Shetkari majha bhola - 7 in Marathi Fiction Stories by Nagesh S Shewalkar books and stories PDF | शेतकरी माझा भोळा - 7

Featured Books
Categories
Share

शेतकरी माझा भोळा - 7

७) शेतकरी माझा भोळा!
कारखाना सुरु झाला व्हता. चेरमनपदी आबासायेबाची निवड झाली. त्येच्यासंग दुसरे धा डैरेक्टर बी नेमले व्हते. कारखान्याचा पैयलाच हंगाम! क्यानालच्या पाण्यावर ऊस लावलेले शेतकरी बी लै व्हते. समद्यांना ऊस पोचवायची गडबड व्हती. सीतापूरात पैल्या नंब्रावर आसणाऱ्या गणपतच्या फडानं मातर मान टाकाय सुरुवात केल्ती. एव्हढया बिगीनं कार्खाना ऊस ऊचलायची काय बी चिन्न न्हवती. ऊसाला एखाद-दुसरं पाणी देवून दीड-दोन म्हैन्यात पुना ऊसाला टवटवीत कराव म्हणून गणपत आन् यस्वदा क्यानालला पाणी सुटायची वाट फात व्हते. मातर पाणी सुटायचा काय बी आंदाज न्हवता. त्या दिशी भर दोपारी नितनेमापरमानं त्येनं क्यानालात डोकावलं. कोरड्याफाक क्यानालातलं धोंडे त्याला वाकड दावू लागले. क्यानालच्या काठाला आसलेल्या लिंबाच्या खोडाला गणपत टेकून बसला. येकदा त्यो क्यानालकडे फायचा तर दुसऱ्यांदा ऊसाच्या फडाकडं ! दोन पुरुष उच्चीचा ऊस मातर जीव नसल्यावाणी दिसत व्हता. टप्पोरेच्या टप्पोरे आसलेले कांडे सुकल्यावाणी झालते. त्येच्या धुऱ्याला लागून आसलेला तात्यासायेबाचा फड मातर मस्तीला आल्यापरमानं डोलत व्हता, त्यांच्या वावरातल्या हिरीची ती करामत व्हती. क्यानालच्या भरोश्यावर न ऱ्हाता, फायजे तव्हा हिरीचं पाणी त्येंनी ऊसाला पाजल व्हतं. गणपतच्या ऊसाला पाण्याच्या दोन पाळ्या मिळाल्या न्हाईत तर फडाला उतरती कळा लागली व्हती.
दोन चार रोज पैयले यस्वदा म्हन्ली, "अहो, तात्यासायेबास्नी ईच्चारुन त्येच्या मोट्रीचं पाणी ऊसाला द्या."
"आगं पर त्ये देतील का?"
"कावून देणार न्हाईत? आपले धा हजार रुपै हायेत. न्हाईच म्हन्ले तर आजूक चार दोनसे रुपै त्येच्या मड्यावर फेकून पाण्याच्या दोनेक पाळ्या करा. ऊस जरासा भरला म्हंजी उतार तर चांगला यील..."
"कोण गणपत? कावून बसलासा?" गणपतजवळ आलेल्या तात्यासायेबांनी इच्चारलं
"उगाचच बसलो मालक, क्यानालच्या पाण्याची वाट फात व्हतो."
"आर आता कहाच पाणी? चार-आठ रोजात नेवून टाक."
"पर मालक औदा समद्या गावानं ऊस लावला हाय. सिवाय परिसरातल्या गावात बी उस खडा हाय. तव्हा येव्हडा ऊस नेयाला कारखान्याजवळ वाहनं आन माण्सं बी फायजेत का न्हाई? ऊस तोडायची परमिसन कारखाना कोन्ला कोनाला देईल. "
"आर बाबा, तस न्हाई कराचं. आसं हातावर हात दिवून गप बसायचे न्हाई. जगरहाटी परमान कराया फायजेत."
"जेग-हाटी?"
"आरं, कार्खान्यावर जावूनशिनी ऊस तोडाची परमिसन देणाऱ्या सायेबाला काय तरी चिरीमिरी देवून तोडीची चिट् घिवून मोकळ व्हावं."
"चिरीमिरी म्हंजी? किती देवाव लागतील?"
"त्ये काय भाजीचं दुकान हाय की सरकारी कोपन हाय? येकच भाव आसाया?"
"तरी बी?"
