मागील भागावरून पुढे....
यथाअवकाश सगळे मुंबईला पोचले... येणारी पौर्णिमा अजून वीस दिवस लांब होती. त्याच्या आंत त्यांना सगळे सामान घेऊन चार दिवस आधी पुन्हा गावाला पोचायचे होते.
किशोरच्या घरी मंदाकिनीला बघून एकदम गदारोळ माजला. सगळ्यांना वाटले की, तो लग्नच करून आला की काय. पण सगळ्यांना शांत करत त्याने मंदाकिनी कोण आणी काय परिस्थिती आहे ते समजावून सांगितले. तसें सगळे शांत झाले. आज पर्यंत त्याच्या आईबाबानां पण आपल्या गावाचा विसर पडला होता. पण अचानक असे प्रकरण समोर आलेले बघून सगळे हतबल झाले.
काहीशे सावरत त्यांनी किशोरला ह्या सगळ्यातून बाजूला व्हायला सांगितले. पण किशोर बधला नाही. त्यामुळे आता जास्त कोणी काही बोलले नाही. झालेल्या पहिल्याच प्रकारात मंदाकिनी पण काहीशी बावरली. माणसे नवीन , किशोर सोडला तर कोणाला ओळखत नाही. पण अश्या वेळी किशोर ठामपणे तिच्या मागे उभा राहिला. त्यामुळे घरातल्या सगळ्यांनी तिच्या आगमना बद्दल फार खळखळ केली नाही.
त्या रात्री दोघांनी सामानाची यादी वाचून काढली. त्यातले बरेचसे सामान कुठे भेटेल ह्या बद्दल किशोर ला माहित नव्हते.
काळी हळद , बिब्बे , एकधारेची लिंब , हळद , कुंकू आणी असेच काही बाही त्या यादीत लिहले होते. ती यादी वाचून किशोर चक्रावला. पण मंदाकिनीने त्याला आश्वस्थ केले. असे सामान कसे शोधायचे हे तिला माहित होते. म्हणून दुसऱ्याच दिवशी ते दोघे जुन्या बाजारात वेगवेगळ्या दुकानात फिरले. कुठून एक तर कुठून एक असे करत तिने सगळे सामान जमा केले. लिंबू जाण्याच्या दोन दिवस आधी घेऊ म्हणून ते दोघे परत फिरले . पुढील दोन चार दिवसात मंदाकिनी त्या घरात रुळली... आता आईबाबानी पण तिला स्वीकारले. त्यात ती सुगरण मग काय बघता बघता तिने किचनचा ताबा घेतला. किशोर ने एक महिना सुट्टीच घेतली होती. त्यामुळे गडबड अशी नव्हतीच...
एके दिवशी मंदाकिनी किशोरच्या रूम मध्ये आली. तेव्हा तो लॅपटॉप वर काम करत होता.
" किशोर !... " तिने आपल्या नेहमीच्या मंजुळ आवाजात हाक मारली.
" ह्म्म्म..." त्याने एकदा तिच्या वर नजर टाकत पुन्हा लॅपटॉप मध्ये डोळे घातले.
" आपण कुठे तरी फिरायला जाऊया का ? "
" काय ? " किशोर चमकला.
" ह्म्म्म.... मी कधी अशी शहरात आलीच नाही. म्हणून जरा सगळे शहर बघायची इच्छा आहे. तुला जमेल का?"
" हो... का नाही...उद्याच जाऊ आपण. " किशोर म्हणाला. तिचा असा मिळणारा सहवास तो काय सोडणार होता ?
" पण आई बाबा ? "
" त्यांचे मी बघतो.. तु नको काळजी करू. तु उद्या सकाळी तयार राहा. " किशोर असे म्हणाला तसें तिच्या चेहऱ्यावर आनंदाची झाक आली.
दुसऱ्या दिवशी किशोर तिला घेऊन आपल्या बाईकवर मुंबई फिरवत होता. त्या अवाढव्य गर्दीत त्याचा हात ती घट्ट पकडून होती. तिच्या नजरेत भीती , कुतूहल , उत्साह असे कितीतरी भाव होते. कधीही त्या छोट्या गावातून बाहेर न पडलेली ती ही मायानगरी आपल्या नजरेत साठवून घेत होती.
