"निनाद, तुम्हाला 'शकू' नावाची कोणी बाल मैत्रीण होती का?" डॉ. मुकुलनी सरळ मुद्यालाच हात घातला. या प्रश्नाने निनाद सटपटला. म्हणजे याला 'शकी' समजली तर?
"हो! पण शाळेतली! का?"
"अशात ती तुम्हास भेटते का?"
"नाही! गाव सुटले तशी ती पुन्हा भेटली नाही!" डॉक्टरांचा आय कॉन्टॅक्ट टाळत निनाद म्हणाला. डॉ. मुकुलनी तो खोटं बोलत असल्याचे तात्काळ ओळखले. खरे तर स्वरालीचं शकीबद्दल त्याला विचारणार होती. पण ज्या अर्थी तो हुन सांगत नाही त्या अर्थी ते फारसे महत्वाचे नसावे, असे तिला वाटले.
" तुम्हाला म्हणे एकच स्वप्न वारंवार पडत! असे स्वराली म्हणत होत्या!"
"तस ते फारस विशेष नाही! फार लहानपणा पसन ते कधीतरी पडतंय!" निनाद पुन्हा खोटं सांगत होता! स्वरालीनी दिलेल्या माहितीनुसार ते स्वप्न नेहमीच पडत होत.
"तरी हि तुम्ही ते मला सांगायला हवं होत. असो. स्वप्नात काय दिसत?"
" रात्रीचा दोनचा सुमार असल्याचं दाखवणार भिंतीवरलं घड्याळ दिसत. नंतर असा भास होतो कि घराच्या अंधारात हजारो वटवाघूळ दाटी करताहेत. ती माझ्यावर लवकरच तुटून पडणार आहेत असं वाटत. ती माझा बदला घेणार आहेत! अंधारात खाड्कन, एक दार उघडत! दाराच्या चौकटीत कोणीतरी उभं असत! मला खूप भीती वाटू लागते. मी जागा होतो!"
"पहिलं स्वप्न कधी पडलं?"
"लहानपणी."
"शेवटचं असं स्वप्न केव्हा पडलं होत?"
"काल!"
" ओके. पहिल्या आणि कालच्या स्वप्नात काही फरक होता का?"
" सुरवातीला फक्त भिंतीवरील घड्याळ दिसायचं, आणि भीती वाटायची! मग घड्याळाबरोबर अंधारात वटवाघुळे असल्याचा भास होऊ लागला! त्यानंतर ते स्वप्न अधिक स्पष्ट आणि भीतीदायक वाटू लागलं! वटवाघुळासोबत अंधारात एक दार उघडू लागलं! आणि त्या दारात, हाताच्या जागी वटवाघुळासारखी फोल्ड केलेली पंख असलेली मानवी आकृती दिसू लागली! काल तर कहरच झाला, ती आकृती एक मोकळे केस सोडलेली तरुणी असल्याचे स्पष्ट दिसले! आणि ती माझ्याकडेच येत होती!"
" ओके निनाद. हे वरचेवर स्पष्ट होत जाणारे स्वप्न म्हणजे, तुमचे अंतर्मन तुम्हास भीतीवर मात करत असल्याचे संकेत देत आहे! ती आंधारातली तरुणी कोण होती?"
" तिचाचेहरा स्पष्ट दिसत नव्हता! "
" दिसेल! कदाचित ती तुमच्या परिचयातली पण असेल! आणि ती दिसली कि तुमची भीती कुठल्या कुठे पाळूनही जाईल! अर्थात हा माझा अंदाज आहे. प्रत्यक्षात काय घडत ते पाहू! तेव्हा लक्षात ठेवा, प्रोग्रेसिव्हली स्पष्ट होणारे स्वप्न धीराने फेस करा! प्रत्यक्षात सोडाच, स्वप्नातही काही होणार नाही!"
" मलाही हेच हवंय! मला ती वटवाघूळांच्या दहशती पासून सुटका हवी आहे!" निनाद प्रथमच डॉक्टरांशी मनःपूर्वक बोलला.
"आपण हेच करणार आहोत!" डॉ. मुकुल शांत आवाजात म्हणाले.