"आरं त्ये संबंदावर, वळखीवर आवलंबून ऱ्हाते. दोन येकरातला ऊस तोडाचा म्हंजी पाच येक हज्जार लागतील."
"पाच हज्जार?"
"व्हय. पाच हजार न्हाई देला तर तोड व्हयाला दोन तीन म्हैने लागले तर नुकसान कोन्हाचं हाय?
कारखान्याचं की साहेबांचे?"
"मालक, पंद्रा-ईस दिसात दोनेक पाळ्या देल्या तर?"
"देयाला काय बी ना न्हाई पर क्यानालला पाणी आलं तर ना?"
"म्हणजे?"
"आसं बग. या साली क्यानालला पाणी यील याचा आता ईस्वास न्हाई. त्यासाठी म्हतो तू..."
"मालक येक कर्ता का?"
"काय त्ये?"
"मालक, तुमच्या हिरीचं पाणी देता का?"
"माझ्या हिरीचं?"
"न्हाई म्हणू नगसा. मी तुमास्नी ईनवतो. पाया...''
"आर तस न्हाई रे. आस काय बी करु नगस. आर तू का परका हायेस? गणपत आरं पाण्याची येक पाळी देयाची म्हंजे पाच-सात घंटे मोटार चालल. तव्हा लैट बील..."
"मालक, म्या फोकट घिणार न्हाई. आसं करा चौथाई..."
"गणपत, त्याच आसं हाय, चौधाई बिधाई काय न्हाई. तोडीचा कागुद मिळलं कव्हा? ऊसतोडाय कामगार येवाव कव्हा? ऊस तोडाय किती दिस लागतील? काटा कव्हा व्हवावं? पैका मिळायचा बी काही नेम न्हाई. त्यापरीस येका म्हैन्याचं लैटबील तू भरून टाक. म्या अशा झंझटी करत न्हाई पर तू आपला माणूस हाय."
"ठीकाय मालक. मझी तैयारी हाय."
त्याच राती गणपतन तात्यासायेबाच्या हिरीचं पाणी फडाला पाजलं. मोटार रातभर चालली. तात्याची मोटार बंद करून गणपत वावरात आला. ऊसाचा फड आनंदला व्हता. बेभान व्हवून डोलत आसल्याच गणपतला वाटल. गणपत खुसी खुसी घरी आला. घराम्होरी त्येची जीप येखांद्या मड्यावाणी ऊभी व्हती. तिची चारी टायरं बसली व्हती. जीपपाशी कोंडबा ऊभा असल्याचं फावून गणपत म्हन्ला,
"काय झाल रे? कावून मड्याजोळ बसल्यापरमानं हुबा हायेस?"
"त्येच काय बापू, आज जीपीचा हाफ्ता भरायचा हाय."
"हप्ता भराचा हाये? आता मला ईकणार हाईस का?"
"बापू, आस..."
"मंग काय तुला आन् तुझ्या जीपीला ववाळू? मझे दिवाळं काढणाऱ्या तुम्हा दोघायची वरात काढू? या -या जीबीपायी मझं त्ये वावर गेलं. पडून व्हतं पर त्याच्यापायी आव तरी व्हती.. या जीपीवाणी त्येला पोसायची तं गरज न्हवती. बेचारी गुमान पडून व्हती."
"बापू, आता आचारसंहिता लागली त्येला म्या काय करणार की जीप काय करणार?"
"म्हण आच्यारसंहेता? आर ती लागायच्या पैली तुह्या जीपीनं मिळकत ती काय केली? कंदी धा रुपै घरामंदी आले? दोन्दा त्या पोलीसायचे हात भराया सावकारापुडं मला हात पसरावं लागले. त्येचं काय? पोरा, आमी तं आडाणी व्हतो पर तू तं पंद्रावी सिकलास ना? धावी पास झाल्याबरुबर तुला कळाय फायजे व्हत ना, की फुड कालीजात जावूनशानी काही फायदा व्हणार न्हाई त्ये? धावी झाल्यावर तू खरं म्हंजी घरीच ऱ्हाया फायजे व्हतं..."
"पर बापू डिग्री..."
