ha marg niyticha in Marathi Short Stories by Vasanti Pharne books and stories PDF | हा मार्ग नियतीचा

Featured Books
Categories
Share

हा मार्ग नियतीचा

#हा_मार्ग_नियतीचा
प्रेमात पडलेलं माणूस सुंदर दिसते असं म्हणतात ते निधीकडे पाहून खरं वाटायला लागलं होते. दिवसेंदिवस निधी आणि सोमेशच्या प्रेमाच्या चर्चा कॉलेज मध्ये ऐकायला मिळत होत्या. त्यांचं प्रेम हळूहळू वाढत होतं.तरुण मुलामुलींनी प्रेमात पडणं काही गैर नव्हतं. पण आजूबाजूचा समाज मात्र या गोष्टीकडे चांगल्या नजरेनं बघत नाही. आरुषी व निधी या दोघी मैत्रिणी जिथे रहात होत्या ते नावापुरतंच शहर होतं. प्रत्यक्षात होतं मात्र जास्त लोकवस्ती असलेलं खेडेगावंच !!
सर्व जुन्या परंपरा, रीतिरिवाज यांना त्या ठिकाणी अजून खुप महत्व दिलं जायचं. सोमेश आरुषीच्या घराजवळ राहत असलेला मुलगा आणि निधी आरुषीची जिवलग मैत्रीण दोघेही एकमेकांना पसंत करू लागले होते.निधी आरुषीच्या घरापासून लांब अंतरावर राहायची.ती अभ्यास करायला अधून मधून आरुषीच्या घरी येत होती. अभ्यासातील काही विषय तिला कठीण जात होते. पण तिच गणित खूप चांगल होते आणि आरुषी गणित या विषयाला बागुलबुवा समजून घाबरत असे.त्यामुळे एकमेकींच्या सहकार्याने त्या दोघींचा अभ्यास चालायचा.
त्या दोघी अभ्यासात अगदी पहिल्या दुसऱ्या नंबरात नव्हत्या . पण त्यांचे मार्क बरे असायचे. शिवायअभ्यासा व्यतिरिक्त इतर ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांचा सहभाग असायचा. आरुषी रनिंगमध्ये भाग घ्यायची. आवाज बरा असल्यामुळे शाळेच्या कुठल्याही कार्यक्रमात गाणी म्हणायला तिला आवडत असे. निधी नृत्याच्या क्लासला जायची. ती ग्रुप डान्स मध्ये भाग घ्यायची. एकदा शाळेतील मुलामुलींच्या ग्रुप डान्स मध्ये तिची सोमेशची ओळख झाली. सोमेश अभ्यासाला बरा होता आणि त्यांचा वर्गमित्र होता.आरुषीच्या घराजवळ रहात असल्याने त्यांची ओळख होती. निधीशी ओळख झाल्यावर आरुषी तिची मैत्रीण आहे म्हणून तिच्याशी तो मधून मधून बोलू लागला.
दहावीला गेल्यावर निधी अभ्यासाला आरुषीच्या घरी आली की, सोमेश पण तिथे कधीतरी यायचा. सुरवातीला आमचे अभ्यासाविषयी बोलणे व्हायचे. नंतर इतर सर्व विषयांवर गप्पा व्हायला लागल्या. यातून त्याची व निधीची जास्त ओळख झाली आणि दोघांना एकमेकांविषयी प्रेम वाटू लागले. निधी कुणीही प्रेमात पडेल इतकी सुंदर होतीच. सोमेश पण स्मार्ट व दिसायला बऱ्यापैकी आकर्षक होता. अभ्यास करताना निधी कधी कधी आरुषीला त्याच्या विषयी सांगायची.आज त्याने मला अमुक गिफ्ट दिले,आज आम्ही इथे फिरायला गेलो होतो.
