या अंगावर ओरडत होती, “हे काय केले तुम्ही? लहान मुलगा आहे ना तो. आता ह्याला काय झाले म्हणजे आपण काय करायचे?”. बाबा डॉक्टरांना फोन लावत होते. तोपर्यंत आई माझे डोके मांडीत घेऊन मला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करीत होती. पण म्हणतात ना, झोपलेल्याला उठवू शकतो पण झोपेचे सोंग घेतलेल्याला उठवायचे कस? ते तसेच काहीसे चालले होते.

थोड्यावेळाने डॉक्टर आले. ते इंजेकशन देतील या भितीने मी हळूच डोळे उघडले. आईला लगेच हायसे वाटले. डॉक्टरांनी मला तपासले. म्हणाले “काळजी करू नका, आकस्मित फटका पडल्याने घाबरला आहे तो. ताप पण वाटतो आहे थोडा, औषधं देतो मी, होईल ठीक.” डॉक्टर निघून गेल्यावर, आई बाबा माझ्यापाशी आले, आई डोक्यावर हात फिरवत होती, बाबा पण थोडे दुःखी दिसत होते. मी मात्र आपल्या निर्णयावर ठाम होतो. हीच ती वेळ होती नशीब बदलण्याची, एकदा नॉर्मल झालेलो दाखवलं असतं तर परत मागे फिरणं शक्य नव्हतं.
मी इकडे तिकडे बघू लागलो. हळूच हसू लागलो, विचित्र हातवारे करू लागलो. बाबांना विचारले, “तुम्ही कोण? पोलीस का? आणि ह्या शाळेतल्या बाई रडतायेत का?” आई हमसून हमसून रडत होती. बाबांनी परत डॉक्टरांना फोन लावला, काहीतरी बोलणे झाले त्यांचे.
वाह, काय मजा येते आहे. मी नंतरचा विचार करत होतो. शाळा नाही, अभ्यास नाही, मोठे झाल्यावर ऑफिस नाही, फक्त खायचे प्यायचे आणि टाईमपास करायचा.

सकाळी कोणीतरी दुसरे डॉक्टर आले, स्पेसिएलिस्ट म्हणे. त्यांनी तपासले आणि म्हणाले, “अहो तो नॉर्मल वाटतो आहे, होईल ठीक.” मी घाबरलो, बिंग फुटते आहे की काय. पण नंतर डॉक्टरच म्हणाले, “अश्याही केसेस येतात आमच्याकडे, बाहेरून नॉर्मल वाटत असले तरी मानसिक तणाव असतो. शॉक लागला आहे त्याला कुठल्यातरी गोष्टीचा, होईल ठीक हळू हळू”. चला, डॉक्टरांनी माझे काम सोपे केले. मी मनाशी ठाणले, ठीक बिक काही नाही, आता असेच आयते जगायचे.

असेच काही दिवस गेले. उठायचे, टीव्ही लावायचा, मध्येच नाटक केल्यासारखे जोरजोराने ओरडायचे, हसायचे, रडायचे. दिवसभर खिडकीत बसायचे नाहीतर बिल्डिंगबाहेर गल्लीमध्ये फिरायचे. रात्र झाली की झोपून जायचे. आई बाबांची खरेतर दया पण येत होती, त्यांची अवस्था बघवत नव्हती. पण आता मागे फिरणे नाही, कोणाला कळले की मी नाटक करत होतो तर बाबा बदडून काढतील मला आणि हो अभ्यास पण चालू होईल. तेव्हा जे चालू आहे ते काय वाईट आहे. टीव्हीवर शाहरुख खान आला की नाचायला लागायचो, बिल्डिंग मधली मुले मला बघून चिडवायची, “ए करिना कपूर” मग मी त्यांना उत्तर द्यायचो, “तुझा बाप करिना कपूर”. त्यांच्या अंगावर दगड घेऊन धावून जायचो, वाटले तर पाहिजेना त्यांना ह्याचे डोके ठीक नाहीये म्हणून. कोणालाही शंका यायला नको माझ्या वेडेपणाबद्दल. उलट बाबांना तक्रार करायचो, मला बिल्डिंगमधली मुले करिना कपूर बोलतात म्हणून. तर त्यावर बाबा म्हणायचे, “जाऊ दे रे बाळा, लक्ष देऊ नकोस त्यांच्याकडे”. माझ्याशी बोलताना, बाबांच्या डोळ्यात पाणी यायचे, झाल्या प्रसंगाला स्वतःला दोषी ठरवायचे. पण मी चलाख होतो, असल्या गोष्टींना भुरळणारा नाही. मध्ये मध्ये डॉक्टर यायचे तपासायला, तेव्हा मी जास्त चिडचिड करायचो. तरीही “तुमच्या मुलाला खास काही झाले नाहीये” असे डॉक्टर म्हणायचे, पण आई बाबा मानायला तयार नव्हते की मी नाटक करतो आहे म्हणून. त्यांना मनाशी स्वीकारले होते की माझ्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला आहे. काही काळानंतर डॉक्टरही यायचे बंद झाले, माझे अजून एक टेन्शन गेले.