तीची अशी अवस्था बघून किशोर पण तिला खूप ठिकाणी फिरवत होता. गेटवे , मलबारहिल , मरीन ड्राइव्ह , भाऊचा धक्का... शेवटी तो तिला घेऊन बांद्रा पाली हिल भागात आला.
" इथे मोठे मोठे फिल्म स्टार राहतात." तो तिला सांगत होता.
" तो बघ अमिताभचा बंगला ' जलसा '. " तो तिला वेगवेगळ्या फिल्मस्टारचे बंगले दाखवत होता.
" तुला कोणता फिल्म स्टार आवडतो. " त्याने सहज विचारले.
" मी काही फार सिनेमे बघितले नाहीत. " ती खिन्न आवाजात म्हणाली.
" ओह... मग आपण बघू या का एखादा सिनेमा ? " त्याने पुढे विचारले. आणी त्याच्या प्रश्नाने तिची चर्या उजळली. खरंतर तिला पण एखादा सिनेमा बघायचा होता. पण त्याने तिला आज एव्हडे फिरवले होते त्यात आपण अजून त्याला सिनेमा बघायचा कां? हे विचारणे तिला प्रशस्त वाटत नव्हते. पण आता त्याने विचारल्यामुळे ती आनंदली.
" चालेल बघू या... "
" मग ठीक आहे. आपण उद्या जाऊया सिनेमाला. "
तिने मान डोलावली. संध्याकाळी ते घरी आले. रात्री झोपताना मंदाकिनीच्या डोळ्यापुढे त्याच्या समवेत घालवलेले क्षण सारखे सारखे येत होते. गावात माळ्यावर त्याच्या मिठीत गवसलेले सुख अजून पण अंगावर काटा आणत होते. उगाचच सगळे अवयव उचंबळून येत होते. मनातल्या मनात ती हसत होती , लाजत होती , पुन्हा त्याच्या विचारात गढून जात होती.
किशोरचीं अवस्था काही वेगळी नव्हती. त्याला पण तीच आठवत होती. आज जवळून झालेला तिचा स्पर्श त्याला लगडून चालणारी ती... सगळे त्याला आठवत होते.
ती त्याच्यात गुंतली होती हे तर त्याला कळत होते. पण तिचे नक्की आपल्यावर प्रेम आहे की फक्त आकर्षण हे त्याला कळत नव्हते. पण त्याच्याकडे ह्यावर एक उपाय होता . आणी उद्या सिनेमाला गेल्यावर तो अजमावून बघणार होता. जर त्यात ती पास झाली तर काहीच अडचण नव्हती. त्याच्या घरून त्यांच्या लग्नाला कोणतीही आडकाठी होण्याची शक्यता नव्हती.
उद्या काय काय कसे कसे करायचे ह्याचा विचार करतच तो झोपला.
दुसऱ्या दिवशी मंदाकिनी लवकर तयार झाली. एक चांगली साडी तिने घातली होती. हलकासा पावडर चा शिडकाव , लहानशी टिकली.. बस गळ्यात एक मंगळसूत्रचीं कमी होती. किशोर तिला बघतच राहिला. व्यवस्थित नेसलेल्या साडीतून सुद्धा तिच्या अंगाचे उठाव ठळकपणे नजरेस पडत होते. त्याला असा बघून तीने लाजून मान खाली घातली.
शेवटी दोघे एका चांगल्या थिएटर ला पोचले. किशोर ने मुद्दाम एका बाजूची दोन तिकिटे काढली. सिनेमा लागून एक आठवडा झाला होता म्हणून फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे दोघांना पुरेसा एकांत मिळणार होता. जसा सिनेमा चालू झाला. किशोर ने आणलेले पॉपकॉर्न तिच्या समोर धरले.. मग दोघे सावकाश खात खात सिनेमा बघत होते. आता एकमेकांना सहज स्पर्श होत होते. हळूहळू त्याचा हात तिच्या हातावर आला. आणी मग सावकाश पुढे पुढे सरकत होता. त्याच्या त्या कृतीने ती एकदम उतेजीत झाली. पण त्याला वेळीच आवर घालत तिने त्याचा हात पकडला...
