Rakhandar - 1 in Marathi Moral Stories by Amita a. Salvi books and stories PDF | राखणदार. - 1

Featured Books
  • આંખની વાતો

      પુષ્ટિ  બગીચામાં ફરતી હતી અને પોતાના ભૂતકાળની વાતો યાદ કરત...

  • ભાગવત રહસ્ય - 149

    ભાગવત રહસ્ય-૧૪૯   કર્મની નિંદા ભાગવતમાં નથી. પણ સકામ કર્મની...

  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

Categories
Share

राखणदार. - 1

राखणदार.

प्रकरण १

गावाबाहेर मोठ्या वडाच्या झाडाखाली गावातले काही रिकाटेकडे गप्पावीर तुक्या नरसू, शिवा आणि इतर दोनचारजण बसले होते. भरदुपारची वेळ असली; तरी गर्द पानांमुळे झाडाखाली चांगली सावली होती.

" सूर्य डोक्यावर आला. कडकडून भूक लागलीय. मी बाबा घरी चाललो!" शिवा म्हणाला. आणि उठू लागला.

"थांब की रे थोडा वेळ! एवढी कसली घाई ? " नरसू त्याला थांबवत म्हणाला.

"गजाली मारत सकाळपासून बसलोय! अजून पुरे नाही झालं? माझ्या पोटात पण कावळे ओरडायला लागलेयत ! संध्याकाळी परत येऊ! " तुक्यासुद्धा निघायच्या तयारीला लागला.

" अरे पण माझी मनीआॅर्डर यायचीय ! इथेच घेतली; की थोडे पैसे माझ्या खर्चाला काढून ठेवता येतात. एकदा बायकोच्या हातात पैसे गेले; की महिनाभर तिच्या मिनतवा-या कराव्या लागतात. थोडा वेळ थांबा की रे! पोष्टमन कदम येईलच एवढ्यात! " नरसू आता चक्क विनवण्या करू लागला.

"तू एकटा बस त्याची वाट बघत! आम्ही निघतो. ऊन पण खूप वाढलंय." शिवा आता वैतागला होता. पोटात ओरडणारे कावळे आता मैत्री पुरे; असं ओरडून सांगत होते. सकाळी फोडून दिलेला कच्चा फणस मसालेदार भाजीच्या रूपात डोळ्यासमोर दिसत होता. बरोबर गरमागरम- भाक-या--- कधी एकदा घरी जातो असं त्याला झालं होतं.

"मी? आणि इथे एकटा? काय बोलताय तुम्ही? ह्या झाडाखालून जाताना किती जणांना 'ती'नं झपाटलंय हे विसरलात ? " नरसू थरथरत म्हणाला.

"अरे ह्या वयात एखादी सुंदरी गळ्यात पडत असेल; तर एवढा घाबरतोस कशाला? " तुक्याने मस्करी केली.

"तू तिला बघितलंयस? ती सुंदर आहे; हे तुला कसं माहित?" नरसू आता त्याला चिडवू लागला.

"मी ऐकलंय! माणसाला आकर्षित करायला 'त्या' सुंदर स्त्रीचं रूप घेतात!" तुक्या मागे हटणारा थोडाच होता?

"आणि नंतर त्यांनी खरं भयंकर रूप दाखवलं; की माणूस घाबरून वेडा होतो!" नरसू म्हणाला.

"तुझ्या मागे भयंकर कोणी लागली ; तर घालवून लावायला तारा वहिनी खमक्या आहेत ना? तुझ्यासारख्या घाबरट नाहीत त्या!" तुक्या नरसूची पाठ सोडत नव्हता.

" त्याला चिडवू नका रे! हे बघ नरसू! ह्या सगळ्या वदंता आहेत. आणि दिवसा- उजेडी काय होणार आहे? " एकजण म्हणाला.

"टळटळीत दुपार झालीय. या वेळात एकट्या- दुकट्याला 'ती' हमखास पछाडते. जाऊ देत पैसे! मी पण निघतो" नरसू वैतागून उठला. त्या झाडावरच्या हडळीच्या अनेक कथा त्याने ऐकल्या होत्या.

