mann aanand aanand chhayo in Marathi Moral Stories by Anjali J books and stories PDF | मन आनंद आनंद छायो

Featured Books
Categories
Share

मन आनंद आनंद छायो



सकाळी उठल्यावर रेडिओवरचं ‘ मन आनंद आनंद छायो’ हे तंबोर्याच्या सुरावर म्हणलेलं आशाताईंचं गाणं कानावर पडलं आणि वसुचं मन एकदम प्रसन्न झालं. चला दिवसाची सुरवात तरी छान झाली असं म्हणत चहा पित पित ती टेबलवर थोडी रेंगाळली. नंतर मात्र प्रसन्न मनाने पण चटाचट हात उचलत तिने रोजची कामं आटोपली. सचिन, श्रेयाचे डबे भरले . आणि घाईघाईने ती चहा घेउन सासुबाईंच्या खोलीत आली. वरुण आईचे पाय चेपत बसला होता. तिला पाहताच किती उशीर? असा चेहरा करुन तो आॕफीसच्या तयारीसाठी उठला.सासुबाईंना झोप लागली होती. झोपेतला त्यांचा शांत चेहरा पाहून तिला हसु आलं. उठल्या उठल्या हा शांतपणा दिसेनासा होणार होता. जाग आली की त्यांच्या लहानपणचे किस्से, त्यांचं माहेर , भावंडं यांच्याबद्दल भरभरुन बोलणं व्हायचं. रोजरोज तेच तेच व कधीकधी संदर्भहीन बोलणं ऐकून ती वैतागून जायची. तरीही रोज उत्साह दाखवत ती ऐकायची. हे विचार डोक्यात चालू असतानाच सवयीप्रमाणे तिने त्यांना उठवून उशीला टेकून बसवलं. चहाचा कप त्यांच्या हातात देउन शेजारी बसली. खरंच किती बदल झालाय ना त्यांच्यात. वय झाल्याने लांब असलेले केस कापून टाकले होते, साडी सावरता यायची नाही म्हणून गाउन घालायला सुरवात केली होती.गळ्यातली साखळी, बांगड्या सहन व्हायचं नाही म्हणून काढून टाकल्या होत्या.पूर्वीचं त्यांचं रुप वसुच्या डोळ्यासमोर उभं राहीलं. कमरेएवढ्या जाड केसांची वेणी, गोरापान रंग, कपाळावर रुपयाएवढं लालभडक कुंकू. काॕटनच्या साड्या चापूनचोपून नेसायच्या, दागिन्यांची तर प्रचंड आवड. हातात सोन्याच्या पाटल्या, काचेच्या कमीतकमी सहा बांगड्यातर असायच्याच. अत्तर लावायलाही फार आवडायचं त्यांना. त्या जवळून जरी गेल्या तरी मोगर्याचा सुगंध खूप वेळ दरवळत रहायचा. त्यांचा स्वभावही अत्यंत कडक. वसुने त्यांच्या एकुलत्या एक लाडक्या लेकाशी, वरुणशी प्रेमविवाह केला होता. वसुचं माहेर डोंबिवलीचं आत्ताही डोंबिवलीतलं तिचं घर तिच्या डोळ्यासमोर उभे राहीले...


