tarevrchi ksrt - 3 in Marathi Short Stories by Swapnil Tikhe books and stories PDF | तारेवरची कसरत - ३

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

Categories
Share

तारेवरची कसरत - ३

तारेवरची कसरत – ३

(वैधानिक इशारा: सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, कथेतील पात्रे पूर्णपणे काल्पनिक आहेत. कथा व कथेतील पात्रांचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी अथवा समूहाशी काहीही संबंध नाही. असा संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा)

(अधिक रंजकते साठी कथा क्रमशः वाचावी.)

हा प्रश्न माझा मला सोडवावा लागेल असा उपदेश ओळखीतल्या सर्व जेष्ठ पुरुषांनी दिला होता. एकूणच मी सर्वांचे सल्ले ऐकून भलताच निराश झालो होतो माझ्या प्रश्नाचे उत्तर मला कोणीच देऊ शकत नाही हे पचवणं मला खूपच जड गेलं.



अशाच वेळी हताश होऊन फिरत असताना मला तेव्हा डोंबाऱ्याचा तारेवरील कसरतिचा खेळ दिसला होता. ‘तारेवरची कसरत’ दिसायला कितीही अवघड असली तरी त्याच्या आयुष्याचा ती एक भागच बनली होती. आपलं आणि आपल्या कुटुंबाच पोट भरण्यासाठी त्याला ती अवघड कसरत करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.



माझीही घरातील परिस्थिती अशीच काहीतरी झाली होती. त्यादिवशी तो खेळ बघून मी भलताच प्रेरित झालो होतो. आपणही अत्यंत सावधपणे अशीच कसरत करायची असे मी ठरवलं होतं. त्यादिवशी घरी पोहोचल्या पासुनच मी माझ्या नवीन योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात केली.

आता मात्र, 'आई का रोहिणी?', असा गहन प्रश्न बहुतेक वेळा माझ्यापुढे उभाच राहू नये असा माझा प्रयत्न असे. पुढच्या वेळी जेव्हा दोघींच्या आवडीचे वेगवेगळे सिनेमे एकाचवेळी टीव्हीवर प्रसारित झाले, तेव्हा मला दोन्ही सिनेमे एकत्र बघायची गरज भासली नाही कारण त्यावेळी बाबांनी हट्ट करून रामायण लावले. ज्या दिवशी माझ्या आवडीचे दोन पदार्थ घरी तयार झाले त्यादिवशी बाबांनी मला पूर्वकल्पना दिल्यामुळे मी माझ्या मित्रांबरोबर आग्रहाने बाहेरच जेवून आलो. म्हणजे बहुतेक वेळेला मला खूष करण्याची, आपल्या बाजूला खेचण्याची स्पर्धा सुरु होण्याआधीच मी बाबा किंवा माझ्या इतर मित्रांच्या मदतीने रद्द करून टाकू लागलो. अर्थातच माझ्या अशा वागण्यामुळे कधी कधी दोघीही नाराज होत असत, पण अशा वेळी मी माझ्या आवडीने आणि माझ्या सवडीने दोघींना परत एकदा खुश करायची योजना आधीच केलेली असे. दोघींचीही नाराजी फार काळ टिकणार नाही याची काळजी मी घेऊ लागलो होतो. कालांतराने ही कसरत मला सवयीची होऊ लागली आणि माझी संसाराची गाडी खड्डे चुकवत धावू लागली.



'तारेवरची कसरत' हा तसा साहसी खेळ आहे. यामध्ये अपघात होतच असतात. माझ्या बाबतीतही तेच घडत होतं. मी ही मधूनच तोंडावर पडायचा, अशा वेळी खूप लागायचं, पण माझ्याकडे पर्याय नव्हता. आपलेच दात आणि आपलेच ओठ ही परिस्थिती जाणून घेऊन मी पुढच्या कसरतीसाठी पुन्हा उभा राहायचो. अशा कठीण प्रसंगी मला माझ्या मित्रांनी नेहमीच मोलाची साथ दिली होती. मित्रांना साद दिली आणि मित्र उपस्थित नव्हते अशी परिस्थिती माझ्या बाबतीत कधीच घडली नाही. आजही असेच काही घडले समोर सुरू होणारी तारेवरची कसरत डोळे विस्फारुन बघताना माझ्या खांद्यावर अमोलचा हात अलगद पणे पडला आणि मी भूतकाळातून बाहेर आलो.

