koni bolavel tyala ? - 2 in Marathi Horror Stories by निलेश गोगरकर books and stories PDF | कोणी बोलावले त्याला ? (भाग 2)

Featured Books
  • ફરે તે ફરફરે - 37

    "ડેડી  તમે મુંબઇમા ચાલવાનુ બિલકુલ બંધ કરી દીધેલુ છે.ઘરથ...

  • પ્રેમ સમાધિ - પ્રકરણ-122

    પ્રેમ સમાધિ પ્રકરણ-122 બધાં જમી પરવાર્યા.... પછી વિજયે કહ્યુ...

  • સિંઘમ અગેન

    સિંઘમ અગેન- રાકેશ ઠક્કર       જો ‘સિંઘમ અગેન’ 2024 ની દિવાળી...

  • સરખામણી

    સરખામણી એટલે તુલના , મુકાબલો..માનવી નો સ્વભાવ જ છે સરખામણી ક...

  • ભાગવત રહસ્ય - 109

    ભાગવત રહસ્ય-૧૦૯   જીવ હાય-હાય કરતો એકલો જ જાય છે. અંતકાળે યમ...

Categories
Share

कोणी बोलावले त्याला ? (भाग 2)

मागील भागावरून पुढे....


संपत ने किशोरचा हात सोडला आणी घाबरून दोन पावले मागे गेला. त्याच्या चेहऱ्यावर आता भीती स्पष्ट दिसत होती. प्रकरणाची नजाकत बघता आता श्यामलाच काही करणे भाग होते.

" किशोर ! चल आपण फार्म हाऊस वर जाऊ. तिथे जाऊन आपण बोलू ? "

" नको..." किशोर म्हणाला. पण त्याची नजर अजून पण दरवाज्यावर स्थिर होती. डोळ्यात स्वप्नाळू भाव होते. जणूकाही तो कोणत्या वेगळ्याच दुनियेत होता.

" किशोर ! " श्याम ने एक जोरदार हाक मारली... आणी किशोर भानावर आला.
" चल... आपण फार्म हाऊस वर गेल्यावर बोलू... मला पण जाणून घ्यायचे आहे. नंतर हवं तर आपण परत येऊ पण आता इथून चल...." श्याम त्याला समजावत म्हणाला.

" ह्म्म्म..." शेवटी किशोर वळला... आणी संपत आणी श्याम ने सुटकेचा निश्वास सोडला... काही वेळातच तिघे फार्म हाऊस वर परत आले.

दुपारी जेवण वैगरे करून तिघे बसले आणी मग पुन्हा विषय निघाला.

" संपत काय झाले? तु एव्हडा का घाबरलास ? "

" साहेब... त्या घरात कोणी जातं नाही.. ते घर शापित आहे. एक म्हातारी आणी एक तरुण मुलगी अश्या दोघीच तिथे राहतात.... "
" म्हातारी जादूटोणा करण्यात पारंगत आहे. सुरवातीला बऱ्याच लोकांनी तिला गावातून हाकलून लावायचा प्रयत्न केला. पण तिने काय जादू केली माहित नाही? त्या सगळ्यांचे हालत अशी झाली की , कोणाला लकवा मारला , कोणाचा तरणाताठा पोरगा अपघातात गेला. कोणाची बायको मेली. असे किती तरी किस्से आहेत सांगायला गेलो तर... त्यामुळे आता कोणी त्या म्हातारीच्या नादाला लागत नाही... "

" ती माझी आजी आहे.... " किशोर म्हणाला.
" प्रेमळ आहे. ती कोणाला त्रास देत नाही. पण कोणी तिला त्रास दिला तर ती त्याला सोडत नाही.... "

" मला जरा नीट सांगशील ? कारण माझ्या माहिती प्रमाणे तुझा ह्या सगळ्याशी काही समंध नाही. ह्या गावात पण तु पहिल्यांदा आलास. मग असे असताना ती तुझी आजी कशी असू शकते ? " श्याम ने त्याला विचारले. खरंतर त्याचा हा प्रश्न एकदम बिनतोड होता.

