परवड भाग-२ (अनर्थ)
“आजपासून या आंधळ्याला मी बिलकूल सांभाळणार नाही. सोडून या कुठंही! यापुढे मला याच तोंडही बघायचं नाही! जोपर्यंत हा आंधळा घरात आहे तोपर्यंत मी या घरात पाऊल ठेवणार नाही!”
भरपूर आकांडतांडव करत सुनंदा राहुलला-तिच्या सख्ख्या मुलाला घेवून घर सोडून गेली होती....
त्यावेळी अरविंदा आणि सुनंदा यांच्यात चाललेला वाद बघायला सगळे शेजारी जमले होते;पण एकानेही सुनंदाला समजावून सांगायचा प्रयत्न केला नाही.अरविंदाने तिची खूप मनधरणी करायचा प्रयत्न केला.राहुलची शपथ घातली;पण त्यालाही ती बधली नाही.
तिचा वसंताला घरातून घालवून द्यायचा हट्ट कायमच होता.शेवटी तर अरविंदाने सुनंदाच्या पायावर लोळण घेतले,तिची माफी मागितली.काकुळतीला येवून आपल्या अंध लेकरासाठी दयेची भीक मागितली;पण सुनंदावर काडीचाही फरक झाला नाही.तिच्यातली दुष्ट कैकयी जागी झाली होती आणि ती कुठलाही मागचा पुढचा विचार न करता राहुलला घेवून घराबाहेर पडली होती!.....
“...... काय होतो ....आणि हे मांझ काय होऊन बसलंय.....”
हातातलं काम सोडून अरविंदा विचारात हरवून गेला....
नकळत त्याला आपले भूतकाळातले रम्य दिवस आठवायला लागले ......
किती सुखी कुटुंब होत त्याचं! त्याची प्रेमळ पत्नी सीता, वसंता व गुणवंता अशी दोन आवळी जावळी मुल! अगदी सुरेख चौकोनी कुटूंब होत ते!
अरविंदा आरोग्य खात्यात नोकरीला होता.अगदी खूप नाही; पण घरातल्या सर्वांना दोन वेळचं पोटभर खायला मिळेल अशी व्यवस्था करणारी नियमित पगाराची रक्कम घरात दर महिन्याला येत होती. अरविंदावर तशा फार काही जबाबदाऱ्या नव्हत्याच त्यामुळे येणाऱ्या उत्पन्नात त्यांच व्यवस्थित भागायचं. वर्षातले सगळे सण उत्साह व आनंदात साजरे केले जायचे,मुलांचा एकाच दिवशी येणारा वाढदिवस जोरात साजरा केला जायचा.हौसेने नवे कपडे तसेच मुलांसाठी खेळण्यांची खरेदीही केली जायची.आपल्या या लाडक्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी दर महिन्याला काही रक्कमी बँकेत जमा व्हायची.त्याची पत्नी सीता निगुतीने त्यांचा हसता खेळता संसारगाडा आनंदाने चालवत होती. समाजात एक सुखी कुटुंब म्हणून या कुटुंबाची ओळख होती.आपल्या कार्यालयातही अरविंदा एक प्रामाणिक होतकरू कर्मचारी म्हणून ओळखला जात होता.
जुळ्या भावंडात गुणवंता थोडा थोराड होता, तर वसंता तब्बेतीने थोडा नाजूक चणीचा होता. गुणवंता धसमुसळा होता,तर वसंता शांत व समजदार स्वभावाचा होता.जसे जसे वय वाढत होते तसा तसा वसंतामध्ये जास्त जास्त समजूतदारपणा वाढत होता याउलट गुणवंतामधला आक्रस्ताळीपणा वाढत होता.खरं तर अरविंदा आणि सीता या दोन्ही मुलांचे संगोपन एकाच पध्दतीने करत होते; पण दोन्ही मुलांच्या स्वभावातला फरक दिवसेंदिवस अधोरेखित होत होता. एरवी अत्यंत आनंदात असलेल्या या कुटुंबामध्ये या दोन भावांमधील किरकोळ;पण वाढत्या कुरबुरी हा चिंतेचा विषय होऊ पहात होता.