०००
'पाकोळी पाडा ' समुद्रालगदच्या डोंगर कपारीत वसलेले, चार-पाचशे उंबऱ्याचे खेडे. डॉ. मुकुलच्या उपचाराने म्हणा, स्वरालीच्या सपोर्टने म्हणा, कि निनादच्या गृहपाठाने म्हणा निनादची भीती कमी होत होती. रात्री स्वप्न पडल्याचे तो सकाळी, स्वरालीला सांगू लागला. तरी डॉ. मुकुलनी शेवटची परीक्षा म्हणून निनाद आणि स्वरालीला दोन महिन्यासाठी या पाड्यावर रहाण्यासाठी पाठवले होते. या गावालगतच्या डोंगर कपारीत असंख्य वटवाघुळीची निवासस स्थाने होती!
डॉ. मुकुलच्या उपचाराची दिशा योग्य असल्याची निनादला खात्री पटूलागली होती. दोन किलोमीटरवर असलेल्या समुद्रकिनारी, तो स्वरालीला घेऊन रोज सकाळ, संध्याकाळ फिरायला जाऊ लागला. संध्याकाळच्या संधीप्रकाशात वटवाघुळांचे थवे आकाशात झेपावताना तो आनंदाने पहात होता. भीतीचा लवलेशही त्याच्या चेहऱ्यावर दिसत नसे. स्वराली खुश होती.
असेच एक दिवस संध्याकाळी निनाद आणि स्वराली समुद्रकिनाऱ्यावरून घरी परतत असताना स्वरालीचा फोन वाजला. थोडे थांबून तिने तिने तो घेतला. डॉ. मुकुलचा फोनवर होते. निनाद आकाशातले वटवाघुळीचे थवे पहात पुढे चालत होता.
"बोला डॉक्टर."
" स्वराली, निनाद कसे आहेत? एनी प्रॉब्लेम ?"
" नो प्रॉब्लेम! निनाद मजेत आहे. परवा तर 'कायमच येथेच राहू म्हणत होता!' "
"अरे,वा! खूप छान प्रतिसाद मिळतोय कि आपल्या ट्रीटमेंटला. तुम्ही दिलेल्या माहितीनुसार निनाद एकोणतीस - तीस दिवसांनी ते झोपेत भितात. आणि ती वारंवारता आज उद्याच्या येतियय! सजग राहावे लागेल तुम्हाला. हेच सांगण्यासाठी फोन केला होता."
" बरे झाले, आठवण करून दिलीत ते! थँक्स!"
" काळजी घ्या! बाय!" डॉक्टरांनी फोन कट केला. स्वरालीने मोबाईल पर्स मध्ये टाकला. तिचे समोर चालणाऱ्या निनादच्या पाठमोऱ्या आकृतीकडे लक्ष्य गेले. त्याच्या डोक्यावर उंच आकाशात, घरट्या मारणाऱ्या त्या वटवाघुळाने, तीरासारखी निनादच्या टाळूच्या दिशेने झेप घेतली होती!
"नीनाSSS द!" स्वराली ओरडली! त्या आवाजासरशी ते वटवाघूळ हवेतूनच परत फिरले!
०००
स्वराली आपल्या विचारात गढून गेली होती. विज्ञाननिष्ठ स्वरालीच्या मनाची चलबिचल होती. हे प्रकरण 'सायकॉलॉजि 'च्या कक्षेबाहेर जात असल्याचे तिला जाणवू लागले होते. स्वप्ना पुरत्या वटवाघुळी ठीक होत्या, पण प्रत्यक्षात सुद्धा निनादच्या आसपास आताशा त्या दिसत होत्या. त्यादिवशी सिसिडेच्या पोर्चत, मुंबईला खिडकीच्या काचेवर, एकदा कारच्या टपावर, ते तिला दिसलेच होते! आज तर निनादच्या डोक्याच्या रोखाने झेपावले होते! वटवाघुळीच्या बऱ्याच वंदता, येथे आल्यावर तिच्या कानावर आल्या होत्या. त्या नुसार रक्तपिपासू पिशाच्य वटवाघुळीच्या रूपाने, आमोशाच्या रात्री फिरत असतात. आणि संधी साधून त्यांनी निवडलेल्या प्राण्याचे, आधी रक्त पितात, आणि मग सगळे मास खाऊन टाकतात! शिल्लक फक्त हाडाचा सांगाडा उरतो! शेजारच्या डिकॉस्टा अंकलच्या शेळ्यांचे, एका सकाळी सांगाडे झाल्याचे निदर्शनास आले होते! तिने समोरच्या भिंतीवरील कालनिर्णय कॅलेंडरवर नजर टाकली. उद्याच्या तारखेस, त्यावर आमावस्या दिसत होती! आज रात्री ती दोन वाजून दहा मिनिटांनी लागणार होती! तिने भराभर आपल्या बॅगेतले कपडे बाहेर काढून टाकले, आणि तळाशी असलेली एक डायरी बाहेर काढली, त्यात तिने निनाद झोपेत भिल्याच्या तारखा होत्या. त्याच तिने डॉक्टरांना दिल्या होत्या. तिने त्या कॅलेंडरवर ताडून पहिल्या, सर्व तारखांच्या आसपास अमोश्या होती!
