(सदरची कथा हि पूर्णपणे काल्पनिक आहे.)
भाग : पहिला
आजपर्यंत भारताच्या या पवित्र भूमीवर असंख्य युद्धे झाली. प्रत्येक युद्धाची कारणं वेगवेळी होती. कुणाला आपलं साम्राज्य वाढवायचं होतं. तर कुणाला आपलं वर्चस्व सिद्ध करायचं होतं. कुणाला अन्याया विरुद्ध आवाज उठवायचा होता तर कुणाला जगण्याचं स्वातंत्र्य मिळवायचं होतं.
भारताच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे मिळतील कि ती युद्धे त्यांच्या परिणामामुळे आठवणीत राहतील. असच एक युद्ध म्हणजे महाभारत... धर्माने अधर्माला संपवण्यासाठी केलेलं सर्वविनाशी युद्ध. महाभारताची व्याप्ती इतकी मोठी होती की इतिहासाला त्याची दखल घेणं भागच पडलं.
पण महाभारताच्या काळात आणखीन एक युद्ध लढलं गेलं. आपलं प्रेम मिळवण्यासाठी झालेलं हे युद्ध मात्र इतिहासाच्या पानातून नामशेष झालं कारण त्याची व्याप्ती महाभारता इतकी प्रचंढ नव्हती. पण ह्या युद्धाला असलेली प्रेमाची किनार मात्र नेहमीच अजरामर राहिली. त्याच प्रेमाला उजाळा देणारी ही कथा.
विराट देशाचा राजा. महाराज चक्रधर याने आपल्या एकुलत्या एक कन्येचा स्वयंवर मांडला होता. देशोदेशीच्या राजपुत्रांना स्वयंवराचे निमंत्रण पोचले होते. ह्या स्वयंवरासाठी खूप दूर दूरचे सुद्धा राजपुत्र आले होते. प्रत्येकाला स्वयंवर जिंकण्याची इच्छा होती याला कारण होती ती राजकुमारी देवयानी...
विराट देशाच्या राजाची एकुलती एक कन्या राजकुमारी देवयानी. तिच्या सुंदरतेची कीर्ती पूर्ण आर्यावरतात पसरली होती. तिच्या ह्या सुंदरतेमुळेच तिला स्वयंवरात जिंकण्यासाठी अनेक देशाच्या राजकुमारांनी हजेरी लावली होती.
नावाप्रमाणेच देवयानी जणू देवलोकातील अप्सराचं भासत होती. नाजूक रेखीव भुवया. त्याखाली किंचित उमललेल्या कमळासारखे डोळे. लाल - गुलाबी गुलाबासारखे मादक ओठ. त्यात लांब सडक नाकाची रेखीव ठेवण. गोरापान रंग त्यावर चढलेली यौवणाची लाली. कमनीय बांधा. शरीरावर असलेले स्त्रीत्वाची जाणीव करून देणारे उंचवटे. खूपच आकर्षक असा देह. देवयानीच्या ह्याच सुंदरतेमुळे कितीतरी राजकुमार तिच्यासाठी वेडे झाले होते. प्रत्येकाच्या नजरेत देवयानीसाठी आकर्षण होते. तिच्या मादकपणामुळे सगळे घायाळ झाले होते.
चक्रधर महाराजांचा दरबार तुडुंब भरला होता. देशोदेशीचे राजकुमार आपापल्या स्थानावर बसले होते. समोर उच्चासनावर महाराज चक्रधर बसले होते. त्यांच्या उजव्या बाजूला राजकुमारी देवयानी एका सुंदर आसनावर बसली होती. शेजारी दोन तीन दाशी उभ्या होत्या. राजसेवक समोर बसलेल्या राजकुमारांची ओळख करून देत होता. एक एक राजकुमारांच्या शेजारी जाऊन तो त्या राजकुमाराचा देश, त्याने केलेले पराक्रम, त्याच्या राज्याची व्याप्ती ह्याची पुसटशी ओळख साऱ्या दरबाराला करून देत होता. उच्चासनावर बसून देवयानी एक एक राजकुमाराला चोरून पाहण्यात दंग झाली होती.
