लघुकथा - " कवितांची डायरी "
"मग काय ठरलं ? इथे पुण्यातच सेटल होणार आहेस कि कऱ्हाडला ? " प्लेटमधील नॅचोजचा तुकडा उचलून त्याची एक बाईट घेत नियतीने विचारले.
"विचार तर पुण्यातच सेटल व्हायचा आहे पण.... " बोलताना निनाद थांबला आणि बिअरचा एक घोट घेत डाव्या बाजूच्या काचेच्या खिडकीतून बाहेर पाहू लागला. . नवव्या मजल्यावरील त्या रेस्टोरेंटच्या खिडकितुन सूर्यास्ताचे विहंग दृश्य दिसत होते.
"पण काय ?" त्याची क्षणभराची तंद्री भंग करत नियतीने विचारले.
"बाबांची इच्छा आहे कि इथली नोकरी सोडून तिथे मी एखादा व्यवसाय सुरु करावा , फायनान्स ते करतील" ग्लास टेबलवर ठेवत तो म्हणाला.
"पण तुझी इच्छा काय आहे ?" दोन्ही हात टेबलावर ठेवत निनादकडे झुकत नियतीने विचारले आणि त्याच्या उत्तराची वाट पाहू लागली.
" मी थोडा कन्फयुज आहे गं " काहीसा कावरा बावरा होत निनाद म्हणाला.
"अरे असं काय उत्तर देतोयस ? हि दुसरी भेट आहे आपली , मॅट्रीमोनीवर प्रोफाइल सिलेक्ट केलीस तेव्हा पुण्यातच सेटल होणार असं ठसकून सांगितलं होतंस मला "
" मी कऱ्हाडला सेटल व्हायचं ठरवलं तर नाही पुढे जायचं का आपण ? " केवीलवाना चेहरा करत निनादने नियतीला विचारले.
"नाही " असं बोलून तिने चेहरा दुसरीकडे वळवला.
"रागावलीस ? "
"हो , जी गोष्ट मनात गृहीत धरून इथवर आलो ती तशी घडणारच नसेल तर पुढे जाण्यात काय अर्थ ?"
"मी आवडतो ना तुला ?"
"हो आवडतोस , दोन आठवडे झाले आपण बोलतोय आणि तुझ्यात न आवडण्या सारखं असं काही दिसलं नाही , तुझ्यात एक समजूतदार , मनमिळावू , विचारी लाईफ पार्टनर दिसतो मला , खूप कमी दिवसात इतके जवळ आलो आपण "
"एवढं सगळं असून सुद्धा फक्त पुण्यात राहायला नाही जमणार म्हणून आपण इथेच थांबायचं ? "
"एवढंच नाहीये माझ्यासाठी हे , माझं अख्ख आयुष्य गेलय इथे ,माझी नोकरी , कुटुंब , फ्रेंड सर्कल हे सगळं सोडून येऊ मी ? "
"का बाकीच्या मुली नाही जात का त्यांचं सगळं सोडून ? "
" आता असली फालतू डिबेट करणार आहेस का तू माझ्यासोबत ? कम ऑन निनाद अरे पस्तिशीत आहे मी आता , आजपर्यंत आयुष्य स्वतःच्या टर्म्स वर जगले बाकीचे काय करत आहेत तस करत बसण्यात वेळ न घालवता मला जे पटलं तेच केलं नेहमी , म्हणून समाधानाने जगू शकले ! घर ,करिअर सगळं स्वतःच्या हिमतीवर मिळवलं मी , आता या टप्प्यावर आल्यावर आतूनच वाटलं कि लग्न करावं , त्यासाठी स्वतःच स्थळ पाहायला लागले , बऱ्याच जणांना भेटले पण तुझ्यासोबत एक वेगळंच बॉन्डींग जाणवलं मला तरीही आजपर्यंत मिळवलेलं सगळं सोडून फक्त तुझ्यासोबत राहण्यासाठी लांब कुठेतरी जावं हे नाही पटत मला "
" तसं तुझं बरोबरच आहे , बारावी झाल्यावर मीही घरात भांडून पुण्याला शिकायला यायचं ठरवलं , मेहनतीने शिकलो जॉब मिळवला , घर घेतलं , खरंतर मलाही परत जाऊशी वाटतं नाही a , असं वाटलेलं कि आईबाबा येतील इथे पण gavakadcha ऐसपैस बंगला सोडून तुझ्या पुण्यातल्या खुराड्यात अजिबात येणार नाही असं स्पष्ट बोलले ते , त्यांचं अख्ख आयुष्य त्या वातावरणात गेलं मग साहजिक आहे त्यांचं नाही मन रमणार इथे ....
