३. अधिकृत नियुक्ती (ऑफिशियल अपॉईंटमेंट)...
हॉस्पिटल बेडवर पडलेल्या असॅसिनने डोळे उघडले तेव्हा शक्ती त्याच्या समोरच कोचवर बसलेला होता. स्पेशल वॉर्डमध्ये या खास पाहुण्याची खास सोय केली होती.
"बोलतं व्हा!" शक्ती त्याला शुद्धीवर आलेला पाहून म्हणाला!
असॅसिनने नकारार्थी मान हलवली.
"हॉस्पिटल्समध्ये एक्सिडेंट्स होऊ शकतात! नाही?!" शक्ती धमकीचा सुरात म्हणाला.
"मला माहित नाही कोणी? मला... मला फोनवरून इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या... त्यांनीच सगळी... सगळी... सोय केली... केली... होती..." असॅसिन कष्टाने म्हणाला.
तो बोलला तसा तोंडावर व्हेंटिलेटरचा मास्क असल्याने त्याचा तो अस्पष्ट आवाज नुसताच घुमल्यासारखा झाला व त्याच्या श्वासाच्या वाफेनं त्या मास्कवर बाष्प जमा झाल्यासारखं झालं.
शक्तीने उठून चढवलं जात असलेलं रक्त बंद केलं. मग तो व्हेंटिलेटरजवळ गेला... आणि स्विच ऑन-ऑफ करू लागला...
असॅसिनला श्वसन करण्यास त्रास होऊ लागला... तो जीवाच्या आकांताने तडफडू लागला...
"तुझ्यामुळे सात ऑफिसर्स मेलेत, माझ्या मित्राने कायमचा हात गमावला आहे. तुला मारायला मला काहीच दुःख होणार नाही!" शक्ती स्विच ऑन-ऑफ करत म्हणाला.
असॅसिन जगण्यासाठी धडपड करत होता... तो शक्तीच्या हातावर मारत होता... पण त्याच्या फटक्यांत ती शक्ती नव्हती जी शक्तीला रोखू शकेल...
अनेकदा स्विच चालू - बंद करून शक्तीने स्विच चालू ठेवला.
"आता बोलायचंय?" शक्तीने त्याला विचारलं.
अस्वस्थ तडफडणाऱ्या असॅसिनने त्याच अवस्थेत होकारार्थी मान हलवली व काही काळ तो तसाच अर्थवट डोळे उघडे ठेवून पडून राहिला...
बराचवेळ गेल्यावर तो मारेकरी व्यवस्थित शुद्धीवर आला.
"बोला! बोला! सुरवात आपल्या शुभनामापासून करा!" चेहऱ्यावरची शांतता विरू न देता शक्ती त्याला म्हणाला.
त्याच्या चेहऱ्यावरची ती शांतता असॅसिनला भयाण जाणवली. शक्ती त्याला कोल्ड ब्लडेड मर्डरर वाटत होता... स्वतः अनेकांना मृत्यूसदनी पोहोचवलेल्या या मारेकऱ्याला शक्तीची मोठी भीती वाटून गेली...
शक्ती शौर्यजीतच्या बेडजवळ उभा होता. चढवलेल्या सलाईनमुळे कदाचित तो ग्लानीत होता...
जसे त्याने डोळे उघडले तसा त्याने शक्तीला आपल्या जवळ पाहिला.
"बरा आहेस?" शक्तीने त्याला विचारलं.
शौर्यने हळुवार मान हलवून शक्तीला आश्वस्त केलं. त्याला धीर दिला.
"डोन्ट वरी मित्रा! तू बरा व्हायच्या आत हे प्रकरण मिटलेलं असेल!" शक्ती ठामपणे म्हणाला.
शक्तीला वेड्यासारखं काही करू नको हे सांगण्यासाठी शौर्यजीतने नकारार्थी मान हलवून त्याला सुचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला अडवण्यासाठी शक्तीचा हात धरला. पण ऐकेल तो शक्ती कसला?!
"मी नाही म्हणत असताना तू मला यात ओढलंस! आता मागे फिरणे नाही! तेव्हा तर अजिबात नाही; जेव्हा त्या लोकांमुळे माझा मित्र अशा अवस्थेत आहे!"
शक्तीने त्याचा हात बाजूला केला.
"काळजी करू नको. काळजी घे! आता काम पूर्ण झाल्यावरच भेटू!"
