८) शेतकरी माझा भोळा!
कलाकेंदरातून पैका घिऊन गणपत सीतापूरला आला. त्येला येसीतच आबासायेबाचा गडी भेटला. तो म्हण्ला,
"गणपत, आर कोठ कोठ धुंडावं तुला. चल, आबासाबानं तुला बलीवलंय." गड्याच्या माघ मांघ गणपत सरपंचाकडं गेला. त्येला फाताच सरपंच म्हण्ले,
"गणपत, काय ठरवलस बा जीपीच?"
"मालक, म्या काय..."
"म्या बैंकत फायलं, तुमी आतापस्तोर येकच हप्ता भरला हाय. त्यो बी सम्दा याजात गेला. आजच्या घडीला त्या जीपीपरीस नई जीप घेतल्याली परवडती. पर आस हाय तू मझा माणूस हाय. तुही हर वक्ती फसगतच झाली म्हून म्या तुही जीप ठिवून घितो."
"लै-लई उपकार झाले बगा, मालक. ले मोठ्या संकटातून वाचविल फा तुमी."
"ते जावू दे. जीबीचे थकल्याले आन् म्होरले हाफते म्या भर्तो. नगदी म्हणशील तं काय बी मिळायचे न्हाई"
"मालक, काय तरी..."
"तसं आसल तर मंग तू जाणे आन् तुही जीब जाणे."
"न्हाई...न्हाई ती आवदसा नगच. घ्या. तुमी घ्या."
"जा रे, गणपतसंग जावून जीब ढकलत कारखान्यावर नेवून लावा." सरपंचानं दोघायला गणपतसंग धाडलं. त्या मान्सांनी गणपतच्या घराम्होरी ऊबी असलेली जीब कारखान्याकडे नेली.
"काय झालं व्हो, जीब कोणी नेली?
"यस्वदे, आपलं तकदीर चांगलं. आबासाहेबांना पुण्ये वाटून घेत्ल."
"म्हंजी? तुमी जीब ईकली की काय?" बाहेरून आलेल्या कोंडबानं इचारलं.
"व्हय ईकली. आबासायेबाच्या रुपात देवच धावून आला. मांघले समदे थकलेलेत हाफ्ते आन् म्होरलं करजं बी भर्तो म्हन्ले."
"आन् नगदी किती देले?" कोंडबा इच्चारलं.
"त्यांचा गू! म्हणं नगदी? खूळ कोठलं? जीबीचे थकल्याले हाफ्ते, त्यांचं याज मिळूनशानी नईच जीब येयाची म्हणं."
"अव्हो , पर..."
"चूप बास! काही आकल हाय का? ती पीडा येकदाची गेली हेच लै झालं त्या आबासायेबानं मन मोठं केल नसत तर ह्ये घर आन् वावरबी ईकायची पाळी आली असती त्या जीपीपायी."
"म्हण उपकार! त्या घुबडाचा काय तरी डाव आसल..."
"डाव आसल म्हण! या कार्ट्याला ईचार. आबासायेब, जीप आन् येला बी कारखान्यावर ठेवून घेतो म्हन्ले व्हते पर येला डोळे आले..'
"व्हय र?"
"म्हन्ले व्हते. पर मला वाटलं त्ये आबासायेब जीप घेतील आन् मंग पुना मला ठिवतील का न्हाई..."
"काय शाना हायेस रे ! ह्येच का रं तुव्ह शिक्षाण? आरं, आंगठेबहात्तर पोऱ्हं फाय कार्खान्यावर ड्युटी करुन पाच-पाच हजार रुपये कमवायलेत आन् तू आपेश्या... दारात आलेल्या लक्षुमीला पाठ दावलीस? आर् आमाला ईचाराय काय तुही जीभ झडली व्हती रे?" कव्हा न्हाई ते यस्वदा कोंडबावर चिडली.
"जावू दे यस्वदा, झालं ते झालं. तरी बी आबासायेबानं मन मोठ्ठं केलं, पोरानं केलेला आपमान त्येंनी गिळला आन् जीब घेतली आन उंद्या आपल्याला ऊस तोडीचा पास मिळणार हाय."
"खरं बोल्ता व्हय?"
"यस्वदे, तुही आन!"
"नग. नग. आण नग घिवूसा." म्हणताना यस्वदा आनंदानं कामाला लागली. काम कर्ता कर्ता तिनं ईच्चारलं,
"अव्हो, पर तोडचिट काढाय पैका कोठून आन्ला?"