आणि अचानक एक दिवस आई बाबांनी बॉम्ब फोडला. मला मतिमंद मुलांच्या शाळेत टाकायचे असे ठरले. मी म्हटले, च्यायला काय कटकट आहे, एवढे केले तरी शाळा आहेच का अजून. पण आता नाईलाज होता, जावेच लागणार होते ह्या शाळेत. माझी नवीन शाळा सुरु झाली. खरेच तिथे मतिमंद मुले यायची, केविलवाणी. मी त्यांना नीट बघायचो, ही मुले कशी वागतात, कशी बोलतात. मला सुद्धा असेच काहीतरी वागावे लागेल. शिक्षक पण त्यांच्याशी म्हणजे आमच्याशी गोडीने बोलायचे. दिवसभर गाणी, रंगकाम नाहीतर कागदाच्या होड्या बनवा, हे एवढेच काय ते सुरु असायचे. एकंदरीत मजेची शाळा, अगदीच वाईट नव्हते तर. कधीकधी कंटाळा यायचा इथे पण, काय ते रोज चित्रे काढत बसायची, गाणी म्हणायची.

एक शिक्षक यायचे तिथे, कविता शिकवायचे, वाचन करून घ्यायचे. कुणास ठाऊक पण मला निरखून पाहायचे ते. एक दोनदा नाव विचारले त्यांनी मला, घराचा पत्ता विचारला. मी उडवाउडव केली, दुर्लक्ष केले. माझी परिक्षा घेत होते असे वाटले मला. पण जाणूनबुजून माझ्यावर जास्त लक्ष द्यायचे ते. खरंच मतिमंद असल्याचे नाटक करणे पण कठीण काम असते. काही दिवसानंतर ते शाळेत येईनासे झाले, नाव माहित नाही त्यांचे मला पण चेहरा मात्र चांगलाच लक्षात आहे अजून.

बाकी ठीक चालले आहे, ठीक काय अप्रतिम. इतके दिवस कोणाला काही कळले नाही, आता काय कळणार आहे. आई बाबा नातेवाईकांकडे घेऊन जातात, तेव्हा त्यांच्या घरी गप्प बसायचे, मध्येच थोडेसे तोंड वेडे वाकडे करायचे, कोणालाही शंका नको मनात. गल्लीतील लहान मुले मागे लागतात, “वेडा वेडा” म्हणून दंगा करतात, करू देत, मी पण त्यांना सामील होतो. दगड उचलून मारायची ऍक्टिंग करतो. कधी पोलीस बनून गाड्या थांबवतो तर कधी कुत्र्यांच्या मागे धावत राहतो. बाकीचे लोक जरा टरकूनच असतात, लाम्बनच रस्ता ओलांडतात तर काही बाल्कनी/खिडकीतून मजा घेत असतात.

असाच एक चेहरा खिडकीतून डोकावतो आहे काही दिवसापासून. ओळखीचा वाटतो पण नीट दिसत नाहीये, बाबांच्या वयाचा माणूस असावा, मला टक लावून पाहत असतो. एकदा मी त्याला हूल दिली आणि हात वर केला तर तो टरकलाच, पटकन खिडकीच लावून घेतली. हाहा, कसे घाबरवले, माझ्या वाटेला जाल तर याद राखा.