आणि शक्ती शौर्यजीतला विवंचनेत ठेवून निघून गेला...
रात्री एसपी त्याच्या रेसिडेन्सीमध्ये प्रविष्ट होत होता. त्याने दरवाजा उघडला, तसा मागून त्याला कोणी तरी ढकलून दिलं आणि लाईट्स लावल्या. एसपी स्वतःला पडण्यापासून सावरत स्विचबोर्डच्या दिशेने वळला. एसपीला ढकलणार शक्ती, तिथं उभा होता.
"हॅलो एसपी साहेब!" शक्ती त्याला म्हणाला.
"तू? इथं असा? काय अर्थ आहे या सगळ्याचा?" एसपी जाब विचारत आवाज चढवून विचारलं.
"ते तुम्ही सांगायचंय साहेब! या बसा!" कोचवर बसत तो एसपीला म्हणाला. आणि त्यालाही समोर बसण्यासाठी हाताने निर्देश दिला. त्या निर्देशात हुकूम होता.
शक्तीच्या अशा धिटाईमुळे एसपी चांगलाच चिडला, पण काही पाऊल उचलण्याआधी त्याला शक्तीचा थांग घ्यायचा होता... तो शक्तीसमोर बसला!
"मुलं बाळं, फॅमिली? कुठं आहेत?" शक्तीने प्रश्न केला.
"अशा परिस्थितीत नकोत म्हणून गावी पाठवलंय."
"कुटूंबाची काळजी आहे; आणि समाजाची?" शक्तीने डावी भुवई उडवत विचारलं.
"काय हवंय?" एसपी सुशेनने उखडत शक्तीला प्रश्न केला.
"काही प्रश्नांची उत्तरं!" शक्ती रिव्हॉल्व्हर काढून हातात घेत म्हणाला.
"तुला खरंच असं वाटतं, की तू मला संपवू शकतोस?" एसपीनं विचारलं व तो विकट स्मित करत पुढं म्हणाला,
"माझी एक हाक आणि त्यानंतर तू असंख्य गोळ्या शरीरात घेऊन कुठेतरी धूळ चरत पडशील!"
"हाक मारून बघ! बघू ऑफिसर्स कुणाचं ऐकतात!" शक्ती शांत भाव चेहऱ्यावर घेऊन म्हणाला!
मग एसपी सुशेन कुंठीत झाला. कारण शक्तीच्या वक्तव्याची त्याने प्रचिती सकाळीच सेंट्रल जेल बाहेर घेतली होती. शक्तीला कसलीच ऑथेरिटी नसताना त्याच्या ऑफीसर्सनी शक्तीला प्रोटोकॉल तोडून सल्युट केला होता.
आपली शेवटची वेळ जवळ आली आहे हे तो समजून चुकला.
"बोल काय हवंय...?" हताश होऊन खाली पाहत त्याने शक्तीला विचारलं.
"तो असॅसिन तू अपॉईंट केला होतास?"
"नाही..."
"वाचस्पतीच्या असॅसिनला तू घाबरवलं होतंस? त्याची जीभ कापण्यासाठी तू त्याला सांगितलंस?"
"हो!"
"का?"
"ऑर्डर्स होत्या!"
"कुणाच्या?"
"नाही सांगू शकत!"
"मग त्या असॅसिनला का मारलं?"
"संभवत: त्यांची भीती संपली नसेल..."
"म्हणून असॅसिनला मारायला नवीन असॅसिन अपॉईंट केला?"
"हो!"
"पण त्या असॅसिननं तुझं नांव घेतलंय!"
शक्तीच्या या वाक्यावर एसपी खाली कुठेतरी शून्यात पाहत दुर्दैवी स्मित करत हसला.
त्याचं काम झालं होतं म्हणून त्याला आता अडकवण्यासाठी हा सापळा आहे हे तो समजून चुकला होता...
"ओ, तर तुझा काटा काढायचं निश्चित केलेलं दिसतंय. मी तुला नाही मारलं, तरी त्या असॅसिनच्या स्टेटमेंटवरून कोर्ट शिक्षा देईलच."
"त्या असॅसिनच्या सांगण्यावरून तू इथं आलास? तो खोटं देखील बोलू शकतो याची जराही शंका तुझ्या मनाला शिवली नाही?" एसपी त्वेषाने डोळे बारीक करत उलट शक्तीला जाब विचारू लागला.