"गेल्तो कलाकेंद्रात..."
"काय म्हणता? जीभीला काही हाडंबिडं हाय का न्हाई?? काय आवदसा आठीवली? म्या..."
"आगं ऐकून तं घेशील? त्यो केंदराचा मालक याजानं पैका देतो. त्येच्याकडूनच पैका आण्ला."
"अव्हो, मंग आपली जीप त्येलाच कावून न्हाई ईकली?"
"अग, खरच की ! पर त्यो बी बैंकत इच्चारून आला असता का न्हाई? जावू दे, झालं ते झालं."
दुसऱ्या दिशी फाटे-फाटे गणपत ईलासच्या घरी गेला. "ईलास हाय का?"
"कोण गणपतदाजी? त्ये तर न्हाईत की वो. रातची नाईट हाय कार्खान्यावर आस्स सागून गेल्ते काल दोपारी. येतील थोडा येळात. बसा की च्या कर्ते."
"नगं वैनी. त्येला कार्खान्यातच गाठतो." असं म्हणत गणपत कार्खान्याकडं निघला. त्येच्या पावलाला जणू टायर बसविल व्हत. तो बिगी बिगी चालू लागला. दुरुन कलाकेंदर दिसताच गणपत मनाशीच म्हण्ला,
'आरं राती ईलास येथच आसणार. बायकुला नाईट डिवटी सांगून बहादरानं समदी नाईट येथच काढली आसल. पाच हज्जार तर घेतलेच व्हते.' आसं बडबडत त्यो कलाकेंदराजवळ पोचला.
ईसकुटलेल्या आवतारातल्या पाच-धा बाया बाहीरच व्हत्या. गणपत त्येंच्याकडं येत असल्याच फावून त्या मुरक्या मुरक्या हासत व्हत्या.
"आगोबाई, पाटील फाटे फाटेच! राती बायकून हात लावू देला न्हाई का? येव्हढा बी धीर न्हाई?"
"त-त--ई--ई---ईलास हाय का?"
"कोण ईलास? येथं ईलास न्हाई पर ईलासिनी मातर फायजे तेवढ्या हाईत."
"ईलास---त्यो--त्यो सीतापुरचा..."
"न्हाई की व्हो..."
"आगं, राती तर व्हते की."
"तुझ्याजवळ व्हते का, मंग तुलाच ठाव आसणार."
"त्ये फाटेच गेले कार्खान्यावर. चार-बारा ड्युवटी हाय म्हन्ले. गडी मातर रगेल आन् रंगेल हाय बरं. रातभर सोत्ता बी झोपला न्हाई आन् मझा बी डोळ्याला डोळा लागू देला न्हाई. तीन वाजता तडक कार्खान्यावर गेला.''
"पाटील कावून चाल्ले व्हो? या की कव्हा तरी निचेंतीनं ! एखांदे बार तरी या सोरगात! घरचा नर्क तर जलमभर हायेच की. एखांद्या वक्ती एखांदी रात तरी इकडं घालाकी." ती बाई म्हन्ली आन् तिच्यासंग समद्या बाया हासल्या.
गणपत कार्खान्यापासी पोचला तव्हा दोपारचे साडेअकरा वाजत व्हते. ईलास फाटकापाशी त्येची वाट फात व्हता.
"ईलाश्या, हीच का रं तुही नाईट? साल्या, वैनीला चाट मारुन बेट्या तेथं नाईट मारलीस आन् पुना येथं. आत्ता आणि काय सांगशील?''
"डबल शिफ्ट मारली! आणिक काय सांगणार? मंग घेयाची का तोडचीट?"
"तर मग?" आसं बोलत बोलत ते दोगं सायेबांकडं गेले आन् ज्ये काम धा दिसात बी व्हयाचं नाही त्ये काम आवघ्या धा मिन्टात पैका दिवून तोडचीट बी घिवून आले.
"चल, येक काम तर झालं. आत्ता मुकरदमासी गाठ." ईलास म्हण्ला आन् दोघायन मुकीरदमाला घंटाभर हुडकले. तव्हा कोठं त्यो गावला.
"रामराम, मुकरदम सायेब, रामराम !"
"बोला पाटील, रामराम."
"त्येच की आपली तोडपास आन्लीय. बगा."
