mayajaal - 3 in Marathi Fiction Stories by Amita a. Salvi books and stories PDF | मायाजाल -- ३

Featured Books
Categories
Share

मायाजाल -- ३

मायाजाल -- ३
एका डेरेदार वृक्षाखाली थंडगार सावलीतल्या बाकावर इंद्रजीत आणि हर्षद बसले.
" हं! बोल जीत! काल तू कोणाकडे गेला होतास? मी आईला विचारलं! तू आमच्या घरी गेला नव्हतास- - आमच्या कॉलनीत दुसरं कोण तुझ्या ओळखीचं आहे?" हर्षदच्या मनातलं कुतूहल त्याने एका पाठोपाठ विचारलेल्या प्रश्नांवरून कळत होतं.
" मी प्रज्ञाकडे गेलो होतो! काल मी प्रज्ञाला माझ्या गाडीतून लिफ्ट दिली. तुला माहीतच असेल; ती माझ्याच काॅलेजमध्ये आहे! काल खूप पाऊस होता, टॅक्सी - बसेस बंद होत्या. ती बस- स्टॉपवर भांबावलेल्या अवस्थेत दिसली. म्हणून मी तिला घरी सोडलं. तिने आग्रह केला, म्हणून तिच्या घरी कॉफी प्यायला गेलो होतो! तू त्यावेळी घरी नसणार याची खात्री होती; म्हणून तुझ्याकडे गेलो नाही!" इंद्रजीतने नाइलाजाने खरं काय घडलं हे सांगून टाकलं. ज्या अर्थी प्रज्ञाशी मैत्री आहे; हे हर्षद लपवतोय, त्याअर्थी त्याला हे आवडणार नाही, हे त्याला कळत होतं. पण आता सत्य सांगण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. नाहीतरी आता वरचेवर प्रज्ञाकडे जाणं होणारच होतं.. किती वेळा तो खोटं बोलणार होता? तो हर्षदच्या चेहऱ्यावरच्या हावभावांचं निरीक्षण करीत होता. त्याच्या अपेक्षेप्रमाणेच हर्षदच्या कपाळावर आठ्या दिसू लागल्या.
इंद्रजीत पुढे बोलू लागला,
" अरे! काय करणार? बस - स्टॉपवर एकटीच उभी होती. रस्ते पाण्याने भरले होते, टॅक्सी- बसेस बंद झाल्या होत्या. मोठ्या अडचणीत सापडली होती! मी घरी येत होतो. तिला पाहिलं आणि लिफ्ट दिली. अशा वेळी माणुसकी तर जपावीच लागते! खरं आहे की नाही? नंतर ती मला काॅफी प्यायला घरी घेऊन गेली. छान कुटुंब आहे! मला याचं आश्चर्य वाटतं की, इतक्या जवळ राहूनही तुमची फारशी ओळख नाही. काल सगळे घरीच होते." बोलताना इंद्रजीत हर्षदच्या चेह-यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत होता.
"ओ हो! म्हणजे फक्त काल गाड्या बंद होत्या म्हणून तू तिला घरी सोडलंस तर! तू म्हणतोस ते खरं आहे, अडचणीला मदत केलीच पाहिजे! आणि कालचं वादळ हाॅरिबल होतं! चांगलं केलंस तू! पण तुझी तिच्याशी आताच ओळख झाली आहे. त्यामुळे तुला माहीत नाही! खूप अॅटीट्यूड वाली मुलगी आहे ती! तिचे डोळे बघितलेस? जणू काही एक्स रे मशीन बसवल्यासारखे वाटतात! त्यामुळेच एवढी सुंदर असूनही तिच्याजवळ जाऊन बोलायची कोणाची हिंमत होत नाही. ती कोणाशी मैत्री करणं शक्यच नाही! तू सुद्धा ओळख वाढवायचा प्रयत्न करू नकोस- कधी इन्सल्ट करेल सांगता येत नाही!" हर्षद जीतच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. जणू काही महत्त्वाचा सल्ला देतोय असा त्याचा अविर्भाव होता. प्रज्ञाच्या तिखट नजरेविषयी हर्षद जे काही बोलला; ते मनापासून बोलला होता. त्या नजरेच्या धाकामुळेच तो अजूनपर्यंत आपलं मन तिच्यासमोर मोकळं करू शकला नव्हता.
