bhuk bali - 1 in Marathi Moral Stories by Vrushali books and stories PDF | भूक बळी भाग १ - भूक बळी

Featured Books
Categories
Share

भूक बळी भाग १ - भूक बळी

" आह..." हात हवेत पसरवत अंगाला अळोखेपिळोखे देत तिने खांद्यावरून कललेल्या टॉपला वर खेचलं. डोळे किलकिले करत तिने वेळेचा अंदाज घेतला. घरात भरलेल्या काळोखावरून संध्याकाळ उतरून गेली होती. बराच वेळ लोळत पडल्याने तिचे कपडे अस्ताव्यस्त होऊन चुरगळले होते. पाठभर रुळणाऱ्या दाट कुरळ्या केसांना लावलेला रबरबँड एव्हाना घरंगळून केसांच्या टोकांपाशी जेमतेम अडकून पडला होता. पुन्हा आळस देत तिने एका हाताने केसांचा रबर खसकन खेचला. त्यात निबरपणे अडकलेले चार पाच केस तिने ओढूनच काढून फेकून दिले. साऱ्या केसांना दोन्ही तळव्यांत गच्च पकडून रबराच्या साहाय्याने तिने घट्ट अंबाडा बांधला. डोळ्यावरची झोप किंचितशी उतरल्यावर तिला वेळेचं भान आलं. मागे सरकून बसत तिने खिडकीचा पडदा जरासा बाजूला केला. लॉकडाऊन असल्यामुळे निदान आतातरी सगळे घरात बसले असतील ही तिची पोकळ अपेक्षा बाहेरून भसकन नाकात शिरलेल्या सिगारेटच्या वासाने फोल ठरवली. ' सदानकदा नुसते फुकट पडलेले असतात..' स्वतःशीच नाक मुरडत तिने पडदा खेचून पुन्हा होता तसाच बंद केला.


स्वतःशीच निश्वास सोडत ती मागेच भिंतीला टेकून बसली. आपल्या निराश नजर तिचे एकवेळ घरातल्या अंधारावरून फिरवली. बऱ्याच वर्षांपासून राहत असलेल्या त्या चाळीच्या छोट्याश्या खोलीत पाहण्यासारखं असं काहीच नव्हतं. साधारण दहा वर्षांपूर्वी माप ओलांडून ती ह्याच एवढुश्या घरात आली होती. तीच अर्ध आयुष्य तर गावातल्या कुडाच्या झोपडीत अगदी गरिबीत गेलेलं. सकाळी असलं तर दुपारच्या भ्रांत व्हावी अशी परिस्थिती. कधी कोणी काही दिल तरीही आधी ते तिच्या भावांच्या पुढ्यात पडायचं आणि मग उरलंच तर तिच्या... कित्येक रात्री तर घोटभर पाणी घशाखाली रिचवून आणि ओढणी पोटाला बांधून सरल्या. पोटात उठणाऱ्या कळांसरशी तिच्या मेंदूत मात्र प्रश्न भिरभिरू लागत. असं काय झालं असेल तिच्या हातून कि तिला इतक्या दारिद्र्यात जन्म मिळाला. घरात अठरा विश्वे दारिद्र्य असूनही वंशाच्या दिव्याच्या नावाखाली तिच्यापाठी चार भाऊ जन्मले पण अजूनही गरिबीचा अंधकार काही संपला नव्हता... विचारांत ती तशीच हसली... वर्षानुवर्षे वापरवुन खिळखिळ्या झालेल्या लाकडी खाटेवर तितकाच जुना फाटलेला बिछाना अंथरला होता. आधी आधी ती त्याला ठिगळ जोडायची पण एका जागी जोडावं तर खेचून अजून दोन तीन बाजूनी उसवायचं शेवटी तिने त्याचा नाद सोडून दिला. ' चला आता उठायला हवं..' आळस झटकून उठत आधी तिने खाटेवरची चादर सरळ केली. मोरीत जाऊन बादलीतील पाणी उपसत खसाखसा चेहरा धुतला. मोरीच्या कोपऱ्यातल्या चीर गेलेल्या साबणाच्या भांड्यात छोटीशीच वडी उरली होती जेमतेम दोन दिवस पुरेल इतकी. त्यामुळे चेहरा धुवायला साबणाची उधळपट्टी तिला परवडणार नव्हती. तांब्याभर पाणी पायावर ओतून ती तशीच ओल्या पावलांनी बाहेर आली.


एव्हाना बाहेरूनही अंधारून आलं होत. पण तिची लाईट लावायची हिम्मत झाली नाही. मागच्या महिन्यातील बिलाचे आकडे पाहून तिची बुबुळ पांढरी झाली होती. तेव्हापासून तिने विजेची काटकसर सुरु केली होती. आपल्यात घराला ती आधीच परिचित होती आणि आता अंधारात वावरायला सरसावली होती. ह्याक्षणी तिला चहा प्यायची तीव्र इच्छा झाली होती. परंतु स्वयंपाकघरातील रिकामे डब्बे तिला तितक्या अंधारातही सत्याची जाणीव करून देत होते. मनातच हिरमुसत तिने फळीवरील मोठा ग्लास घेतला. ओट्यावर ठेवलेल्या माठातून चांगले दोन ग्लास पाणी पोटात रिचवून ती पुन्हा तिच्या लाडक्या खाटेकडे वळली. ह्या घरात पाऊल पडल्यापासून ते आतापासून ती खाटच सगळ्याची साक्षी होती.