भाग 3 (अंतिम) – पाहुणे

आज – श्री. गंगाधर साठे निवासस्थान

दारावर बेल वाजली तिसुद्धा दोनदा. पाहुणे आले असावे बहुतेक, सोबत लहान मुलगा किंवा मुलगी असेल, दोनदा बेल वाजवणारी. माझ्या मुलाने म्हणजे प्रसादने त्याच्या बॉसचे घरात स्वागत केले.
श्री पाटील : सर्वप्रथम तुम्हाला ओळख करून देतो, मी नारायण पाटील, प्रसाद आणि मी एकत्र काम करतो, ही माझी बायको आणि मुलगा कल्पेश. आम्ही इथे समोरच्या बिल्डिंग मध्येच राहतो, बऱ्याच दिवसांपासून प्रसाद घरी बोलवत होता, आज योग आला.

मी त्या मुलाला बारकाईने बघितले, हा तोच वाटतो आहे. खाली रस्त्यावर उभा असलेला, वेडसर चाळे करणारा. पण ह्याला अजून कुठेतरी पाहिलेले वाटते आहे. मला पाहताच का कुणास ठाऊक त्याने नजर चुकवल्यासारखे केले. हो, आले लक्षात, हा तोच शाळेतला. ज्यावर मी विशेष लक्ष द्यायचो.

घरात जेवणाचा कार्यक्रम चालू झाला होता, गप्पा रंगत होत्या, पण माझे मन दुसरीकडे भरकटत होते. आठवणी उजळत होत्या. शाळेत माझे शेवटचे काही दिवस उरले होते, तेव्हा एक नवीन ऍडमिशन झाली - कल्पेश पाटील, मनोरुग्ण होता म्हणे. वशिला लावला होता शाळेत ऍडमिशनसाठी. इतकी वर्षे मतिमंद मुलांच्या सहवासात काढली होती पण असा मुलगा पाहिला नव्हता. जरा वेगळा वाटत होता, बाकीच्या मतिमंद मुलांसारखा नव्हता, मनोरुग्णही वाटत नव्हता. त्याच्या हालचाली, हावभाव वेगळे असायचे. बाकी मुलांना तो निरखत असे, जणू काही शिकायचे होते त्याला. मी एक दोनदा त्याच्याशी चौकशी करायचा प्रयत्न केला पण त्याने उडवाउडवी केली. मला खोलवर जाऊन बातमी काढावीशी वाटत होती पण तेवढ्यात माझी रिटायरमेंट आली. कशाला हवी नसती ब्याद म्हणून मी विषय सोडून दिला, दुर्लक्ष केले.

आज पुन्हा त्या आठवणी जाग्या झाल्या. बघूया तरी काय म्हणणे आहे ह्याच्या आई वडिलांचे. गप्पा रंगल्या होत्या, तेवढ्यात मी विषय काढला.

मी : पाटील साहेब, माफ करा मला पण उत्सुकता म्हणून विचारतो आहे. तुमचा मुलगा जन्मापासूनच असा आहे की नंतर काही विपरीत घडले?

श्री पाटील : अहो विचारा ना, त्यात माफी कसली. काही वर्षांपूर्वी अशीच एक घटना घडली की ज्याचा ह्याला शॉक बसला. आम्हाला वाटले होते बरा होईल काही काळानंतर, पण नाही, नंतर आम्ही आशा सोडून दिली. बाकी काही त्रास नसतो त्याचा, घरात चुपचाप बसून असतो, गल्लीत फिरत असतो.

मी : डॉक्टर काय म्हणतात? (माझे कुतूहल वाढू लागले)

श्री पाटील : डॉक्टर म्हणायचे, खास काही झाले नाहीये, तसा बरा वाटतो आहे. पण नंतर डॉक्टरांना बघून हा वेडापिसा व्हायचा, अटॅक ह्यायचा ह्याला. मग डॉक्टरना बोलावणे बंद केले आम्ही.

(मी मनामध्ये : माझी शंका खरी ठरते आहे तर, नाटक करतोय की काय हा.)