शिवाने त्याच्या खांद्यावर हात दाबून त्याला खाली बसायचा इशारा केला." घाबरू नको! ते बघ तानाजीराव येतायत! बघ कसे रुबाबात चालतायत! कशाला घाबरतायत का? त्यांना थोडा वेळ तुझी सोबत करायला सांग! शेतावर निघालेयत बहुतेक; पण थांबतील थोडा वेळ! आम्ही निघतो. नाहीतरी आमची त्यांच्याबरोबर इकडतिकडच्या गोष्टी करायची हिंमत नाही . त्यांचे उपदेशाचे डोस चालू होतील. गप्पांमध्ये वेळ घालवलेला त्यांना बिलकुल आवडत नाही. आमच्यासाठी इथून निघालेलं बरं! " तानाजीराव जवळ येताच त्यांना हात जोडून सगळे निघाले.

********

अनंतपूरचे तानाजीराव त्यांच्या बेडरपणासाठी आजूबाजूच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होते.जिल्ह्यातील कुस्तीमध्ये कितीही आडदांड पैलवानाला दोनचार डावांतच पाणी पाजण्याचं कसब त्यांच्याकडे होतं. पिळदार देहयष्टी आणि बेदरकार दृष्टी---- समोरच्या माणसाची नजर आसूकच खाली जात असे. घरची भरपूर शेती-वाडी आणि पूर्वजांपासून चालत आलेला भव्य वाडा वारसा हक्काने मिळलेला असल्यामुळे उदरनिर्वाहाची सोय करण्याची डोकेदुखी नव्हती. सगळं लक्ष पैलवानीकडे देणं त्यांना सहजशक्य झालं होतं.

घरची व्यवस्था पहायला घरात भरपूर माणसं होती. त्यांची पत्नी कांता, दोन मुलगॆ-दिलीप आणि राजू आणि मुलगी राधा यांचीही काळजी करण्याची वेळ त्यांच्यावर कधी आली नव्हती; कारण त्यांचे दोन भाऊ मोहन आणि शांताराम--- त्यांची बायकामुलं मिळून घरात वीस पंचवीस माणसं होती. एकमेकांचं हवं - नको आपलेपणानं बघितलं जात होतं.

दिवस उजाडला, की तालमीत जाणं, त्यानंतर घरी येऊन न्याहारी झाली; की शेतावर जाणं; हा त्यांचा नेहमीचा शिरस्ता होता. शेतीवर मात्र त्यांचं पूर्ण लक्ष असायचं. त्या कसदार जमिनीचं त्यांनी सोनं करून दाखवलं होतं. ज्वारीबरोबरच द्राक्ष, ऊस याचं विक्रमी पीक निघायचं. शिवाय आंबा -फणस- चिकू- पेरू - सिताफळं यांचंही विक्रमी उत्पन्न ते घेत असत. फळांबरोबरच झेंडू , सूर्यफूल, गुलाब यांनाही शहरामध्ये खूप मागणी होती. एकूण काय? तर शेतीवर कष्ट करून फक्त त्यांनी एवढं मोठं कुटुंबच सांभाळलं नव्हतं; तर ऐश्वर्यही मिळवलं होतं.

भीती नावाची गोष्ट तानाजीरावांना माहीत नव्हती. नरसू नात्यानं त्यांचा लांबचा काका होता. दोघांच्या परिस्थितीमध्ये आणि मानसन्मानामध्ये जमीन-अस्मानाचं अंतर होतं. पण नात्याचा ओलावा कायम होता. त्याला एकट्याला झाडाखाली उभा पाहून ते थांबले.

"काय रे नरसूकाका? तुला एकट्याला टाकून घाईघाईत कुठे गेले सगळे?" त्यांनी घाईघाईने गावाकडे परतणा-या नरसूच्या मित्रांकडे बघत हसत हसत विचारलं.

" त्यांना भूक लागलीय; म्हणून सगळे गेले. मी पोस्टमन कदमची वाट बघतोय! थोडा वेळ थांबशील माझ्या बरोबर?" नरसूने विनंती केली.

"-- मनोहरच्या मनिआॅर्डर वाट बघत असशील ! अरे काका! अजून म्हातारा झाला नाहीस तू! चांगला धडधाकट आहेस! फुकटच्या गप्पा छाटत बसण्यापेक्षा झाडांची काळजी घे! जमिनीची मशागत कर. स्वतःपुरतं तरी थोडं काही कमव! स्वाभिमानाने जग! तिकडे तुझ्या मुलालाही त्याच्या जबाबदा-या आहेत! हल्ली शहरामध्ये घर चालवणं सोपं नाही. मुलांच्या शाळांची फी ऐकलीस तर तुझे डोळे गरगरतील. तरी आई - बापाची काळजी आहे म्हणून न चुकता दर महिन्याला पैसे पाठवतो! त्याची किती ओढाताण होत असेल याचाही थोडा विचार कर!" तानाजीरावांनी नरसूला समजावण्याचा प्रयत्न केला. अर्थातच हे उपड्या घड्यावरचं पाणी आहे; हे त्यांनाही माहीत होतं. मनिआॅर्डर हातात पडली; की नरसू सगळं विसरून जाणार होता. पुढची मनिआॅर्डर हातात पडेपर्यंत विड्या फुंकत मित्रांबरोबर चकाट्या पिटणं काही थांबणार नव्हतं.. गावात त्याच्यासारखे शहरातून येणा-या मनिआॅर्डरवर जगणारे अनेक सवंगडी त्याला साथ द्यायला होतेच!