"त्याचं झालं व्हो. या पाशीला का जाळायचं हाय. तशा शंबर पासा पडल्यात मह्याजवळ. सायेब लोकायला काय लागलंय? पंख्याखाली बसून दोन वळी घसाटल्या की झालं का? कामगार तर पायजेत का नाही"
"म्हंजी?"
"अहो, आंगापेक्शा बोंगा मोठा हाय. समदाच घोळ हाय. कारखाना नवा हाय. त्या सायेलाबी कळना आन त्या डायरेक्टरायलाबी काही वळना. सम्दा च्युतायचा कारबार हाय झालं. म्हैनाभर तरी नंबर लागायचा न्हाई."
"आस म्हणू नगसा मुकीरदम सायेब, अव्हो लै करजा झालाय."
"मुकीरदम सायेब, आस करा, तुमची जी काय फी आसल ती देवून टाकू मग तर झाल?"
"सम्दे तस्सेच हायेत. कित्ती येकर ऊस हाय?"
"हाय की दोन येकर."
"ठीक हाय चार हजार रुपये देवा. उंद्या साच्याला टरक धाडतो."
"अव्हो पर..."
"आसं करा, भरोसा न्हाई ना तर मंग ती पास मह्याजवळ ठिवून जावा. जव्हा नंबर लागलं तव्हा टरक धाडतो."
"न्हाई, सायेब तसं न्हाई. मझं चुकलं. हे घ्या." असं म्हणत गणपतनं लगोलग चार हजार रुपयांनी मुकीरदमाचे हात भरले. दोघं बी गावाकडं निघले. कलाकेंदर दिसताच गणपतनं इचारलं,
"ईलास येक ईचारू का? रागावू नगस पर वैनी येव्हढ्या रुपवान हायेता, भरल्या अंगाच्या बी हाये..."
"तरी बी म्या येच्या मांघ कावून गोंडा घोळतो? गणपत, मला सांग, तुह्या लगिनाला पंचेईस वरसे झाली असतील... एवढ्या वर्षात भाबी कंदी बिन कपड्यान...."
"आरं, आर.... बिन कपड्यात..... काय बी....."
"येथच समदी खुटी हाय. आर, आपल्या बायकात आन् येंच्यात लै फरक हाय. ह्या बाया कापड न घाल्ता... जस म्हन्ल तस...."
"आरार! बापो रे..."
"बर ते जावू दे. तू व्हय म्होरी. म्या यितो जरासं जाऊन. गणप्या, तुह्या वैनीला सांगू नगस हां. ये गणप्या, चल तर बे एकदा...
"चूप बे!" म्हन्ता म्हन्ता घशामंदी आलेला बेडका गणपतनं रस्त्यावर टाकला आन् त्यो घराकडं निघला...
"यस्वदे, आगं यस्वदे..." घरामंदी आल्या आल्या गणपतनं आवाज देला.
"काय म्हणता?"
"काम झाल. उद्या टरक येणार हाय. ही बग तोडचीट. मुकिरदमाची भेट घिऊन आलो हाय..."
"देव पावला, पळा. नारेळ घिऊन या. आज सनवार हाय. मारोतीरायाला नारेळ फोडा..." म्हन्ता म्हन्ता यस्वदा कामाला लागली आन गणपत नारळ आणायला गेला...
दुसऱ्या दिशी फाटे गणपतच घर लौकरच जाग झालं. सम्दी काम बिगी बिगी झाली. गणपतन येसीपस्तोर चक्कर टाकली. ईलासनं समद्या गावाला ऊसाच्या तोडीचा पास गणपतला मिळाल्याचं सांगल व्हतं. जो-तो ईचारु लागला,
"गणपत, आर, तोडीची चीट मिळाली म्हण?".
"व्हय. मिळाली बोवा एकदाची."
"काय नसीब फळफळलं तुहं. सोत्ता चेरमनचा फड आजूक ऊबा हाय. वाळाय सुरु झाला हाय. झालच तं तात्यासाब, सकाराम, तुकाराम, सेटजी अश्या समद्या बड्या लोकायचा ऊस तसाच ऊबा हाय आन् तुहाच नंबर बरा लागला."
“लाग्ला झालं. त्यो चीट देणारा सायेब मझा दूरचा पाव्हणा निंघला. काम फत्ते झालं."
