“ओ जेवायला वाढू का”
सविताने किचन मधून आवाज दिला.
अनिलचे लक्षच नव्हते, त्याला सविताचा आवाज किंबहुना ऎकायला आलेला नसावा.
सविता स्वतःच्या ओढणीला हात पुसत बाहेर आली आणि अनिलला बघून समजून चुकली कि काय सुरु आहे ते.
“काय झालं ओ, आता तर नीट होते”
सविताने अनिलच्या खांद्यावर हात ठेवून त्याला हलवून विचारले.
अनिलने मान सविताकडे फिरवली आणि दबक्या आवाजात बोलला.
“छातीत दुखतंय डाव्या बाजूला”
“काही नाही ऍसिडिटी असल, ऍसिडिटीची गोळी खा अन जेवून घ्या”
सविताने खूप प्रेमाने आणि आपुलकीने सांगितले.
“दे एक गोळी त्या डब्यातून”
अनिलच्या औषधांचा एक वेगळा डबाच होता, त्यात खोकल्याच्या, सर्दीच्या, ऍसिडिटीचा, बी पी च्या, पोट दुखण्याच्या, जेवण पचण्याच्या, पोट साफ होण्याच्या, अश्या अनेक प्रकारच्या गोळ्या आणि औषधांनी तो डबा गच्च भरलेला.
सविताने अनिलला ऍसिडिटीची गोळी दिली आणि जेवण आणू का विचारले,
अनिलने गोळी खाल्ली आणि थोडा वेळ थांब असं सांगितलं आणि परत आपल्या विचारात आणि कल्पनांच्या विश्वात डुबला, मुले झोपी आले होते, बाहेर खाल्ल्याने त्यांचे पोट देखील भरलेले होते, सविताने मुलांचे कपडे बदलले आणि त्यांना झोपी घालू लागली, मुले देखील फिरून दमले होते, लगेच झोपी गेले.
सविताने ह्या वेळेस अनिलला न विचारताच जेवणाचं ताट करून आणलं आणि त्याच्या पुढे ठेवून बोलली,
“ओ घ्या जेवून पटकन आणि झोपा शांत”
अनिलनेही गुपचुप ताट पुढे ओढले आणि पटापट ते संपवले,
“अजून देऊ का ओ खिचडी”
“नको झालं माझं”
सविताला कळलं होत कि अनिल अस्वस्थ आहे आणि अर्ध्या पोटानेच उठलाय, ती पण पुढे काही बोलली नाही आणि बेड झटकून अनिलची गोधडी काढून त्यावर ठेवली.
अनिलने घरातल्या घरात सात आठ चकरा मारल्या आणि बेडवर मोबाईल घेऊन आडवा झाला, सविता देखील किचन मधलं काम आवरून दुसऱ्या बाजुला झोपली.
अनिल मात्र जागाच होता मोबाईलवर ह्या स्क्रीनवरून ती स्क्रीन, कधी व्हाट्स अप तर कधी फेसबुक, इकडून तिकडून मन आणि विचार दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत होता, घड्याळाचा काटा टिक टिक करत पुढे चालत होता पण अनिलचं न चित्त थाऱ्यावर येत होतं ना त्याला झोप येत होती.
साडे अकरा बाराच्या सुमारास तो उठला आणि कपडे घातले, सविताचा डोळा उघडला.
“काय ओ काय झालं?
“छातीत जास्तच दुखायला लागलाय, मी आलो दवाखान्यात जाऊन”
“मी येते सोबत”
सविता काळजीच्या स्वरात बोलली
“नको पोर एकटेच आहेत, तू थांब मी आलो लगेच”
अनिलने चप्पल घालता घालता सविताला घरीच राहायला सांगितले, दरवाजा लावून घेण्यासाठी देखील बजावले आणि बाहेर पडता पडता देवाच्या पाया पडला आणि निघाला.
अनिल थेट सरकारी रुग्णालयात गेला, अपघात कक्षात जाऊन समोर बसलेल्या डॉक्टरला छातीत खूप दुखतंय सांगितलं,
“कधी पासून”
डॉक्टरांनी विचारलं.
“संध्याकाळ पासून, खरं म्हणजे काल पासूनच थोडं थोडं घाबरल्या सारखं होतंय”
डॉक्टरनी त्याला समोरच्या बेडवर शर्ट काढून झोपायला सांगितलं आणि ज्युनियर डॉक्टरला इ सि जि काढण्यास सांगितले, डॉक्टरने मशीनच्या वायरी काढून त्याच्या छातीवर लावायला लागले.
अनिलला हे काही नवीन नव्हतं, आज पर्यंतर पंचवीस तीस इ सी जिच नाही तर दोन तीन वेळा २ डी इको देखील करून झालं होत.
डॉक्टरने मशीनच बटन दाबलं आणि चर चर आवाज करत कागद बाहेर यायला लागला, अनिलचे सगळे लक्ष त्या कागदा कडेच होते, डॉक्टरने तो कागद बाहेर काढून बघायला लागले, कागद बाजूला ठेवून अनिलच्या छातीवरच्या वायरी काढल्या आणि अनिलला छातीवरील चिकट द्रव्य पुसायला कापूस दिला.
“काय झालंय डॉक्टर?
अनिलने तोंड बारीक करून विचारलं
“थांबा जरा”बोलून डॉक्टर समोरच बसलेल्या मोठ्या डॉक्टरांना इ सी जि दाखवण्यास गेले.
अनिल अजूनच घाबरला आणि लगबगीने शर्ट घालून मोठ्या डॉक्टर पुढे जाऊन उभा राहिला.
डॉक्टर तो पेपर नीट पाहत होते, आणि अनिलचे ठोके वाढत होते.
डॉक्टरने त्या पेपरची घडी घातली आणि ज्युनियर डॉक्टरच्या हातात देऊन नॉर्मल आहे असे बोलले आणि अनिलच १२० च्या स्पीडने धावणार हृदय ७० वर आलं. ज्युनियर डॉक्टर ने अनिलला इ सी जि आणि औषधांचा पेपर देत बोलले ऍसिडिटी किंवा मसल पेन असेल ह्या गोळ्या घ्या बर वाटेल.