समोर खेळ सुरू झाला होता. या वेळी मी तो खेळ बघण्यात भलताच हरवून गेलो. त्याच वेळी, मला मी स्वतः तारेवरती चालत असल्याचा भास झाला. माझ्या हातात एक लांबलचक काठी होती. काठीच्या टोकावर आई बसली होती तर दुसर्‍या टोकावर रोहिणी बसली होती. मी सावरत होतो, त्या दोघी पडणार नाहीत याची काळजी घेत होतो. त्या दोघी काठीच्या टोकावर अगदी आरामात बसल्याचे मला भासत होतं. मी मात्र माझा तोल सांभाळून त्या अरूंद आणि उंचावर बांधलेल्या तारेवरून घाबरत घाबरत पुढे चालत होतो. बाबा खाली उभे राहून ढोलकी वाजवत होते तर माझे सगळे नातेवाईक माझे सगळे मित्र दूर उभे राहून टाळ्या वाजवत होते. नेमके अशावेळी अघटित घडले आणि माझा तोल जाऊन आमची पुर्ण तारेवरची कसरत कोसळली.



लोकांच्या टाळ्यांच्या आवाजाने मी पुन्हा एकदा भानावर आलो. काय भयंकर भास होता तो. त्या भासातून बाहेर पडताना माझा चेहरा माझा चेहरा घामाने पूर्ण डबडबला होता.

तारेवरची कसरत कितीही सवयीची झाली तरी पडायची भीती ही दरवेळी तितकीच भयावह असते, कदाचित या भीतीनेच ती कसरत दरवेळी सुरक्षित पार पडते. आज आई आणि रोहिणीच्या आवाज पुन्हा ऐकले आणि पुन्हा एकदा तारेवरची कसरत करावी लागणार हे माझ्या मनाने ओळखलं असावं आणि म्हणूनच कदाचित पुन्हा एकदा मला या भीतीची जाणीव करून दिली असावी.



ढोलकी वाजायची बंद झाली, खेळ संपला आणि मी विचारचक्रातून बाहेर आलो. अमोल शेजारीच उभा होता. माझ्या चेहऱ्यावर जमलेला घाम बघून तो ही चिंतीत झाला त्याने माझी विचारपूस केली. माझी उत्तरं ऐकून मी काहीतरी लपवतो आहे असा संशय त्याला आला. त्यामुळं तो ही अडूनच बसला, नक्की काय झालं आहे हे त्याला जाणून घ्यायचं होतं.

'मला रोहिणी आणि आई यांचे आवाज ऐकू येत आहेत.' हे मी त्याला कसं सांगावं याचा विचार करत होतो. त्याला हे सांगितलं तर, मला वेड लागलं आहे असा निष्कर्ष तर तो काढणार नाहीना, अशी भीती मला वाटत होती. शेवटी मी धीर एकवटून त्याला गर्दीपासून दूर घेऊन गेलो आणि घरी घडलेल्या घडामोडी ऐकवल्या. त्याचा सुरुवातीला विश्वास बसत नव्हता, पण जसं पुढं के घडत गेलं हे त्यानं ऐकलं तेव्हा त्यालाही माझ्यावर विश्वास ठेवावा लागला.



"ही भुताटकी तर नाही न?" - मी त्याला घाबरत विचारले.