"तुह्या डिगरीला जाळायचं का? त्या डिगरीमुळे घरावर आन वावरावर डिगरी यायची येळ आलीया आन म्हण डिगरी? भाकरीसंग खायाला ग्वाड लागलं कार डिगरी? दोपारपस्तोर भूक धरल का ती डिगरी गिळूनशानी? म्हणं डिगरी? या डिगरीपाबी तू जिंदगानीतून ऊठला की? तुहं आंग कसं मठरल्यावानी झालय. येक डिगरी व्हती आता ही बयाबी घितली ऊरावर. आधीच दुस्काळ आन त्यात ह्यो फालगुनमास! कोठून भरणार हायेस रे हप्ता?"
"अव्हो, झाल काय? आस रस्त्यावर कावून..."
"इच्चार तुह्या लाडल्याला. हाट्टीला पेटून ह्ये मडं ईकत आन्ल आन आत्ता ईचा हाफ्ता भरायचा हाय."
"मंग काय झालं? भरा की..."
"म्हण भरा की. ती काय गरामपंचायतीची घरपट्टी हाय की शाळेची फी हाय?
"कोंड्या, किती रुपै भरायचे हात रे?
"माये, ईस हजार तरी भरावं लागतील..."
"आता गं माय! इस हज्जार? आता हो काय कराव?" यसोदानं इचारलं.
"म्या काय सांगू? तव्हाच म्हण्ल व्हत... नग रे बाबा पर तव्हा पोराबरूबर तुला बी पख फुटले व्हते. लागली व्हती आबाळात उडाया. आत्ता..."
"झाल ते झाल. त्येच.... त्येच रडगाण गावून काय व्हणार? लेकराची चूक झाली ती आपूनच निस्तराय फायजेत."
"निस्तरावं तं लागलच की. टाक ईकुन ती जीप..."
"अव्हो, पर कोण घिणार?"
"दुकान मांडल्यावर काय, आज ना उंद्या कोणी तरी गिऱ्हाईक गावल की."
"आव्हो, आस्स करा ना, आबासाब या तात्यासायेबाला इच्चारुण तर फा."
"आग पर पैलेच दोघायन बी..."
"धोखा देला हाय. पर आत्ता समद कस सम्द सपष्ट बोलून घ्या. नगद रकमेचा चोक येवहार करा."
"बरं फातो." आसं म्हणत गणपत तात्यासायेबाकडे गेला पर तात्यासाहेब कोन्त्या तरी गावाला गेल्ते. चार-पाच दिस येणार न्हवते. गणपत मंग आबसायेडाकडे गेला. त्ये घरीच व्हते. आजुबाजुला कोन्ही नव्हतं. गणपतला फाताच आबासायेब तोंडदेखल्यावनी म्हण्ले, "ये गणपत."
"मालक, आज घरीच?"
"काय करणार बाबा. लोकायच्या कल्याणासाठी साखर कारखाना काढला आन् वांधाच झाला."
"त्ये कसं?"
"आर, क्यानाल झाला, पाणी बी यायलं, गावाजवळ कारखाना बी काढला. मातर येड लागल्यावाणी समद्या कास्तकारानी ऊसच लावला. गणपत, आर येकच काय पर धा कार्खाने बी झाले ना तर ऊस ऊबाच ऱ्हाईल. आता आमी चेरमन हावोत ना तव्हा लोक आमाला त्वांड काढू देईनात."
"मालक, आस झालं हाय खरं. गेल साली समद्यायनी पपयाच लावल्या आन् समद्या सडल्या. पराडल्याळ साली ज्येन त्येन गोभीच लावली."
"येडपट हाय जन्ता. बर तू कावून आल्ता? ऊस नेयाचा म्हन्शील तर म्हेनाभर वाट फावी लागल."
"मालक, ऊसालं म्या थांबतो पर दुसरच काम हाय."
"बोल..."
"कोंडबाची जीप..."
"हां..हां...किरायानं लावाची व्हती पर आता इलक्सन लांबल..."
"कावून मालक?"
"आरं बाबा राजकारण हाय. कोणी तरी कोरटात केस टाकली आन् इस्टे मिळवला. आता कव्हा व्हतील काय सांगता येत नही. तुव्ह पोरगं बी येडं हाय..."
"काय झालं मालक?"
"आरं, त्येला म्हन्ल व्हत की, जीप कारखान्याला लाव. जीवीचा सम्दा खर्च कार्खाना करलं आन तुला बी ड्रावर म्हून ठिवतो पर तुव्ह पोरगं म्हंजी लाटसाब! जीप घेतली न्हव. तव्हा त्येला दुसऱ्याच्या हाताखाली काम कराया कसं जमल?"