गुणवंताच्या आक्रमक स्वभावाला कसे आटोक्यात आणायचे हे अरविंदा व सीता दोघांनाही समजत नव्हते.दोघेही आपापल्यापरीने गुणवंताला समजावत होते त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून मनापासून प्रयत्न करत होते;प्रसंगी त्याला धाकही दाखवला;पण त्याच्यात काहीच सुधारणा होताना दिसत नव्हती.
या एका विषयाने मात्र हल्ली दोघेही हताश होत होते. दोन्ही मुलांची वये वाढत होती आणि त्याबरोबरच गुणवंताच्या बाबतीतली काळजीही वाढत होती.
एकाच वातावरणात, संस्कारात वाढत असलेल्या दोघा भावंडांच्या स्वभावात असलेल्या या फरकाबद्दल शेजारीपाजारीही खाजगीत चर्चा करायचे!
एकदा काय झाले की,अरविंदा कामावर गेला होता.सीताही काही कामानिमित्ताने बाहेर गेली होती. घरात हे दोघेच होते. सुरुवातीला दोघे अगदी शांतपणे खेळत होते. नंतरचा डाव पहिला कुणी खेळायचा यावर वसंता आणि गुणवंता यांच्यात भांडण सुरू झाले.वसंता शांत होता;पण नेहमीप्रमाणे गुणवंता चिडचीड करत होता.....
”असा नेहमीच तू कां दादागिरी करतोस” असं म्हणत वसंताने बाजूला ठेवलेल्या ग्लासातले पाणी गुणवंतावर फेकले.त्याचा शर्ट ओला झाला.आपल्या अंगावर वसंताने पाणी टाकले हे त्याला सहन झाले नाही.
आधीच कोपिष्ट असलेल्या गुणवंताचा राग अनावर झाला.हाताला येईल ती वस्तू तो वसंताच्या अंगावर फेकू लागला.वसंता तसा बेसावध होता.निमूटपणे तो मार खात राहिला.अंग आक्रसून कोपऱ्यात बसून रडत राहिला.गुणवंताला अजूनच चेव चढला.कोपऱ्यात काचेची कसली तरी मोठी बाटली ठेवलेली होती. गुणवंताने आता ती बाटली हातात घेतली. बाटलीचे झाकण उघडून काही कळायच्या आतच त्यातले द्रावण त्याच्याकडे डोळे फाडून बघत असलेल्या वसंताच्या चेहऱ्यावर ओतले......
वसंता जीवाच्या आकांताने किंचाळला,भेसूर किंचाळत तो सैरावैरा धावत सुटला. त्याची ती असह्य तडफड बघून शेजारीपाजारी मदतीला धावले.प्रथमोपचार केले गेले.त्याला दवाखान्यात हलवले.
बाटलीतल्या त्या जहरी केमिकलने वसंताच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर अपाय केला होता...
जवळच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याला हलवण्यात आले. तेथे पोहोचेपर्यंत व उपचार होईपर्यंत खूप उशीर झाला होता.
डॉक्टरांनी उपचारांची शर्थ केली;पण काहीही उपयोग झाला नाही.वसंताचे दोन्ही डोळे निकामी झाले होते!
गुणवंताच्या एका किरकोळ चुकीने होत्याचे नव्हते झाले होते!
वसंता ठार आंधळा झाला.त्याचा चेहराही विद्रूप झाला होता.
अरविंदा आणि सीतेवर आकाश कोसळले होते.त्यांच्या लाडक्या हसत्या खेळत्या लेकाच्या-वसंताच्या डोळ्यापुढे आणि एकूणच भविष्यावर काळाकुट्ट अंधार दाटला होता.......
(क्रमश:)
©प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020