आघात
एक प्रेम कथा
परशुराम माळी
(28)
प्रिय मित्र प्रशांत
पत्र लिहिण्याचं कारण की कोणता दोष होता असा माझा? काय चूक होती माझी? की तू मला न सांगता असा रागारागाने गेलास. हेच तुझं नि:स्वार्थी प्रेम काय? तूच काय माझ्यासाठी काहीही करायला तयार असणारा प्रियकर? तुझी गरज भागताच तू निघून गेलास! पण मी काय करायचे? संसाराचं सुखी स्वप्न रंगविणारा तू. कुठं गेलं ते तुझं प्रेम? इतकी आतुरता होती, गावची, घरची मग प्रेम का केलंस माझ्याशी, का माझा कामापुरता वापर केलास तू? मी आजपर्यंत तुझी कोणती गोष्ट नाही म्हटली का? तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण केलेल्या आहेत.प्रसंगी सगळयांचा विरोध डावलून. तू माझ्याशी असे वागशील असं कधीच वाटलं नव्हतं. ही अपेक्षा तुझ्याकडून नव्हती. तू माझा विश्वासघात केलायसं, हेलक्षात ठेव. मीच काय परमेश्वरही तुला कधीच माफ करणार नाही. तुझं खरं रूप मला आज कळाले. तुला मी ओळखूच शकले नाही. मला तुझा तिरस्कार वाटतो आहे. तू मुला खूप दु:ख दिलं आहेस. ते कधीही भरुन निघणार नाही.माझ्या असाह्यतेचा फायदा घेतलायसं तू. परीक्षा संपून महिना होत आला तरी देखील एका शब्दानंही तू मला कळविलेलं नाहीस. किती कठोर असेल तुझं मन? एक दिवस एक क्षणही माझ्याशिवाय राहू न शकणार तूच काय तो? असा प्रश्न माझ्या मनाला पडायला लागला आहे. एक क्षणभरही माझा विरह तुला सहन होत नव्हता. मग महिनाभर तू माझ्याशिवाय कसा राहू शकलास? सगळचं खोटं होतं तुझं, तुझं बोलणं, तुझा स्वभाव आणि तुझं ते प्रे . पडद्यावरचं खरं रूप तुझं काय आहे ते मला समजले आहे. इतक्या लवकर तु मला कसा काय विसरू शकलास कदाचित सवयच असावी. सगळयांशी प्रेमाचं नाटक करण्याची, पण लक्षात ठेव. माझी तळमळ माझी तडफड तुला शांत जगू देणार नाही. मला तू असं अचानक एकाएकी लाथाडून फार मोठी चूक केलीयसं. त्याचं प्रायश्चित्त तुला एक ना एक दिवस भोगावं लागेल.
तुझीच होती मी,
आता कोणीच नसेल,
सुमैया.
पत्र वाचून सुन्नच झालो. साध्यासुध्या गोष्टीमुळे माणसाचा केवढा मोठा गैरसमज होतो. एवढं बोलावं मला तिनं? एवढ्या खालच्या मापात तोलाव तिनं? मला खूप वाईट वाटलं. केवढा मोठा गैरसमज झाला तिचा! खरंच मी एवढं वाईट वागलो होतो काय? या प्रश्नाचं उत्तर नाहीच होते. पण काय करणार? शेवटी तिच्या मनाची समजून मला काढायची होती. तिचा गैरसमजमला दूर करायचा होता. मनाशी ठरवलं तिला पत्र पाठवून तिचा गैरसमज दूर करायचा, अन्यथा ति आपल्याला कधीच माफ करणार नाही. पत्र वाचून झाल्यावर पुन्हा एकदा आजोबांनी विचारलंच,
‘‘काय लिव्हलय रं पोरा पतर?’’
‘‘काही विशेष आस काय नाही. सहज लिहिलंय मित्रानं निकालाबद्दलच्या चौकशीसाठी, पेपर कसं गेलतं म्हणून.’’
‘‘पेपर गेल्यातीनं चांगलं?’’
‘‘व्हयं गेल्याती.’’
‘‘ह्या वर्षी बी.ए. पहिला नंबर येणार नव्हं?’’
‘‘व्हयं येणार की.’’
‘‘ह्या बक्षीसाला आपण दोघं बी जाऊया बघ मला पण ने संग.’’
‘‘व्हयं जाऊ की.”
पण यावेळी मी बक्षिसाचा मानकरी ठरणार होतो काय? त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण करणार होतो काय? मला पेपर अवघड जाऊन सुद्धा मी सोपे गेलेत म्हणून सांगत होतो. पण खऱ्या अर्थाने यावेळी माझा पहिला नंबर येणार होता काय?
सुमैयाचा झालेला गैरसमज तर मला दूर करायचा होता. अखेर तिला पत्र लिहायचं ठरविलं. पत्र लिहायला घेतलं.