"मालक, पोरगच हाय त्ये. चुकल आसल त्ये. म्या माफी मागतो आता काय जमाल का?"
"न्हाई. आमी चार जीपी किरायाने लावल्यात म्होरच्या सिजनला बगू."
"मालक, जीपीचा हाफ्ता आज भरायचा हाय. क्यानालात गेलेल्या मझ्या जिमिनीचा पैका..."
"गणपत, कावून उकंडे ऊकरतो रे बाबा? आर त्यो प्रश्न म्या कवाच मिटवला हाय. त्या पैक्याचा आन् मझा काय बी संबद न्हाई."
"मालक, तुमीच आस ऊडवून देणार आसल तर म्या कोठ जावावं? म्या आता आसा ईच्यार करतूया की..."
"हा...हा... बोल.... बोल की."
"जीबीची जाळभाज करावं."
"नग, आर, आस करु नगस. आता इलक्सन लांबलच हाय तं चार- दोन दिसात जीपा सुरु व्हतील मंग हाती पैका बी यील."
"नग मालक, नगच. तव्हाच त्ये मडं घेयाला नगं व्हत. मझ्या तं बिलकुल मनात नव्हत. हातरुण फावून पसराव ह्येच खर पर यस्वदा आन् कोंडबाचा लैयच हाट व्हता आन् मंग मह्या त्वांडाला बी पाण्याची हाव सुटली."
"गणपत, जीप सांबाळणं म्हंजी वाघ सांबाळण्यावाणी हाय."
"खरं हाय मालक, तव्हा जीपीला..."
"गणपत, त्येच काय हाय जीप म्हंजी काय वावर न्हाई. आर्ध्या राती बी गिन्हाईक लागाया. आजकाल लोक जीबीपरीस लक्झऱ्या घेयालेत. तव्हा तुह्या जीपीला गिऱ्हाईक मिळल आस मला वाटत न्हाई "
"न्हाई मालक, आस म्हणू नगसा"
"गणप्या, खरं सांगतो रे बाबा आणिक आस हाय तुझ्या बायकुचं त्वांड लै वंगाळ हाय त्या क्यानालच्या पैक्या संबंदानं लोकायजवळ मह्याच नावानं शिमगा केला. त्यो शब्द न शब्द मह्यापस्तोर आला..."
"तिच्या बोलण्याकडं नगा ध्येन देवू मालक. त्वांडानं वंगाळ हाय पर लै गुणाची हाय. मनात काई बी ठिवत न्हाई.''
"त्ये तुह्यासाठी आसल. बर जावू दे. म्या आज बैंकत जावूनशानी जीपीचे किती हाफ्ते ऱ्हायलेत त्ये फातो. तू आस कर सांच्या पारी ये. मंग फावूता."
गणपत "बर" म्हणला आन् घरी येवून त्येन सम्द यस्वदा आन् कोंडबाला सांगलं. न्याहारी करुन त्यो कार्खान्याच्या साईटवर निघाला. रस्त्यातल्या कलाकेंदराचा धंधा लै तेजीत व्हता. कार्खान्याला ऊसाचा माल नेता येत न्हवता आन् कलाकेंदरात माल मावत न्हवता. कार्खान्याच्या येटाळीतले धा-येक गाव केंद्रातल्या बायांनी पुर्ते नागवे केलते. या बायाची नदर सोतावर पडाव म्हून बायकुची नदर चुकवून धा-पाच हजार रुपै घेवून लोक येयाचे आन् राततून नंगे व्हवून घराला जायचे. मोठे-मोठे कास्तकार आळीन फळ पोखरावं तशे पोखरल्या गेले व्हते पर कोणाचे डोळे उघडत न्हवते. त्या बायानी काय जादू केली व्हती कोण जाणे. उन्हाला ईस्कटलेल्या आवस्थेत बसलेल्या बायावर येक नदर टाकीत गणपत कारखाना साईटवर पोचला. तेथे ह्ये तोब्बा गरदी. हजारो कास्तकार वावरातलं काम सोडून ऊस तोडणीसाठी जमले होते. डारेक्टर लोक बी जमले व्हते. समदे लोक त्येंना भंडावून सोडत व्हते पर त्ये लोक बी गोंधळले व्हते.