तिने लगेच डॉ. मुकुलला फोन लावला. त्यांच्याशी 'पिशाच्य' थेयरीवर चर्चा केली. त्यांच्या मताप्रमाणे,हे सगळं थोतांड आहे. पिशाच्य -वटवाघूळ काही सम्बन्ध नाही. भूत असत नाही. इतके विज्ञान कोकलून सांगतंय तरी का आपण विश्वास ठेवायचा? मग ती वटवाघूळ निनादच्या आसपास दिसली ते? तो एक योगायोग होता. तिने मनातून ती 'पिशाच्य' कल्पना काढून टाकली.
०००
मध्य रात्र उलटून गेली असावी. सर्वत्र निरव शांतता नांदत होती. मधेच एखाद कुत्रा वर तोंडकरून रडत होत. निनाद आणि स्वराली झोपले होते, त्या बेडरूमच्या खिडकीला बाहेरच्या बाजूने एक वटवाघूळ उलटे लटकलेले होते. जळत्या सिगारेटच्या टोकासारखे त्याचे लालभडक रसरशीत डोळे खिडकीच्या काचेच्या तावदानातून आत पहात होते. काही क्षणांनी ते पेटते डोळे मिटले गेले!
स्वरालीला जाग आली. शेजारी निरागस चेहऱ्याचा निनाद गाढ झोपला होता. तो असाच सकाळपर्यंत न भिता झोपून रहावा असे तिला वाटून गेले. ती उठून बाथरूमकडे गेली.
घट्ट अंधार असूनही निनादला भिंतीवरील घड्याळात दोन वाजून दहा मिनिटे झाल्याचे दिसत होते. झोपताना स्वरालीने नाईट लॅम्प लावला होता. मग हा अंधार कसा? बरोबर! काल रात्रीच्या पावसाने बहुदा लाईट गेले असतील. तो उठून बसला. डोळे मोठे करून, त्या अंधारात त्याने अदमास घेतला. त्याला पाण्याचा तांब्या कोठे आहे कळेना. अंधाराने दिशाच कळत नव्हती. कानाला काहीतरी वळवळ जाणवत होती. त्या शिवाय अजून एक आवाज येत होता. त्याने तो ओळखला, ती पंखांची मंद फडफड होती! पुन्हा ती 'फैज' घरात घुसली होती! मनात भीतीने डोके वर काढण्यास सुरवात केली. तेव्हड्यात खाड्कन दार उघडल्याचा आवाज झाला. तो त्या आवाजाने दचकला! आठवणीने बंद केलेले दार कसे उघडले? समोरच्या बाजूस चौकटी पुरता उजेड दिसत होता. त्या अंधुक उजेडाने सुद्धा त्याला धीर वाटला.त्या चौकटीत कोणीतरी उभे होते, हाताची घडी घालून. बघता बघता त्या उजेडात, एक केस मोकळे सोडलेली तरुणी आवतरली. डौलदार पावले टाकत ती निनादकडे सरकत होती. आता निनादच्या भीतीची जागा कुतूहलाने घेतली होती. तो टक लावून तिच्या लयीत हेलकावणाऱ्या नितंबाकडे पहात होता. ती जशी जशी जवळ जेवू लागली, तशे तशे त्याचे हृदय ज्यास्त जोराने धडधडू लागले. कारण तिच्या कमनीय देहावर, टिचभरही वस्त्र नसल्याचे स्पष्ट दिसत होते! कुठल्याही वयाच्या पुरुषास हवे हवेसे वाटावी अशी तिची फिगर होती. निनादच्या वासनेला उधाण आले होते. त्याचा समोर उभी होती, नखशिखान्त नग्न! मदनिका! क्षणभर त्याला तिचा चेहरा दिसला. त्याने तिला ओळखले! डॉ. मुकुल म्हणाला होता, ती स्त्री तुमच्या परिचयातली असेल म्हणून!