माझ्या नसत्या शंका कुशंका ऐकून त्याने माझ्याकडे एक रागाने नजर टाकली आणि तो विचित्र हातवारे करू लागला. जणू काहीतरी सिद्ध करून दाखवायचं होतं त्याला.

कुठेतरी मनात सल होती. एकदा श्री.पाटील यांच्या बरोबर सविस्तर बोलून पहावे असे वाटत होते.
मी : पाटीलजी, जर काही प्रॉब्लेम नसेल तर 2 मिनिट बोलू इच्छितो तुमच्याशी एकांतात. बाकीच्यांना इथे गप्पा मारू देत.
श्री पाटील : हो, अवश्य. बोलूया ना आपण. बोला काय म्हणणे आहे तुमचे?

(आतल्या खोलीत गेल्यावर)

मी : सर्वप्रथम मी माझी पुन्हा एकदा ओळख करून देतो, मी गंगाधर साठे, सध्या रिटायर्ड आहे पण या आधी मी एका शाळेत शिकवायचो, मतिमंद मुलांच्या. तिथे मी तुमच्या मुलाला पाहिले. न जाणे का, कुणास ठाऊक पण पहिल्यापासून माझ्या मनात त्याच्या बद्दल शंका आली होती, म्हणजे अजूनही आहे. मला सत्य जाणून घ्यायचे आहे, हा कल्पेश खराच असा झालाय की तो नाटक करतोय. सॉरी म्हणजे, डायरेक्ट प्रश्न विचारला पण लपून छपून कशाला बोलावे असे वाटते. अर्थात, तुम्ही त्याचे वडील आहात, तुम्हाला सर्व ज्ञात असेलच. पण मला फक्त एक छोटी शंका आली म्हणून विचारले, प्लीज गैरसमज करून घेऊ नका.

श्री पाटील : खरेतर मी जास्त कोणाशी बोलत नाही ह्या विषयावर. पण तुम्ही शिक्षक होता, मतिमंद मुलांचे. तुम्हाला खऱ्या खोट्याची जाण असणे स्वाभाविक आहे, आता काय लपवू तुमच्यापासून. आम्हाला म्हणजे मला आणि बायकोला दाट शंका येते कधी कधी की कल्पेश वेडेपणाचे नाटक करतो, डॉक्टरांचे नाव काढले की चवताळतो. आम्ही डॉक्टरांशी बोललो सुद्धा ह्या विषयावर, त्यांचेही असे मत होते की नॉर्मल वाटतो आहे तो, खास काही झाले नाहीये त्याला. बऱ्याचदा कल्पेशशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण हा काही दाद देत नाही, वेडसर चाळे सुरु करतो, घराबाहेर निघून जातो. मग शेवटी आम्ही असा विचार केला की नशिबात जे आहे त्याला कोण बदलणार, खरेच डोक्यावर परिणाम झाला असेल ह्याच्या त्या एका घटनेनंतर. मीच शेवटी त्याला जबाबदार आहे, उगाच हात उचलायला नको होता त्याच्यावर, आता भोगा आपल्या कर्माची फळे आणखी काय. त्याला मतिमंद मुलांच्या शाळेत पण टाकले, तुम्हाला तर माहीतच आहे. खरेतर हा काही मतिमंद नाही, मनोरुग्ण समजून चालावे. बराच वशिला लावा लागला ऍडमिशनसाठी पण तेवढीच बायकोला घरात ह्याच्या पासून मोकळीक मिळावी म्हणून शाळेत टाकले ह्याला. नाहीतर जीव जायचा हिचा ह्याच्या मागे दिवसभर राबून.
काही झाले तरी त्याला आता आशा अवस्थेत जपणे आमचे कर्तव्य आहे, निदान मुलगा तरी घरात राहील, कुठे पळून गेला तर आम्ही काय करायचे. एकुलता एक मुलगा आहे आमचा.
(बोलताना त्यांचा कंठ दाटून आला. मला दया आली त्यांची.)