' तुझे कितना चाहने लगे हम..' तिचा फोन जीव तोडून वाजत होता. थोड्याशा निराशेनेच तीने फोन हातात घेतला. स्क्रीनवरील ' हबी ' नाव बघून तिचे डोळे आनंदाने लकाकले. दहा वर्षांआधी अशा एका वैतागलेल्या संध्याकाळी अण्णा मात्र आनंदात नाचत घरी आले होते. अण्णा म्हणजे तिच्या वडिलांचे काका. त्यांच्या बाजूच्याच झोपडीत राहत. गरीब असले तरीपण दोन्ही घरात बरंच सख्य होत. तिच्या आईवडिलांपेक्षा तिच्यावर कोणी जीव लावला असेल तर तो अण्णांनी. त्यांच्या घरात गेल्यावर स्वतःच्या ताटातील दोन घास ते जबरदस्ती तिला भरवत. म्हणून जेव्हा केव्हा पोटातील भूक वेदनेत परिवर्तित होई, ती मुद्दाम काही कारण काढून त्यांच्या घरी जात असे. तिला प्रेमाने भरवताना पाहून काकूंच्या नजरेत फुललेले अंगार एकदा तिच्या दृष्टीस पडले आणि त्यांनतर मात्र तिच्या स्वाभिमानाने सदैव तिला त्यांच्या उंबऱ्याबाहेर थांबवलं.


अण्णा नाचत आले ते तिच्या लग्नाची बातमी घेऊन. त्यांच्या ओळखीत कोणाच्या तरी कोणाचा मुलगा लग्नाचा होता. आल्यापासून ते बराच काहीबाही बोलत होते. ' मुलगा मुंबईला राहतो ' आणि ' हुंडा नकोय...केवळ नारळ आणि मुलगी द्या..' ही दोन वाक्य तिच्या आईवडिलांच्या कानात पडली आणि त्यांनी एक श्वासही न घेता तात्काळ होकार भरला. जितक्या जलद होकार झाला त्याहीपेक्षा जलद अवघ्या दोन दिवसांत त्यांचा विवाह पार पडला. आपलं लग्न छान वाजतगाजत व्हावं, मैत्रिणींनी केळवणाला बोलवावं, दोन्ही हात भरभरून मेहंदी काढावी, उमललेल्या केतकीच्या रंगासारखी पिवळी साडी नेसावी, आजूबाजूच्यांना उगाचच येताजाता नवऱ्याच्या नावाने चिडवावं असं बराच काही विचार करत तिने स्वतःच्या लग्नाची स्वप्न रंगवली होती. परंतु तीच स्वप्न ते स्वप्नच राहील. आजकाल तर त्यातील रंगही उडून गेले होते.


अंतरपाट उतरताच तिने प्रथमच आपल्या झालेल्या नवऱ्याला पाहिलं. तिच्या लखलखीत गोऱ्यापान सौंदर्यासमोर तिला काळासावळा, बसक्या नाकाचा आणि टक्कल पडत असलेला नवरा अगदी नकोनकोसा वाटला. पण तिच्या वाटण्याला तिथे काही किंमत नव्हतीच आणि वेळही टळून गेलेली होती. घुसमटल्या मनाने आणि गुदमरल्या जिवाने तिने त्याच्यासोबत मुंबई गाठली. आणि तिथेही तिच्या पदरात निराशा पडली. सिनेमातल्या पडद्यावरील दिसणाऱ्या मुंबईला लागून बांडगुळासारख्या वाढणाऱ्या झोपडपट्ट्या कधीच तिच्या नजरेत आल्या नव्हत्या. तीच नशीब तिला अशाच एका नाल्याच्या आधाराने उभ्या असणाऱ्या वस्तीतल्या काही फुटांच्या घरात घेऊन आलं. इथेही जमेची बाजू इतकीच होती कि घरात त्या दोघांशिवाय अजून कोणी नव्हतं आणि नवरा कुठे का होईना नोकरी करत होता त्यामुळे दोन वेळा पोटाला मिळण्याची सोय झाली होती. रात्री उशिरा शहरात पोचली तरीही गर्दीत आंबलेल्या अंगावर बादलीभर पाणी ओतून ती जरा तरतरीत झाली. इतक्या रात्री स्वयंपाक कुठे करणार म्हणून तिच्या नवऱ्याने बाजूच्याच गाडीवरून चायनीजच पार्सल आणलं होत. बापाघरी भाकरीला महाग झालेल्या तिला असं भन्नाट काहीतरी ते ही पोट फुटेस्तोवर मिळालं होत. दोन्ही हातानी जेवत वर्षानुवर्षे ज्वालामुखी बनून फुटत असणाऱ्या भुकेला तिने आधी शांत केलं. मन तृप्त झाल्यावर तीच लक्ष नवऱ्याकडे गेलं. तिचा नवरा अनिमिष नेत्रांनी तीच फुलारलेलं सौंदर्य पाहत होता. तिला त्याच्या डोळ्यात मात्र भूक दिसली... ही भूक पोटाची नव्हती... ती तेव्हाही स्वतःशीच हसली. तिच्या पोटाची भूक भागवायची असेल तर त्याच्या डोळ्यात दाटलेली भूक मिटवायचं कर्तव्य तिला पार पाडाव लागणार होतंच. गळ्यातल्या बेन्टेक्सच्या मंगळसूत्राने त्याला तो परवाना देऊन टाकला होता. खांद्यावरचा पदर खाली पडत तिने त्याला परवानगी देऊन टाकली. रात्रीच्या अंधारात तो तिच्या स्त्रीत्वात हरवून स्वतःच पौरुषत्व मात्र शोधतच राहिला. तो मोकळा होऊन बाजूला सरकला आणि ती मात्र पुन्हा घामेजल्या अंगाने रात्रभर काहीतरी अधूर राहिलेलं चाचपडत राहिली.


