आघात
एक प्रेम कथा
परशुराम माळी
(27)
शेवटचा पेपर संपला आणि मी कुणाशीही न बोलता, कुणालाही न भेटता धावत खोलीवर आलो होतो. दुसऱ्या दिवशी गावी जायचंहोतं. आजीआजोबांच्या प्रश्नांची उत्तरं काय द्यायची? पुन्हा खोटं बोलणं आलंच पण निकाल खोटा बोलणार नव्हता.दुसऱ्या दिवशी जायची तयारी करत होतो. सुमैया भेटायला येईल पण काल परीक्षा संपल्यापासून दिसलीच नव्हती. मनाशी ठरविलं होतं. तिला भेटल्याशिवाय गावाकडं जायचं नाही.इतक्यात अनिल माझ्या खोलीवर धावत खोली शोधत आला.
‘‘प्रशांत लवकर आवर तुला आताच्या आता गावी जायला हवं.’’
मी पूर्णपणे घाबरून गेलो.
‘‘अरे, पण का?’’
‘‘आजीची तबयेत पुन्हा बिघडलीय. तुला लवकरात लवकर गावी बोलवलंय चल लवकर.’’
तसं मी साहित्य घेतले आणि गावी आलो, पाहतो तर घरासमोर गर्दी जमली होती. ते पाहून मी भेदरल्यागत झालो, तोल गेल्यागत झालं. मी पळतच आलो पाहतोय तर आजी आमच्यातून कायमची निघून गेली होती. मी मोठ्यानं बोंब ठोकली तसं मला बघून आजानं हंबरडा फोडला. मी आजाजवळ जाऊन आजाला गच्च मिठी मारली. तशी शेजारच्या बायका मोठ्यानं रडायला लागल्या. आजी गेल्याचं सर्वात मोठं दु:ख होतं, त्या दु:खात माझं मला मी सावरू शकलो नाही. आजारी पडलो. दवाखान्याचा खर्च अनिल आणि त्याच्या घरच्यांनी केला. घर भयाण आणि भकास वाटत होतं. आता चांगल वाईट सांगायला कोणी राहिलं नव्हतं, आजोबांशिवाय.
घरात कधी आजी दिवसाची विश्रांती घ्यायची नाही. सतत काहीतरी काम काढून ते करत बसायची. कुठं माळाला शेण्या गोळा करायला जाणं, काट्याकुट्या गोळा करायला शेताकडं जाणं ते जरी काही काम नसलं तरी पाखडत, झाडत, सारवत, असं काहीतरी करीत बसायची. निवांत कधी बसलेली, विश्रांती घेतलेली मी तिला बघितली नव्हती. संसार मोठा चिकाटीने करायची. एक एक पैसा जपून ठेवायची. आजारी असली की अंगावर काढायची. पण दवाखान्याला कवा पैसा घालायची नाही. डोक्याला लावायला खोबरेल तेल कवा मिळायचं नाही पण आमटी बनवताना हाताला लागल्यालं तेल ती माझ्या डोक्याला पुसायची. माझं डोकं कवा कोरडं ठेवायची नाही. तिच्यात भिनलेलं साधंपण भल्याभल्यांना आपलं करतं होतं.आजी गेली. आजी होती तेव्हा आईची उणीव मला कधीच भासली नाही.तिनं कधी आई नसण्याची उणीव मला जाणवू दिली नाही. जे हवं ते तिनं दिलं. माझी जी जी इच्छा असेल ती तिनं पूर्ण केली होती. बिचारी तब्येतीनं पेलत नव्हतं तरी कष्ट उपसायची. राब राब राबायची, माझं चांगलं व्हावं म्हणून माझी ही भोळी माय उपासतापास करायची, देवाला नवस बोलायची. एखादं दिवस उपाशी राहिलं. पण मला शिक्षणासाठी काही कमी करू देत नव्हती. अशी माझी आजी निरपेक्ष वृत्तीची होती.लहानपणी सणवाराचं लोकांची पोरं नवे नवे कपडे घालायची, मलाही मग त्यांच्यासारखी कपडे घालावे असे वाटायचे मी आजीकडे हट्ट धरायचो. पण बिचारी आजी दुसऱ्या दिवशी कपडे आणल्याशिवाय स्वस्थ बसायची नाही. भले मग कुणाकडून उसने पैसे आणायची. मला जसं जसं आपल्या परिस्थितीची जाणीव होईल तसं आजी आजोबांकडे हट्ट करणं बंद केलं होतं. त्रास देणं बंद केलं होतं.