दोपारीच यस्वदा आन् सखीन ठेवणीतल, सटी सामाहीला वापरायचं लुगड नेसलं. यस्वदाचं सोडा पर सखी त्या लुगड्यात लईच मास्त दिसत व्हती, पोरगी आंगानं बी चांगलीच भर्ली व्हती.
"काय फाता व्हो?" सखी बाजुला गेल्यावर यस्वदान ईचारल.
"यस्वदे, ल्हान ल्हान म्हन्ताना बग सखी केव्हढी झाली.''
"व्हय. पोरीची जात हाय. येकदा भराया लागली की बास... तरी बी वयीच्या मानानं सखी लईच मोठी वाटत्ये आणिक आत्ता तं शानी बी झाली हाय."
"काय म्हन्तीस? बाप्पारे, यस्वदे म्हणजे आत्ता जावाई धुंडाय फायजेत की! उद्या या फारच झालं तर परवा आपला ऊस कार्खान्यात जाईल. लोक म्हन्त्यात दीड-दोन लाखालं मरण न्हाई. आलेल्या पैक्यातून पैले सम्द रिन फेडायचं आन् आखाड संपला की बाहीर पडायचं. जावाई बी आस्सा शोधायचा..."
"गप बसा व्हो. आजकाल सपान फायन बी वंगाळ हाय."
दोपारच्या दोन वाजेपासूनच गणपतचं घर वावरात जाऊन बसल. यस्वदानं हाळद, कुक्कू, गुलाल, ऊद, नारेळ, फूल, उदबत्ती सम्द सामान घेतलं. वावरातल्या खोपीत यस्वदा आन् सखी बसल्या व्हत्या. कोंडबा रोडावरच थांबला व्हता. गणपत खोपीतून बाहीर आन बाहीरुन खोपीत येरझारा घालीत व्हता. जरा-जरा येळान यस्वदाबी बाहीर येयाची.
"फायलात का हो झंडू? कसा टप्पोरा झालाय. समदे गेंदचं हाईत. पाच -धा हज्जार तर नक्की व्हतील बगा फुलायचे."
"व्हय. व्हतील की..."
"त्ये टमाटे बी बगा. अव्हो... अव्हो, टमाटे पिकायलेत की. या बाजारी नेवाव काय?"
"खरच की. यस्वदे, आग बग तं सम्दे टमाटे कसे टप्पू-टप्पू आन लालभडक झालेत ते?"
व्हता व्हता दिस बुडाया आला पर टरकच काय पर त्येचा आवाज बी कानी पडत न्हवता. आंदार पडू लागला तस यस्वदा म्हन्ली, "काय झालं व्हो?"
"आता म्या बी तुह्यासंगचं हाय की. यील आता..."
"अव्हो, आंदार पडतुया तव्हा...''
"आगं, त्येन्ला लई काम हायेत. काटा बिटा व्हयाचा आसल."
"पाडुरंगा...ईठ्ठला.... मारोतीराया... यिवू दे लवकर. "
आंदार चांगलाच दाटून आला. टरकाचा पत्त्याच न्हाई. आखरीला गणपत म्हन्ला,
"चला. आता काय टरक येत न्हाई. यील आता फाटेच..."
समदे आस्ते आस्ते घरी आले. कोन्लाच भुका न्हवत्या. दोपारचं ऊरलं सुरलं कोर-कोर सम्द्यांनी खालं आन् तसच हातरुणावर आंग टाकले. डोळ्यात झोप आसून बी कोन्लाच झोप लागत न्हवती. सम्दे जागीच तळमळत व्हते. सखी आन् कोंडबा घंट्याभरात झोपले पर गणपत अन् यस्वदाच्या डोळ्याला डोळा लागत न्हवता.
"का व्हो, त्येंचा ईच्चार तर बदलला नसाल. दुसरं कोन्ही जास्तीचा पैका तर देला नसेल?"
"यस्वदे, मला तरी काय ठाव गं? तू झोप बरं, ऊगीच डोस्क पिकवू नगस. उंद्या फाटे जावून टरक घिवून येतो." दोन-तीन घंट्यानं यस्वदाचा डोळा लागला पर गणपतचा लागला न्हाई. त्यो बी ईच्चारात पडला व्हता. यस्वदाला त्येन मूकं केलं पर त्येच्या ईच्चाराचं काय? त्ये तर ऊसाच्या टरकापेक्शा बी भारी वेगानं पळत व्हत. मध्येच कलाकेंदराची सय येताच गचकन दिशा बदलत व्हतं. कव्हा ऊस, कव्हा यस्वदा, कव्हा सखी, कव्हा जीब आन् कोंडबा, आबासाब, तात्यासाब, सावकार, सायेब, मुकीरदम आन्.... आन्.... त्या ऊघड्या बाया बी त्येला दिसत व्हत्या. कित्ती येळ गेला कोण जाण. कोंडबाच्या बरळण्यान गणपत हातरुणात ऊठून बसला.