सकाळ होतंच त्याची दिनचर्या चालू झाली. ती तशीच विस्कटलेली साडी सावरत त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागच्या भावनांचा ठाव घ्यायचा प्रयत्न करत होती. मात्र तो आपल्या विजयाच्या उन्मादात मग्न होता. लग्नाच्या काही वर्षांनंतर मात्र तिला सत्य उमजलं. बरेच उपासतापास, गंडेदोरे, डॉक्टरी उपचार केल्यावर तीच रुसलेलं मातृत्व हे त्याच्या व्यंधत्वाची देणं आहे हे कळलं आणि बिना हुंड्याच्या लग्नाचं रहस्य आपोआप उलगडलं. परंतु आताही तिचा नाइलाज होता. आयुष्यातील उमेदीची वर्ष आणि हुरहुरत घालवलेल्या रात्री सरल्यानंतरच सत्य समजूनही तिने मौन धारण केलं. मागे परतून पुन्हा उपासमार वाट्याला येण्यापेक्षा आपल्या पोटातल्या भुकेशी तिने त्याच्या शरीराच्या भुकेचा सौदा केला.


त्या दोघांच्याही जीवनाचे सूर काही फारसे जुळलेच नाही. बेसूर निरस आयुष्य जगायची सवय असणाऱ्या तिनेही दुसरा सूर शोधायचाही कधी प्रयत्न केला नाही.आहे त्यातच जुळवून घेत बिघडलेल्या सुरतरंगावर डोलायला सुरुवात केली. तसा तिचा नवराही गरिबीत वाढलेला. त्यामुळे बाकी कसले फुकटचे चोचले त्याचेही नव्हते. दोन वेळच गरम जेवण आणि रात्रीचा सौदा त्याच्यासाठी पुरेसा होता अन्यथा इतकी रूपवान पोरगी कधी त्याच्या स्वप्नातही आली नव्हती. दोघेही आपापल्या विश्वात खुश होते. मात्र मार्च महिना उजाडला आणि लॉकडाऊन झाल. कोरोनाच्या बातम्यांशी तीच काही घेणंदेणं नव्हतं पण अचानक सगळं बंद झाल्याने आणि घरातला किराणा संपत आल्याने तिचे धाबे दणाणले. नेमकं त्यातच साहेबांसोबत कामासाठी बाहेरगावी गेलेला तिचा नवरा तिथेच अडकून पडला. घरात साठवलेल्या काही पैशांत तिने कसातरी मार्च आणि एप्रिल घालवला. मात्र मे महिना उजाडला तरी हे लॉकडाऊन काही संपायचं नाव घेईना. तिचा नवरा अश्या शहरात अडकून बसला होता जिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम. कशाचीच काही खबर नव्हती. हिच्या इथल्या अवस्थेची तिला काही खबरही नसावी. आज इतक्या महिन्यांनी तिचा फोन वाजला होता. तिने घाईने फोन उचलला.

" हॅलो " तिच्या शब्दांतून तिला होणारा आनंद ओसंडत होता

" ऐक.. इथे नेटवर्क नाहीये. साहेबांचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय त्यामुळे अजून दोन महिने तरी मी इथून निघू नाही शकत.. या... अं..." खरखर करत फोन बंदही झाला. तिने पुन्हा पुन्हा तो नंबर डायल केला. ' आपके खाते मे पर्याप्त..' तिने वैतागून फोन कट केला. फोनचा बॅलन्स तर दोन महिन्यांआधीच संपला होता. तिच्या हातात काहीच नव्हतं. अख्ख्या मे महिन्याची उपासमार तिच्या डोळ्यांसमोर फिरू लागली... अजून दोन महिने... फोन हातात पकडून ती तशीच खाटेवर बसली. सुकलेल्या तिच्या डोळ्यांत पाणी भरून आले. रिकाम्या पोटात काहीतरी डुचमळून आलं. पण उलटी झाली तर अजून भूक लागेल म्हणून ती तशीच पाय पोटाशी घेत डोळे बंद करून बसून राहिली.


क्रमशः