आजी गेली आणि दु:खाचं आभाळ कोसळल्यागत झालं. आता घरची जबाबदारी सारी माझ्यावर येऊन ठेपली, कारण आजोबांना काहीच होतं नव्हतं. घरात पाणी आणणे, जेवण करणं, जळाण-काटुक आणणे हे सारं मला करावं लागायचं. एवढं शिकूनही असली काम करायला लागतंय याची मला लाज वाटायची. काही लोक टिंगलटवाळी करायचे, चिडवायचे, म्हणायचे, काय उपयोग याचा एवढं शिक्षण घेऊन आम्ही जिथं हाय तिथंच हाय आम्ही जे करतुया तेच ह्यो शिक्षण घेवूनही त्येच करतुया असे म्हणायचे. मला जी लोकं मी कोल्हापूरला कॉलेज शिकतोया म्हणून कौतुक करायची ती ही माझं हे दररोजचंकाम बघून कौतुक करायची बंद झाली. बरं झालं पोरं आमचं लय शिकलं नाही ते. नाही तर आमच्या पोरात आणि जाधवाच्या परश्यात कायम फरक हाय शिकून? भकल्यावानं अवस्था हाय त्याची एक दिवस शेजारीच राहणारा आणि गावाची सगळया चौकशी करायची सवय असणारा बापू तात्या आमच्या घरात आला आणि म्हणाला,
‘‘काय पोरा, शिक्षण झालं काय नाही?’’
‘‘झालं की हो.’’
‘‘मग आता पुढं काय ठरविलयस?’’
‘‘बघू आता कुठं संधी मिळत्या काय ते!”
‘‘आरं, संधी काय तुला चालून येणार हाय व्हयं, जरा हातपाय हालवायला नकुत व्हयं, तू इकडं दिस दिसभर रानातनी काम करीत बसणार मग तुला कशी संधी मिळणार? माझी पोर बघ कशी शिक्षाणं न घेता कामाला लागत्याती आरं, म्हाताऱ्याला किती दिवस धरून बसणार हाय? ह्यो पिकलं पान आज ना उद्या गळून पडायचं.’’
‘‘ए बाप्या हरामखोरा माझ्याच घरात यून माझ्या नातवाला शिकवतोस व्हयं रे! माझ्या पोराची मला काळजी हाय. तू कोण सांगणारा? चल बाहीर पड माझ्या घरातनं. परत हुंबऱ्याच्या आत पाऊल टाकशील आणि माझ्या नातवाची चौकशी करशील तर जोड्यानं मारीन साल्या.’’
‘‘ए तू काय मारतोस मला, तुझीच हाडं चालल्यात नदीला. अंगात रग हाय काय म्हातारडया?”