" बरोबर आहे तुझे. जर ह्या गोष्टी मला पण कोणी सांगितल्या असत्या तर मला पण पटल्या नसत्या. पण इथे आल्यावर त्याच्या खुणा जुळत गेल्या.
मला इथले रस्ते माहित आहेत , इथली घरे माहित आहेत , माझे घर माहित आहे. माझी आजी आठवते आहे...... मी लहान असताना त्या घरात राहिलो आहे. माझी आजीने तेव्हा पण जवळपास साठी पार केलेली होती. तिचा मी सगळ्यात लाडका नातू होतो. आपल्या खरखरीत हातानी ती नेहमी माझ्या डोक्यावरून हात फिरवायची... "
" तेव्हा आमचे घर भरलेले होते. तीन काका एक आत्या अशे आम्ही सगळे एकत्र राहायचो. मी सगळ्यात लहान म्हणून आजीचा लाडका... माझे वय फारतर तीन चार वर्षे असेल... नंतर काय झाले माहित नाही. सगळ्यांनी ते घर सोडले. बाबा मला आणी आईला घेऊन मुंबईला आले. माझे इतर काका पण कुठे कुठे गेले. आत्याचे लग्न लावून दिले... आणी सगळ्यांनी ते गाव , घर सगळ्याचे नाव टाकले. कोणी कधी त्याचा साधा उल्लेख पण करत नव्हते. म्हणून तर मला पण माहित नव्हते की माझे पण एक गाव आहे. पण इथे आलो आणी सगळे ओळखीचे वाटायला लागलं.. खुणा पटायला लागल्या... "
किशोर बोलायचं थांबला. आणी संपत आणी श्याम दोघे कान लावून त्याचे बोलणे ऐकत होते.

" खरं आहे.... गावातील जुनी माणसे सांगतात की , त्या घरात एकेकाळी चांगला राबता होता. अचानक सगळे सोडून गेले... आता ती म्हातारी.. म्हणजे ती आजी एकटीच तिथे राहते..." आपले जीभ चावत संपत ने किशोरच्या बोलण्याला समर्थन केले.

" मग ती मुलगी कोण आहे ?" श्याम ने विचारले.

" मला नाही माहित... मी तिला नाही ओळखत..." किशोर म्हणाला. म्हणून श्याम ने उत्तरा दाखल संपत कडे बघितले.

" ती आताच आलीय तिथे.. झाले असेल दोन एक वर्ष... पण ती सहसा बाहेर पडत नाही... आजीची कोणी लांबची नातेवाईक असावी. अतिशय सुंदर अशी ती मुलगी आहे." संपत म्हणाला.

" ह्म्म्म.... ठीक आहे.. आता जे झाले ते झाले... उद्या आपण घरी निघतोय... " फायनली श्याम ने जाहीर केले..

" काय ? " किशोर ला एकदम धक्का बसला.

" हो... तु इथे माझ्या बरोबर आला आहेस. त्यामुळे तुला सुखरूप घरी पोचवायची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे आपण उद्या घरी निघतोय... "

" अरे श्याम, आपण इथे आलोय तर एकदा आजी ला भेटून घेउदे.... मग आपण जाऊ घरी..." किशोर अजीजीच्या स्वरात त्याला म्हणाला.

" अजिबात नाही.... मी तुला त्या घरात पाय पण टाकून देणार नाही..." श्याम ने अगदी ठाम स्वरात सांगून टाकले.

" अरे श्याम ! माझी आजी आहे ती... ती आपल्याला काही करणार नाही. एकदाच तिला भेटून येऊ. इथवर आलो आणी तिला न भेटताच गेलो.. कसे दिसेल..? "
किशोर श्यामला समजावत म्हणाला. पण श्याम अजिबात ऐकायला तयार नव्हता. आणी त्याच्या हट्टापुढे किशोरचे अजिबात काही चालले नाही. तो तोंड पाडून बसला.

रात्री दोघे जेवले.. आणी गप्पा मारत बसले... रात्रीचे साधारण नऊ वाजले असतील पण जंगल आणी आडबाजूला असलेले फार्म हाऊस त्यामुळे खूप रात्र झाल्या सारखी वाटत होती. दोघे हळू हळू आवाजात गप्पा मारत होते. त्यांच्या गप्पांचा विषय तोच होता. किशोरची आजी... एव्हड्या रात्री पण ते सहजपणे तिच्या बद्दल बोलत होते. तिच्यातील मंत्रतंत्रा विषयी त्यांच्या मनात अजिबात भीती नव्हती.

" ठक... ठक...... ठक... ठक.... " अचानक दरवाजा वाजला.. दोघे गप्पात चांगलेच रमले असल्याने झालेल्या आवाजाने दोघे दचकले. एव्हड्या रात्री कोण आले?
संपत तर येणार नाही. तो तसा बोललाच होता. क्षणभर दोघांनी एकमेकांकडे पाहिले.
आणी पुन्हा दरवाज्याचा आवाज झाला.

" कोण असेल रे ? " श्याम ने हळू आवाजात विचारले.