"शके? तू?"
"निन्या, अरे केव्हाची मी या क्षणाची वाट पाहतियय! पण तुझी ती पांढरी पाल, स्वराली, तुला एकटं सोडतच नाही!" निनादच्या बाहुपाशात ती शिरत म्हणाली.
निनाद धुंद झाला. तो तिचा कोमट देह, मुक्त केसांचा मादक गंध! त्याने तिला घट्ट छातीशी आवळून धरली! डोळे मिटून तो, ते सुख अनुभवत होता. त्याला जगाचा विसर पडला होता.
"निन्या, मला अजून घट्ट धरून ठेव! इतकं घट्ट कि, कोणीच आपल्याला वेगळं करू शकू नये!"
" शके, मला माहित नव्हतं तू इतकी सेक्सी असशील ते!" तिला अधिक जवळ घेत म्हणाला. तो तिच्या ओठावर आपले टेकवण्यासाठी झुकला. पण ---- तिने त्याचा चेहरा हाताने बाजूला सारला आणि समोर आलेल्या त्याच्या मानेवर आपले ओठ टेकवले! दोन सुळे त्याच्या मानेतील रक्त वाहिनेत कधी घुसले हे त्यालाही कळले नाही! त्याला तिच्या पुष्ट अवयवाचा स्पर्श सुखावत होता, तोच स्पर्श त्याची हृदय गती वाढवून, सुळ्याना रक्त पुरवठ्याचे सातत्य कायम ठेवत होता! पण त्याच्या कानाला पाणी पिताना घश्याचा जसा आवाज होतो तसा ऐकू येऊ लागला! हा आवाज कसला? कोण अधाश्या सारखं, काय पितंय? त्याने डोळे उघडले. मानेत काहीतरी टोचत होत. त्याने शकीचे डोके बाजूला करण्याचा प्रयत्न केला. ती सोडेना! त्याने अधिक जोर लावून तिला बाजूला केले. तिचे तोंड आणि तोंडातून डोकावणारे सुळे रक्ताने माखले होते! ती शकी नव्हती, तिचे डोके वटवाघुळी सारखे होते! तो भीतीने गारठला! घामानं तो निथळत होता!
खाड्कन त्याने डोळे उघडले! घरभर लाईट लॅम्पचा उजेड पसरला होता! रात्री झोपताना स्वरालीने लावलेला तो दिवा, तसाच जळत होता! म्हणजे आत्ताचे प्रत्यंकारी असले तरी, ते एक स्वप्नच होते तर! आजवरचे सर्वात स्पष्ट स्वप्न! त्याने घाम पुसला. स्टूलवर ठेवलेल्या भांड्यातले पाणी पिल्यावर त्याला बरे वाटले. शेजारी नजर टाकली, स्वराली तेथे नव्हती. पण बाथरूम मध्ये लाईट दिसत होता. ती तेथे गेली असावी, असा त्याने अंदाज केला. सहज त्याची नजर समोरच्या घड्याळावर गेली. आणि तो वेड्या सारखा त्याच्याकडे पहातच राहिला! एक टक! त्या घड्याळात दोन वाजून आठ मिनिटे झाली होती. स्वप्नातली घटना बरोबर दोन वाजून दहा मिनिटांनी घडली होती!
दोन वाजून नऊ मिनिटे! सेकंड काटा टक - टक करत पुढे झेपावत होता. अठ्ठावन सेकंड, एकोणसाठ, साठ! त्या क्षणी फटकन लाईट्स गेले! घरभर अंधार दाटला! तीच पंखांची मंद फडफड! आठवणीने बंद केलेले बेडरूमचे दार खाड्कन उघडले! दारात कोणीतरी उभे होते! ती मोकळ्या केसांची,नग्न शकी निनादकडे सरकू लागली!
