१. मित्राचा प्रस्ताव (फ्रेंड्स प्रपोसल)...
"प्लिज डोन्ट किल हर... प्लिज..."
"नो..."
गडद अंधारात आवाज घुमत होते... आधी पुरुषाचा व नंतर स्त्रीचा... त्यांच्या विनंतीचा उपहास करणारं न जाणो किती जणांचं विकट हास्य रात्रीच्या शांततेला फाडून आसमंत दुमदुमून टाकत होतं...
आणि अचानक एका गन शॉटने एक कलेवर जमिनीवर पसरलं गेलं. आणि नंतर शॉटगनच्या रिकॉईल पॅडच्या फटक्याने आणखी एक शरीर जमिनीवर आदळलं... धाड्....
"नाही!..."
शक्ती ओरडत उठला! सत्य परिस्थिती अवगत व्हायला त्याला थोडा वेळ गेला...
हे... हे... स्वप्न होतं का...? नाही! ही एक आठवण होती! ट्विस्टेड् असली तरी आठवणच! जी रोज शक्तीला सतावत होती... याचमुळे त्याने ठरवून टाकलं होतं... की काही झालं तरी रात्री झोपायचं नाही... किंबहुना मुळी झोपायचंच नाही...
पण शरीरधर्मावर विजय मिळवणं कोणाला जमलंय थोडीच... मग त्याला शक्ती तरी कसा अपवाद ठरणार? रोज रात्री झोपळू तारवटतलेले डोळे महत्प्रयासाने उघडे ठेवणे हा त्याचा यत्न असायचा... नाही तो योगी नाही... पण काही घटना होती, जी त्याला डोळ्यांसमोर येऊ द्यायची नव्हती. पण त्याच्या इच्छेला त्याची वासना भीक घालत नव्हती...
हो वासनाच ती... झोप ही शरीराची वासनाच नाही का...?! प्रयत्न करूनही त्याला या वासनेवर विजय मिळवता येत नव्हता. आणि म्हणूनच कधीतरी त्याची इच्छा नसताना रात्री झोपेच्या त्याच्यासाठी काळकूस असणाऱ्या कुशीत तो गुरफटला जायचा... आणि मग तीच एक आठवण जी त्याला विसरायची होती; ती त्याच्या नजरेसमोर रोज रात्री उभी राहायची... जिवंत व्हायची...!
घामाने थबथबलेल्या त्याचा जोराने श्वासोच्छ्वास चालू होता... घर्माने त्याचे केस तर असे निथळले होते, की जणू त्याने डोक्यावरून अंघोळ केली होती... पण स्वतःच्या अस्वस्थ अवस्थेवर विजय मिळवत तो अंथरुणातून उठला. नित्यकर्म आटोपून त्याने आपला व्यायाम चालू केला... शरीराला बळकट ठेऊन मनाला सबळ करण्याचा त्याचा प्रयत्न होता हा... पण तरी तो त्याच्या आठवणीतून बाहेर काही पडत नव्हता.
दिवस जायचा कसातरी... पण रात्र काळसर्पिनी ठरायची... जी त्याला ग्रासून टाकायची...
वर्कआऊट झाल्यावर तो घरातून बाहेर पडला. घराजवळील महावीर उद्यानमध्ये तो आला...
वर्कआऊट नंतर पार्क जवळच्या कॅफेमध्ये ब्रेकफास्ट करणं हा त्याचा नित्याचा क्रम. पण व्यायामानंतर लगेच काही खाऊ नये म्हणून तो या पार्कमध्ये अर्धा तास बसून काढायचा.
लहान मूलं खेळत असायची. त्यांना पाहणं हे त्याच्यासाठी पर्वणीचं असायचं... एक प्रकारचं स्ट्रेसबस्टर! काही वेळातच शाळेची वेळ होईल म्हणून या मुलांच्या आया त्यांना घेऊन गेल्या की मग शक्ती पण उठायचा आणि कॅफे गाठायचा.
"रोजची ऑर्डर!" 'युथ'स् चॉईस' या कॅफेच्या आत शिरता शिरता दाराजवळच्या काउंटरवर बसलेल्या मालकाला शक्ती म्हणाला.
आणि त्याने त्याचं रोजचं टेबल गाठलं. कोणाशीच संपर्क नको असल्याने शक्ती कॅफेच्या अगदीच मागे कोपऱ्यात असलेल्या टेबलपाशी प्रवेशाकडे पाठ करून बसला. रोजसारखंच!
कॅफेच्या वेटरने शक्तीच्या समोर त्याची रोजची ऑर्डर आणून ठेवली. 'वेगन टाकोज् विथ कॅलिफोर्निया वॉलनट्स' आणि 'बनाना अँड वीटग्रास स्मूदी' आयडियल डायट आफ्टर वर्कआऊट...