"त्यानं तुझं नाव घेतलं नसतं, तरी मी तुझ्याकडं येणार होतोच!"
"कशाच्या आधारावर?" कठोरतेने एसपी ओरडला.
"वाचस्पतीच्या खुन्याने स्वतःला इजा करण्याआधी तू त्याला भेटला होतास. शंकेला इतकी जागाही पुरेशी आहे."
"हं! याने काहीच सिद्ध होत नाही!" एसपीने शक्तीच्या तर्काची व पर्यायाने शक्तीच्या बुद्धीची कीव केली.
"लॉकडाऊन करणं तुझ्या अखत्यारीत होतं ना? तरी पाचशे मीटरचा ब्लॉकेड् तोडून तो असॅसिन आत आला कसा? तुझ्याशिवाय त्याला कोण एक्सेस देऊ शकत होतं?"
शक्तीचा हा तर्क मात्र एसपीला मान्य करावाच लागला! तो जरा घाबरला आणि गत्यंतर नाही पाहून तो शक्तीला उत्तर देऊ लागला...
"मी जास्त काही सांगू शकणार नाही! पण तो जो कोणी आहे, तो 'सिराज नाईट क्लब'ला रोज संध्याकाळी भेट देत असतो! साडे नऊ - दहाचं टायमिंग. तिथं गेल्यावर तुला खरा सूत्रधार भेटेल..."
"आज, उद्या असेल?"
"सेलिब्रेशन करायला नक्कीच येईल..." हताष एसपी म्हणाला.
"तुमच्या मरणाचं?" त्याला डिवचण्यासाठी शक्तीनं कुटील हसत विचारलं.
एसपी मात्र नजर चोरत खाली पाहत राहिला...
"आणि हे तुला कसं माहीत?" शक्तीनं पुढं विचारलं.
"एक्स्क्यूज मी! मी या डिस्ट्रीक्टचा एसपी आहे!" तो शक्तीकडे नजर टाकून आवाजात जरब आणत म्हणाला.
मृत्यूच्या दारात उभा राहूनही अजूनही अधिकाराची खोटी तृष्णा न मिटलेला एसपी स्वामित्व सिद्ध करू पाहत होता.
शक्तीने त्याच्या या अज्ञानावर त्याचा उपहास करणारं स्मित केलं व तो एसपीला म्हणाला,
"तरी तू अर्धवट माहिती घेऊन काम केलंयस! आपण कुणासाठी काम करतोय आणि त्याचे पुढे काय परिणाम होणार आहेत याचा जराही विचार केला नाहीस ना?!" आणि तो जाण्यास उभारला.
"ज्याने तुला हे सांगितलं, त्याला आणि एकदा भेट दे!" शक्ती दरवाजाकडे जात असताना शेवटी एसपी त्याला एवढंच म्हणाला.
शक्तीने मागेही पाहिलं नाही. तो दरवाज्यातून जसा बाहेर आला, तसा त्याच्यामागे एक स्पार्क झाल्याचं त्याला जाणवलं. आणि एक आवाज... गनशॉटचा!
बाहेर तैनात गार्ड्स शक्तीला जाताना पाहत होते... पण त्यांनी त्याला पकडण्याचा अट्टहास केला नाही... शक्ती काय आहे हे ते जाणून होते... आणि तो आता कोणाच्या रोखण्याने थांबणार नाही हे देखील ते ओळखून होते...
एसीपी मरणासाठी शक्तीमुळेच उद्युक्त झाला आहे हे समजून देखील ते शांत राहिले. शक्तीला घाबरून नाही, तर तो काही चुकीचं करणार नाही हे माहीत असल्याने!
शक्ती पुन्हा त्याने असॅसिनला ठेवलेल्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्याने थेट असॅसिनचा वॉर्ड गाठला. पहातो तर असॅसिन निपचित पडला होता. चेक करण्याची आवश्यकता नाही हे शक्तीही समजून होता... असॅसिनचा काटा काढला गेला होता...
एसपीने संकेत दिल्यावरच शक्तीला संशय आला होताच की हेच होणार आहे! मग अचानक त्याला काही क्लिक झालं. तो लगोलग शौर्यजीतच्या वॉर्डकडे पळाला. बाहेर तैनात दोन गार्ड्स शक्तीला असा आलेला पाहून जरा सावध झाले. शक्ती जसा वॉर्डमध्ये शिरला तसे तेही हातातील शस्त्र सज्ज करून त्याच्या मागून आत शिरले. शौर्यजीत पण निपचितच होता...