त्या क्षणी किशोर ने तिच्या हातावरून आपला हात काढून घेतला. तो मनोमन सुखावला. पण त्याच्या त्या कृतीचा अर्थ त्याला राग आलाय असा तिने घेतला. आता तो शांतपणे पिक्चर बघत होता आणी तिच्या मनात वादळ उठले होते. त्याला दुखावणे हा हेतू नव्हता. पण लग्नाआधीच त्याचा असा उतावीळपणा तिला पसंद पडला नव्हता.
तिने सावकाश आपले डोके त्याच्या खांद्यावर सोडले. त्यानेही तिच्या खांद्यावर हात टाकत तिला आपल्या जवळ घेतले.
" तुला राग आला का ? " पिक्चर संपल्यावर तिने विचारले.
" कशाचा ? "
" मगाशी मी तुला मज्जाव केला त्याचा ? "
" नाही ग... उलट मी बघत होतो. की हे प्रेम आहे की फक्त आकर्षण ? नाहीतर असे काही करण्याचा माझा पण काही इरादा नव्हता." तो म्हणाला.
" खरंच ? " तीने डोळे मोठे करत अविश्वासाने विचारले.
" देवा शपथ... खरंच... मंदाकिनी तु मला खुप आवडतेस. माझ्याशी लग्न करशील ? " त्याच्या अचानक विचारलेल्या प्रश्नाने ती दचकली. खरंतर तिला पण तो आवडत होता. पण लग्न वैगरे एकदम वेगळी गोष्ट होती. ती गावातली. फारशी शिकलेली नव्हती. तो खूप शिकलेला होता. त्याच्या आई बाबा ने तिला स्वीकारले असते ? आणी आता जरी त्याला ती आवडत असली तरी पुढे काही बिनसले तर ती काय करणार होती ? म्हणून तिने त्यावर काही उत्तर दिले नाही.
ती शांत बसलेली बघून किशोर खिन्न झाला.
" सॉरी मला माफ कर. मला वाटत होते की तुझे पण माझ्यावर प्रेम आहे. म्हणून... "
" नाही. असे नाही. माझे पण तुझ्यावर प्रेम आहे. पण आई बाबा मला स्वीकारतील कां ? ह्या गोष्टीचा मी विचार करत होते. मी इथे आल्यावर ते किती चिडले होते माहित आहे ना ?" तिने आठवण करून दिली.
" नाही. माझ्या सुखासाठी ते पण मान्य करतील. मला खात्री आहे. कदाचित काही वेळ जाईल , पण ऐकतील." तो ठामपणे म्हणाला. त्याच्या बोलण्याने तिची कळी थोडी खुलली. ती हळूच त्याच्या बाजूला सरकली. त्याचा हात आपल्या हातात घेत तिने आपल्या प्रेमाची कबुली दिली.
असे करता मंदाकिनीचे मुंबई मधील बारा दिवस पूर्ण झाले. आता त्यांना लिंबू आणी घेतलेले सामान घेऊन गावाला परत जायला लागणार होते. आईबाबा धास्तावले होते कारण किशोर त्यांचा एकच्या एक मुलगा होता. त्यामुळे तो जिद्दी होता. ऐकणार तर तो नव्हता म्हणून मग आईने मंदाकिनीलाच त्याची काळजी घ्यायला सांगितली.
शेवटी सहा दिवस बाकी असताना त्यांनी गावाला जायचे नक्की केले. शिवाय पुन्हा एकदा सामानावर नजर टाकली. काही राहिले तर नाही नां ? ह्याची खात्री करून घेतली. श्याम पण त्यांच्या सोबत येणार होता. शिवाय गावात संपत पण त्यांना मदत करणार होता. शेवटी मोठा प्रवास करून तिघे पुन्हा गावाला आले. श्याम संपत ला बघायला गावात गेला. किशोर आणी मंदाकिनी आजीच्या समाचाराला गेले.
त्यांना परत आलेला बघून आजीचे डोळे पुन्हा एकदा चमकले.
" आलात ? या..." तिने थकलेल्या आवाजात त्यांचे स्वागत केले...
