Bhijavnara paaus in Marathi Travel stories by Na Sa Yeotikar books and stories PDF | भिजवणारा पाऊस

Featured Books
Categories
Share

भिजवणारा पाऊस

भिजवणारा पाऊस

घड्याळात तीन वाजले होते. बाहेर काळेभोर आभाळ जमू लागले होते. पाहता पाहता सर्व ढग एकत्र झाले आणि पाऊस सुरू झाला. तसं त्याच्या मनात चलबिचल चालू झालं. सकाळी शाळेला निघत असतांना निरभ्र आकाश होतं. पाऊस पडेल असा कोठेही अंदाज नव्हता. तसं हवामान खात्याने अंदाज सांगितलं होतं की, पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता म्हणून. पण त्याने त्या हवामान खात्याच्या अंदाजाकडे नजरअंदाज केला आणि सोबत रेनकोट न घेता शाळेला निघाला. मनातल्या मनात स्वतः विरुद्ध चिडून उठला. गेल्या दहा दिवसापासून रोज रेनकोट सोबत होतं पण पाऊस काही पडला नाही. नेमकं आजच रेनकोट सोबत नाही आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. शाळा सुटेपर्यंत एक तासांचा अवकाश होता. तोपर्यंत पाऊस पडून निघून जाईल म्हणून खिडकीतून तो पाऊस न्याहाळत बसला. पाऊस वाढत होता तसा वर्गातली मुले गोंगाट करत होती. पाऊस वरचेवर वाढतच होता. अर्ध्या पाऊण तासांनी पावसाने आपला जोर कमी केला तसं त्याने सर्व मुलांना घरी जाण्यास सांगितले. पोरं ही छत्री किंवा रेनकोट आणलं नव्हते म्हणून आपल्या शाळेची बॅग डोक्यावर धरून धूम ठोकली. शाळेच्या वर्गखोल्या व्यवस्थित लावून घेतलं आणि तो ही घरी जाण्यास तयार होऊ लागला. मैदानात येऊन घराच्या रस्त्याकडे एकवार नजर फिरवली तर तिकडे खूपच काळे कुट्ट ढग दिसत होते. आज भिजत भिजत घरी जावं लागेल याची काळजी त्याला वाटत होती. लहान असतांना खूप आवडणारा हा पाऊस त्याला आज नको वाटत होतं. पावसात गाडी चालवत जाणे त्याला अवघडल्यासारखं वाटत होतं. त्याचसोबत त्याला जास्त काळजी वाटत होती ती मोबाईलची. मोबाईल जर पाण्यात भिजला तर खराब होऊन जाईल, याची त्याला चिंता लागली. काय करावं ? या विचारात असतांना त्याला जेवण्याच्या डब्याची आठवण आली. त्याचा जेवणाचा डबा मोबाईल एवढा लांब आकाराचा होता. लगेच त्यानं आपला मोबाईल स्विच ऑफ केला आणि डब्यात ठेवून ते डबा गाडीच्या टॅकवरील कव्हर मध्ये सरकवला. त्याची एक काळजी मिटली होती. पावसाचा जोर कमी होता पण रिमझिम चालूच होतं. पाऊस अजून कमी होईल म्हणून थोडा वेळ वाट पाहिलं, थोडा वेळ थांबला. पण पाऊस काही थांबेना. शेवटी कंटाळून आपल्या डोक्यावर टोपी लावली आणि डोळ्याला चष्मा लावून गाडी चालू केली. पावसाचा पहिला थेंब अंगावर पडला तेंव्हा त्याला झटका लागल्याचा अनुभव आला. गाडी अगदी सावकाश चालवत तो पुढे जाऊ लागला. उलट दिशेने वारा जोरात वाहत होता. पाच दहा मिनिटाच्या प्रवासात त्याचे कपडे सर्व ओले झाले. हळूहळू त्याचे अंतर्वस्त्र देखील ओले होण्यास सुरुवात झाली. तसे त्याला थंडी वाजण्यास सुरुवात झाली. जसे जसे गाव जवळ येत आहे असे वाटत होते तसे तसे पावसाचा जोर वाढतच होता. त्याच्या अंगात आता पूर्ण थंडी भरली होती. गाडी वेगात पळविणे त्याला अशक्य वाटू लागले. त्यातच विजा चमकणे आणि ढगांचा गडगडाट देखील त्यात सहभागी झाले त्यामुळे त्याच्या मनात अजून भीती वाटू लागले. चाळीस मिनिटाच्या प्रवासानंतर तो घरी पोहोचला. पूर्ण अंगातून पाणी गळत होतं. घरी आल्याबरोबर ती म्हणाली, " म्हटलं होतं, रेनकोट सोबत घेऊन जा म्हणून, पण माझं ऐकलं नाहीत.." यावर त्याला अजून तिचा राग आला पण करावं काय ? तिचं सकाळी ऐकलो असतो तर आज पावसात भिजण्याची वेळ आली नसती. पण तिचे बोलणे खाली टाकण्यासाठी तो म्हणाला, " पहिल्या पावसात भिजण्याची मजा तुला काय कळते ? पावसात भिजलं तरच त्याचा आनंद कळू शकते ...!" आपल्या मनाला रिझवण्यासाठी तसा तो बोलला पण आतून खजील झाला होता. तिने लगेच आद्रकचा गरमागरम चहा आणून दिला. बाहेर गॅलरीत बसून चहाचा घोट घेत घेत तो पावसाला म्हणाला, " आत्ता पड की तुझ्या मनासारखं..." पण...... काही वेळात पाऊस थांबला, काळेकुट्ट ढगांच्या जागी आता पांढरे आभाळ दिसू लागले होते .....
- नागोराव सा. येवतीकर