शंकेने शक्ती हळूहळू त्याच्या दिशेने सरकला. आपली भीती सत्यात उतरलेली नसावी अशी न जाणो कितीवेळा या मधल्या काळात त्याने प्रार्थना केली होती...
तो शौर्यजीत जवळ पोहोचला. त्याचे पोट हलताना पाहून त्याचा श्वासोच्छ्वास चालू आहे हे शक्तीच्या लक्षात आले आणि तो रिलॅक्स झाला... दबकन तो शौर्यच्या बेडजवळच्या स्टूलवर बसला. त्याने थोडा आवाज झाला. त्याच्याही नकळत तो उसासा टाकत होता... त्याने डोळे बंद करून घेतले.
कपाळावर आलेले घर्मबिंदू फोरआर्मने टिपत असतानाच, त्याच्या मांडीवर शौर्यचा डावा हात आला.
"काय रे काय झालं?" शौर्यजीतने तोंडचा मास्क काढून विचारलं.
शक्ती स्टुलावर पडला तेव्हा त्या आवाजाने शौर्यची तंद्री भंगली होती.
तो आवाज कानात घुमताच शक्तीने ताडकन डोळे उघडून शौर्यजीतकडे पाहिलं. शक्तीच्या डोळ्यांत अश्रू होते... चेहऱ्यावर साचलेला घाम आणि त्याचे अश्रू एकरूप झाले होते... आणि ते जमिनीवर ठिबकत होते...
काय चाललंय याबद्दल गार्ड्स पूर्णतः क्लूलेस होते. त्यांना बाहेर जाण्याची शौर्यजीतने त्यांना खूण केली. त्याच्या सूचनेनुसार बाहेरून दार देखील लावून घेतलं गेलं...
मग काहीच न बोलता शौर्यजीतने सोबतच्या टेबलवर असलेलं एक जाडजूड एन्वेलोप उचलून ते शक्ती समोर धरलं.
शक्ती प्रश्नार्थक नजरेनं पाहत राहिला... जास्त बोलण्याचा त्रास न घेता शौर्यजीतने शक्तीला इशारा करूनच एन्वेलोप घेण्याचा आग्रह केला.
शक्तीने डोळे आणि घाम पुसले. शौर्यकडून एन्वेलोप घेऊन त्याने तो फोडून पाहिला. आत खूप सारे पैशांचे दोन पुडके. प्रत्येक बंडलांत दोन हजारांच्या पंचवीस नोटा. दोन पत्रं होती आणि एक कसली तरी आयडी...
ती पत्रं शक्तीने वाचली आणि शक्तीची चर्या बदलली... त्याच्या चेहऱ्यावरच्या आठ्या गडद झाल्या...
"यु आर ऑफिशियल अपॉईंटेड् ऑन थिस केस बाय प्राईम मिनिस्टर अँड सेन्ट्रल होम मिनिस्ट्री! त्या स्पेशल आयडीमुळे तुला तुझ्या कामात कोणी बाधा आणणार नाही! याचा तू क्रेडिट कार्ड म्हणून पण उपयोग करू शकतोस. आणि डोन्ट वरी हे अनडिटेक्टेबल आहे. मला माहित आहे तू काही आता ऐकायचा नाहीस. म्हणून मी ही स्पेशल परमिशन काढली आहे."
"आय वोन्ट लेट यु डाऊन ब्रदर्...!" कागद हातात असून शक्तीने गहिवरून शौर्यचा हात हातात घेतला व भरल्या डोळ्यांनी त्याला आश्वस्त करत म्हणाला आणि यामुळे हातातले ते महत्वाचे कागद चुरगळले गेले.
"पण लक्षात ठेव! विशेष परिस्थितीतच त्या आयडीचा उपयोग कर. अदरव्हाईज, नाही. तू ऑफिशियली जरी या केसवर अपॉईंट असलास, तरी तुझं काम अनॉफिशियल असणार आहे. त्यामुळे एसआयटी सोबत आणि रॉ सोबत कधी ओव्हरलॅप होऊ नको!" शौर्यजीतने शक्तीला ताकीद दिली.