क्रमशः-
७.
क्षणार्धात माझं अशांत मन शांत झालं. क्षणभर वाटले, की मी इतकं करतोय, पण अशा कठीण प्रसंगात ना मी कामी आलो ना माझा पैसा. फक्त पैसा नव्हे तर माणूसकीच माणसांच्या उपयोगी पडते याची जाणीव झाली. ओमिनी कार चालवणारा आण्णा काहीही विचार न करता जिकडे बोलेल तिकडे पैशाचा विषय न काढता आला. मेडीकलवाल्याने स्वतः त्या गावात नसतानाही इतक्या अंधारात आपल्या बायकोला अनोळखी लोकांसाठी मेडीकल उघडायला पाठवले आणि त्या माऊलीनेही आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव असतानाही रात्रीचे एक वाजता अंधारात येऊन मेडीकल उघडून माणूसकी दाखवली.
दोन दिवसांत अनेकांनी फोन करून माझी खूशाली विचारली होती, पण सर्व जण स्वत:च्या स्वार्थासाठी फोन करत आहेत, असे वाटत होते. आत्तापर्यंत, ' समूद्रातल्या लाटांवर वाहत जाणाऱ्या पाला पाचोळ्याला कुठलं आलय सुख आणि दुःख आणि त्यांची काळजी कोण करीत बसेल, असे समजून कामगारांना इतका भाव देत नव्हतो, पण या घटनेनंतर माझ्यासारखा सर्वांना जीव आहे. मन आहे. हृदय आहे आणि त्या हृदयात भावना ही आहेत. याची जाणीव झाली.
या दोन दिवसांत ज्या ज्या लोकांनी मला फोन केले होते त्या सर्वांना फोन केले. त्यांची आपुलकीने चौकशी केली. खूशाली जाणून घेतली. कुणाला काय हवं नको ते विचारले. अनेकांना पैशाची गरज होती. माझ्याकडून ती जमेल तेवढी सर्व मदत केली. २७ कामगारांपैकी २६ जणांनी फोन केल्यामुळे त्यांना परत फोन करता आला, २७ वा कोण राहिला हा विचार करताना लक्षात आलं. विठ्ठल, सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील विठ्ठल. त्याचं नेमकं गाव माहीत नव्हते आणि फोन नंबरही माझ्या जवळ नव्हता. थोडा डोक्याला ताण दिला. पाटणच्या सतीश कांबळे या मित्राची आठवण झाली. त्याच्यामार्फत विठ्ठलशी संपर्क साधता येईल का पाहीले. विठ्ठलचा या अगोदरचा कंपाऊंडरचा जॉब, दम्याचा आजार असणारी आई.ही सर्व माहिती सतीशला सांगितली आणि आश्चर्य, विठ्ठल सतीशचा शेजारी निघाला. सतीश कामावर होता. 'संध्याकाळी घरी गेल्यावर फोन करायला सांगतो' असे सतीशने सांगितले आणि मनावरचं ओझं खाली झालं. संध्याकाळी विठ्ठलचा फोन आला. मी बोललो, " कसं काय चाललंय विठ्ठल?"
विठ्ठल - " घरी मस्त आहे. निवांत आहे."
मी - " आणि तुझी आई ? काम म्हणते त्यांची तब्येत ?"
विठ्ठल- " सर, दोन दिवसांत आईचा दम्याचा त्रास वाढलाय. तिला दवाखान्यात घेऊन जाणं माझ्या जीवावर येतंय. काय करावं कायच समजेना. "
मी - " घाबरू नकोस, मी आहे. तुला किती पैशांची आवश्यकता आहे सांग. मी शक्य तेवढी व्यवस्था करतो. पगाराच्या पैशाची चिंता मिटेल, पण तोपर्यंत मी आहे. तु एकटा आहेस, असं समजू नकोस. बिनधास्त आईला दवाखान्यात घेऊन जा. तू कंपनीत कामावर यावं, म्हणून मी हे सर्व बोलत नाही, तर तुझा एक जवळचा मित्र म्हणून बोलतोय. अजून काय लागलं तर संकोच न करता सांग."
विठ्ठल- " सर, मी त्या दवाखान्यात कंपाऊंडरचं काम करत होतो, त्यामुळे पैशासाठी काही अडचण येणार नाही, पण आईला दवाखान्यात अॅडमिट करायचं माझं धाडस होत नव्हतं. घरातून बाहेर पडायला मन उचल खात नव्हतं, पण तुम्ही फोन केलात बरं वाटलं. पैसे नकोत, पण धाडस पाहिजे होतं, मनाला बळ येण्यासाठी मानसिक आधार पाहिजे होता. तो तुम्ही दिलात. अजून मला काय पाहिजे ? मी आजच आईला दवाखान्यात घेऊन जातो."