आरुषी तिला म्हणायची,..."यंदा दहावीच वर्ष आहे तेव्हा अभ्यास चांगला व्हायला हवा.मार्क चांगले मिळायला हवेत नाहीतर घरची माणसे आपल्याला खूप बोलतील.शिवाय पुढे कॉलेजला घालतील का तेही सांगता येणार नाही.".... तिला ते कितपत आवडायचे माहिती नाही पण त्या दोघी अभ्यास लक्ष देऊन करायच्या.असं करत त्यांची दहावीची परीक्षा झाली.त्या तिघांनाही चांगले मार्क मिळाले. नंतर अकरावीला त्यांचे विषय बदलले. आरुषीला गणित आवडत नसल्यामुळे तिने तो सोडून सायन्स विषय घेतला.निधीने कॉमर्स घेतले. तर सोमेश मार्क कमी असल्यामुळे आर्टसकडे गेला. त्याने सोशल सायन्स घ्यायचे ठरवले. अकरावीला दोघींचे विषय बदलले त्यामुळे निधी आरुषीच्या घरी अभ्यासाला यायची बंद झाली. त्यामुळे सोमेशचे व आरुषीचे बोलणे पण कमी झाले.
एक दिवस तिला समजले की, सोमेश व निधी दोघेही पिक्चर पाहायला थिएटरमध्ये गेले होते.निधी आता खरोखर सोमेशच्या प्रेमात पूर्ण गुंतलेली दिसत होती. तिच्या खुललेल्या मोहक रूपावरून ते जाणवत होते.निधीचे व तिचे अकरावीत विषय वेगळे झाल्यामुळे त्यां दोघींची विशेष भेट होत नसे. कधी कधी लांबून दिसल्या तर त्या एकमेकींना हसून हात हलवत असत. सोमेश आरुषीच्या घराजवळ रहात असल्यामुळे कधी कधी तिला दिसत असे पण फारसा बोलत नसे.
बघता बघता बारावीची परीक्षा संपली. आता कॉलेजला सुट्ट्या सुरु झाल्या होत्या. आरुषीने बीएस्सीला जायचे ठरवलं होते. विषय बॉटनी घेणार होते. गणित तिला फारसं जमत नव्हतं त्यामुळे घरच्यांना विचारून तिने हा निर्णय घेतला होता. कॉलेजच्या ऍडमिशनच्या गडबडीत असतांनाच निधीबद्दल समजलं की ती बारावी नंतर पुढचे शिक्षण इथं घेणार नाही. तिच्या मामाकडे मुंबईला गेली आहे. तिथे एखादा कॉम्पुटरचा कोर्स करून नोकरी करणार आहे. आरुषीला एकदम आश्चर्याचा धक्का बसला. एकदम अस काय घडलं त्यामुळे निधीला इथून जावं लागलं. तिच्याकडे जाऊन यावे म्हणले तर आरुषीच्या घरच्यांना आवडले नसते. निधी व सोमेशचे प्रेमप्रकरण आरुषीच्या घरच्यांना समजल्यावर तिच्या घरी जायला व तिला घरी बोलवायला त्यांनी मनाई केली होती. फोन करून विचारावं तर तिचा नंबर आरुषीकडे नव्हता. त्यामुळे निधी विषयी तिला काहीच समजले नाही.
नंतर काही वर्षानंतर आरुषीचे पदवीशिक्षण पूर्ण झाले. नंतर पदवीनंतरचा मॅनेजमेन्टचा दोन वर्षाचा कोर्स पूर्ण झाल्यावर तिला इथल्याच एका शेती संशोधन संस्थेत नोकरी लागली. तिथे एक वर्ष नोकरी केल्यावर आरुषीला मुंबईला सहा महिने संस्थेच्या मुख्य ब्रँचमध्ये ट्रेनिंगसाठी पाठवले.मुंबईला गेल्यावर सुरवातीला तिथली गर्दी गोंधळ व धावपळीच्या आयुष्याशी जुळवून घेण्यात एक महिना कसा गेला समजले नाही. आरुषीचे राहण्याचे हॉस्टेल व ऑफिस या मध्ये थोडेच अंतर होते त्यामुळे तिला बसने जाणे येणे शक्य झाले. सुट्टीच्या दिवशी बरोबर असलेल्या सहकारी मित्र व मैत्रिणींबरोबर ती मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाऊन येत असे.