"वा-ग-वा. म्हण पैका... काय म्हन्तेस दाढी काढू? टोचते. बर.. बर.. कर्तो उंद्या दाढी. मंग तर झाल? ये-ये-सुमने. आग आग..." कोंडबा आसच काही तरी बरळत व्हता ते ऐकून गणपत मनाशी म्हण्ला,
'बापरे, कोंड्या कोठ तरी नादी लागला रे बाप्पा. आता काय करावं? घरात तर तरणीताठी पोरगी हाय आन् ह्ये पोरगं.. जावू द्या. वाहवल नसाल. पोरगं हाय. वय बी हाय. या वईत सपान पडणारच. त्येचा कहाला गाजावाजा करायचा?' आशा ईचारा ईचारात गणपतचा बी डोळा लागला.
दुसऱ्या दिशी फाटे गणपत सम्दी काम झाल्यावर बिडी शिलगावत म्हन्ला,
"यस्वदे म्या कार्खान्यावर चाल्लो. टरकाचं बगतो."
"बरं-बर पर सांबाळून. ऊगाच हुज्जत घालू नगा."
ईलास घरी आलाच नसलं म्हणून त्येच्या घरी न जाता गणपत तडक कार्खान्याकडं निघाला. कलाकेंदरापासी लै मोठ्ठी गर्दी झाली व्हती. काय झालं आसल या ईच्चारान त्यो बी तेथं पोचला. त्येला फाताच ईलास त्येच्याजवळ येत म्हन्ला,
"काय झालं रे? राती टरक आला न्हाई?"
"न्हाई रे. म्हून तं आलो की. पर येव्हढी मोठी गरदी?"
"चल. चल. सांगतो." दोघं बी कार्खान्याच्या वाटेला लागले.
"त्ये सम्दे तारापुरचे लोक हाईत. आर बाबा, तारापुरच्या सयाजीनं मालकाकून पन्नास हजार रुपै घेतले व्हते. सिवाय त्येला बाईचा बी नाद हाय. रोज राती उधारीवर..."
"काय? बाय बी येथं उधारीवर मिळत्ये?"
"व्हय. ऊसाचा पैयसा त्यो बी पाच लाख रुपै उचलून सयाजीनं मालकाची पै भी चुकवली न्हाई. सयाजीवर मालकाचे नगदी, याज आणि बायाची ऊधारी मिळूनशानी सव्वा लाख रुपै हाईत. बाप्याचा मालकालं धोका देयाचा ईच्चार व्हता..."
"मंग?"
"मंग काय? मालक कच्च्या गुरुचा चेला न्हाई. त्येन सयाजीची जवान पोरगी काल सांच्याला उचलून आन्ली आन् लगुलग राती तिला आबासायेबाच्या मिठीत धाडून बी देलं..."
"काऽय? पर सयाजी आन आबासायेबाचं काय तरी नातं लागतं न्हवं?
"आरं बाबा, आश्या संबंधात येकच नातं ऱ्हाते. नर आणि मादी..."
"पोर्गी उचल्ली तव्हा गाव काय करत व्हतं?"
"गाऽव? गणप्या, येडा की खुळा रं! आरं, आर्धे ऊबार तारापुरचे लोक रातच्याला येथचं येतात. आबासाबाच्या बाद तारापुरच्या सरपंचानं आन दूसऱ्या तीन-चार लोकायनं बी त्या पोरीसंग मजा मारली."
"सयाजीनं पोलीसात कम्प्लीट न्हाई लिवली?"
"पोलीसात? गणपत, तुला काय बी अनुबव न्हाई बोवा. आर राती पोलीसायच ड्युवटी ऱ्हाते येथ पोरींच्या खोलीत."