"निन्या, असा काय वेड्या सारखा माझ्याकडे पाहतोयस? अरे, केव्हाची मी या क्षणाची वाट पाहतियय!"
स्वप्नाची पुनरावृती होत होती! पण आता निनाद जागाच होता. तो तिला जवळ घेण्यास कचरत होता. तरी ती बळेच त्याला बिलगली! त्याला आता मात्र खात्री पटली, पुन्हा तेच होणार! स्वप्न खरे होणार! त्याच्या हृदयाचे ठोके गतिमान झाले! तो तिला आपले सर्व बळ एकवटून दूर लोटू पहात होता, आणि ती त्याच्या मानेपर्यंत पोहंचण्याचा प्रयत्न करत होती! त्या अमानवी शक्ती पुढे निनादची शक्ती कमी पडत होती! त्याची शुद्ध हरवू लागली.
"अवसान घातकी! हृदय जोरात धडकततोवर मानेतल्या रक्तवाहिन्यातलं रक्त पिता येत! शुद्ध, मेंदूसाठी जाणार रक्त! हा मोक्याच्या क्षणी शुद्ध हरवून बसलाय! पण हा विरोध कसा करतोय? याला पुढे काय होणार आहे, हे कळलेले दिसतंय! हा असाच विरोध करणार! ह्या माकडाला याच्या लहानपणा पासून माझ्या आधीन होण्यासाठी तयार करत होते! माझी इतक्या काळाची मेहनत वाया गेली! कोण याला सावध केलं असेल? मी त्या व्यक्तीला सोडणार नाही! आणि मला ती कोण आहे माहित आहे!" स्वतःशी पुटपुटत शकी धुरसर होत खिडकीच्या फटीतून झिरपून गेली!
खिडकीच्या तावदानावर उलट्या लटकलेल्या वटवाघुळाचे डोळे पुन्हा अंगारा सारखे पेटले आणि ते एक हलकासा फटका खिडकीवर मारून अंधारात नाहीसे झाले! तेव्हा स्वराली 'निनाद! निनाद!!' म्हणून त्याच्या तोंडावर पाणी शिंपून त्याला शुद्धीवर आणू पहात होती.
०००
या घटनेला चार महिने उलटून गेले होते. निनादला ते स्वप्न पुन्हा पडले नव्हते. एक फोबिया समूळ बरा केला म्हणून डॉ. मुकुलनी एक छोटीशी सेलिब्रेशन पार्टी अरेंज केली होती. त्या निमित्याने निनाद आणि स्वरालीला हि बोलावले होते. काही तज्ञ डॉक्टर्सपण हजर होते.
"मानवी अंतर्मन एक गूढ आहे. हे निनादच्या केस वरून पुन्हा सिद्ध होतय!" डॉ. मुकुल म्हणाले.
"मग ते स्वप्न?"
" तेच तर सांगतोय! त्या अंतमनाने दाखवलेल्या स्वप्नामुळे निनादाना पुढील धोक्याचा अंदाज आला!"
"म्हणजे डॉक्टर, तुम्ही 'पिशाच्य'च्या अस्तित्वाला मानता तर!"
"नाही! ते अजून विज्ञानाच्या कक्षेत आलेले नाही! मला वाटते, निनादाचा 'भूत, पिशाच्य' या कल्पनांवर विश्वास आहे, म्हणून त्यांच्या मनाने तसा संकेत दिला!"
डॉ. मुकुलचे सर्वानी अभिनंदन केले. निनादला शुभेछया दिल्या. पार्टी संपली.
निनादने कार स्टार्ट केली.
" आई गंSSS !" स्वराली कारमध्ये शिरणार तेव्हड्यात ती ओरडली.
"काय झालं?" निनादने विचारले.
"अरे, डोक्याला टाळूजवळ काहीतरी लागलं!"
निनादने तिच्या डोक्याकडे पहिले. एक वटवाघूळ वर वर उडून जात होते!
(समाप्त!)
सु र कुलकर्णी. आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.