देवयानीची चोरटी नजर समोर बसलेल्या साऱ्या राजकुमारांवरून फिरत होती. तिची भिरभिरणारी नजर एका राजकुमारावर पडली आणि तिथंच खिळून राहिली. समोरच्या डाव्या बाजूला बसलेल्या त्या राजकुमाराचं रूप आणि त्याचा पुरुषी देह देवयानीला पहिल्याच नजरेत भावून गेला. आजपर्यंत इतके पुरुष तिच्या नजरेने पाहिले होते मात्र समोरच्या त्या राजकुमारात एक वेगळचं आकर्षण तिला जाणवत होतं. तिची नजर काही केल्या त्या राजकुमारावरून हटत नव्हती. पण आपण त्याला पाहतोय हे कुणाला कळू नये म्हणून ती मोठ्या कष्टाने आपली नजर दुसरीकडे वळवत होती. पण राहून राहून तिची चोरटी नजर त्याच्याच दिशेने धाव घेत होती.
देवयानीला आता त्या राजकुमाराची ओळख ऐकायची नुसती घाई लागली होती. तो कोण असेल? कुठल्या देशाचा असेल? त्याने काय काय पराक्रम केले असतील? तो आपल्याला स्वयंवरात जिंकु शकेल का? तो खरचं पराक्रमी असेल की नुसताच रूपाने सुंदर असेल?.... हे आणि असले असंख्य प्रश्न तिच्या मनात एकाचवेळी थैमान घालत होते. ओळख करून देणाऱ्या राजसेवकाकडे तिचं लक्ष हि नव्हतं. तिला फक्त त्या राजकुमाराचा कधी एकदा नंबर येतोय असं झालं होतं.
" ....आणि हे आहेत गांधार देशाचे राजपुत्र, युवराज कर्कसेन..." राजसेवकाच्या ह्या आवाजाने देवयानी आपल्या विचारातून बाहेर आली आणि तिची नजर समोरच्या उजव्या बाजूला बसलेल्या आणि राजसेवक ओळख करून देत असलेल्या एका राजपुत्रावर पडली... बापरे! किती प्रचंढ आहे हा? पहाडासारखा दिसणारा कर्कसेन तोंडावर गर्विष्ठ हास्य करत एकटक देवयानीकडे पहात होता. त्याचा तो बलिष्ठ आकार पाहून देवयानीच्या मनात तर धडकीच भरली होती. आपल्या आकाराला साजेसा त्याचा पराक्रम ऐकून तर देवयानी मनोमन घाबरून गेली होती. गांधार देशाची सीमा कर्कसेनाने स्वपराक्रमाने फक्त दोन वर्षात दुप्पट वाढवली होती. आजूबाजूच्या देशांच्या राजांवर त्यांने चांगलीच वचक बसवली होती. त्याच्या चेहऱ्यावरूनचं त्याची क्रूरता स्पष्ट दिसत होती. ..... 'याने जर स्वयंवरचा पण पूर्ण केला आणि आपल्याला जिंकलं तर?'... ह्या विचाराने देवयानी पुरती बेचैन झाली होती. ती मनोमन देवाचा धावा करू लागली. कर्कसेनाने स्वयंवरचा पण जिंकू नये म्हणून ती देवाला साकडं घालू लागली.
थोड्यावेळाने राजसेवक त्या राजकुमाराजवळ पोचला ज्याची ओळख ऐकण्यासाठी देवयानीचे कान आतुर झाले होते. मनातील सगळे विचार बाजूला सारून देवयानी कान देऊन ऐकत होती. तिच्या नजरेने तर कधीच त्या राजकुमाराच्या साऱ्या देहावर आपला अधिकार गाजवून ठेवला होता...