"असू शकते, पण मला वाटतं तुला घाबरायचं काही कारण नाही. त्या दोघी काही तुझ्यावर रागावलेल्या वाटत नाही... आणि तुला आवाज ऐकू येत असेल तर तू त्यांनाच विचारून बघ न नक्की काय घडतं आहे ते? आणि जर तुला पाहिजे असेल म्हणजे तुझ्या मनात शंका असेल तर पुढं जाऊन आपण पुढचा मार्ग चाचपडून बघू." - अमोल

"म्हणजे? कुठला मार्ग?"

"तुला हे भास तर होत नाहीत ना? तुझी मानसिक स्थिती तर ठीक आहे ना? हे आपण व्यवस्थित तपासून घेऊ." - अमोल.



मला त्याचं म्हणणं पटलं होतं. पुढं जायचा हा योग्य मार्ग आहे असं माझं मन मला समजावत होतं. आणि म्हणूनच मी अमोलचा निरोप घेतला आणि घरी गेल्यावर, आई आणि रोहिणी यांच्याशी काय बोलायचं याची उजळणी मनात करू लागलो. समाधानकारक तयारी झाल्याशिवाय घरी परत जायचं नाही असं मी आता ठरवलं होतं.

साधारण अर्धा तास विविध प्रश्नांची उजळणी केल्यावर मी घरी परत निघालो. बिचकत बिचकत कुलूप उघडलं. बाहेरच्या खोलीत येऊन बसलो, नेहमी प्रमाणे रोहिणी पाणी घेऊन आली नाही आणि तिची दाट आठवण मनात जागृत झाली आणि मा‍झ्या डोळ्यात पाणी आलं.

“रडू नकोस बाळ...” – आई समजूत घालत म्हणाली.

“तुम्ही रडलात तर मला पण रडू येईल....” रोहिणी रडवेल्या आवाजात म्हणाली. त्या दोघींचे आवाज ऐकून मनाला किती समाधान वाटलं हे मला शब्दात वर्णन करता येणार नाही.

“बबड्या, आम्हाला माहिती आहे. आम्ही दोघींनी तुला थोडा त्रास दिला.” – आई

“थोडा???” – मी अस्पष्टपणे म्हणालो.

“हो ‘थोडाच त्रास’ दिला आहे आम्ही...” – रोहिणी डाफरली.

“बरं, आम्ही दोघींनी तुला थोडा जास्तच त्रास दिला. वेळोवेळी आमच्या प्रेमाची परीक्षा पाहण्यासाठी तुला कोड्यात टाकलं. तुझ्यावर रूसलो.. तुझ्याशी भांडलो... हे सगळं खरं असलं तरी हे सगळं तुझ्यावर असलेल्या गाढ प्रेमामुळेच घडलं हे तुला मान्य करावं लागेल. कदाचित त्या प्रेमामुळेच आम्ही तुझ्यात अजूनही अडकलो आहोत आणि आम्हाला मुक्ती मिळालेली नाही.” – आई

“आणि म्हणूनच आम्हाला तुमच्याशी स्पष्ट बोलायचं आहे. आधी तुम्ही आईंशी बोलून घ्या.. मी तुमची बेडरूममध्ये वाट बघेल....” - रोहिणी अत्यंत समजूतदारपणे म्हणाली आणि आत निघून गेली.

होय!!! आता मला त्या दोघींच्या आवाजाबरोबरच त्यांच्या अस्पष्ट आकृतीही दिसू लागल्या होत्या.

रोहिणी आत गेल्यावर मात्र आईने आधी प्रेमाने मला जवळ घेतले, तिचा स्पर्श मला अस्पष्टपणे जाणवत असला तरी त्यात नेहमीचे समाधान मिळालेच नाही. काही क्षणातच दोघांना आमच्या आणि परिस्थितीच्या मर्यादा समजल्या. स्वत:ची हतबलता जाणवल्याने आईला अश्रू आवरले नाहीत. ती मोकळे पणाने रडू लागली. थोड्याच वेळात स्वत:ला सावरून ती बोलू लागली.

“बबड्या .......