" आजी काय झाले ?" किशोर ने तिचा आवाज ऐकून काळजीने विचारले.
" काही नाही रे. खूप थकलीय मी..." आजीने उत्तर दिले.
" तुम्ही पण थकला असाल... मंदाकिनी ह्याला ह्याची खोली दाखव. आणी आज रात्री साधच काही बनव जेवायला. तु पण थकली असशील ना ? "
त्यावर मंदाकिनी काही म्हणाली नाही. आणी तिने किशोरला इशारा केला. दोघे ही बाहेर आले. तिने एक खोली उघडून दिली. त्या रूम मध्ये किशोर आणी श्याम दोघांची राहायची व्यवस्था होती.
संध्याकाळी त्यांची पुन्हा बैठक झाली. त्यात पुढे काय काय करायचे ते आजी सांगत होती.
" बाबू ! तो समंध इथे आला की , श्याम आणी तुमचा मित्र बाहेरून वाड्याच्या बाजूने आपण मंत्राने अभिमंत्रित केलेले तांदूळ टाकायचे. एक रिंगण आखायचे. म्हणजे तो त्यातून बाहेर निघू शकत नाही. त्यानंतर आपण घरातून बाहेर पडण्याच्या ज्या वाटा , खिडक्या , काचेची तावदाने सगळी कडे... मी मंत्रून दिलेले तांदूळ , लिंबू बांधायचे. त्याला पळण्याची एकही जागा ठेवायची नाही. "
" जर एकदा का तो पळाला तर तो आपला सूड घेणार..."
तिचे बोलणे ऐकून किशोर आणी श्यामच्या अंगावर काटा आला.
ठरल्या प्रमाणे आजीने एक दिवस आधी तांदूळ मंत्रून घेतले. शिवाय काळी हळद आणी बिब्बे मंत्रून त्याच्या साह्याने प्रत्येक काचेवर एक विशिष्ट चिन्ह काढण्यात आले. स्वतः किशोर आणी मंदाकिनीने घरभर फिरून एकही वाट मोकळी राहणार नाही ह्याची काळजी घेतली. बादलीभर तांदूळ मंत्रून श्याम आणी संपत कडे देण्यात आले. सर्व तयारी झाली त्या संध्याकाळी श्याम आणी संपत वाड्यात आले. संपत आज पहिल्यांदाच ह्या वाड्यात पाय ठेवत होता.
" मुलांनो ! आपली तयारी पूर्ण झाली आहे. पण महत्वाची एक गोष्ट राहिली आहे. "आजी म्हणाली.
" आता अजून काय राहिले आहे आजी..." किशोर ने विचारले.
" बाबू ! आपल्याला आपली सुरक्षा करायला नको ? त्याला जायला रस्ता मिळाला नाही तर तो आपल्यावर चाल करून येईल. म्हणून मी एक तावीज मंत्रून देते सगळ्यांनी आपल्या गळ्यात बांधायचा. म्हणजे तो आपल्याला काहीही इजा करू शकत नाही. "
" श्याम आणी संपत दोघे वाड्या बाहेर असतील. इशारा मिळाला की त्यांनी लगेचच वाड्या भोंवती तांदूळ घालून त्याला इथेच जेरबंद करायचा. आपण सगळे एका रिंगणात बसून पुढील विधी करू. त्यासाठी आपल्याला एक यज्ञकुंड पेटवावे लागेल. त्यात समिधा टाकाव्या लागतील. पडणाऱ्या प्रत्येक समिधे बरोबर त्याची शक्ती कमी कमी होत जाईल. आणी शेवटी तो मुक्त होईल. "
आजी ने त्या सगळ्यांना आपली योजना सांगितली.
त्यावर सगळ्यांनी माना डोलावल्या. पौर्णिमा आता उद्यावर आली होती.
दुसऱ्या दिवशी सगळे कामात गुंतले होते. कोणतीही चूक होता कामा नये म्हणून सगळे पुन्हा पुन्हा सगळे नीट बघत होते. मंदाकिनी जेवणाच्या तयारीला लागली होती. आज ' ब्रम्हसमंधा ' साठी मोठा बेत केला होता. त्या मुळे थोडा जास्त वेळ श्याम आणी संपत ला मिळणार होता. समंध रात्री बारा वाजता यायचा. गावाचा तसा त्रास नव्हता. कारण गाव तो पर्यंत झोपी गेलेले असायचे.
