Aajaranch Fashion - 12 in Marathi Moral Stories by Prashant Kedare books and stories PDF | आजारांचं फॅशन - 12

Featured Books
Categories
Share

आजारांचं फॅशन - 12

रात्री दहा साडे दहाच्या दरम्यान अनिल घरी पोहचला, मुले झोपली होती आणि सविता टी व्ही वर काही तरी कार्यक्रम पाहत होती, अनिलने दार वाजवले, दरवाजा उघडला, अनिल आत जाण्या आधी दारूच्या वासाने गृहप्रवेश केला, सविताचा चेहरा सरस्वती पासून चंडिके मध्ये क्षणात परिवर्तित झाला. एखादी गाडी कशी पहिल्या गियर पासून दुसरा, मग तिसरा आणि मग चौथ्या गियर मध्ये हळू हळू वेग वाढवते, तसा सविताचा पहिला गियर पडला.

"आलेना पिऊन? खोकला झालाय ना, दहा वेळा डॉक्टरचा उंबरा झिजविला, दारू घश्यात वत्तांना नई आला का खोकला, काय मेल नशीब माझं, दोन दिवस हा माणूस सुखानी जगून देत नई, एक दोन दिवस नई पीलिका का ह्या माणसाला तलब येति अन येतो मग ढोसून"

सविता खूपच चिडली.

"अग डॉक्टरनी एक्सरे काढायला सांगितला होता, हा बघ"

अनिल हातातला एक्सरे पुढे करत बोल्ला

"मग एक्सरे काढायला दारू प्यावी लागती?

सविता अजून चिडून बोलली

"तस नई पण एक्सरेचा रिपोर्ट दोन तासांनी भेटणार होता, आन मी घाबरलो होतो, दोन तास काय करू, म्हणून भीती घालवण्यासाठी, गरम पाण्यात थोडी रम पिलो, रम चांगली असती खोकल्याला, बग खोकला थोडा कमी झालाय माझा"

"रम बीम काय नाय रिपोर्ट नॉर्मल आला असल म्हणून खोकला नीट झालाय, काय करू मला खरंच कळत नई, डोक्यातलं आजाराचं येड जात नई अन तोंडाची दारू सुटत नई, मी आहे म्हणून टिकली, दुसरी एखादी असती तर कधीच सोडून गेली असती"

सविताच तोंड काही शांत होत नव्हतं आणि अनिलला पुढे काय बोलावं ते सुचत नव्हतं.

अनिलने सरळ आत जाऊन कपडे काढले आणि बेड वर जाऊन न खाता पिताच आडवा झाला, सविताने देखील रागाच्या भरात त्याला जेवण वैगेरे काही विचारलं नाही आणि आतमध्ये जाऊन आपलं काम आटपायला लागली.

दुसऱ्या दिवशी अनिल लवकर उठून सविताशी एकही शब्द बोलला नाही आणि सविता देखील निशब्द होती, त्याने अंघोळ वैगेरे केली आणि सरळ गॅरेज वर निघून गेला, अनिलला वाटत होत सविता मला समजून घेत नाही आणि तिला वाटत होत अनिल काही तरी नाटक करून दारू पिण्याचे बहाणे शोधतोय.

खरंतर दोघांच्या नात्यामध्ये नकळत एक अदृश्य दरी पडत चालली होती आणि तिची चाहुल किंवा कल्पना त्या दोघांना देखील नव्हती.

संध्याकाळी पाच साडे पाचच्या सुमारास अनिलचा फोन वाजला, त्याला वाटले सविता असेल पण शार्दूल होता.

"हॅलो, हा बोल रे"

अनिलने फोन खांद्याच्या साहाय्याने कानाला चिटकवत कपड्याने हात पुसत फोनला उत्तर दिले.

"अरे भाई हळदीला जायचंय ना, किती वाजे पर्यंतर येतोस?

फोनच्या दुसऱ्याबाजूने शार्दूल बोलला.

"कोणाची रे हळद?

अनिल फोन हाताने पकडत बोलला,

"अरे पवार बाळ्याची हळद आहे ना आज"

"हा हा जाव लागलं यार, पण तोंड दाखवून मी लगेच कल्टी मारलं, कालच दीड पिलो होतो रात्री लई मच मच झालीय घरी, जेवलो पण नई रात्री घरात"

अनिलने शार्दुलला कालचा कारनामा सांगितला

"बर ठीक हे तू ये तर खरं"

शार्दूलला माहित होत अनिल एकदा आला की पुढे कसं कामाला लावायचं ते,

"चल येतो साडे सात आठ पर्यंतर"

अनिलने फोन कट केला.

पवार बाळाच्या घराजवळ मंडपात सगळे फुकटे मित्र जमा झाले होते, आज काय पिणाऱ्यांची दिवाळी होती, फुकट पियाला आणि बिर्याणी खायला, अजून काय पाहिजेल. अनिल बरोबर आठ सव्वा आठ दरम्यान आला, त्याला त्याची गॅंग कुठे दिसेना, म्हणून त्याने शार्दुलला कॉल लावला.

"कुठंय रे?

अनिलने फोन वर शार्दुलला विचारलं.

"गच्ची वर ये गच्ची वर"

डी जे च्या आवाज मुळे शार्दुल ओरडून बोलत होता.

अनिलने फोन कट केला आणि सरळ गच्ची वर गेला. गच्ची वर पिण्याचा कार्यक्रम चालू झाला देखील होता, सगळे एक एक पेग डाउन होते.