जोगांच्या भल्या मोठ्या घरातल्या पहिल्या मजल्यावर तिच्या वडलांच्या, प्रभाकरपंतांच्या भाड्याच्या दोन खोल्या होत्या. घरात आई बाबा , ती आणि तिचा लहान भाउ असे चौघेजण रहायचे. तिचे वडील मुळचे रत्नागिरीचे. नोकरीच्या निमीत्ताने इकडे आले आणि इकडचेच होउन गेले. पण गावाची नाळ काही तुटली नाही. गावातून कोणीही मुंबईला आले की पूर्ण स्थिरस्थावर होईपर्यंत त्यांचा मुक्काम प्रभाकरपंतांकडेच असे. त्यामुळे वसुच्या घरी कायम माणसांचा राबता असे. घराच्या जवळच रेल्वेचे रुळ होते. त्या रुळांवर गाडी यायच्या सुमारास नाणं ठेवायचं आणि गाडी गेल्यावर ते सपाट झालेलं नाणं पाहून नाचायचं हे तिचं आणि तिच्या भावाचं, प्रतिकचं आवडतं काम. कोकणातले असल्याने त्यांना मत्स्याहार प्रिय. वसुची आई कुसुमताई उत्तम मासे बनवायच्या. प्रभाकरपंत आॕफीसमधून येतायेता कधी सुरमई, बांगडा तर कधी पापलेटचा बाजार घेउन यायचे. मग काय पूर्ण इमारतीत माशांचा घमघमाट सुटायचा. हे मासे खायला वरुण वसुच्या घरी यायला लागला. वरुण इंजिनियरींगच्या शेवटच्या वर्षाला होता. तिच्या शेजारच्या काकूंकडे PG म्हणून रहायचा. काकू एकट्याच रहायच्या. त्यांचा मुलगा जर्मनीमधे वास्तव्यास होता. सोबत म्हणून मग त्यांनी अगदी ओळखीतल्या वरुणला घरी रहायला बोलवले. त्याचाही जेवणाचा प्रश्न मिटल्याने तो आनंदाने त्यांच्या कडे रहायला आला. त्याची आई आणि काकू दोघी जणी चांगल्या मैत्रीणी . वरुणला मासे खायला फार आवडायचे. पण त्याच्या पुण्यातल्या घरी आणि इथे काकूंकडे शाकाहारीच जेवण असे. हे समजल्यावर वसुची आई त्याला मासे खायला बोलवायला लागली. हळूहळू वसुची आणि वरुणची चांगली मैत्री झाली. मैत्री चं रुपांतर प्रेमात कधी झालं ते दोघांनाही कळलंच नाही. वसु विज्ञान शाखेच्या दुसर्या वर्षात होती. तिचा लहान भाऊ दहावीला होता. वरुणचं कुटुंब अत्यंत धार्मिक व कर्मठ. वरुण त्यांचा एकुलता एक लाडका मुलगा. त्यांच्या लग्नाला परवानगी मिळणं शक्यच नव्हतं. प्रेम कधी लपून थोडीच राहतं? एक दिवस त्याच्या घरी समजल्यावर एकच गहजब झाला. अनेक वर्षांचे संबंध असलेल्या काकूंनी पण त्यांच्या मैत्रीणीचे ऐकून वसुच्या कुटुंबाशी संबंध तोडून टाकले. वसु एकदम भांबावून गेली. आईवडलांचा विरोध पत्करुन वरुण आपल्याशी लग्न करेल?या शंकेने ती मुळापासून हादरली. तिला काहीही सुचेनासे झाले, अभ्यासात लक्ष लागेना. अशातच वरुणने तिला त्यांच्या नेहमीच्या जागी भेटायला बोलावले. आता तो काय सांगेल या भितीने तिच्या हाताला कंप सुटला होता. तिचे थरथरणारे हात हातात घेउन वरुण म्हणाला,” वसु खूप प्रेम करतो गं तुझ्यावर. मला माहितीये माझ्या घरुन परवानगी मिळणार नाही . पण काहीही होउ दे, लग्न करेन तर तुझ्याशीच.”, गुडघ्यावर बसून वरुणने विचारले, “ लग्न करशील माझ्याशी? “, त्याचे शब्द ऐकले आणि डोळ्यातले पाणी न थांबवता वसु त्याच्या कुशीत शिरली. पुढच्या गोष्टी मात्र पटापट झाल्या. घरुन विरोध होणार हे माहित होतेच. रजिस्टर लग्नासाठी एक महिनाही थांबायची वरुणची तयारी नव्हती. त्याच्या आईला कुणकुण लागलीच. तिने वरुणचं लग्नं जमवण्याची धडपड सुरु केली . शेवटी दोघांनी मंदिरात जाउन लग्नं केलं आणि वरुणच्या पुण्यातल्या घरी आशिर्वाद घ्यायला पोचले. दोघांना पाहून वरुणच्या आईबाबांनी न बोलता त्यांना घरात घेतले .पण वरुणची आई तिच्याशी एकही शब्द न बोलता आत देवघरात जाउन ओक्साबोक्शी रडु लागली. वसुला काय करावं ते समजेना. तरीही ती हळूच देवघरापाशी गेली.”आई”, तिने हळूच हाक मारली.” थांब, तिथेच थांब. देवघरात पाउलही टाकू नकोस आणि मला आई म्हणू नकोस ..कधीच” , चाबकासारखे शब्द त्यांच्या तोंडातून आले.त्यांच्या पायावर डोके ठेवत तिने त्यांची क्षमा मागीतली. त्यांनी तिला माफ केलं असं त्या क्षणी जरी तिला वाटलं तरी नंतर मात्र त्यांनी तिला कधीच माफ केलं नव्हतं हे पावलोपावली जाणवायचं. वरुणने पुण्यात नोकरी धरली आणि दोघेही घरी रहायला आले. वसुने घरी आवडत नाही म्हणून मांसाहार सोडला, आवड असूनही शिक्षणही अर्धवट सोडून दिले .या घरातल्या रितीभाती, सण मनापासून शिकायचा प्रयत्न केला पण सासुबाईंनी मात्र तिला कधीच आपली मानले नाही. तिला त्या स्वयंपाकघरातही फारसं काही करु द्यायच्या नाहीत. त्यांच्या लाडक्या वरुणला त्यांनी पूर्ण माफ केलं . वसुसाठी त्यांनी कायमच मनात राग धरला.जणु काही हे लग्न म्हणजे तिची एकटीचीच चुक होती. त्या वसुला खिजगणतीतही धरत नसत. असहकाराचे धोरणच जणु काही आयुष्यभर त्यांनी तिच्याबरोबर अवलंबले होते. त्यांच्या खोलीत वसुने गेलेलंही त्यांना चालत नसे. तिच्या घरच्या लोकांशी त्या अगदी तुटक बोलायच्या, नापसंती दर्शवायच्या. वसुशी कायम तुसडेपणाने वागायच्या. घरात तिला अजिबात किंमत द्यायच्या नाहीत. या सगळ्याने वसु खूप अपमानीत व्हायची. हे लग्नं करुन चूक तर केली नाही ना हा विचार वारंवार तिच्या मनात येउ लागला. हे सगळं वरुणजवळ बोलायची सोयच नव्हती. आईने आपल्याला माफ करुन घरात घेतलं या आनंदात तो काहीही ऐकून घ्यायला तयार नसायचा. काळ उलटला. तिच्या सचिनचा जन्म झाला आणि त्याच्या पालनपोषणात सगळी अवहेलना तिने मागे टाकली, काही वर्षांनी श्रेयाची चाहूल लागली आणि ती हरखली. सासुबाईंनी मुलांना पण आपलं मानलं, वसू मात्र त्यांच्यासाठी कायमच परकी राहीली. वरूणलाही हे लक्षात यायला लागलं होतं ही एक जमेची बाजु होती.या सगळ्याचा तिला खूप त्रास व्हायचा, अपमानीत वाटायचं. वाटायचं का मी इथं राहतीये? तिची घुसमट वाढतच होती. कितीही लक्ष द्यायचं नाही असं ठरवलं तरीही त्रास व्हायचाच. खूप चिडचीड व्हायची तिची. सगळा राग मुलांवर निघायला लागला. वरुण तिला खूप समजवायचा. याच काळात तिला रेडिओवरील गाणी ऐकायची सवय लागली. ही गाणी म्हणायला आपल्याला आवडतात हे तिच्या लक्षात आले. तिच्या घराशेजारी राहणार्या निशाशी तिची मैत्री झाली होती. ती शास्त्रीय संगीत शिकायची. संगीत विशारदची परीक्षा देणारी निशा रोज पहाटे रियाज करायची . ते ऐकायला तिला खूप आवडायचं. एक दिवस वरुण तिला म्हणाला," वसु, तु गाणं का शिकत नाहीस? किती छान गाणं म्हणतेस?". ही कल्पना तिला खूप आवडली आणि एक दिवस निशाबरोबर तिच्या क्लासमधे आली. तिच्या गुरु नायडु बाईंसमोर जाउन म्हणाली,.” मला गाण्याची खूप आवड आहे. गाणं शिकवाल मला?.". घाबरत घाबरत नायडु बाईंसमोर तिने एक गाणं म्हणून दाखवलं आणि मग हळूहळू संगीतातला तिचा प्रवास सुरु झाला. त्याची सुरवात वरुणनेच करुन दिली .संगिताने तिचे अवघे विश्वच बदलून गेले. आठवड्यातल्या त्या दोन दिवसांची ती वाट पहात रहायची. घरातल्या कटकटींचा आता तिला पहिल्यासारखा त्रास होत नव्हता. ती आनंदी रहायला लागली. वरुणलाही तिच्यातला हा बदल जाणवला. आता वसु छान गाणं म्हणायला लागली. चारचौघात बोलायला घाबरणारी वसु आता स्टेजवर जाउन गाणं म्हणायला लागली. गाण्याने तिला मानसिक शांती व आनंद दिला. सासुबाईंच्या वागण्यातही हळूहळू बदल होत होते. काळ थोडीच कोणासाठी थांबतो? वसुची मुलं मोठी झाली . मुलगा नुकताच इंजिनीअर झाला आणि मुलगी मेडिकलला होती. सासर्यांचे काही वर्षापूर्वी निधन झाले त्यानंतर मात्र सासुबाईंच्या वागण्यात अजूनच बदल होत होते. थोड्या मवाळ झाल्या होत्या, निदान तिच्याशी चार शब्द नीट बोलायच्या. एवढ्यानेही वसु खुश व्हायची.