" तू थांब कदम येईपर्यंत! मला उशीर होतोय! दिवस उतरण्यापूर्वी जमिनीची भाजणी करायची आहे! उशीर झाला तर गडी बसून रहातील. त्यांचं जेवण घरून मघाशीच शेतावर पाठवलंय. जेवल्यावर लगेच कामाची सुरूवात केली तर संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल. उद्या त्यांना दुसरीकडे जायचं आहे. पुढच्या आठवड्यात मला सुद्धा तालुक्याला जायचं आहे. आज वेळ घालवून चालणार नाही. मी निघू का?" त्यांनी विचारलं.

"जरा वेळ थांबशील का? आता कदम यायची वेळ झालेलीच आहे! " नरसूकाकाने विनंती केली. त्याला पण आता ह्या तानाजीच्या भरवशावर उगाच इथं थांबलो; असं वाटत होतं. सगळ्यांबरोबर गावात न गेल्याबद्दल त्याला आता पश्चात्ताप होत होता. शेतीचं काम सोडून तानाजी फार वेळ इथे थांबणार नाही; याची त्याला खात्री होती.

"एवढा काय घाबरतोयस? " त्याच्या भीतीचं कारण माहीत असूनही तानाजीरावानी खोचकपणे हसत विचारलं.

" तुला तर माहीतच आहे मी भुता-खेताच्या बाबतीत किती भित्रा आहे. याउलट तू कोणालाच घाबरत नाहीस. मी साधासुधा माणूस आहे! पैलवान गडी नाही." नरसू म्हणाला. पैशांचा मोह सोडून आता गावात जायचं म्हटलं; तरी त्याला आता शक्य नव्हतं. गावापर्यंतचा रस्ता या वेळी गर्द झाडीतून एकट्याने चालण्याची त्याची हिंमत नव्हती. पोस्टमन आला असता; तर गावापर्यंत त्याची सोबत आपोआपच मिळणार होती.

"भित्यापाठी ब्रम्हराक्षस- हे वाक्य विसरलास का? मुळात मन घाबरता कामा नये! मग किती मोठा समंध आला तरी आपलं काही वाकडं करू शकत नाही. घाबरून गेलेल्या माणसावर कबजा करणं भूतच काय-- सर्वसाधारण माणसांसाठीही अगदी सोपं असतं. खरं म्हणजे भुतांपेक्षा माणसांपासूनच जास्त जपून रहायला हवं. कारण आपल्यातील कमतरतेचा फायदा माणसंच जास्त घेतात. तुझंच उदाहरण घे! तू एवढा भित्रा आहेस हे कळलं, तर तुझा एखादा हितशत्रू तुला खोटी भिती दाखवून अर्धमेला करेल. " तानाजीराव म्हणाले.

"तू तर रात्र भुतांबरोबर घालावली आहेस; गावात ती गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणून तर या पंचक्रोशीत तू सगळ्यांचा हीरो आहेस! पण मी मात्र या बाबतीत खूप भित्रा आहे बुवा! ---- बघ आपण बोलत होतो --- आणि कदम कधी बाजूला येऊन उभे राहिले कळलंही नाही. जा आता ! तुझ्या कामाची खोटी व्हायला नको! मी यांच्याबरोबर गावात जातो." नरसूने मनिआॅर्डर घेतली; आणि पोस्टमन बरोबर गावाकडे निघाला. तानाजीराव त्यांच्या शेताकडे निघाले. पण नरसूने त्यांना ज्या प्रसंगाची आठवण करून दिली होती; तो दिवस वारंवार त्यांच्या डोळ्यासमोर येऊ लागला आणि त्यांचं अंग शहारलं. शेजारच्या गावात ---आडगावला त्यांच्या आत्याला भेटायला ते गेले होते. तिच्या घरी घडलेली ती थरारक गोष्ट---- .

*********

contd. ..... Part - 2