रात्री श्याम आणी संपत बाहेर जाऊन लपले. आता वाड्यात फक्त तिघेच उरले. मंदाकिनीने एका मोठ्या परातीत सगळे पदार्थ काढायला सुरवात केली. आजीने यज्ञकुंडाची तयारी करून ठेवली होती. वेळ येताच ती ते पेटवणार होती. किशोर सगळे बघत होता. त्यात आपला रोल काय तेच त्याला कळत नव्हते.
" आजी मी काय करायचे आहे? तु तर म्हणाली होतीस की तुला रक्ताचा माणूस हवा आहे म्हणून? "
" बाबू ! यज्ञकुंडात तुझ्या रक्ताच्या समिधा टाकायच्या आहेत. "
" काय ? "
" हो... त्याला आपल्या अधिकारात घेताना मी माझ्या रक्ताच्या साह्याने त्याला बांधले होते. पण आता माझ्यात तेव्हडे रक्त राहिले नाही. आणी जर मी रक्त दिले आणी मी बेहोष झाले तर मंत्र कोण म्हणणार ? म्हणून तु माझा नातू . रक्ताचा आहेस. म्हणून तुझे रक्त त्या यज्ञकुंडात टाकून आपण त्याला मुक्त करू शकतो. " आजी त्याला शांतपणे समजावत म्हणाली.
आता किशोरच्या लक्षात आले. की , काय प्रकार आहे. तिचे बोलणे पण बरोबर होते. जर तीच बेहोष झाली तर पुढील सगळे काम फसणार होते. कारण त्याला मुक्त करण्याची ताकत फक्त तिच्यातच होती.
" आणी बाबू ! मी रिंगण आखून देईन त्यातच बसायचे त्यातून बाहेर यायचे नाही. मी सांगत नाही तो पर्यंत अजिबात तिथून हलायचे नाही. आणी तो समंध कदाचित तुला निरनिराळी आमिषे दाखवेल , त्याला सोडायची गळ घालेल , चिडून अंगावर धावून येईल , तुला काय हवे ते देण्याचा मोह घालेल. पण त्याच्या कडे दुर्लक्ष करायचे आणी समिधा टाकत राहायची... आलं लक्षात ? "
" हो.. आजी... "
" ठीक आहे. तु त्याला अजून बघितला नाहीस. म्हणून त्याला बघून तु कदाचित घाबरशील म्हणून तुला सांगतेय. तो अतिशय मोठा दिसतो. भयंकर दिसतो. कराकरा दात खातो. लांबलच्चक शेंडी आहे. जानव असते. बोलायला चतुर आहे. पण शेवटी तो समंधच. इतर कोणाही भूतांपिशाचा पेक्षा त्याचा अधिकार आणी शक्ती अंमळ जास्तच असते. म्हणून त्याच्या कोणत्याही बोलण्यावर , दिसण्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही..." आजी पण आता जरा काळजीत पडली होती.
" काही काळजी करू नकोस आजी... मी सगळे लक्षात ठेवीन..." किशोर ठाम आवाजात म्हणाला.
शेवटी ती वेळ आली. रात्रीचे बारा वाजायला आले. आणी थंडगार वारा सुटला. सगळी कडे अचानक सन्नाटा पसरला.
" त्याच्या यायची वेळ झालीय. " आजी अचूक म्हणाली. मंदाकिनीने पटकन परात नेऊन मधल्या मोकळ्या जागेत जाऊन ठेवली . एखाद मिनिटाच्या अंतराने दरवाजा धाडकन उघडला. त्याचा जोरदार आवाज झाला.
" तो आलाय..." आजी सूचकपणे बोलली. तिघेही आतच होते. बाहेरून मचमच खाण्याचे आवाज येत होते. बाहेरच्या दरवाज्याच्या आवाजाने श्याम आणी संपत सावध झाले होते. त्यांनी पटापट तांदूळ टाकत त्याचा जाण्याचा मार्ग बंद केला.
पुढील भाग लवकरच....
© सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित..