प्रिय,
आज मुद्दामच हे लिहिण्याचे उपद्याप... तुला आश्चर्य वाटत असेल ना माझ्यासारखी टेक्नोसेवी आणि सतत मोबाईलला चिकटून बसणारी व्यक्ती चक्क कागद आणि पेन घेऊन आपल्या मोडक्या अक्षरात काहीतरी खरडतेय... खरंय... पण आजकाल आपलं फारस पटत नाही ना रे... समोरासमोर बसून क्वालिटी डिस्कशन होण्यापेक्षा वादच जास्त होतात. दोघांचंही वय वाढलंय आणि वयानुसार येणाऱ्या अनुभवासोबत आपली मत बदलली आणि मग चालू झाले न संपणारे भांडण तंटे. मग ते माझ्या सतत बदलणाऱ्या नोकरीवरून असोत वा रात्री लेट येण्यावरून असोत वा शॉपिंग करण्यावरून...
माझ्यासाठी तू नेहमीच ओल्ड स्कुल होतास. नोकरीत बढती पाहिजे तर आजच्या काळात एकाच कंपनीत राहून काही नाही होत हे तुला एकाच कंपनीतून रिटायर होणाऱ्या तुला कस समजावणार ना... माझा मित्रपरिवार नेहमीच तुला खटकायचा. त्यांच्यासोबत फिरण्यावर तुझी कित्येक बंधन. तू कायम तुझ्या संसारापुरता मर्यादित राहिलास... तुला काय समजणार मित्र परिवार आणि आमची मस्ती. मला नवीन टेक्नॉलॉजी वापरायला आवडते म्हणून मी घेतो नवीन फोन. किती काही फीचर्स असतात त्याच्यात... पण तुला तर त्यातलं काही काळात नाही तर कस समजावणार...?
माझी कार घेताना पण किती काय काय बोललास मला. तू तर आयुष्यभर खटारा बाईकवर फिरलास आणि आम्हालाही त्याच्यावरच फिरवलंस. आता मी माझ्या पैशावर गाडी घेऊन जरा चांगली लाईफ जगावं म्हटलं तर तुझी फायनान्स, सेविंग सगळ्याची लेक्चर्स चालू झाली. माझ्या औटींगवर पण तुझी पाबंदी. साधं हॉटेलमध्ये जेवायला गेलं तरी समोरच्या डिशपेक्षा मेनूकार्डच्या रेटवर तुझं लक्ष. किती ते मिडलक्लास वागशील. थोडं नाही खूप सुधारायची गरज होती तुला.
पण... हा कोरोना आला आणि सगळीच मत बदलून गेली. लेऑफच्या लिस्टमध्ये नवीन एम्प्लॉईजची नाव आधी टाकली गेली. त्यात माझा नंबर पहिल्या ५० लोकांत होता. कन्फर्मेशन मिळालं तशी माझ्या पायाखालची जमीन सरकली. पाच महिन्याआधीच तर हि कंपनी जॉईन केलेली. तेव्हाही तू ओरडला होतास ' मागच्या कंपनीत निदान दोन वर्ष तरी स्टॅबिलिटी ठेव... इतकी कितीशी इन्क्रिमेंट मिळणार आहे नवीन ठिकाणी ' पण नाही ऐकलं तुझं. जुन्या कामाच्या प्रेशरला कंटाळून ती कंपनी सोडली. परंतु नवीन ठिकाणी डोक्याचा व्याप काही सुटला नाही त्यात अद्यावत ऑफिस पाहून पाघळलेल्या मला त्याच्या पोकळ पायाची कल्पना येईपर्यंत फार उशीर झाला होता...
वाटलं तू आता सुनावशील. पण नाही तू एखाद्या स्थितप्रज्ञासारखा शांत होतास. तुझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तेव्हाही वाटत होत कि तुझं बोलणं खरं झालेलं पाहून तुझा इगो सुखावला असेल आतून. पण तो हि माझा निव्वळ भ्रम होता. नोकरी गेल्याच कळताच जिवाभावाचे दोन चार जण सोडून बाकीच्यांच्या फोनकॉल्सचा ओघ आपोआप कमी झाला. त्यातही कोणाला नोकरीच विचारताच केवळ बघतो सांगतो म्हणून मला टाळणारेच जास्त. ज्या टीमसोबत रात्र रात्र पार्ट्या केल्या त्यांनी स्वतःची जागा सुरक्षित ठेवून आम्हा नवख्या लोकांना पद्धतशीरपणे कटवल.