" दुध घेतेस ना? मला माहितीये सकाळपासून धावपळीत विसरलीच असणारेस तु". वरुणच्या या बोलण्याने ती भानावर आली. गरम दुधाचा मग तिच्या हातात देउन वरुण आॕफीसला गेला. आत्ता त्यांच्याकडे पाहता पाहता सगळा भूतकाळ सर्रकन वसुच्या डोळ्यासमोरुन तरळून गेला. तिच्यासमोरच्या पलंगावर ८० च्या घरातल्या सासुबाई झोपलेल्या होत्या. त्यांच्या खोलीत वसु उभी होती.त्यांना अलझायमर्स ची सुरवात झालेली होती. परत परत तेच तेच बोलायच्या तर कधी ओळखायच्याही नाहीत. चहाचा कप त्यांच्या हातातून घेउन तिने त्यांचे कपडे बदलून दिले. परत एकदा त्यांना उशीवर निजवून ती निघाली तेवढ्यात त्यांनी हाक मारली, “आई मला चहा प्यायला देतेस?” तिने सर्रकन वळून पाहीले, त्या वसुलाच आई म्हणून हाक मारत होत्या. डोळ्यातलं पाणी लपवत वसु आपल्या या लेकीला समजवायला निघाली. आज ती ‘ आई ‘ झाली होती...एका हट्टी , ऐंशी वर्षाच्या मुलीची.


अंजली जोगळेकर