"बाप्पो रे, मालक म्हण्जे लई आवगड परकरण हाय की "
"तर मग ! मला सांग सई, आंगठा न घेता जो माणूस लाख्खान पैका उधारीवर देत्यो तव्हा त्याचे काही तरी लागेबांदे आसतील का नहाई?" बोल्ता बोल्ता दोघं बी कार्खान्यात पोचले. सम्दी साईड धुंडली पर मुकीरदमाचा कोठंच पत्या नव्हता. कोन्ही काही सांगत बी न्हवते. आखीर दोपार बी झाली. गणपत आन ईलास भजे खावून च्याहा पेत आस्ताना मुकीरदम होटलात आला. त्याच्यासंग धा-पंद्रा कास्तकार व्हते. सम्द्यायकून पैका घिवून त्यो आस्वासन देत व्हता. शेतकरी बी त्याच्याच हातापाया पडून त्येच्या हाती जुल्मच पैका कोंबत व्हते... आडला हारी गाडवाचं पाय धरल्यावानी ! सम्दा ओपन तरी बी शिकरेट कारबार व्हता.
"या या मुकारदम, गरमागरम भज्ये खा." ईलासनं आवाज देला आन मुकीरदम त्येच्याजवळ यिवून बसला. त्येचा आवतार कायी न्याराच येता. डोळे लालभडक झाले व्हते. बहुधा रातची ऊतरली न्हवती. डोळ्यात देसीचे इंगोळ फुलले व्हते.
"सायेब, काल ट्रक धाडायची बोली व्हती. सबूद देला व्हता पर...."
"व्हती हो. म्या कोठं न्हाई म्हन्तो. तुमी सोत्ताच फाता, येक मिनीट बी येळ हाय का व्हो? अव्हो, काल दोपारी मझ्या साहा टरकायचे माप व्हणार व्हतं म्हून म्या तुमास्नी सबूद देला व्हता पर...."
"पर काय?"
"अहो, त्या तारापूर तांड्यावर पाच टरक सांच्यापारी पोचल्याबरुबर कामगार ज्ये टाईट झाले त्ये आत्तापस्तोरबी त्येंची उतरली न्हाई. कोपावर कोप.....पैयल्या धारेची हाणायलेत. तुमाला सांगू पाटील, त्येंच बी खर हाय, काय टेस्ट हाय म्हन्ता? छे! अशी टेस्ट आमी जिंदगानीत चाखली न्हाई."
"म्हणजे तुमी बी?"
"त्येचं आस झाल, काल फाटे येणारे टरक आज फाटे पस्तोरबी आले हाईत म्हून काय झाल ते फाण्यासाठी आमी तांड्यावर पोचलो. तुमास्नी काय सांगू, पाटील मान्स सोडा पर त्याच्या बायकांनी बी घेतली हाय. तारापुरच्या सरपंचाच्या वावरात नुस्ता धिंगाणा चालू हाय, कोण कोणाची बायकू आन कोण कोणाचा नौरा कश्याचा पत्या न्हाई. आत्ता तेथं गेल्यावर मझ्यासारखा नशाबाज आन् रंडीबाज माणूस का कोरडा माघारी यील व्हो? पर पाटील, काळजी करायची न्हाई. उद्या फाटे सम्दे टरक येतील. माप झाल्याबरुबर येक सोडा दोन टरक तुमच्या वावरात धाडतो. काळजी नग. बर यितो म्या" म्हन्ताना मुकरदम निघून गेला.
"आता कस रे, ईलास?"
"घाबरू नगस त्येंना बी प्वाट हाये, येतील उद्या. बर म्या जावून फातो तांड्यावर..."
"तू बी?"
"व्हय, तुह्यापासून काय लपवू? वाहत्या गंगेत हात धुवून फातो."
गणपत ईच्चार करत सीतापूरकडं निघाला. त्यो सोत्ताच्याच तंदरीत व्हता. त्येची तंदरी तव्हा भंग पावली, जव्हा त्यो कलाकेंदरापासी पोचला. येका पोराला त्या ठिकाणी जाताना फावून त्यो भीतीने जागीच थिजला. येक मिन्टभर त्याला काय कराव ते समजलंच न्हाई पर लगेच त्यो रागानं थरथरु लागला. रागाचा येक लोट पार मस्तकात शिरला तव्हा त्येच येक मन म्हन्ल, 'आरं जरा थंड डोस्क्यानं घे. त्यो कोंडबाच व्हता हे कशाहून? दुसरं कोन्ही पोरगं आसल तर ऊगाचच राग कहाला?'