"हे आहेत मगध देशाचे राजकुमार, युवराज ऋतुराज. यांची ख्याती जितकी वर्णावी तितकी कमीच आहे. वयाच्या नुसत्या 16 व्या वर्षी राक्षस समूहाचा आपल्या राज्यातून समूळ नायनाट करून आपल्या प्रजेच्या मनावर अधिराज्य मिळवणारे हे राजकुमार. शक्ती बरोबर युक्तीचाही वापर करुन शत्रूला घाईला आणणारे हे राजकुमार. ज्यांच्या पराक्रमाची ख्याती संपूर्ण क्षत्रिय कुलात प्रशंसनीय आहे असे हे युवराज ऋतुराज. विराट देशाच्या चक्रधर महाराजांचा राजसेवक या नात्याने मी आपले स्वागत करत आहे.." असं म्हणून राजसेवकाने त्यांना नमस्कार केला आणि तो पुढच्या राजकुमाराकडे वळला.
'ऋतुराज..' वा! सुंदर नाव... देवयानी पुन्हा आपल्या विचारात गुंग झाली... तिन्ही ऋतुवर राज्य करणारा राजा म्हणजे ऋतुराज. किती योग्य नाव आहे ना हे.. ह्याच्या शरीरयष्टीला अगदीच साजेसं असं हे नाव आहे. एक वेगळीच जादू आहे ह्याच्यात. मी पूर्ण मोहून गेलीय.. देवयानी आणि ऋतुराज.... ह्या विचाराने देवयानी लाजली आणि तिने चोरनजरेने पुन्हा एकदा ऋतुराजाकडे पाहिलं. यावेळी ऋतुराजही देवयानीकडेच पहात होता. एक क्षण दोघांची नजरा नजर झाली आणि देवयानीने लाजेने आपली नजर खाली झुकवली... तिच्या सर्वांगात एक वेगळीच भीती सरारून गेली. सारा चेहरा लाजेने लालबुंद झाला होता.
इकडे ऋतुराज सुद्धा देवयानीचं अलौकिक सौन्दर्य न्याहाळत होता. तिच्या सौन्दर्याने तर तो आधीच घायाळ झाला होता त्यात तिच्याशी झालेल्या नजरा नजरीने तर तो पुरता वेडावून गेला होता. हिला मिळवण्यासाठी काहीही करायला त्याचं मन तयार झालं होतं.
राजसभेत बसलेले सगळेच राजकुमार देवयानीला न्याहाळत होते. प्रत्येकाच्या मनात देवयानीला मिळवण्याची इच्छा प्रबळ होत होती. कर्कसेन तर देवयानीला पाहून लाळ गाळत होता. स्वयंवरचा पण कितीही अवघड असुदे तो पूर्ण करू शकलो तर ठीक नाहीतर बळजबरीने हिला उचलून घेऊन जायचं असा त्याने मनाशी पक्का निर्णय केला होता. तो येताना पूर्ण तयारी करूनच आला होता. प्रसंगी युद्ध करावं लागलं तरी तो त्यासाठी तयार होता. एका बुक्कीत काळं पाषाण फोडणारा कर्कसेन कुठल्या ताकतिचा असेल हे वेगळं सांगायची गरज नाही.
थोड्याच वेळात साऱ्या राजकुमारांची ओळख करून झाली. त्यांनतर महाराज चक्रधरांनी स्वयंवराच्या पणाची घोषणा केली आणि स्वयंवरात भाग घेण्यास इच्छुक राजांना स्वयंवराचं निमंत्रण देण्यात आलं. स्वयंवरचा पण ऐकून मात्र भल्या भल्या राजांच्या काळजात धस्स झालं होतं.
राजवाड्याबाहेर एक प्रशस्थ मैदान तयार केलं होतं. त्याच्या गोल दोन पुरुष उंचीची तटबंदी बांधली होती आणि वर प्रेक्षकांना बसण्यासाठी मैदानाच्या सभोवतालीने आसनांची व्यवस्था करण्यात आली होती. मैदानाच्या भोवतीने असंख्य प्रेक्षक बसले होते. एका उच्चासनावर महाराज चक्रधर बसले होते. त्यांच्या बाजूला राजकुमारी देवयानी बसली होती. बाजूला उभ्या असणाऱ्या दाशीच्या हातात एक तबक होतं ज्यात एक फुलांची माळ होती. जो राजकुमार पण जिंकेल त्याला देवयानी आपला पती मानून हार घालणार होती.