युज्वली या कॅफेत असलं काही डायट फूड मिळत नाही. पण शक्ती रोजचा ग्राहक असल्याने आणि ओळखीचा असल्याने या कॅफेत त्याच्यासाठी हा खास डायट तयार केला जात असायचा.
जसं पुढं खाणं आलं तसं सगळं दुःख विसरून तो त्याच्यावर ताव मारू लागला. खाणं हा त्याचा विलास नव्हता. जिवंत राहण्यासाठी खाणं गरजेचं आहे म्हणून तो खात होता...
पुढंलं अन्न संपवण्यात तो तल्लीन असतानाच त्याच्या खांद्यावर एक तगडा हात येऊन आदळला!
"यु आर अंडर अरेस्ट शक्तीसेन!" हात टाकणारा माणूस म्हणाला.
त्याचा आवाज इतका मोठा लागला होता, की तो कॅफेभर घुमला आणि कॅफेतल्या सगळ्यांना तो ऐकू आला. सगळेच आश्चर्याने आवाजाच्या आणि पर्यायाने शक्तीच्या दिशेने पाहू लागले. शक्ती सारख्या आश्राप व्यक्तीला अटक? पण का? त्याचा गुन्हा काय होता? सगळेच भवचक्क होते!!!
शक्तीने मागे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरची शांतता ढळली नव्हती.
"माझा गुन्हा काय आयबी डिरेक्टर शौर्यजीत?" त्याने तोंडातला घास चघळत विचारलं.
तसा तो माणूस शक्तीसमोर भिंतीला टेकून बसला.
"इतक्या वर्षात आमच्याशी संपर्क न ठेवणे. यासाठी तर तुम्ही मृत्यूस पात्र आहात. पण सध्या अटकेवर निभावतंय याचं नशीब माना!"
"माझा नशिबावर विश्वास नाही!" शक्ती त्याच कोरड्या नजरेने म्हणाला.
"कर्मावर तर आहे?!" ऑफिसर म्हणाला.
"काय हवंय!" शक्तीने विचारलं.
"तू!"
"मला कसं शोधलंस?"
"तुझं घर माहीत आहेच. सकाळ पासून तुला फॉलो करतोय. म्हटलं तुझं रुटीन पहावं!"
"आणि मला कॅफेमध्ये बघून तुला भूक आवरली नाही!" शक्तीने खिल्ली उडवली.
"खाऊन घे!" शौर्यजीत हसून इतकंच म्हणाला.
आणि तो विरंगुळ्यासाठी इतस्ततः पाहू लागला... आणि त्याला आपली चूक लक्षात आली.
"हे सगळे असे का बघत आहेत?" तो शक्तीला म्हणाला.
"मला अटक करणार म्हणतोयस तू... म्हणून बघत असतील..." शक्ती घास चावत स्मूदीचा सीप घेत म्हणाला.
तसा शौर्यजीत खलीज स्मित चेहऱ्यावर घेत उठला.
"सॉरी फ्रेंड्स! हा माझा मित्र आहे. चेष्टेत म्हणालो. तुम्हाला डिस्टर्ब करण्याचा हेतू नव्हता..." तो म्हणाला व उंचावलेले हात खाली घेत तो संथपणे खाली बसला.
सगळे पुन्हा आपापल्या चर्चेत मग्न झाले. शौर्यजीत टेबलवर लिन झाला व खुसपुसल्यासारखा शक्तीला म्हणाला,
"मला माहित नव्हतं तू तुझ्या एरियात इतका पॉप्युलर आहेस..."
"कसला पॉप्युलर? माझ्या जागी कोणीही असतं तरी सगळ्यांची हीच अवस्था झाली असती. जस्ट थिंक ऑफ इट, तू ज्या कॅफेत बसला आहेस तिथे एक क्रिमिनल बसलाय. आणि एक ऑफिसर त्याला पकडण्यासाठी तिथे आला आहे. काय अवस्था होईल तुझी?"
"मी सामान्य असतो, तर नक्कीच दचकलो असतो!"
"तेच इथं झालंय! असो बोल कशी आठवण झाली?"
"तुला होत नाही म्हणून!"
"आता सांगणार आहेस का?"
"आवर. बाहेर बोलू."
"तू काही घेणार?"
"नको!"
"ठीक!" शक्ती पुन्हा डायट फूड संपवण्यात मग्न झाला...
चाळीस-पंचेचाळीस मिनिटांनी दोघे शक्तीच्या घराकडे चालले होते... शक्ती जर्कीनच्या खिशांत हात कोंबून चालत होता...