प्रिय सुमैया,
पत्र वाचलं. पत्र वाचून खूप वाईट वाटलं. तुला थोडं देखील मनाला वाटलं नाही का? मी काहीतरी महत्त्वाचं कारण असल्याशिवाय तुला भेटू शकलो नाही म्हणून? तू इतकी मला खालच्या पातळीत का तोललीस? मी विश्वासघातकी नाही सुमैया तुझ्याबाबतीत तर मी कधीच विश्वासघात करू शकणार नाही. तू माझा जीव-प्राण सर्वस्व आहेस. मी असं तुझ्याशी जाणूनबुजून वागलेलो नाही.काहीतरी कारण आहे. तुझ्याबद्दल असलेलं प्रेम पूर्वी होतं तसंच आहे. आणि मी पूर्वी होतो तसाच आहे. मी बदललो नाही. तुझ्या नजरेत मी पूर्वी जसा होतो तसाच आहे. माझं प्रेम सच्चे आहे. ओठात एक पोटात एक असं माझं नाही. तो तुझा गैरसमज तुझ्या मनातून काढून टाक. तुझ्याबद्दल माझं प्रेम, आपुलकी पूर्वी होती तशीच आहे. मी काय सांगतो आहे हे नीट लक्षात ठेव. त्या दिवशी शेवटचा पेपर संपला आणि आवराआवरी करून झाल्यानंतर तुला भेटायला येणार होतो. पण अचानक अनिल खोलीवर आजी गंभीर आजारी असल्याचं सांगू लागला. मी पटकन माझे साहित्य घेतलं आणि गावचा रस्ता धरला. घरात आलो तर आजी मला कायमची सोडून गेली होती. तुला फोन करून सांगावं तरघरच्यांना संशय येणार. आजी गेल्याच्या दु:खात मी तुला पत्रही पाठवून तुझा गैरसमज दूर करू शकलो नाही. शेवटी तुझं पत्र आलं आणि तुझा माझ्याबाबतचा फार मोठा गैरसमज झालेला आहे. असं समजलं म्हणूनच हे पत्र लिहिलं. निकालाच्या वेळी मी येईनच. त्यानंतर आपण आपली पुढची दिशा ठरवू. पण त्यावेळी आपला जो निर्णय असेल तो अंतिम असेल. भले मग आपल्याला पळून जाऊन लग्न करायचं असल्यास त्यासाठी तुझी तयारी असायला हवी. काहीही असो पण आपल्या या प्रेमाला अंतिम रूप आलं पाहिजे ते म्हणजे लग्नाचं. तू तुझी तयारी ठेव. माझा निर्णय तरी पक्का आहेच. पुन्हा आता माघार नाही. मी येतोच आठ दिवसातच माझी वाट बघ.
तुझाच
आणि फक्त तुझाच,
प्रशांत.
पत्र लिहिलं आणि खूप समाधान वाटलं. कित्येक दिवसांनी अस्वस्थता कमी झाल्यागत वाटलं. मन मोकळं झालं. पत्र टाकायला पोस्टात जाणार तोच
मनामध्ये अचानक विचार चमकून गेला. मी जे हे पत्र पाठवतोय ते जर आईबापाच्या हातात जाऊन पडलं तर? आमचा पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय तो त्यांना समजला तर? पुन्हा आमचं प्लॅनिंग विस्कटणार. पुन्हा तिच्यावरची बंधनं वाढणार? पुन्हा करडी नजर वाढणार आणि माझ्यावर मग कारवाई करायला तिचे आईवडील मागेपुढे बघणार नाहीत. उगीचच त्यांना सावध केल्यासारखं होईल. अगोदरच आजोबा दु:खी कष्टी आहेत. या उतारवयात त्यांना माझ्याबाबतीत काही वाईट घडलेलं सहन होणार नाही. पत्र पाठवून अंगावर संकट बळेबळेच ओढून घेतल्यासारखं होईल.त्याच्यापेक्षा पत्र न पाठविलेलंच बरं. असं वाटून गेलं आणि मी ते मनावरही घेतलं. नाहीतर आणखीन आठ दिवसात आम्ही प्रत्यक्ष भेटणारच होतो. आता मात्र अस्वस्थता खूपच वाढत होती. त्यात निकालाची धास्ती वाढलेली, आपण नापासच झालो तर काय? आपण पुढं काय करायचं? मी नापास झाल्याचं समजलं तर आजोबा काय करतील? त्यांना काय वाटेल? त्यांना फार मोठा धक्का बसेल. आतापर्यंतच्या त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरेल. ही बाब ते खूप मनाला लावून घेतील. ही झाली आजोबांची गोष्ट. जग काय म्हणेल? गल्लीतली, गावातली लोकं काय म्हणतील? थोड्या फार लोकांच्या नजरेत माझी प्रतिमा चांगली आहे. ती या गोष्टीनं पूर्णपणे मलीन होऊन जाईल.गल्लीतली लोक अडाणी असून उपदेशाचे धडे द्यायला सुरू करतील. गल्लीतला बापू तात्या, बोळातली सखू मावशी, शिवू आजी, आंबू आजी काय म्हणतीला?पोरगं वाया गेलं. वाईट संगतीला लागून मातरं झालं. म्हाताऱ्यानं फुकटचं पैसं खर्च करून शहरात घातलं शिकायला. पण त्यानं सगळे पैसे शिक्षणाला घालायचं सोडून चैनीलाच उधळलं. बेकार निघालं पोरगं. म्हातारा-म्हातारीणं ह्या काटर्याला जवळ करायला नको हेतं. म्हातारी तर याच्यासाठी राब राबूणच मेली. याच्या शिक्षणाला सगळा पैसा खर्च केला. पण या पोरानं त्याची जाण ठीवली नाही.बोंबलत शहरातनं दारू पित, पिक्चर बघत, पान तंबाखू खाईत. पोरीच्या नादाला लागत. कसं हुईल पास? अशा रीतीनं सगळी बोलणार, माझ्या नापास होण्याचं कारण एक आसलं तरी त्याला हजार कारणं लावणार, कारण मी नापास झालो होतो.पण थोडासा कुठंतरी विश्वास वाटायचा की नाही आपण नापास नाही होणार, नापास होण्याइतकं आपण पेपर लिहिलेलं नाहीत.
******