इतके वर्ष मनसोक्त आयुष्य जगता यावं म्हणून एकटं राहिलेल्या मला , mazya बरोबरच्या मित्रांना त्यांच्या कुटुंबसोबत आनंदाने जगताना पाहून आता आयुष्यात काहीतरी कमी वाटायला लागलंय "
"गफलत होतीये तुझी काहीतरी , तुला आइबाबांसोबत रहायचं का स्वतःच कुटुंब , पोरं बाळं हवीत ?"
"दोन्ही एकत्र हवंय "
" ओके , मग तशीच एखादी मुलगी पहा , मला खात्री आहे सहज मिळेल तुला "
"तू मनात फिक्स झाली आहेस "
"निनाद .. मी निघते... तू सध्या कन्फयुस्ड आहेस तू शांत डोक्याने विचार कर , आता तुझा काही ठाम निर्णय झाला तर मला कळवं मगच भेटू आपण " बिलाचे पैसे बिल फोल्डर मध्ये ठेऊन नियती जागेवरून उठली , तिने पर्स खांद्यावर लटकवली आणि रेस्टोरेंटच्या बाहेर पडली
"थांबना" लगबगीने तिच्या मागे येत तिला आवाज देत निनाद म्हणाला
"बोल" लिफ्टचे बटन दाबत नियती म्हणाली.
"खरं सांगू रागावणार तर नाहीस ना ? "
“बोलशील आता ?”
"मला तू हवी आहेस पण एक भीती आहे मनात , जेव्हा मी खचून जाईल तेव्हा तू मला आधार देऊ शकशील ? तू इतकी प्रॅक्टिकल वागतेस माझ्या भावना समजू शकशील ? अशा वेळी आई बाबा सोबत असतील तर त्यांच्या आधाराने आपल्याला कुटुंबाचा समतोल साधता येईल "निनाद काहीसा चाचपडत बोलून गेला आणि नियतीला हसू आवरले नाही .
"हसतेस का अशी " निनादने कपाळावर आट्या पाडून विचारले.
"स्टुपिड आहेस तू , एक मुलगी आपल्याला सपोर्ट देऊ शकत नाही असं वाटत असून सुद्धा तुला ती हवी आहे ? "
"हो हवी आहे "
"अवघड आहे तुझा विषय , पण तुझ्यात गुंतून मला अजून कॉम्प्लिकेटेड नाही करायच्यात गोष्टी सो तुझा निर्णय कळवं लवकर , नाही तर इथेच फुल स्टॉप" त्याच्या खांद्यावर हात मारत ती बोलली
"हा बघ हेच... हेच.. म्हणतोय मी , तुझं असं तडाखा- फडकी वागणं ... मी नाही बरका असा , मी खूप इमोशनल आहे , माझ्या प्रत्येक नात्यात मी डेडिकेटेड असतो "
“काय बोलू यावर आता मी , निघुयात आपण चल " निर्विकार चेहऱ्याने नियती म्हणाली.
"हम्म " नियतीने चर्चा तिथेच थांबवाल्याने निनाद निराश झाला.
दोघेही लिफ्टने खाली आले.
"तुझी गाडी घेऊन जाऊ का गं ? माझी सर्व्हीसिंगला टाकलीये संध्याकाळी आणून देतो" नियतीच्या कारमध्ये बसल्यावर निनादने विचारले.