मैत्रीचा जो अर्थ तू इतकी वर्ष जीवाचा आटापिटा करून समजावत होता तो अगदी काही महिन्यांत उदाहरणांसह समजला. जेव्हा सगळं कळून चुकलं तेव्हा स्वतःचीच लाज वाटत होती. ज्या पद्धतीच माझं तुझ्याशी वागणं होत त्याचा मलाच पश्चात्ताप होत होता. वाटलं तुला खूप दुखावलंय मी... त्यापेक्षा सगळं सोडून कुठेतरी दूर निघून जावं... पण... माझ्या बँक बॅलन्सने मला माझी लायकी दाखवली. पाच वर्षांच्या सर्व्हिसमध्ये बँकमध्ये केवळ चार अंकी रक्कम मला माझ्या खर्चाचा विचार करायला लावत होती. तू दार वेळी सेविंगच बोलायचा आणि मी तुला कंजूस म्हणून उडवून लावायचो पण आज त्या कंजूसपणामागे दडलेला फायनान्स प्लॅनर दिसला. इतकी वर्ष माझ्या कमवतेपणाचा असलेला गर्व क्षणार्धात गळून पडला.
आणि कार ती तशीच पार्किंगमध्ये उभी आहे आणि आता जेव्हा दिसते तेव्हा तिच्या महिन्याच्या ई एम आयची आठवण करून देते. ' रोज ट्रेनने जायला पर्याय नाही तर कशाला एवढी महागडी कार हवी..' हे तुझं वाक्य त्यावेळी माझ्या इगोला बाणासारखं टोचलं होत. आणि त्यामुळे ठरलेल्या मॉडेलपेक्षा महागडं मॉडेल तुझ्या नाकावर टिच्चून घेतलं होत. तुझ्या चेहऱ्यावरच्या नाराजीमागे माझ्या हातात येणाऱ्या पगाराची तुला असलेली काळजी मला दिसलीच नाही.
तुझं एकाच नोकरीवर टिकून राहणं ही तुझी गरज होती कारण तुझं पूर्ण कुटुंब तुझ्यावर अवलंबून होत. मित्रांत रमण्यापेक्षा जमलंतर ओव्हरटाइम करून निदान दोन दिवसाच्या भाजीचे पैसे कसे सुटतील ह्याच घड्याळ सतत तुझ्या डोक्यात फिरत असायचं. मला नेहमीच इरिटेटिंग वाटणारे आणि वर्षातून चार पाच वेळा भेटणारे काका मामा जेव्हा आता स्वतःहून तुला मदतीसाठी विचारतात तेव्हा माझ्या मित्रत्वाच्या कल्पना मला पोकळ वाटू लागल्या. कधी स्वतःचे आईबाबा तर कधी आईचे व आमचे लाड पुरवता पुरवता तू स्वतःच्या आवडीनिवडी कधी विसरलास तुझं तुलाही कळलं नाही. आणि मी मात्र माझे हट्ट पूर्ण होत नाहीत म्हणून इतकी वर्ष तुझ्यावर राग होता. तुझं बाईक घेणं हे कधीच छानछोकीसाठी नव्हतं तर दोन बस बदलून घरी येईपर्यंत उशीर होई म्हणून त्यावरच सोल्युशन होत. एवढ्या तेवढ्या अंतरासाठी उगाच ढीगभर ट्राफिकमध्ये उभं राहून जास्त पेट्रोल का जाळा ते तुझं तत्वज्ञान.
माणसाच्या गरज मर्यादित असाव्या म्हणजे कोणत्याही परिस्थितीत तो तग धरू शकतो हे तू केवळ सांगत नाही बसलास पण स्वतःच्या जीवनात तू रुजवलास पण. सगळ्या जबाबदाऱ्यांचं ओझं आपल्या खांद्यावर यशस्वीपणे पेलत मोडेन पण वाकणार नाही हा तुझा बाणा माझ्यासारख्या बेजबाबदार उडाणटप्पूच्या लक्षात कधी आलाच नाही. तुझ्या कंजूसपणाने तू माझ्या भविष्याची मात्र भरभक्कम तजवीज करून ठेवलीस तरीही माझ्यासाठी तू नेहमीच भणंग राहिलास. माफी मागायचीय तुझी पण कशी ते कळत नाहीये. इतकी वर्ष आपल्यात असणारी जनरेशन गॅप हा माझा दुनियेच्या अनुभवाचा तुटवडा होता हे आज कळतंय मला. तुझी रटाळ लेक्चर्स हे तुझ्या अनुभवाचे बोल होते हे आज समजलंय. आणि काल जे पैसे ट्रान्स्फर केलेस ना ते नकोत आता थोडे तुझे अनुभव मात्र नक्की शेअर कर. आणि हो अगदी मनापासून हॅपी फादर्स दे...!
तुझाच नालायक मुलगा