स्वयंवरचा पण ऐकून काही राजपुत्रांनी ह्यात भाग घेण्यास नकार दिला होता. ते सारे प्रेक्षक म्हणून दिलेल्या आसनावर बसले होते. ज्यांनी स्वयंवरात भाग घेण्याचं ठरवलं होतं त्यांना दुसऱ्या बाजूला बसवलं होतं.
मैदानात एक नरभक्षक वाघ खुला सोडला होता. त्याच्या डरकाळ्यांनी सारं मैदान दणाणून टाकलं होतं. त्याला जास्तच आक्रमक बनवण्यासाठी दोन दिवसापासून उपाशी ठेवण्यात आलं होतं. त्याच्या गळ्यात एक घंटी बांधली होती. त्याच्या गळ्यातून जो कोणी घंटी काढून घेईल तो हा पण जिंकणार होता. हा पण ऐकताना खूपच सोपा वाटत होता पण ह्याची भयानकता तेव्हा स्पष्ट झाली जेव्हा हा पण पूर्ण करण्याच्या अटी सांगण्यात आल्या....
वाघाच्या गळ्यातून घंटी मिळवण्यासाठी राजकुमाराने स्वतः मैदानात उतरायला हवं. त्याचा कोणताही सेवक सोबत असता कामा नये. कोणत्याही शस्त्राचा वापर करता येणार नाही. अंगावर फक्त दोनचं वस्त्र घेण्यास मुभा होती. ती कोणती घ्यावी हे ज्याचं त्यानं ठरवावं पण युद्धवस्त्र चालणार नाही. वाघाला मारलचं पाहिजे असं नाही फक्त त्याच्या गळ्यातील घंटी मिळवली तरी चालेल. एका राजकुमाराला एकदाच संधी मिळेल. कुणाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला तो स्वतः जबाबदार असेल. राजकुमार कोणत्याही क्षणी ह्या पणातून बाहेर पडू शकतो. वाघाशी झुंजताना जर कोणी 'वाचवा... वाचवा...वाचवा...' असं तीन वेळा ओरडला तर तो हरला असं समजून त्याला वाचवण्यात येईल....
ह्या सगळ्या अटी ऐकून निम्म्याहून अधिक राजकुमारांनी स्वयंवरातून माघार घेतली होती. अंगावर फक्त दोनच वस्त्र त्यात युद्ध वस्त्र ही घालता येणार नाही म्हणजे लज्जा रक्षणासाठी वापरायची अंतर्वस्त्रच घालावी लागणार हे नक्की होतं. म्हणजे वाघाला सहजपणे शरीराच्या कोणत्याही भागाचा लचका तोडता येणार होता. कोणतंही शस्त्र न घेता इतक्या प्रचंढ वाघाशी कसं लढता येईल. घंटी मिळवण्यासाठी वाघाला मारावाच लागणार पण विना शस्त्र हे कसं शक्य आहे...
वाघाच्या डरकाळीने सारं मैदान व्यापून टाकलं होतं. स्वयंवरात भाग घेणारे आता फक्त बोटावर मोजण्याइतकेच राजकुमार शिल्लक होते. उच्चासनावर बसलेल्या देवयानीचे डोळे अजूनही ऋतुराजवर खिळून बसले होते. त्याने माघार घेतलेली नाही हे पाहून तिच्या मनात त्याच्याविषयी अधिकच आदर निर्माण झाला होता. मला मिळवण्यासाठी हे राजकुमार साक्षात मृत्यूशी लढायला तयार आहेत हे पाहून तिला आपल्या सौन्दर्याचा अधिकच अभिमान वाटत होता.
कर्मश.....