Madiralay in Marathi Comedy stories by Pradip gajanan joshi books and stories PDF | मदिरालय

Featured Books
Categories
Share

मदिरालय


रावसाहेब आज दिवसभर बेचैन होता. गावातील बड्या आसामीपैकी एक म्हणजे रावसाहेब. गडी देशी नाही मात्र विदेशी बाटल्यांचा मोठा शौकीन. फिरायला म्हणून कुठं बाहेर गेला की त्याची बॉक्सनेच खरेदी. सगळे विदेशी प्रकार गड्याचे तोंडपाठ. नुसता बाटलीचा रंग बघून पाण्याबरोबर घ्यायची की सोड्याबरोबर की नुसतीच याचा ठोकटाळा त्याचा कधी चुकत नसे. एकपरी जेवण नरम असले तरी गडी चालवून घ्यायचा मात्र पेय कसे अंगात शिरशिरी आणणार हवं हे एकच त्याचे सूत्र. विदेशी घेत असला तरी गडी उपद्रवी मात्र न्हवता.
जवळजवळ दोन महिन्याहून अधिक काळ लोटला होता. त्याला नेहमीसारखी मनसोक्त विदेशी बाटली काही हाती लागली न्हवती. त्यामुळे गडी अगदी बेचैन झाला होता. त्याचे कशावर लक्ष लागत न्हवते. रात्रीची मैफल नाही म्हटल्यावर मित्रानी देखील त्याची बऱ्याच दिवसात भेट घेतली न्हवती. एरव्ही गडी एकदम तर्र असायचा. बाटली शिवाय पठ्ठ्याला जेवण सुद्धा जात न्हवत. एकदम इतका गॅप पडल्याने त्याला काही सुचत न्हवत. फारसा शिकलेला नसला तरी विदेशी कंपन्यांची नावे मात्र तोंडपाठ होती. दोन चार पेग टाकून झणझणीत रस्स्यावर ताव मारणारा गडी रातच्याला मिळमिळीत जेवण करून सर्वाना शिव्या हासडून झोपी जात होता. नवऱ्याची ही आवस्था बघून त्याची बायको काळजीत असली तरी मनात मात्र खुश होती.
आज रावसाहेब नेहमीप्रमाणे जेवण उरकून झोपी जाण्याच्या तयारीत होता. जाता जाता महत्वाच्या बातम्या काय आहेत हे पाहण्यासाठी त्याने टीव्ही सुरू केला. उद्यापासून मदिरालये सुरू होणार असल्याची बातमी त्यांन ऐकली. मदिरालय सुरू होणार म्हणजे नेमकं काय सुरू होणार हे काही त्याला कळलं नाही. त्याच तंद्रीत तो झोपण्यासाठी निघून गेला. मोठा दिवा बंद करून मंद प्रकाशात अंथरुणावर पडून तो इचार करू लागला. त्याला देवालय, मत्स्यालय, रुग्णालय, ग्रंथालय, दुग्धालय हे शब्द माहीत होते. मदिरालय या नव्या शब्दाची भर त्याच्या शब्दकोशात पडली. हा शब्द त्याला नवीन होता. विचार करत करतच झोप कधी लागली हे त्याला देखील कळलं नाही.
सकाळी गडी उठला व्यायामासाठी बाहेर पडला. रस्त्यातच त्याला त्याचा बैठकीतला मित्र शामराव भेटला. ते तर पक्क मदीराभक्त होत. ते पण बरेच दिवस पेग न भेटल्यानं वैतागल होत. रावसाहेबान त्याला बोलता बोलता मदिरालय म्हणजे काय असं इचारताच ते “ काय झालं काय सुरू?” अस जोरात किंचाळल. रावसाहेबान ओळखलं आपण ज्याच्या शोधात होतो ते आता आपल्या हाती पडणार. मदिरालय म्हणजेच दारूचं दुकान, म्हणजेच बार हे समजलं अन व्यायाम न करताच ते घरी आलं. स्वारी आज व्यायाम करून खुशीतच घरी लवकर परत आल्याचे बघून त्याची बायको काय समजायचं ते समजली. त्यांन चहा घेतला नाष्टा केला. विहिरीवर जाऊन आंघोळ करून आलं. ताजतवान होऊन बायकोला म्हणाल,” मी जरा गावातन जाऊन येतो. “