"ओके , तसही मी आज सुट्टी टाकलीये , आई-बाबा बाहेर गेलेत घरची सगळी कामं पेंडिंग आहेत , मला ड्रॉप कर आणि गाडी घेऊन जा " गाडी गतिमान करत नियती म्हणाली.
नियतीला ड्रॉप करून झाल्यावर निनादच्या मनात फक्त तिचाच विचार चालू होता. प्रॅक्टिकल वागत असूनही नियती त्याला मनापासून आवडली होती.
बराच विचार केल्यानंतर नियतीला होकार कळवण्याचे त्याने मनाशी ठरवले. ज्या कामासाठी तो गेला होता ते काम करुन झाले. तो परत यायला निघाला . गाडीत बसला . हातातील एन्व्हलप ठेवायला त्याने कारचे ग्लोव्ह कंपार्टमेंट उघडले आणि त्याची नजर आत असलेल्या डायरीवर गेली.तो क्षणभर पाहत राहिला मग त्याने एन्व्हलप आत टाकला कंपार्टमेंट बंद केले आणि परत यायला निघाला.
संध्याकाळचे सात वाजले होते. नियती बाल्कनीतल्या खुर्चीवर बसली होती. संध्याकाळ झाली तरी घरातील एकही दिवा तिने पेटवला न्हवता.दारावरची बेल वाजली. तिने दार उघडले.
"वर आलास तू ?" निनादला न सांगता वर आलेलं पाहून नियतीने विचारले.
"सॉरी .. आता आत तर येउदे " दरवाजा हळूच नियतीच्या बाजूने ढकलत निनाद म्हणाला.
" सांगायचं तरी अवतार बघ माझा ? " नाईट ड्रेस परिधान केलेला असल्याने नियती म्हणाली. तिने घरातील दिवे पेटवले.
"क्युट दिसत आहेस " तिच्याकडे एकटक पाहत निनाद म्हणाला
"शट अप " लाजणे लपवत नियती म्हणाली.
"बरं काय घेणार तू चहा कि कॉफी " तिने विचारले.
"कॉफी चालेल , मी फ्रेश होऊन येऊ ? "
"हो त्या बाजूला बाथरुम आहे " बाथरूमच्या दिशेने हात दाखवत नियती म्हणाली. मग किचन मध्ये कॉफी बनवायला गेली.
थोडाच वेळात निनाद हॉलच्या दिशेने परतल्याच तिला जाणवताच तीने कोफी मगमध्ये ओतली आणि ट्रे घेऊन बाहेरच्या दिशेने जाऊ लागली . तितक्यात निनाद किचनमध्ये आला .
"हलकीशी वाऱ्याची झुळूक
का लक्षात ठेवेल कोणी ?
मिटले असतील ज्याचे डोळे क्षणभर
तोच ते जानी " हातात धरलेल्या डायरीतून निनादने नियतीला चारोळी वाचून दाखवली .
"एक्स्क्यूज मीSSS " आपली डायरी निनादच्या हातात पाहून नियती जागच्या जागी खिळली .
"अजून एक ऐक ....
....... ........ ...
जपताना स्वतःच काचेपरी मन
दगड व्हायचं सोंग हवं
कुस्करले जाऊ नये हळव्या भावना
म्हणून काटेरी देठ असल्याचं ढोंग हवं " वाचून झाल्यावर निनाद नियतीकडे पाहू लागला. नियतीने हातातला ट्रे खाली ठेवला आणि निनादच्या दिशेने गेली.
"मला न विचारता तू माझ्या डायरीला हातच कसा लावलास" असे बोलत तिने रागाने त्याच्या हातातून डायरी घेतली.
"किती सुंदर कविता करतेस तू कधी सांगितलं नाहीस मला ? "
"पहिले सांग तू माझी डायरी का घेतलीस ? "
"खरंतर न्हवतो हात लावणार , मी डायरी पहिली आणि तिला हात न लावताच परत यायला निघालो पण वाटेत राहून राहून मनात प्रश्न येत होता कि काय लिहलं असेल त्यात ? मग न राहवून गाडी बाजूला घेतली आणि डायरी उघडली मग शेवटचं पान वाचेपर्यंत बंद करू शकलो नाही "
"असं वागून तू निराश केलंस मला निनाद "
"आय एम रिअली सॉरी नियती अशी चूक पुन्हा नाही होणार "
"होप सो "
"आता तरी मुखवटा उतारवशील ? "
"म्हणजे " कावरी बावरी होत नियतीने विचारले.