एकदा असंच आरुषी तिच्या ग्रुपबरोबर फिरायला गेलेली असताना तिने निधीला दुरून पहिले. ती पण एका ग्रुप बरोबर आलेली दिसत होती. आरुषीने जवळ जाऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण निधीने डोळ्यावर मोठा गॉगल चढवून तिच्याकडे लक्ष नाही दिले. तिने नंतर जास्त प्रयत्न नाही केला. काहीतरी तसंच कारण असेल म्हणून निधी मला टाळत आहे असं समजून घेतले.निधी त्यावेळी दिसत मात्र छान होती. स्वतःला खूप मेंटेन करून एकदम छान ठेवलेले दिसत होते.
"कुठे ती साधी तरीही सुंदर दिसणारी माझी प्रेमळ मैत्रीण निधी आणि कुठे ही मुंबईतील मला टाळणारी पॉश फॅशनेबल सौन्दर्यवती निधी."...... आरुषीचं मन नकळत तुलना करू लागलं.
निधीचा विचार मनातून काढायचा प्रयत्न करीत आरुषी आपल्या ग्रुप बरोबर मन रमवायचा प्रयत्न करू लागली . थोडया वेळानंतर एक लहान मुलगा पळत तिच्याकडे आला आणि झटकन एक चिट्ठी देऊन पळत निघून गेला. बरोबरच्या ग्रुप मधल्या कुणाचं तिच्याकडे जास्त लक्ष नव्हतं. म्हणून तिने चिट्ठी उघडून वाचली तर त्यात....." या ठिकाणीच उद्या संध्याकाळी सहा वाजता भेट.".....असं निधीने लिहिले होते.
आरुषीला तर मुंबई मधील फार काही माहिती नव्हती. त्या भागाची माहिती तिने आपल्या ग्रुपच्या माणसांना विचारली. स्वतःच्या मोबाईल मध्ये सेव्ह केली. उद्या आपण निधीला भेटायला यायचंच असं तिने मनाशी पक्के ठरवले. तिला निधीला भेटायची इतकी उत्सुकता होती की दुसऱ्या दिवशी ती त्याजागी अर्धा तास आधीच पोहोचलली. सहा वाजून गेल्यावर निधी आरुषी जिथे थांबले होती तिथे आली. एकदम फ्रेशलूक मेंटेन केल्यामुळे व मॉडर्न फॅन्सी ड्रेस घातल्यामुळे निधीचे आता हाय सोसायटीतील सुंदर तरुणी मध्ये रूपांतर झाले होते.
त्या दोघीजणी खूप वर्षांनी एकत्र भेटत होत्या .आरुषीला निधी विषयी ऐकायची उत्सुकता होती.
"निधी अग किती वर्षांनी भेटतोय आपण.तुला भेटून खूप आनंद होतोय मला "!!....आरुषीने तिचा हात हातात घेऊन म्हणाले.
निधीने पण थोडा वेळ आपल्या हातात आरुषीचा हात घट्ट धरून ठेवला. नंतर ती आरुषीला तिथल्याच एका छानशा हॉटेल मध्ये घेऊन गेली. कॉफी आणि काही खाद्यपदार्थ मागवले. खात असतांना आरुषीने ती इकडे मुंबईला कशासाठी आली आहे सांगितले. निधीने तिच्या आयुष्यात घडलेलं खूप काही सांगण्यासारखं होतं ते आरुषीला थोडक्यात सांगितले....
"खूप काही घटना अशा घडल्या आहेत की त्यामुळे माझे आयुष्य बदलून गेले. तुला माहिती आहेच की मी व सोमेश एकमेकांवर खूप प्रेम करत होतो. बारावीची परीक्षा झाल्यावर आमचं दोघांचं बाहेर भेटणं वाढलं होते. त्या वेळी
सोमेशच्या वडिलांना आमच्या बद्दल समजले. आधीच त्यांना थोडा अंदाज आला होता. त्यांना वाटत होतं की मुलं आहेत काही दिवसांनी हा प्रेमाचा नाद सुटून जाईल.पण तसं झालेलं नाही हे समजल्यावर त्यांनी माझ्या वडिलांना घरी भेटायला बोलावले. त्यावेळी सोमेशचा मोठा भाऊ पण त्यांच्याबरोबर होता.