मी : सॉरी पाटीलजी, काही जास्त बोललो असेल तर क्षमा असावी. फक्त एक छोटीशी शंका होती मनात त्याचे निरसन करावेसे वाटले. चला, बाहेरच्या खोलीत जाऊया, सगळे वाट बघत असतील.

आम्ही बाहेरच्या खोलीत आलो. त्याची नजर माझ्यावरच होती, जणू त्याला माहित होते आम्ही काय बोलत होतो ते. कुठंतरी राग जाणवत होता त्याच्या डोळ्यात. मी मुद्दाम त्याची प्रतिक्रिया बघायचे ठरवले.

मी : तर मी काय म्हणत होतो पाटीलजी, माझ्या ओळखीचे एक मानसशास्त्र तज्ञ आहेत, त्यांच्याकडे एकदा दाखवले कल्पेशला तर. खूप मोठा अनुभव आहे त्यांचा ह्या विषयावर.

माझे हे बोलणे संपते नाही तोच कल्पेश चवताळला. मोठमोठ्याने श्वास घेऊ लागला, समोरच्या टेबलला लाथ मारली त्याने, हातातला पाण्याचा ग्लास खाली टाकुन फोडला.

मला कळत होते ‘वेडा म्हणून आपले अस्तित्व टिकवायची तळमळ चालली होती त्याची’.

श्री पाटील : अरे कल्पेश, शांत हो बाबा. कुठल्याही डॉक्टरकडे जायचे नाही आपल्याला, नको त्रागा करुस. अहो साठे, मी तुम्हाला बोललो ना मघाशी, नका डॉक्टरचे नाव घेऊ त्याच्यासमोर, अटॅक येतो त्याला. चल बाळा निघूया, उशीर पण झाला आहे.

असे म्हणून ते तिघेही औपचारिकता करून घरी जायला निघाले. जाता जाता त्याने मान वळवून मागे माझ्याकडे पाहिले, मिश्कीलपणे हसत. त्याच्या चेहऱ्यावर जणू कुठलीतरी लढाई जिंकल्याचे भाव होते.
पाहुणे गेल्यावर घरचे बोलू लागले मला, “कशाला नसत्या चौकशा तुम्हाला, बसा ना गप्प. चिडला ना तो मुलगा, दुसर्‍यांच्या भानगडीत कशाला पडायचे. ”

मी गपगुमान झोपायला गेलो. डोक्यात विचार चालूच होते, काय मिळत असेल ह्या मुलाला असे वागून, आई वडिलांच्या जिवावर जगून, त्यांना आणि स्वतःला फसवून. अजून कुठून माहिती काढावी का ह्याची.

संध्याकाळी दाराची बेल वाजली, मी दरवाजा उघडला तर कोणीही नव्हते. एक कागद पडला होता खाली, ज्यावर माझे नाव होते. मागे पुढे काही लिहिले नव्हते, रिकामा कागद माझ्या नावाचा. मनात नसत्या शंका कुशंका येऊ लागल्या. हिने आतून विचारले कोण आले आहे म्हणून तर म्हणालो “कोणी नाही, उगाच कोणीतरी वात्रट पोराने बेल वाजवली”.

उगाच घरच्यांना मनस्ताप कशाला, सुरळीत आयुष्य चालले आहे ते चालू द्यावे की. पण मग या रिकाम्या कागदाचा अर्थ काय? धमकी? त्या पोराने तर दिली नसेल ना की माझ्या वाटेला जाऊ नका म्हणून. उगाच माझ्यामुळे घरातल्यांना संकटात घालायला नको, जर त्या मुलाचे बिंग फोडले तर बदला घेईल का तो. नकोच ती विषाची परिक्षा, आपण बरे आणि आपले घर बरे.

हे मनात येताच खिडकीपाशी आली, खाली बघतो तर तिथे तो उभा होताच रस्त्यावर वेडे चाळे करत. लगेच मला बघितले त्याने जणू माझी वाटच पाहत होता. त्याने एका हाताने दगड उचलून आमच्या खिडकीवर नेम धरला आणि माझ्याकडे बघून जोरजोराने हसू लागला. माझे अंग शहारून आले, मी नकळत त्याला हात जोडले आणि पटकन खिडकी बंद करून घेतली.