भाग तीन...
वसंता आता ठार आंधळा झाला होता.....
एका सख्ख्या जुळ्या भावाच्या अविवेकी वागण्यामुळे दुसऱ्या भावाचे जीवन बरबाद होऊ घातले होते!
आपल्यामुळे आपल्या भावाच्या- वसंताच्या डोळ्याची झालेली ती अवस्था बघून बिनधास्त असलेल्या गुणवंताला आता थोडफार भान आल होते.आपल्या आक्रस्ताळी वागण्याने आपल्या भावाचे डोळे गेले या जाणीवेने त्यालाही खूप वाईट वाटायला लागलं होत.लोकांच्या नजरेत आता आपण गुन्हेगार आहोत हा विचार सारखा त्याच्या डोक्यात फिरत होता.त्याला आता पश्चाताप झाला होता;पण आता वेळ निघून गेली होती.व्हायचं ते नुकसान भरून येणार नव्हत! अरविंदा अक्षरशः हताश झाला होता तर सीता मनाने पार खचून गेली होती.
शेवटी काळ हेच सर्व घावांवरचे जालीम औषध असते!
दिवस जात होते.अरविंदा आणि सीता आता आपल्या या अंध मुलाचे आधार झाले होते.
वसंता संपूर्णपणे आंधळा झाल्यामुळे दैनंदिन प्रत्येक गोष्टीसाठी त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत होते. सकाळी झोपेतून उठला तरी कुणाच्यातरी आधाराशिवाय तो अंथरुणाबाहेर तो येवू शकत नव्हता.
बाथरूममध्ये जाणे,आंघोळ, खाणेपिणे अशा एकूणएक बाबींसाठी तो परावलंबी झाला होता. अरविंदा जेव्हा जेव्हा घरी असायचा तेव्हा तो वसंताची सेवा करायचा.तो बाहेर गेला की वसंता संपूर्णपणे सीतेवर अवलंबून असायचा.हल्ली हल्ली गुणवंतासुध्दा वसंताला मदत करायचा;पण ते त्याचा मूड कसा आहे त्यावर अवलंबून असायचं.आपल्याला आता आयुष्यभर कुणाचातरी आधार घ्यावा लागणार या विचाराने वसंताही मनाने पूर्ण खचला होता.
अरविंदा त्याची सुट्टी संपवून कामावर जायला लागल्यावर तर वसंताच्या सगळ्या कामाचा बोजा त्याच्या आईवर-सीतावर पडला.आपल्या या दुर्दैवी मुलाचे करता करता बिचारी पार थकून जात होती. अचानकपणे झालेली ही दुर्घटना व त्यामुळे वसंताची झालेली अवस्था ही केवळ आपल्या हलगर्जीपणामुळेच झाली आहे असे तिच्या मनाने घेतले.
वसंताचे चाचपडत चालणे,अडखळून पडणे व त्याचे होणारे हाल पाहून ती दिवसेंदिवस खचायला लागली. त्यातच तिच्या दम्याने उचल खाल्ली.डॉक्टरी उपचार केले पण काहीच उपयोग होत नव्हता .अति काळजीमुळे तिचे खाण्यापिण्यावरचे लक्ष उडाले होते. स्वत:च्या शरीराची ती आबाळ करू लागली.अखेर अशक्तपणा येवून एक दिवस तिने कायमचे अंथरूण धरले.
आता केवळ वसंताच नाही तर सीतेचीही काळजी घ्यावी लागत होती. अरविंदा जरी मन लावून दोघांच करत होता तरी एक पुरूष म्हणून अरविंदाच्या काही मर्यादा होत्या.गुणवंताला चुचकारत हाताशी धरून अरविंदा दिवस रेटत होता; पण नोकरी आणि घराच्या जबाबदाऱ्या घेता घेता तो मेटाकुटीला यायला लागला.
‘त्या’ घटनेनंतर गुणवंता काही दिवस अगदी चांगला वागत होता; पण त्याचा मूळ स्वभाव
बदलला नव्हता.
वाढत्या वयाबरोबर तो शरीरानेही आता आडदांड झाला होता.अंगात भरपूर ताकत आली होती.शाळेत त्याचे अभ्यासाकडे बिलकूल लक्ष नव्हते आणि त्याच्याकडे लक्ष द्यायला अरविंदाला वेळ नव्हता.शाळेतल्या त्याच्या कुरापती वाढत गेल्या आणि एक दिवस त्याला शाळेतून काढून टाकले गेले......
हळूहळू त्याला वाईट मुलांची संगतही लागत गेली व तो अजूनच बिघडला.तो शिगारेटबिड्या प्यायला लागला.खोट बोलून घरातून पैसेही तो गायब करायला लागला.घरात व बाहेर त्याची गुंडगिरी दिवसेंदिवस वाढायला लागली.आईवडिलांना तो दुरुत्तरे करू लागला.असाहाय्य वसंतालाही त्रास देवू लागला. दिवस दिवस तो घराबाहेर राहू लागला.
अरविंदा आपली नोकरी,आजारी बायकोची व वसंताची शुश्रुषा यात इतका गुरफटून गेला होता की गुणवंता बाहेर काय करतोय हे बघायला,त्यावर विचार करायलाही त्याला वेळ मिळत नव्हता.दिवसेंदिवस सीताची तब्बेत बिघडत गेली. डॉक्टरी उपचाराना तिची प्रकृती प्रतिसाद देइनाशी झाली, आणि मग एक दिवस अंथरूणावर खिळून पडलेली त्याची प्रिय पत्नी सीता हे जग सोडून गेली.....
अरविंदावर हा अजून एक फार मोठा आघात होता.! कुठल्याही परिस्थितीत तनामनापासून साथ देणारी त्याची अर्धांगिनी-सीताही आता त्याच्यासोबत राहिली नाही.वयाची विशी गाठलेल्या वसंताचे आता काय होणार?वाईट संगतीला लागलेल्या गुणवंताचे काय करायचे? घरगृहस्थी कशी
चालवायची ?असे असंख्य प्रश्न अरविंदाभोवती घोंगावत होते!
त्याचे नोकरीतही लक्ष लागेना....
(क्रमश:)
©प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020.