'त्यो कोंडबा आसला तर?'
'जरा आडोशाला थांब. यील त्ये पोरगं बाहीर.'
'कव्हा बाहीर यील?'
'आर बाबा. पोरगच हाय. नवसीक आसणार. आसा कित्ती येळ लागलं? धा-पंद्रा मिन्टात बाहीर येत्ये कान्हाई त्ये फाय.'
दोन मनायच्या वादात गवसलेला गणपत आखरीला येका मोठ्या झाडाच्या खोडामांघ लपला. ईस मिन्टात त्ये पोरगं बाहीर आलं. गणपतन फायलं, त्यो कोंडबाच व्हता. सदऱ्याच्या गुंड्या लावत, ईकडे तिकडे फात कोंडबा रोडला लागला. गणपतला पायातलं आवसानं गळाल्यावाणी झालं. डोस्क गप्पी धरुन त्यो बुंध्याला टेकून बसला. मनामंदी ईच्चाराचं वादळ ऊठल व्हतं. दोन्ही मनायचा खो-खो सुरु व्हता. आगुदरच संकटामंदी गरगरणाऱ्या गणपतला त्यो लई मोठा धक्का व्हता. पाच-धा मिन्टात गणपत सावरला. डोस्क्यात काय ईचार आला न् आला त्यो त्या कलाकेंदरात गेला. सांचा वकुत व्हता. पोऱ्हींना जसा दिस ऊगवला व्हता. पोरी आंघुळी करुन नया नौरीवाणी सजत व्हत्या.
"आर वा पाटील, पहिल्यांदा आले जणू?"
"पैयल्यांदा न्हाई. ईलासरावासग दोन-तीन्दा आल्ते गं.."
"पर करत काय बी न्हाईत. माणूस म्हंजी एकदम पक्का. बधणार न्हाई."
"आग सोड माणुसच हाये ना मंग न बधाय काय झालं?"
"वाटत्ये तर खरी माणूस पर मरद हाय का न्हाई त्ये बायकुलाच ठाव. त्येच्या बोलण्याकडं दुर्लक्स करीत गणपत म्हणता, "ह्ये.. ह्ये.. पोरगं येथं कव्हापासून येत्ये?"
"तस जास्ती न्हाई पर पाच-सात येळेला आलं असेल "
"पैका देत्ये का?"
"पाटील, पैका नसाल तर आमी कोन्लाच फडकू देत नाई, भले ही आमाला सोडलेला नौरा का येत न्हाई?"
"पर तुमी कावून चौकसी करता?"
"त्ये-त्ये.....मझ पोरगं हाय."
"लई जोरदार हाय. त्येला पैयल्यांदा तुमचा दोस्तच घिवून आल्ता.''
"क-क-कोण?"
"त्यो तुमचा ईलास..." त्ये ऐकून गणपतला मोठा धक्का बसला. त्या बाया, ती इमारत सम्दं कसं फिरु लागलं. दोन-चार मिन्टात गणपत पुना सावरला आन् गावाकडं निघाला. येक मन म्हणत व्हत,
'जावून कोंडबाला लै ठोकावं. रगत वकोस्तर बडवावं.'
दुसरं मन म्हन्लं, 'आसा आकरोस्ताळपणा करु नगस. पोरगं हाय, तुही चप्पल त्येच्या पायात फिट बसतीया. आजकालच्या पोरायचा राग लै भारी हाय. तू ताडताड बोलशील फाडफाड मारशील आन् पोरगं रागानं घर तरी सोडायचं न्हाई तर सोत्ताला मारुन तरी घील. त्या परी गप्पी ऱ्हाय, गुमान फाय. ऊसाचा पैयसा येताच दोघा भईन -भावाचं येकाच मांडवात ऊरकून घे. मंग पोरगं ताळ्यावर यील.'
आंदार पडता-पडता गणपत घरी पोचला. यस्वदा त्येचीच वाट फात व्हती. त्येला फाताच तिनं ईच्चारलं,
"काय झालं व्हो? कावून आला न्हाई टरक?".
"यील उंद्या..."
"उंद्या.... उंद्या.... अव्हो ऊस वाळून जायचा..."
"मंग मी तरी काय करु? कार्खान्यापस्तोर डोस्क्यावर घिवून जाऊ?" दिसभराचा राग त्यानं यस्वदावर काढला...
०००नागेश शेवाळकर