अनिलच्या जीवात जीव आला, त्याने लगेच फोन काढून सविताला सगळं नॉर्मल आहे सांगत बाईक काढली आणि औषध घेऊन सरळ घरी गेला.
सविता बिचारी जागीच होती आणि अनिलची वाट बघत होती, दार वाजलं रात्रीचे दिड वाजले होते, तिला माहित होते अनिलच असणार तरी ती आतून बोलली,
“कोण हे?
“अग मीच आहे, एवढ्या रात्रीच कोण असणार हे?
सविताने दरवाजा उघडून पहिला प्रश्न विचारला
“काय बोलले डॉक्टर? ऍसिडिटी?
“हं”
अनिल कपडे काढता काढता तोंडातल्या तोंडात बोलला
“मी सांगत होते काही नसल तरी स्वतःची पण अन दुसऱ्यांची पण झोप खराब केली, झोपा आता शांत”
सविता बेडवर आडवी होत बोलली
अनिलने देखील गोळ्या खाल्ल्या आणि झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी उठल्यावर देखील अनिलच्या डोक्यातून रात्रीचा प्रसंग धुरकट झाला नव्हता,
त्याने रात्रीच ठरवलं होत की सकाळी अडवाणी डॉक्टरला जाऊन भेटायचं, त्याने पटापट अंघोळ वैगेरे आटपून नाश्ता केला आणि डॉक्टर कडे जायला बाहेर पडला, तेवढ्यात फोन वाजला शार्दूल होता.
“काय रे कुठं हेस?
“अरे काय त्या दिवशी झाली, घरी पण कट कट, अन त्रास पण झाला किती, रात्री बारा वाजता जाऊन इ सी जि काढली माहित हे का”
ऐकून शार्दूल जोरात हसत हसत बोलला
“अरे काय तू पण एवढा जीवाला घाबरतो, आम्ही पण पिलो होतो ना, आम्ही पण माणसं आहे ना, आम्ही काय अमृत पिऊन जन्माला आलोय काय, एवढा घाबरतो जस काय तुझ्या शरीराचं सोन होणार हे”
अनिल शार्दुलचं हे बोलणं ऐकून चिडला आणि बोलला
“ये तू ठेव फोन, नको मला शहाणपणा शिकवू”
“अरे अरे चिडू नको कुठे हेस, ये कटिंग मारू”
शार्दूल शांत पणे बोलला
अनिल शांत होत नंतर भेटतो आता जरा काम आहे बोलत अनिलने फोन कट केला आणि थेट अडवाणी डॉक्टर कडे गेला.
अडवाणी डॉक्टर त्या परिसरातले सगळ्यात जुने आणि अनुभवी एम बी बी एस डॉक्टर, अनिलला ते लहानपणापासून ओळखायचे, डॉक्टरांची बोलण्याची एक खास शैली, प्रत्येक शब्द बोलण्याआधी एक लांब श्वास घेऊन खुर्चीवर पाठ टेकवून अच्छा अजून काही असे बोलून पुढे खरे वाक्य सुरु व्हायचे.
त्या दिवशी अनिल सकाळी सकाळी लवकर क्लिनिक वर गेला आणि म्हणून तो पहिलाच पेशंट होता, डॉक्टर सुद्धा नुकतेच येऊन बसले होते, अनिलने दरवाज्यावर ठक ठक केलं आणि आतून आवाज आला
“हो या”
अनिल आत गेला, डॉक्टरच्या बाजूला ठेवलेल्या छोट्या स्टूल वर बसला, नेहमीची सवय आणि अनुभव होता त्याला.
“काय म्हणतो अनिल कसा आहेस आता काय नवीन झालं?
डॉक्टरांनी जरा मिश्किलीने विचारले
अनिलने डॉक्टरांना इ सी जि दाखवत काल रात्रीचा प्रसंग आणि दोन दिवसां पासून सुरु असलेले मनातले महायुध्द त्यांना सांगितले.
डॉक्टरनी एक मोठा श्वास घेतला आणि खुर्चीवर पाठ टेकवत बोलले.
“अच्छा अजून काही, तशी इ सी जि तर नॉर्मलच आहे आणि मला वाटत नाही तुला काही दुसरा तिसरा त्रास देखील असेल, एखाद्या वेळेस पिण्या खाण्या मुळे पित्त वैगेरे झालं असेल”
“पण डॉक्टर ह्या भीतीच काय”
अनिलने मधेच विचारलं.
डॉक्टरांनी पुन्हा एकदा मोठा श्वास घेतला, खुर्ची वर पुन्हा एकदा पाठ टेकवली आणि बोलले.
“अच्छा अजून काही, मला असं वाटतंय कि तू एकदा सायकॅट्रिस्ट म्हणजे मनोरोग तज्ज्ञांना भेटलं पाहिजेल”
डॉक्टर पुढे काही बोलणार तेवढ्यात अनिल बोलला
“आहो डॉक्टर मी काय येडा थोडी हे, द्या तुम्ही पित्ताच्या गोळ्या”
“अच्छा ठीक आहे जशी तुझी इच्छा, हे घे सकाळी आणि रात्री जेवणा आधी खा, शंभर झाले”
डॉक्टरनी देखील पुढे विषय न वाढवता सरळ औषध देऊन फी मागितली.