"तू ती व्यक्ती नाही आहेस जी मला दाखवत आहेस " नियतीच्या जवळ येत निनाद बोलला.
"कॉफी प्यायची का आपण ... " निनाद पासून दूर होत नियतीने विचारले.
"बोलशील ... ? " तिचा हात धरत निनादने विचारले. तिची नजर खाली झुकली होती.
" इतक्या प्रगल्भ , हळव्या कविता लिहिणारी व्यक्ती इतकी प्रॅक्टिकल नसू शकते " तिला स्वतःजवळ ओढत निनाद म्हणाला. नियतीने एक खोल श्वास घेतला आणि बोलू लागली.
"आपली हळवी बाजू आपण जेव्हा एखाद्याला दाखवतो ना तेव्हा खरंतर आपल्या भावनांचा बराचसा ताबा त्याला देऊन बसतो आपण आणि कितीदातरी असं करून मी स्वतःचा भावांना इजा पोहचवलीये .. मनाविरुध्द्व वागायला प्रवृत्त होऊन स्वतःला हव्या असणाऱ्या गोष्टी मुकलीये ... एवढं सगळं करूनही नातं टीकायची शाश्वती नसतेच म्हणून स्वतःच एक प्रॅक्टिकल व्हर्जन बनवलं मी असं जे गोष्टी स्वतःच्या बाजूने ओढत आणत आणि तेच घेऊन बाहेरच्या जगात वावरते , स्वतःला प्रोटेक्ट करते , मग ते प्रोफेशन असो वा रिलेशन " नियतीने तिचं मन मोकळं केलं
" तुला काय वाटतं ? मी वागेल का असा स्वार्थी होऊन तुझ्याशी ? " नियतीच्या डोक्यावरून हळुवारपणे हात फिरवत निनादने विचारले.
"मला काय माहित ?" नियती म्हणाली आणि एकाएकी तिच्या डोळ्यात पाणी आले तिने निनादला मिठी मारली.
" तू ड्रॉप करून गेलास ना तेव्हापासून इतका वेळ मी बाल्कनीमध्ये बसून फक्त तुझाच विचार करत होते, तू नकार दिलास तर काय होईल ? जरी तू होकार दिलास तरी तुला हवं असलेलं प्रेम मी देऊ शकेल का ? जर तुझ्यात गुंतले तर तुही माझ्या भावनांशी खेळशील का असे असंख्य विचार मनात येत होते त्यामुळे तू होकार कळवलास तरी मीच तिला नकार देऊन टाकावा असं वाटतं होतं " निनाद भोवतीची मिठी तिने आणखीन घट्ट केली.
" वेडी आहेस तू , इतका विचार करतं का कोण ... ? माझ्याकडून होकार आहे आपल्या नात्याला , माझ्या मनात तुझ्याविषयी जेन्युअन फीलिंग्स आहेत पण त्याचं काही प्रूफ नाही देऊ शकत मी तुला , हवं तर आणखी काही दिवस घे तुझा निर्णय घ्यायला आपण अजून थोडा वेळ स्पेंड करू सोबत " तिला अलगत दूर करत तिच्याकडे पहात निनाद म्हणाला.
"आता नको आणखी वेळ घालवायला .. माझाही होकार आहे .. माझी दुखती नस शोधून काढली तू आता नकार कसा देऊ तुला ?”
नियतीचा होकार मिळाल्याने निनाद अतिशय आनंदी झाला . त्याने तिला पुन्हा मिठी मारली.
"कॉफी थंड होतीये चल ... " निनादच्या दंडावर हलकी चापट मारत नियती म्हणाली.
मग रात्र होईपर्यंत दोघं बाल्कनीमध्ये बसून मनसोक्त गप्पा मारत राहिले
****** समाप्त******
© धनश्री साळुंके