"आता बोल. इंटेलिजन्स ब्युरोला माझ्याकडून काय हवंय!" शक्तीनं शौर्यला येण्याचं प्रयोजन विचारलं.
"स्वतःला चांगलंच फिट ठेवलंयस!" शौर्यने मात्र थेट मुद्द्याला हात घालणं टाळलं.
कारण तसं केलं तर शक्ती देखील थेट मुद्याला हात घालून नाही म्हणायची त्याला खात्री होती...
"हं! तू इतक्या लांब मला हे सांगायला आला आहेस, की मी स्वतःला वेल मेंटेन ठेवलंय!"
"हा! हा! नाही! एक असाईंमेन्ट आहे!"
"नाही!" शौर्यजीतची शंका रास्त ठरली. काम ऐकून घेण्याआधीच शक्तीने नकार दिला होता.
"ऐकून तर घे!" शौर्यने विनंती केली.
"गाडी आणलीच असशील?" त्याला टाळत शक्ती म्हणाला. 'तू निघ' हा त्याचा अंतर्भाव होता.
शक्ती पुढे चालत गेला... शौर्यजीत घाईने त्याच्या समोर जाऊन उभारला.
"लिसन. ऍट लिस्ट वन्स! जास्त काही करावं लागणार नाही."
शक्ती पुन्हा नकार देईल म्हणून शौर्य थोडा थांबला, पण शक्ती काही बोलला नाही. चाचपणी करून शौर्यजीतच पुढे म्हणाला,
"इंद्रदत्त वाचस्पती मेलेत हे तर तू जाणून असशील..."
"गाडी घे!" ऑफिसरला पुढं काही बोलू न देता शक्ती रुक्षपणे म्हणाला.
शक्ती किचन मध्ये गेला आणि फ्रीज मधून ऑरेंज ज्यूस घेऊन बाहेर आला. डायनिंग टेबल जवळ बसलेल्या शौर्यजीत समोर त्याने ग्लास ठेवला आणि तो काठाला थोडा कमी भरला. आपल्यालाही त्याने ज्यूस ओतून घेतला.
"मला माहित आहे, तू का नाही म्हणतोय! पण हा टास्क रोजच्या सारखा नाही... तुझी गरज पडेल असं वाटलं म्हणून आलो..."
"मुद्याचं बोल!" शक्तीने हस्तक्षेप केला.
"तेच सांगतोय. वाचस्पती इथे असताना त्यांचा खून झाला. सुट्टीसाठी काही काळ ते त्यांच्या मूळ गावी म्हणजे इथं कोल्हापूरला असताना!"
"त्यांच्या खुन्याला पकडलं पण गेलंय. पुढं!" शक्ती त्याला ऐकून घेतोय असं दाखवून होता होईल तेवढं उडवून लावण्याचा प्रयत्न करत होता.
"त्याची टेस्टमनी करण्यासाठी एक समिती इथे येणार आहे. मीही त्याचा एक भाग आहे. चार महिन्यांत लोकसभा इलेक्शन्स् लागणार आहेत. वाचस्पती हे अपोजिशन पार्टीतील असल्याने शिवाय त्या पार्टीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याने रुलिंग पार्टीवर खूप प्रेशर आहे हे पण तुझ्या लक्षात आलंच असेल.
"या खुनामागील खरा सूत्रधार नाही शोधला, तर प्रस्थापित पार्टीला पुढच्या निवडणुकीत याचा खूप मोठा फटका बसेल. सस्पिशन सर्वांत आधी रुलिंग पार्टीवरच येतं! जनमानसात तर अशी थिअरी जन्म घेत आहे, की सत्ता पक्षानेच त्यांना आपल्या मार्गातून हटवले आहे. करप्शनमुळे त्यांचे नांव आधीच बदनाम आहे, त्यामुळे पुढची इलेक्शन्स सत्ता पक्षाच्या हातून जाण्याची चिन्हे स्पष्ट आहेत. आणि याचा फायदा वाचस्पती यांनाच होणार होता. म्हणून मग त्यांचा काटा काढण्यात आला असं समजलं जातंय!"
"मूर्खपणा आहे! या कॉन्स्पिरिसी थियरीला काहीच आधार नाही! सत्ता पक्ष यावेळी असं काही करून आपल्याच पायावर दगड का मारून घेईल... कोणाही मूर्खाला हे समजायला हवं, की आत्ता आपण किती स्वच्छ आहोत हे दाखवणेच सत्ता पक्षाला इष्ट आहे अशावेळी ते कोणावरही मारेकरी घालणार नाहीत. जनतेच्या सहानुभूतीची काठी ते स्वतःच विरोधी पक्षाला आधारासाठी का देतील? कारण साधी अफवाही त्यांना धूळ चारू शकते मग ते सत्यात असे काही आत्ता तरी नक्कीच करणार नाहीत!" ज्यूस ओठाला लावत शक्ती म्हणाला.