इंद्रजीतला त्याचं प्रज्ञाविषयीचं बोलणं पटलं नाही. न राहवून तो म्हणाला,
" तिच्याशी काल प्रथमच ओळख झाली! कॉलेजमध्ये ती कोणाशी विशेष बोलत नाही. मुद्दाम ओळख वाढवणारी ती मुलगी नाही. एक दोन मैत्रिणी आहेत तिच्या! पण फारशी कोणात मिसळत नाही. तुला तर तिचा स्वभाव माहीतच आहे. स्वतःच्याच कोशात रहाते! पण मला तरी ती सुस्वभावी वाटली. "
हे बोलताना इंद्रजीत हर्षदच्या चेह-याचं निरीक्षण करत होता.
जीतचं हे स्पष्टीकरण ऐकून हर्षदच्या चेह-यावर आश्चर्याचे भाव आले,
" ओळख होऊन दोन दिवस सुद्धा झाले नाहीत, आणि तिच्याविषयी एवढ्या खात्रीने बोलतोयस? कमाल आहे तुझी; जीत!"
आता मात्र जीतला बोलल्याशिवाय रहावे ना!
“पण ती तर म्हणाली - तुझ्याशी चांगली मैत्री आहे - -” तो हर्षदच्या डोळ्यात पाहत म्हणाला.
" छे! साध्या ओळखीला मैत्री समजत असेल तर तो तिचा प्रश्न आहे. ती एवढी खडुस आहे; की सगळेच तिच्यापासून चार पावलं लांब रहातात!. मला अजून पर्यंत माहित नव्हतं की ती मला तिचा मित्र समजते. पण तू तिच्यापासून दूर राहा!! ----आता मी निघतो! वेळ मिळेल; तेव्हा मीच तुला भेटायला येत जाईन. माझी घरी येण्याची वेळ निश्चित नसते; तुझी फेरी फुकट जायला नको." जीतची नजर चुकवत निघण्यासाठी वर उठत हर्षद म्हणाला. तो स्वतःवरच रागावला होता. इंद्रजीतने प्रज्ञापासून लांब रहावं; म्हणून तो त्याच्या मनात प्रज्ञाविषयी विष पेरण्याचा प्रयत्न करत होता; पण जीतच्या बोलण्यावरून त्याला कळत होतं; की त्याचे सगळे प्रयत्न वाया गेले होते.
इंद्रजीतला आज हर्षदचं वागणं नेहमीप्रमाणे सहज वाटलं नाही, तो अस्वस्थ दिसत होता.
त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघताना तो मनाशी म्हणत होता,
"तिच्या कडक स्वभावामुळे तुझा तिच्याविषयी गैरसमज झाला आहे; मित्रा! पण घाबरू नकोस! आणि काही दिवसांतच प्रज्ञाचा स्वभाव बदललेला तू पहाशील! ती कोषातून बाहेर पडेल. मला भिती वाटत होती; की तुलासुद्धा तिच्याविषयी काही विशेष आकर्षण आहे की काय? पण तुझ्या मनात तिच्याविषयी फारशी आस्था नाही; हे चांगलंच आहे. प्रेमाचा त्रिकोण वगैरे --- असला काही भाग नाही."
इंद्रजीतला हर्षदचं प्रज्ञाविषयीचं मत पटत नव्हते. ती मीतभाषी असली तरी सुस्वभावी होती. आणि तिला पहिल्यांदा पाहिलं; तेव्हापासूनच ती त्याच्या मनात भरली होती. पण तिच्या अबोल स्वभावामुळे तिच्याशी मैत्री कशी वाढवायची; हा मोठा प्रश्न होता.