"तुमच्या मुलीचं व आमच्या मुलाचं प्रेमप्रकरण किती वर्षांपासून चाललंय याची तुम्हाला काही कल्पना आहे कां? ".....सोमेशचे वडीलांनी माझ्या वडिलांना विचारले. माझे वडीलांना या विषयी काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांना एकदम धक्का बसला.
"आमचे मोठे एकत्र कुटुंब आहे.आमचा सर्वांचा एकत्र व्यवसाय आहे.आमच्या कुटुंबातील माणसांना हे सगळं प्रकरण आता समजले आहे. त्यांनीच मला या प्रेमप्रकरणाची कल्पना दिली आहे. तसंच " या दोघांनी पळून जाऊन लग्न केले तर पुढे या दोघांचं काय करायच हे बघावं लागेलआम्हाला ".....असा इशाराही त्यांनी दिलाय. तेव्हा तुमच्या मुलीला समजावून सांगा. आमच्या मुलाला पण आम्ही समजावणी देणार आहोत.तशीच वेळ आली तर त्याला मारहाण पण करायला मी कमी करणार नाही.नाही तर ते या दोघांना भयंकर त्रास देतील.कदाचित दोघांना इजा पण होऊ शकेल. तुमच्या कुटुंबियांना पण त्रास देतील.मला व माझ्या मुलाबाळांना सुद्धा त्रास दिल्या शिवाय राहणार नाहीत. आपण सगळेच बरबाद होऊ तेव्हा परिस्थिती बिकट होण्याआधीच हा सर्व विचार करून आता तरी आपण या दोघांना दूर ठेवू या "....सोमेशच्या वडिलांनी माझ्या वडिलांना कडक शब्दात इशारा दिला होता.
माझे वडील घरी येऊन मला व आईला खूप बोलले. मला तर मारायला उठले होते. आईने तेव्हा मध्ये पडून कसं तरी वाचवलं होतं. नंतर त्यांनी सोमेशचे वडील काय म्हणले ते सर्व सांगितले. आई खूप घाबरली होती.मला तर काहीच सुचेना.आईवडील दोघेही मला दोष देऊन तुझ्यामुळे आमची बदनामी होते आहे म्हणून मला खूप रागावले. माझ्या वडिलांनी सोमेशला आता विसरून जा म्हणून सांगितले त्यातच आपल्या सर्वांचं भलं आहे म्हणून सांगितले. मला खूप रडू यायला लागलं. मी इतकी त्याच्यात गुंतले होते की त्याच्या शिवाय कसं जगायचं हा प्रश्न मला पडला. मी त्याला फोन करायचा खूपदा प्रयत्न केला पण लागत नव्हता.नंतर माझा फोन वडिलांनी काढून घेतला.
घरातील सर्वजण आता मला तिरस्काराची वागणूक देत होते. कुणी माझ्याशी सरळ बोलत पण नव्हते. एक दिवस आई वडिलांनी मला मुंबईच्या मामाकडे आणुन सोडले. हिला काहीतरी कोर्स शिकवून नोकरीला लावा. तिला पुन्हा गावी पाठवू नका. आम्हाला ती आता नसल्यात जमा आहे असं समजा म्हणून सांगितले.इथून पुढे आमचा व तिच्या काहीच संबंध नसणार असं म्हणून मामाच्या गळ्यात माझी जबाबदारी टाकून आईवडील गावी गेले.जाताना मामाला माझ्या खर्चासाठी काही पैसे वडिलांनी दिले. माझ्याशी मात्र दोघेही परत जाताना एकही शब्द बोलले नाहीत. मामामामी गोंधळून गेले. मामी रागाने म्हणाली,... "आम्हाला दोन मुले आहेत त्यांचं करायचं आम्हाला होत नाही. हिला आणखी कुठे सांभाळायची. कुठं तरी अनाथाश्रमात पाठवून द्या. ".....
मामा म्हणाला,...." हिच्या आईवडिलांनी मला पैसे दिलेत. तेव्हा दोन वर्षें हिला आपण सांभाळू. नोकरी लागली की तीला वेगळे राहायला सांगूया."