असं बोलताच माझा तोल सुटला. मला राग आवरला नाही. तसं बोलून तो पळून जात होता, जवळच खुरप्याची मूठ पडलेली मी घेतली आणि पाठीत मारली तसं ठो ठो बोंबलतच गल्लीनं घरात पळाला.गल्लीतली लोक सगळी घरासमोर गोळा झाली. त्यांना वाटलं असावं आम्ही त्याला मुद्दामच मारलं की काय? बायाबापड्या सगळी काळी तोंड करून रागाने माझ्याकडे पहायला लागली. आजोबा खोलीच्या एका कोपऱ्याला अस्वस्थ होऊन बसले होते. जो तो बंदुकीची फैरी जशी झाडतात तसं प्रत्येकजण मला म्हणत होते,
‘‘काय, रं पोरा शिकायला गेलतास की शान खायला गेलतास? आसं मारायचं आसत व्हयं त्या माणसाला.काय वाईट केलतं तुमचं त्यानं? शिकून
डोसक्यावर परिणाम झाला की काय? कुणाच ठाऊक आज पिसाळल्यागत करायला लागलंय. म्हातारी हुती तवा ताळयावर हुतं. म्हातारी गेल्यावर पारच बिघाडलय लवकर ताळयावर आण रं म्हाताऱ्या, नाहीतर हातचं जाईल ह्ये पोर. आम्ही आमच्या पोरास्नी शिव्या दयूनं, मार दयून याचं कौतुक सांगायचाव, पण आता झालंय उलटचं, आमचीच पेारं याच्या परास भारी म्हणायची ह्येच्यावानीन्हवं. पोटात एक आणि व्हटात एक. न बोलून शाना करून रिकामा खाल
मान्या, गाव तान्या निघालास बाबा तू तरं.’’
‘‘ए बाबांनो जावा आता पाया पडतो तुमच्या, माझ्या नातवाला सांगतो मी काय सांगायचं ते.’’
आजोबा काकुळतीला येऊन हात जोडून विनवण्या करीत होते.आजोबांच्या चेहऱ्यावरचं दु:ख, कष्टी भावना स्पष्टपणे झळकत होती.किती त्रास होत असेल त्यांना? आयुष्यभराची सुखदु:खात साथ देणारी जोडीदारीण कायमची सोडून गेल्याचं दु:ख आजोबांच्या मनात सलत होते. डोळयातून अश्रू गाळत एकाकी कोपऱ्याला बसायचे. मला वाईट वाटू नये म्हणून माझ्यासमोर आनंदात असायचे पण त्यांच्या मनात जे दु:ख सलत होतं, ते मला कळत होते. पण ते माझ्यासमोर उघड करायचे नाहीत.
पण मी ठरविलं होतं.आजोबांची जेवणखाण्याच्या बाबतीत आबाळ होऊ द्यायची नाही. वेळच्या वेळी चहापाणी द्यायचं. दुर्लक्ष होता कामा नये, सेवा सुश्रुतेत आपण कमी पडता कामा नये, असं ठरविलं होतं. दुसरीकडं सुमैयाची आठवण खूप येत होती. माझी आजी गेल्याची बातमी तिला माहीत नव्हती.शेवटचा पेपर संपला आणि आजीला जास्ती झाल्याचं समजलं. मी गडबडीने कुणालाच न कळविता आलो होतो. त्यामुळे कदाचित तिचा माझ्याबाबतीत गैरसमज होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. तिचा गैरसमज टाळण्यासाठी मी पत्र पाठवून तिला सगळी बातमी कळविली पाहिजे असं ठरविलं. तोच दुसऱ्या दिवशी पोस्टमन काका आले.
‘‘प्रशांत कदम आपणच नव्हं?’’
‘‘होय.’’
‘‘हे पत्र घ्या.’’
‘‘कुणाचं आलंय रे पोरा, पत्र?’’
आतून आजोबांचा आवाज आला. मी अजून पत्र खोलायला नव्हतं तोपर्यंत पत्र खोलून पाहतो तर सुमैयाचं पत्र होतं.
‘‘कुणाचं हाय रं पत्र?’’
पुन्हा आजोबांचा आतून आवाज आला.
‘‘मित्राचं हाय कराडच्या.’’
‘‘काय लिवलय रं पोरा?’’
‘‘आजून वाचायचं हाय. वाचून झाल्यावर सांगतो.’’तसं आजोबा शांत झाले. अगदी आतुरतेन सुमैयाचं पत्र वाचायला सुरूवात केली. पत्रात लिहिलं होतं.
******