*********

इंद्रजीतला सुरूवातीला वाटलं होतं ; ओळख झाली आहे आता मैत्री व्हायला कितीसा वेळ लागणार? पण तसं होण्याची चिन्हं दिसेनात. प्रज्ञाला अभ्यास सोडून कॉलेजच्या इतर ऍक्टिव्हिटीजमध्ये विशेष रस नव्हता. मुलांशी तर ती अधिकच अलिप्तपणे वागत असे. तिच्या अबोल स्वभावामुळे आणि धारदार नजरेमुळे मुलांना तिचा थोडा धाक वाटत असे त्यामुळे कोणी तिच्याशी सलगी करायला धजावत नव्हते. इंद्रजीतचीही तीच गत झाली होती. हे अंतर कमी होणे तितकंसं सोपं दिसत नव्हतं.
प्रज्ञाशी बोलण्याची संधी एके दिवशी अचानक चालून आली. कॉलेजतर्फे आदिवासी वस्तीमध्ये एक शिबिर घेण्यात येणार होतं. डॉक्टर्सना मदत करण्यासाठी आणि प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी काही विद्यार्थ्यांनाही तिकडे पाठवण्यात येणार होतं. त्यात इंद्रजीत आणि प्रज्ञा - दोघांचीही नावं होती. चार दिवस त्या डोंगराळ भागात राहावे लागणार होतं. अनिरुद्ध तिला पाठवायला तयार नव्हते. त्यामुळे प्रज्ञाने न जाण्याचा निर्णय घेतला होता. कॉलेजच्या नोटीस बोर्डवर इंद्रजीतने तिचं नाव पाहिलं होतं. त्याने तिला कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये थांबवलं आणि विचारलं,
" तू शिबिरासाठी जायची तयारी सुरू केलीस की नाही? काही गरम कपडे बरोबर घे! तिकडे थंडी खूप असते. गेल्या वर्षीही आम्ही तिकडे गेलो होतो. तुला त्रास होऊ नये म्हणून कल्पना दिली." यावर प्रज्ञा नाराजीने म्हणाली,
"बाबांची परवानगी मिळत नाहीये! मग मी कशी येणार? चार दिवस मला अशा दुर्गम ठिकाणी पाठवायची त्यांना भीती वाटते आहे. खरं म्हणजे माझी खूप इच्छा आहे; तिथे मला आपल्या कामाचा अनुभव चांगला मिळालाव असता; आणि दुर्लक्षित समाजाची सेवा करण्याची संधीही मिळाली असती. पण मी नाही येऊ शकणार!" प्रज्ञा दुःखी चेहऱ्याने म्हणाली.
" तू जर या शिबिराला आली नाहीस, तर तुझ्या कॉलेजच्या रेकॉर्डसाठी ते बरं असणार नाही. एक मोठी संधी तू गमावशील. काळजी करू नको! मी येऊन तुझ्या आईला समजतो. मला खात्री आहे, तू नक्कीच आमच्याबरोबर शिबिराला येशील!" इंद्रजीतने तिला आश्वासन दिलं.
*********
त्या दिवशी संध्याकाळी तो प्रज्ञाच्या घरी गेला. तिला शिबिरासाठी परवानगी द्यावी म्हणून तो आलाय हे कळल्यावर नीनाताई म्हणाल्या,
“तो डोंगराळ भाग आहे. जाण्यासाठी वाहनांची चांगली सोय नाही, रस्ते चांगले नाहीत. तुमचे शिबिर तिकडे होणार आहे, हे कळल्यावर आम्ही सगळी माहिती काढली . तुम्हा मुलांची गोष्ट वेगळी आहे. प्रज्ञाला पाठवणं जोखमीचं आहे! म्हणून आम्ही तिला नको म्हणालो.”
“आई! तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही. आम्ही पंधरा-वीस विद्यार्थी जाणार आहोतं. चार-पाच जण स्वतःची गाडी घेऊन येणार आहेत. शिवाय कॉलेज तर्फे मिनी बसची सोय केली आहे आणि फक्त टॉपर विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली आहे. प्रज्ञाच्या मैत्रिणी नसतील; पण काॅलेजमधल्या अनेक मुली आहेत आमच्या बरोबर! आम्ही सगळे एकत्र असणार आहोत. शिवाय मोठे डॉक्टर आहेतच! तुम्ही प्रज्ञाला तिकडे पाठवलं, तर तिच्या पुढच्या करिअरसाठी खूप चांगलं ठरेल, तिला तिकडे भरपूर शिकायला मिळेल! काम करायची संधी मिळेल! मी अशा शिबिरांना दोन वेळा जाऊन आलो आहे! काॅलेजतर्फे सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाते! तुम्ही मनात जराही संशय ठेवू नका!"
इंद्रजीतचं म्हणणं नीनाताईंना पटलं आणि प्रज्ञाला परवानगी मिळाली.
********* contd-- part IV