गॅरेज जवळच्या हॉटेल मध्ये जाऊन त्याने मिळेल ते खाऊन पोट भरले आणि कामाला लागला. दिवसभर काम करता करता त्याने शेकडो वेळा फोन खिशातून काढला आणि परत ठेवला, जणू काही तो सविताच्या फोनची वाट बघत होता.
रात्री थकून भागून घरी गेला, दार वाजवले, आणि क्षणात लक्षात आले घरात कोणी नाही, कुलूप उघडून घरात गेला, स्वतःच्या हाताने पाणी घेतले, सोफ्यावर बसला आणि पाणी पिता पिता संपूर्ण घर नेहाळायला लागला, खाली घर आ वासून खायला उठत होत, दोन घटका देखील घरात थांबूशी वाटत नव्हतं, थोडा वेळ तसाच एखाद्या पुतळ्या सारखा बसला आणि मग डोक्यात जेवणाचा विचार आला, तो सकाळी खाल्लेल्या एका मिसळ आणि दोन पावांवरच होता, दिवसभराच्या कष्टाने पोटातले सगळे अवयव आतून जेवणासाठी आरडा ओरडा करत होते.
उठला आणि दाराला कुलूप लावून बाहेर पडला, रस्त्याने चालता चालताच त्याने ठरवलं होतं की प्यायची आणि मग जेवायचं. सरळ ललित बार मध्ये जाऊन मनसोक्त दारू पिला आणि मनसोक्त जेवला, आज घरी रोखायला आणि टोकायला कोणीच नव्हतं, म्हणून सरळ जाऊन झोपी गेला.
पुढचे सात आठ दिवस असेच पिण्यात आणि बाहेरच्या खाण्यात गेले, दरम्यान सविताने किंवा अनिलने एकमेकांला साधा फोन देखील केला नाही, हो दोघांच्या मनात कित्येक वेळा आलं देखील पण मी का करू ह्या अहंकाराच्या भावनेने दोघांना रोखून धरलं होत.
एका संध्याकाळी गॅरेज वरून येतानाच दारू घरी घेऊन आला आणि पिऊन उपाशीच झोपला, दुसऱ्या दिवशी पोटात पुन्हा आग पडली आणि पोट दुखायला लागले, कदाचित दारू आणि बाहेरच्या खाण्याचा प्रताप असावा, अनिलने लगबगीने अंघोळ वैगेरे आटोपली आणि सरळ अडवाणी डॉक्टरनं कडे गेला.
“डॉक्टर मला असं वाटतंय की माझ्या पोटात पु तर नाही झाला ना, कधी कधी असं पण वाटतंय की लिव्हरला सूज आली आहे, पोटात डाव्या बाजूला दुखत असतंय, डॉक्टर किडनी तर खराब नसलं झाली ना”
अनिल चेहरा लाल पिवळा करून सांगत होता.
“अच्छा अजून काही, आणि पिन खान काय म्हणतंय”
डॉक्टरांनी थोड्या मिश्किल पणे विचारले.
“थोडी थोडी घेतो, नई ओ खरं म्हणजे वाढलय पिणं खूप, बायको माहेरी गेल्या पासून खूप एकटा एकटा पडलोय ओ, खाण्याची वन वन होतेय, रोज हॉटेलातलं खाऊन जिभेचे अन पोटाचे दुष्काळाचे दिवस सुरु हेत, पिलो नाही तर घरी जावसं वाटत नाय, घर आ वासून खायला उठत, भिंतीवरचा फॅमिली फोटो बघितला की काळजाचं कार्बोरेटर असा काही धूर सोडत की डोळ्याच्या टाकयातून अश्रूंचं पेट्रोल आपोआप लीक व्हायला सुरवात होत, खरंच खूप त्रास होतो ओ डॉक्टर, तुम्ही तर मला किती वर्षां पासून ओळखता, आधीच हे डोक्याचं बिघडलेलं इंजिन अन त्यात रिकामं पडलेलं भकास घर, पार गाडी ब्रेक डाउन होण्याची पाळी आलीय.
डॉक्टरने सगळे शांतपणे ऐकून घेतले, अनिलने एवढे गंभीर दुखणे सांगितले पण डॉक्टरच्या चेहऱ्यावरची माशी देखील उडाली नाही.
"अच्छा अजून काही?
अडवाणी डॉक्टरांनी नेहमी प्रमाणे विचारले.
" नई अजून काय नाय "
अनिलने नकारात्मक मान हलवून उत्तर दिले.
"अरे मिठाची भूक पिठावर आणि पिठाची भूक मिठावर, हा तर अत्याचारच झाला ना पोटावर"
अडवाणी डॉक्टर हसत हसत बोलले.
"म्हणजे?
अनिलने थोडसं गोंधळून विचारले.
"म्हणजे भीती साठी मिठा एवढी थोडीशी गोळी वैगेरे घेतली पाहिजेल तर पिठा एवढी दारू पिता, आणि पोटभर पिठा एवढं खाल्लं पाहिजेल तर मिठा एवढ थोडास अबर चबर खाऊन पोट भरता, मग त्रास तर होणारच ना”
"मग काय करू तुम्हीच सांगा?
अनिलने केविलवाण्या स्वरात विचारले
डॉक्टरने एक मोठा श्वास घेतला आणि खुर्चीवर पाठ टेकत एकच वाक्य बोलले
“पोटा साठी मी आता तुला गोळ्या देतो पण एक गोष्ट तुझ्या डोक्यात घट्ट गाठ मारून लक्षात ठेव, तुला सायकियाट्रिस्टची गरज आहे”
“काय डॉक्टर साहेब तुम्हाला पण बाकीच्या सारखं वाटतंय की मी येडा झालोय का? अनिल जरा नाराजीच्या स्वरात बोलला.