मला खूप वाईट वाटले. मी आता सर्वांना ओझे वाटू लागले आहे. मग मी जिद्दीने स्वतःच्या पायावर हिमतीने उभे रहायचे ठरवलं. पार्टटाइम जॉब करून पैसे मिळवले. कॉम्प्युटरचा कोर्स, कंपनी सेक्रेटरीचा कोर्स अशा दोन कोर्सची फी त्या पैशातून भरली. खूप अभ्यास करुन ह्या दोन्ही कोर्स मध्ये मी चांगले यश मिळवले. हे सर्व करताना मी मामीला घरच्या कामात मदत करत असे.घरखर्चाला हातभार लावत होते. वर्षभर किरकोळ जॉब केल्यावर मला एका कंपनीत चांगला जॉब मिळाला. नंतर काही दिवसांनी मामाचे घर मी सोडले. त्या आधी माझ्या कमाईतली बऱ्यापैकी रक्कम मी मामाला दिली होती.नंतर मी वर्किंग वुमेन्स हॉस्टेल मध्ये राहू लागले.
पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी खाजगी क्लासच्या ट्युशन लावल्या. ऑफिसचे काम सांभाळून पदवीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मला खूपच कष्ट घ्यावे लागले. माझ्या चांगल्या कामामुळे व मेहनती वृत्तीमुळे मला कंपनीत चांगली संधी मिळत गेली. नशिबानं पण मला साथ दिली त्यामुळे भल्या व योग्य माणसांकडून सहकार्य मिळत गेले. त्यामुळे मी आज बऱ्या पोझिशनला आहे. पण हे सर्व मी मिळवले तरी माझे व आईवडीलांचे आजही काही संबंध नाहीत.त्यांच्या दृष्टीने मी आता नसल्यात जमा झालेआहे. मामाचे घर सोडल्यानंतर तिकडे पण आता जास्त जाणेयेणं राहिले. माझे सर्व निर्णय मला एकटीला घ्यावे लागत आहेत.मला आईवडील जिवंत असूनही जीवनात कुणाच्याही आधाराविना संघर्ष करावा लागला. या सर्व परिस्थितीमुळे मला मजबूत व खंबीर बनवलंय."
स्वतःबद्दल इतकं सगळं सांगून झाल्यावर निधीने आरुषीची हकीकत विचारली . आरुषीने स्वतःचे शिक्षण, नोकरी आणि घरच्या माणसांविषयी सर्व सांगितले. नंतर लग्नाचा विषय निघाल्यावर तिने सांगितले की,....
" सोमेशच्या घरच्यांनी आता सोमेशचे स्थळ माझ्यासाठी सुचवलं आहे. तो आता शिक्षण पूर्ण करून बऱ्यापैकी नोकरीला आहे. माझ्या घरचे लोक मी तिकडे गेल्यावर लग्नाबद्दल पुढचं ठरवणार आहेत.माझी मनस्थिती मात्र त्या लग्नाबद्दल अजून द्विधा आहे. '...
हे ऐकल्यावर निधी म्हणाली,.."सोमेश खरंच एक चांगला मुलगा आहे. आमचं प्रेम म्हणजे अल्लड वयातील वेडेपणा होता. तुम्ही दोघांनी मागचं सर्व विसरून चांगला संसार करा. माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत.माझा पण लौकरच लग्न करण्याचा विचार चाललाय. माझे एक सहकारी मित्र ज्यांच्या हाताखाली मी गेली तीन वर्षे काम करत आहे त्यांनी मला लग्नासाठी विचारलं आहे आणि मी संमति दिली आहे. नियतीने आपल्यासाठी जो मार्ग निश्चित केला आहे त्यावरूनच पुढे जावे लागणार आहे."......
आरुषीने तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि तिचा निरोप घेतला. तिथून निघताना निधीने तिच्याविषयी आणि त्या दोघींच्या आजच्या भेटीविषयी दुसऱ्या कुणाला काहीही न सांगण्याचे प्रॉमिस आरुषीकडून घेतले आणि गुडबाय केले .
©Vasanti Pharne
फोटो -इंटरनेट साभार