मी - " ठिक आहे, काळजी घे आणि लॉकडाऊन हटल्यानंतर मी तुझ्या गावी येतोय. तुला, तुझ्या आईला आणि सतीश कांबळे या मित्राला भेटायला."
विठ्ठल - " सर, नक्की या, आम्ही तुमची वाट पाहीन."
मी - " नक्की येईन.", असे म्हणून मी फोन ठेवला.
विठ्ठलशी बोलणं झाल्यावर कामगारांनी फोन करून विचारलेल्या एका सामान प्रश्नाची आठवण झाली.तो म्हणजे, " सर पगार होईल, पण तोपर्यंत ?..."
यात तोपर्यंत या शब्दाच्या नंतरचा अर्थ 'फक्त पैसा' हा नसून, तर 'मानसिक आधार' हा होता. या सर्वांना फोन करून विचारपूस करण्याने, मला किती मानसिक आधार मिळाला, माझ्या मनातलं प्रेम किती जागृत झालं, हे शब्दात मांडता येणार नाही.
अॉफीसमध्ये जी जबाबदारी माझ्यावर दिली आहे, ती मी चोख पार पाडण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी आवश्यकतेनुसार कठोर बोलणे, कठोर निर्णय घेणे. हे ओघाने आलेच. काही जण मला तोंडावर बोलतात, ' दगडाच्या काळजाचा माणूस'.कित्येक जण पाठीमागेही बोलत असतील, पण या दगडाच्या काळजाच्या माणसालाही हृदय आहे, मन आहे, भावना आहेत. फक्त त्याला कुणी तरी तशी जाणीव करून द्यावी लागते. ती जाणीव या व्हायरसने लॉकडानच्या कालावधीत करून दिली.
खरं तर, या ताळाबंदीच्या एकोणचाळीस दिवसांत काहीही लिहायचे नाही, असे ठरवले होते, पण आशिष शेंद्रे या अमरावतीच्या मित्राचा खूशाली विचारायला फोन आला.त्यात तो बोलला, "सुभाषभाऊ, पुण्यातच हायसा ना ?"
मी- " हो."
आशिष- " तुमची ती रामोशी समाजावरची कादंबरी लिहून झाली का ? "
मी- " थोडी राहिली होती. लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यातच ती पुर्ण केली. आत्ता निवांत वेळ आहे."
आशिष- " मग, या मोकळ्या वेळेत लॉकडाऊन वर काहीतरी लिहा. म्हणजे शहरातल्या लोकांची व्हायरसमुळं झालेली केविलवाणी अवस्था, शहरात नोकरी करणाऱ्या गावाकडच्या लोकांची गावाकडे जाण्यासाठीची तळमळ आणि खेड्यात गरीबांचे अन्नासाठी झालेलं हाल. गरीबांना अन्नाचं एक पॅकेज देऊन पन्नास जण शेल्फी आणि फोटोसाठी आसुसलेले पुढारी, कार्यकर्ते आणि त्यांची फेसबुक, व्हॉट्स ॲप'वर फोटो शेअर करून महान कार्य केलंय असं म्हणवून घ्यायची हौस. अशा सिच्युएशनवर एखाद्यी कथा लिहा."
मी- " ठिक आहे." बस एवढंच बोलून तो विषय टाळला, इतर गप्पा मारल्या आणि फोन ठेवून दिला. अशी कथा लिहण्याचा विषय टाळण्याचं कारण, की अशा निगेटिव्ह बाजू मांडणाऱ्या विषयावर लिहिण्यापेक्षा बाबा आमटेंच्या कवितेसारखं ,
'या माझ्या लोकमातेचं लावण्य
कुणी हिरावून घेऊ नये
म्हणून माझं जीवन मी उधळत राहणार आहे
जगत राहणार आहे मी....'
किंवा,
'शृंखला पायी असू दे, मी मनीचे गीत गाई
दु:ख उघळायास आता आसवांना वेळ नाही....'
अशा सकारात्मक गोष्टींवर एखाद्यी कथा लिहीन. पण सध्यस्थितीत कोणतीही कथा लिहायची नाही, असे ठरवून एक एक दिवस कसातरी ढकलत होतो. पण या काळात काही मानसिकता उलथून टाकणाऱ्या घडल्या, म्हणून हा प्रसंग लिहावा असं वाटलं, म्हणून तो लिहून काढला.
कडक उन्हामुळे झाडावरच्या गुलाबाच्या फुलाचाही रंग उडतो, मृदूपणा नाहिसा होतो. तसाच या व्हायरसमळे माझ्या दगड बनलेल्या मनावरचा कठोर रंग खाडकन उडाला आणि प्रेमभावनेचा मृदू रंग अलगद भरला गेला.
( समाप्त)
_ सुभाष मंडले.