गेलं ते तडक मदिरालय गाठलं. अजून दुकानाच मालक पण आलं न्हवत. बघतय तर लांबलचक रांग लागलेली. त्याच्याआधी पहाटे पसन शौकीन आपापली जागा धरून बसलेले. त्याला बघताच समध्यांनी माना खाली घातल्या. त्यांन नोकराला हाक दिली अन इचारल,”काय र कधी सुरू करताय?” ते म्हणाल,” मला काय बी ठाव नाय. मालकान सांगावा दिला जसा असशील तसा शॉप कड ये. म्हणून धावत पळत आलो”
कसही असलं तरी रावसाहेब शिस्त मोडण्यातल न्हवत. ते आपलं गपगुमान बार कधी उघडतोय याची वाट पहात थांबलं. बारच्या मालकांन बसून पिणारासाठी आत सोय केली होती. ज्याला घरला पार्सल घेऊन जायचं होतं त्याच्यासाठी वेगळी सोय होती. दोन्ही ठिकाणी लांबलचक रांगा लागलेल्या होत्या. गप्पा मारत मारत प्रत्येकजण टाईम घालवत होत. आज घेतल्याशिवाय घरी जायचं न्हाय असा समध्यांनी पणच केला होता.
तेवढ्यात सायरनचा आवाज ऐकू आला. समध्यांनी कान टवकारल. पोलीस अन अधिकारी आलं होत. रांगतली समधी माणस घाबरली. त्यांना पाहताच काढता पाय घेऊ लागली. बघता बघता निम्मी गर्दी कमी झाली. हौशी मंडळी तेवढी जागेवरन हलली नाहीत. अधिकाऱ्यांनी जमीनीवर गोल आखले. प्रत्येक गोलात एकेकाला उभे राहण्यास सांगितले. तेवढ्यात मालक आला अन एकच गलका सुरू झाला. मदिरालयाच्या मालकान शॉप उघडलं. धूळ झाडली देवाजवळ उदबत्ती लावली. करमणुकीसाठी रेडिओ सुरू केला. गाणं वाजू लागलं,” दो घुट मुझे भी पिला दे, देख फिर होता है क्या?”
बार, दुकान एकाच वेळी उघडण्यात आलं. गल्ल्यावरची माणस दोन्हीकड येऊन बसली. लोकांनी आपलं बाटली घरी घेऊन जाण पसंत केलं. तेवढ्यात पत्रकारांची एक टीम तेथे टपकली. त्यांनी सर्वात आधी रावसाहेबाला गाठलं. एका पत्रकारांन विचारल,” आपण कधीपासून घेता? आपणास हे व्यसन कसे लागले?”
रावसाहेब शांतपणे म्हणाला, “ हे बघा याला व्यसन म्हणू नका. अहो फार पूर्वीपासूनच हे अमृत आहे. आपण पाणी पितो की नाही. पाणी पिणे हे व्यसन आहे का? मी पाण्याऐवजी मद्य पितो. दोन्ही पेयच की. अन बुद्धी तल्लख राहण्यासाठी काही तरी करावे लागत. आता ही सवय मला कधी व कशी लागली. हा तुमचा प्रश्न. ती एक फार मोठी घटना आहे. दिवाळीत मी फटाके उडवीत होतो. बाटलीत ठेवलेला बाण उंच जाताना मी पहिला. माझ्या मनात अशी कल्पना आली की जीवनात जर अशी उंच भरारी घ्यायची असेल तर बाटलीचा आधार घेतला पाहिजे. बस त्यावेळेपासून ही बाटली आमच्या जीवनाचा आधार बनली. “
तेवढ्यात रावसाहेबाचा नंबर लागला. त्याने भले मोठे बॉक्स खरेदी केलं अन मदिरालयातून बाहेर पडला. जाताजाता चांगलं एक दीड किलो मटण घेतलं. कोणीतरी कंपनीला असावं म्हणून शामरावला आवातन दिल. ते रिकामच होत अन कोणीतरी बोलवायची वाटच बघत होत. दोघांनी बऱ्याच दिवसांनी ताव मारला. पार्टीच केली म्हणाना अन त्याला नाव बी दिल कोरोना पार्टी.
प्रदीप जोशी, विटे मोबाईल क्रमांक 9881157709