तू मला पडलेलं एक गोड स्वप्न होतास. तू माझं आयुष्यच बदलून टाकलंस. तुझ्यामुळे मी या जगातील वेदना विसरू लागले. तुला सांभाळणं, खाऊ पिऊ घालणं हे माझे छंद झाले होते. तू माझ्याकडे हट्ट करावे आणि मी ते पुरवावे, इतकं माझं आयुष्य सोपं झालं होतं. तुला मोठं करताना, तुझे हट्ट पुरवताना माझं आयुष्य कसं सरून गेलं समजलंच नाही बघ.

तू पण काही कमी नव्हतास. एक आज्ञाधारक, समंजस आणि प्रेमळ मुलगा कोणत्या आईचा लाडका नसेल? माझा एकही शब्द तू कधी खाली पडून दिला नाहीस, आईची कोणतीच आज्ञा कधीच डावलली नाहीस. माझ्या मातृत्वाला तू आदर्श श्रावणबाळ बनून प्रतिसाद दिलास. अशा परिस्थितीमुळे, आपल्या दोघांचं एक वेगळं विश्व निदान माझ्या तरी मनात निर्माण झालं होतं. यात कधीकाळी तिसरं कोणी येईल याची कल्पना मला नेहमीच होती. किंबहुना तुला या जगातील सगळी सुखं मिळावी असाच माझा हट्ट होता. म्हणूनच तुझी बायको म्हणून मी रोहिणीची निवड केली होती.



नंतर मात्र तू जसा तिच्यात गुंतत गेलास तशी माझ्या मनातील असुरक्षितता वाढू लागली, ‘माझं हे गोड स्वप्न, माझ्यापासून हिरावलं तर जाणार नाही ना?’, ही भीती मनात घर करू लागली आणि या भीतीतूनच मी तुला आणि रोहिणीला पेचात टाकणारे हट्ट करू लागले. माझं स्वप्न अजूनही माझंच आहे याची वेळोवेळी खात्री करून घ्यायची मला सवयच लागली.

अर्थात कुठेतरी आपलं चुकतं आहे हे मला समजत होतं, पण त्याचवेळी मनातील भीती मात्र वेळोवेळी मला माझ्या वागण्यात बदल करण्यापासून परावृत्त करत होती.



ताई लग्न करून गेली, तेव्हा काही दिवस घर रिकामं वाटलं पण मग नंतर सवय झाली तिच्या नसण्याची. तुझ्याबाबतीतही असंच होईल असं मला वाटलं होतं. पण तू सतत माझ्या डोळ्यासमोर असायचा, तुझं मला सोडून बायकोला झुकतं माप देणं मला नेहमीच असुरक्षित करायचं. त्यामुळे मनाला होणारी जखम कधीच भरली नाही आणि दिवसेंदिवस तुझ्याविषयीची काळजी वाढतच गेली बघ.



त्या दिवशी जेव्हा यमदूत मला घेऊन जायला आले तेव्हा समजलं की मी तुझ्यात किती अडकली आहे ते.

तुझा संसार माझ्याशिवाय व्यवस्थित चालतो आहे ना?

माझ्यानंतर तुझे हाल तर होणार नाहीत ना? या भीतीने मी इथेच अडकून राहिले बघ." - आई मन मोकळं करत होती, तिचा आवाज भरून आला होता.



"आई, तुझा लाडका मुलगा लहानपणी होता तसाच अजूनही आहे. तू मुळीच काळजी करू नकोस." - मी तिला धीर देत म्हणालो.



"माहिती आहे रे बबड्या.... तू खूप गुणी आहेस... म्हणूनच तुझा आणि रोहिणीचा संसार रंगलेला पाहून मी पुढच्या प्रवासाला निघणारच होते पण तेव्हाच रोहिणीचा अपघात झाला आणि आता तर ती पण माझ्या जोडीला येऊन बसली." - आई रडवेल्या आवाजात म्हणाली.



आता मात्र मलाही भरून येऊ लागलं होतं.



"बबड्या, आता तुझं पुढं कसं होणार ही चिंता मला परत सतावत आहे आणि ती फक्त तूच दूर करू शकतोस.