"तुमचं समद खर हाय. आमाला तरी कारखान्याचा आनुबव हाय का? मझा सोत्ताचा ऊस बी जाग्यावरच वाळून जात हाय की. आमाला बी तोडचिट आजूक मिळत न्हाई. आमाला येगळ समजू नका. आमी बी तुमच्यासंग हावोत."
"कोठून डिरेक्टर झालो त्ये काय कळत न्हाई. उगाच दुस्मानकी वाढत्येय."
"आर, मग कुर्सी सोडा की रं."
"आमी कोठ ढुंगणाला डीग लावून बसलोत? आस कातावून चालायच न्हाई."
"ये गणपत ईकडे ये. वांझोट्या गप्पायमंदी काय बी राम न्हाई. ह्ये भडवीचे पक्के वस्ताद हायेत. मुडद्याम्होरं रडायचं नाटक करतील पर नदर मातर मुडद्याच्या बायकूवर ठिवतील. मड्याच्या त्वांडात तूप घालतील आन त्येच बोट सोत्ताच्या त्वांडात घालतील. तुला ऊस तोडीची परमिशन फायजेत का?"
"व्हय. "
"तर मंग चल.पर पैका देवावं लागल."
"कित्ती?"
"त्ये आत्ता समुरासमुर फायनल करुत की." गणपतचा दोस्त ईलास म्हन्ला आन गणपत ईलासच्या माघुमाग गेला. कार्खान्याच्या म्होरच आसलेल्या 'शेतकरी निवासात' दोघंबी शिरले. येका खोलीच्या दारावर ईलासनं टकटक केली. जरा येळानं दार उघडलं. दोघे मंदी शिरले.
"बसा." त्यो सायेब म्हणाला.
"सायेब, ह्यो सीतापुरचा गणपत हाय."
"म्हणजे चेअरमनच्या गावचा?"
"व्हय. सायेब, बाईला जसा कुक्काला आदार म्हून नौरा आस्तो का न्हाई तसं चेरमन आन सीतापुरचं हाय. ईकडं शेतकऱ्यायचा जीव चाल्लाय आन् त्यो त्वांड लपून बसलाय. बरं ते जावू द्या. आमच्या या गणपतचा ऊस तोडायचा हाय.''
"त्याचं काय आहे, सध्या फार रश आहे. परमिशनची जवाबदारी माझी आहे परंतु मुकरदम आणि कामगारांची ग्यॉरंटी मी घेणार नाही."
"त्यांचं आमी फातो. तुमी फकस्त तोडीची पावती द्या."
"ठीक आहे. तुमचं नाव सांगा. उद्या दुपारी बारा वाजता पावती घेवून जा. हां, येताना दहा हजार रुपये घेवून या."
"धा हजार? सायेब, लै झाले हो."
"हे बघा, तुम्ही चेअरमन साहेबाच्या गावचे आहात आणि विलासची माझी ओळख आहे. पैसा द्यायचा नसेल तर राहू द्या. नंबर लागेलच ना तुमचा."
"कव्हा लागल?"
"ते मी तरी कसं सांगू? लागला तर उद्याही लागेल नाही तर महिना-दोन महिनेही लागतील. बाहेर बसा त्या खिडकीजवळ."
"गणप्या, सायेबाचं खरं हाय. चिट मिळाया नंबर लागेस्तोर ऊस उबा वाळून जायचा..."
"आर तरी बी दहा हजार म्हणजे?"
"सायेब, गणपत्या म्हंतो त्ये खर हाय आन् तुमचे बी खर हाय. आसं करा सात हज्जारावर फायनल करा"
"हे बघा. आता तुम्ही म्हणता म्हणून पण हे बाहेर कुठे सांगायचं नाही. चेअरमनच्या कानावर तर बिल्कुल जावू देवू नका."
"त्येची चिता नगं. तेरी भी चूप, मेरी भी चूप!"
बाहीर आल्यावर गणपत म्हन्ला, "ईलाश्या, आता रे कस?"
"आस हातपाय गाळू नगस. हे फाय, नीट ईचार कर. या सायेबाचे सात हजार, मुकीरदमाचे पाच हजार, तोडीला घेणाऱ्या कामगारांचे धर पाच हजार आसं कर, ईस येक हज्जाराची येवस्था कर."
"बाप्पा रे! हे.. हे.. व्हईल आसं मला वाटत न्हाई. ईलास रातीतून ईस हजाराची येवस्था म्हंजे तुला काय वाटलं...."