"बरोबर आहे तुझं! पण हाच विचार करून सत्ता पक्ष मारेकरी घालू शकतो हे देखील नाकारता येणार नाही. गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड् आहेत! आणि म्हणूनच सत्य शोधून काढायचं आहे! पंतप्रधान पुनीत चिंतपल्ली यांचे स्पष्ट निर्देश आहेत की मूळ सूत्रधार कोणत्याही परिस्थितीत सापडला पाहिजे आणि त्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल! कोणतेही रुल्स रेग्युलेशन्स नाहीत! इट इज युअर काईंड ऑफ जॉब! मला वाटलं तुला करायला आवडेल म्हणून तुझ्याकडे आलो!"
"आय एम सिक ऑफ इट! सॉरी आय कान्ट हेल्प यु!" शक्तीने प्रपोसल उडवून लावलं.
"गार्गीसाठी? अं?" शौर्यजीतने गंभीर होत विचारलं...
"आपलं कर्तव्य पार पाडत असताना मी तिला गमावलं आहे. हे मी कसा विसरू?" शक्ती आता जरा विचलित होऊन बोलला.
"पण आता गमवायला तुझ्याकडे आहेच काय?" शौर्यजीतनेही विचलित होत थोडा आवाज चढवत विचारलं.
"स्वतः!"
"तू तर स्वतःवर प्रेम करणारा नाहीस! मग?"
"माझी मुलगी. तिच्यासाठी जगायचंय! तिच्याचसाठी स्वतःवर प्रेम करायला लागलोय! म्हणून या सगळ्यापासून लांब रहायचंय!"
"ओके! एक डील करूया!"
"मित्च्! तुला मीच का हवा आहे?"
"कारण तू प्रो आहेस!"
शक्तीने झिटीने मान झटकली... आपल्याला यातून सुटका नाही हे त्याच्या लक्षात आलं...
"आणि तू या शहराला कोणाही पेक्षा खूप चांगल्याप्रकारे ओळखतोस!" शौर्यने पुढं आणखी एक कारण जोडलं.
"बरं बोल!" वैतागून शक्ती म्हणाला.
"वाचस्पती यांचा किलर कळंबाच्या सेंट्रल जेलमध्ये आहे. त्याची तिथं चौकशी होईल! त्यानंतर त्याला मुंबईला घेऊन जाण्यात येईल! तोपर्यंत तुला सोबत रहायचं आहे बस."
"मुंबईला नेऊनच चौकशी करा ना!"
"तिथं गेल्यावरही पुन्हा चौकशी होईलच! त्याच्या स्टेटमेंटमध्ये काही बदल होतोय का हे यातून कळेल. कळंबा जेल ते उजळाईवाडी बाय रोड. तेथून मुंबई विमानाने. असा रूट असणार आहे. दिल्लीत कोणाचा हस्तक्षेप नको म्हणून मुंबईत त्या कैद्याला ठेवण्यात येणार आहे."
शौर्यजीतने मग '500 एस अँड डब्लू मॅग्नम स्नब नोस' (स्मिथ अँड विल्सन कंपनी) रिव्हॉल्व्हर आणि 'केल-टेक पीएमआर 30' (केल-टेक कंपनी) ही पिस्टल आशा दोन गन्स निवडण्यासाठी शक्ती समोर ठेवल्या.
"व्हॉट से?" स्मित करत शौर्यजीतने विचारलं.
पण दोन्ही पैकी एक निवडेल तो शक्ती कसला! गन्सवर असलेलं शक्तीचं प्रेम लक्षात घेऊनच तर ही दोन मॉन्स्टर्स शौर्यजीत शक्तीसाठी घेऊन आला होता!
शक्तीने त्या दोन्ही उचलून बेडरूममध्ये नेल्या.
हे पाहून शौर्यजीतच्या चेहऱ्यावरचं स्मित विस्तारलं. यांना पाहून तरी तो नाही म्हणायचा नाही हा त्याचा तर्क सिद्ध झाला होता. हा जॉबशिवाय राहू शकत नाही हा शौर्यजीतचा अंदाज सुद्धा खरा ठरला होता...!
बाहेर येत असतानाच दरम्यान शौर्यजीतच्या प्रपोसलवर शक्तीने विचार करून निर्णय घेतला होता. आपला नाईलाज पाहून त्याने शौर्यजीतची विनंती मान्य केली...!
पण साधारण वाटणारं हे 'एस्कोर्ट मिशन' पुढं काय वळण घेणार होतं हे कोणालाच माहीत नव्हतं...!