ती चिंता दूर झाल्याशिवाय मला मुक्ती मिळणार नाही." - आई रडत रडत म्हणाली.



"आई, तू रडू नकोस. माझी काळजी तर मुळीच करु नकोस." - मी



"असं कसं बोलतो रे तू बबड्या? तुझ्यासाठी जीव अडकला आहे माझा...

माझं एक ऐकशील का?

ते ऐकलस तर माझा पुढचा प्रवास सुखाचा होईल बघ..." - आई पूर्ण भावनिक होऊन म्हणाली.

आता तर मी पण भावुक झालो होतो, आई जेव्हा भावनिक साद देते तेव्हा तिला प्रतिसाद देणं मुलाचं कर्तव्यच नाही का? या कर्तव्य भावनेने मी उत्तरीत झालो. आता आईला मुक्त करणं एवढंच ध्येय माझ्या मनाला दिसू लागलं होतं.

"आई.... आज पर्यंत तुझं ऐकलं नाही असं कधी झालंय का? काय करायचं आहे ते सांग? मी नक्की करेल..." - मी आश्वासन देत म्हणालो.

"खरंच??" - आई आनंदाने म्हणाली आणि तेव्हाच एक वाऱ्याची झुळूक खोलीत आली. समोरच्या टेबलवर असलेला माझा लहानपणच्या वाढदिवसाचा फोटो खाली पडला. मी तो उचलला आणि आई बोलू लागली...

"बबड्या, या फोटोत तुझे लहानपण साठवलं आहे. ती कोपऱ्यात उभी आहे ती बघ... ती माझ्या मैत्रिणीची म्हणजेच नलिनीची मुलगी आहे.

तू तर नलू मावशीला ओळखतोसच ना... तिचीच मुलगी आहे ती.

तसंही, तुझं वय अजूनही फार नाही आणि तिच्याही आयुष्यात तुझ्यासारखच दुःख वाढलेलं आहे. मला वाटतं तुम्ही दोघांनी लग्न करावं आणि आयुष्यभर संसार सुखाचा भोग घ्यावा." - आई उत्साहात बोलत होती.

आईला काय प्रत्युत्तर द्यावं हे मला समजत नव्हतं. मुळातच आई अशी काही मागणी करेल हे मला पूर्ण अनपेक्षित होतं. त्यामुळे मी स्तब्ध होऊन तिथं उभा होतो.



"बाबारे, एवढी चिंता करू नकोस... माझ्या म्हातारीच काय घेऊन बसलास?

शेवटी तुला पटलं तर कर.....

मी काही तुला जबरदस्ती करणार नाही.....

माझ्या नशिबाचे भोग समजून अजून काही वर्षे अशीच भटकत राहील..." - आई सावधपणे म्हणाली.

कदाचित मी लागलीच 'हो' म्हणेल असं तिला अपेक्षित असावं.

"आई, असं काय बोलतेस? मला असं लगेच ठरवता येणार नाही-"

"रोहिणीला विचारावं लागेल का? बोलावं तिला इकडे आणि काय तो निर्णय घेऊन टाक..." - आई माझं वाक्य पूर्ण करत म्हणाली. यावर मौन पाळणे हेच योग्य उत्तर असल्याचे मी अनुभवातून शिकलो होतो. मी शांतपणे बेडवर बसलो. काही क्षण असेच गेले. आईपण शांत होऊन माझ्या शेजारी येऊन बसली.

"मला विचार करायला वेळ लागेल. आपण थोडं नंतर बोलू या विषयावर." - मी आईला उत्तर दिलं.

"ठीक आहे. बघ तुला कसं जमतंय ते..." - आई खोचकपणे म्हणाली आणि आईचा निरोप घेऊन मी खोलीतून बाहेर पडलो.

"निघाला टोणगा म्हशीकडे..." - असा अस्पष्ट आवाज खोलीचं दार लावताना माझ्या कानावर पडला, सवयी प्रमाणे मी त्याकडे दुर्लक्ष केलं.

- क्रमशः