"मला समदं ठाव हाय. हे फा, तुहा ऊस कित्ती हजाराचा व्हईल?"
"त्ये काय सांगू बाप्पा?"
"आर, तुहा ऊस म्हंजी गावात येक नंबर हाय ना, दोन येकरात किती बी न्हाई म्हन्लं तरी दिड-दोन लाख रुप्पये मिळायाच फायजेत. तव्हा आसं करु..."
"कस्स?"
"आपून ऊसाच्या बोलीवर म्हंजी महिनाभरासाठी रुपै सवाईनं काढुता."
"कोण दिल? आर, या रांडायनं समद्यायला चुरु चुरु खाल्ल हाय. कोन्हाजवळच पैका न्हाई . आतमंदी सम्दे पोखरलेले हाईत, नुस्ता डामडौल हाये. बडा घर पोकळ वासा."
"हाय हे बी खर हाय. पर तुला पैक्यासी मतलब ना. चल ये."
"कोठ? येथं? नको रे बाबा. जिंदगानीत यस्वदीसिवाय..."
"आर, त्याच्यासाठी न्हाई रं....येथं याजान पैका बी मिळत्यो."
"काय? या बाया पैका याजान देत्यात?"
"व्हय रं बाबा! आर, आपली ऊसाची कमाई हातात पडायला न्हाई म्हन्लं तरी बी दीड-दोन वरीस लागत्यात तेव्हढा पैका येथ एका रातीत जमा व्हतो."
"खरं सांगतो ईलाश्या?"
"कव्हा रातच्याला येवून तर फाय. ही मोठी जतरा ऱ्हाती. आपला येकच गाव न्हाई तर या बायानी धा-बारा गाव लुटले हाईत. रोज लाखो रुपये मिळत्यात मंग आस आगल्या नडल्याला बी पैका देत्यात... ऊसना...याजानं."
"तू म्हन्तोस तर मग चल..."
ईलास फूड आन् नवस फेडाया जाणा-या बकरीच्या चालीन, गणपत त्याच्या मांघ-मांघ थरथर कापत कलाकेंदरात शिरला. तेथं कसं न्यारंच वार व्हतं जलमभरात दुसऱ्या बायकाची तर सोडा पर यस्वदीचीबी छाती कव्हाच नीट फायली न्हवती आन तेथल्या बाया दिवसाढवळ्या आर्ध्या पेक्शा जास्त छाती ऊघडी ठिवून हिंडत व्हत्या. पराया मान्सासमुर यस्वदीचा पदर कव्हाच ढळला न्हवता पर या बायांना पदर काय ते जस गावीच न्हवतं. यस्वदीचा डोळा कंदी फडफडल्याच गणपतला आठवत न्हवत पर त्या बायांच्या पापण्या येकसारक्या लवलवत व्हत्या.
ईलास आन् गणपत येका खोलीत शिरले. त्या खोलीत बी दोघी-तिघी बाया व्हत्या. अंगावर कपडे आसून बी नसल्यासारके व्हते. त्या दोघायकडे येगळीच नजर टाकत त्या बाया गणपतला खेटून खोलीबाह्येर गेल्या. तव्हा गणपतला कस मळमळल्यावाणी झालं.
"या विलासराव या. आज दिवसाढवळ्या आमची बरीच आठवण झाली."
"मालक, ह्यो गणपत. सीतापुरचा हाय."
"बरं बर ! पण आसं दिवसा..."
"तसं काय न्हाई. गणपत त्येतला न्हाई. ह्येचा पाच येकराचा ऊस आस्सा खडा हाय. परस्थिती जरासी नाजूक हाय. ऊस कार्खान्यावर नेयाचा हाय."
"समजले. किती रुपै फायजेत?"
"जास्त न्हाई पर तीस हजार."
"ऊसाच्या बोलावर सदतीस हजार घेईन. मंजूर?"
"ठीक हाय."
नायकानं लगोलग तीस हजार रुपै देले. गणपत आन् ईलास बाहेर पडले. इलासने पच्चीस हजार रुपये गणपतला देले आन् म्हन्ला,
"गणप्या, पाच हजार रुपै घेतो. दोन चार दिसात देतो. मझ ऊसाचं बील मिळणार हाय.तू जा." म्हन्ता म्हता ईलास पुना कलाकेंदरात घुसला आन गणपत सीतापुर कडं निघाला...
०००नागेश शेवाळकर