" मला काय माहित... दरवाजा उघडू ? "

" वेडा आहेस का ? कोण आहे माहित नाही आणी दरवाजा काय उघडतो आहेस? "

" मग काय करायचे ?" किशोरने पुन्हा दरवाज्या कडे नजर टाकली. आणी श्यामने आजूबाजूला नजर फिरवत एक चांगला जाड सोटा हातात घेतला...

" चल... आधी आतून विचार... मग ठरवू दरवाजा उघडायचा की नाही ते... "

" ह्म्म्म... "

" कोण आहे ? " किशोरने खणखणीत आवाजात प्रश्न विचारला.

" मी.... मंदाकिनी. " बाहेरून एक अतिशय गोड आवाज आला. आणी पुन्हा दोघांनी एकमेकाकडे पाहिले... एव्हड्या रात्रीची एक मुलगी आपल्या दारात ते पण अश्या आडबाजूला... दोघे जरा गोंधळात पडले.

" उघड... आणी जरा बाजूला हो... " आपल्या हातातील सोटा सांभाळत श्याम ने हळुवार आवाजात किशोरला म्हणाला.

किशोरने बाहेरचा कानोसा घेत दरवाजा उघडला. बाहेर एक अत्यंत रूपवान , तारुण्याने मुसमुसलेली साधारण बावीस चोवीस वर्षाची मुलगी उभी होती.

" कोण तुम्ही ? आणी अश्या अवेळी ह्या आडबाजूला कश्या ? "

" मी आंत येऊ का ? की सगळे इथेच सांगत बसू ? " तिचा तोच गोड आवाज पण आता त्यात जरा नाराजी भरली होती.

" ह्म्म्म..." दोघे बाजूला होत त्यांनी तिला आंत यायला जागा करून दिली. आणी ती आल्यावर त्यांनी दरवाजा पुन्हा लावून घेतला. खरं म्हणजे अशी मुलगी घरात असताना दार लावून घेणे दोघांना जरा विचित्र वाटत होते. पण संपत ने सांगितलेले जंगली श्वापद वैगरेंच्या भीतीने त्यांनी दरवाजा लावून घेतला.

ती मुलगी सरळ जाऊन एका सोफ्यात बसली. तिला एव्हड्या रात्री , एकटी ह्या दोघां बरोबर , अश्या आडबाजूला अजिबात भीती वाटत नसावी . किमान तिच्या चेहऱ्यावरून तरी तसें वाटत होते.

" बोल... " श्यामने तिला विचारले .

" मी.. मंदाकिनी... तुझ्या आजी बरोबर राहते... " ती स्पष्टपणे किशोर कडे बघत म्हणाली. आणी दोघे चमकले..

" सकाळी तु दारापाशी येऊन परत गेलास.. आजी ला कळले. म्हणून तिने उद्या तुला भेटायला बोलावले आहे. "

" तिला कसे कळले मी येऊन गेलो ते ? दरवाजा तर बंद होता? "

" तिला सगळे कळते." ती गूढ हसत म्हणाली. हसताना एका ओळीत असणारे तिचे पांढरे शुभ्र दात चमकत होते.

" आम्ही उद्या परत जातोय.. " श्याम म्हणाला. आणी तिने एक नजर त्याच्या कडे टाकत पाहिले.

" तिने तुम्हाला परवानगी दिली नाही तर तुम्ही जाऊ शकता ? " तिच्या आवाजात एक प्रकारचा उपहास होता.

" तरीही आम्ही जाणारच..." श्याम हट्टाने म्हणाला.

" ठीक आहे.. मर्जी तुमची.. पण आजी तुमची वाट पाहत आहे. नाही जमले तर या घरी... येऊ मी...? " ती गालातल्या गालात हसत म्हणाली. तिच्या हसण्या मागचा
उद्देश श्याम च्या लक्षात आल्यावर त्याला ते झोम्बले.
तो आवेशाने तिला काही बोलणार तेव्हड्यात किशोरने त्याला थांबवले. आता बोलायची सगळी सूत्रे त्याने आपल्या हाती घेतली.

" ठीक आहे आम्ही येतो उद्या... "

" आम्ही ? मी नाही येणार तुझ्या सोबत तुच जा..." श्यामने हात झटकले.

" बरं तु नको येउस मी जाऊन येतो. "

" ठीक आहे. मी आता जाते. " मंदाकिनी उठली.

" आता ह्या वेळी , अंधारात ? तुला भीती नाही वाटत ? "

" कसली भीती ? आता येताना नाही का मी आले.. एकटी.... "
एकटी ह्या शब्दावर जोर देत ती म्हणाली. तरीही किशोरला तिचे असे एकटे जाणे काही बरोबर वाटत नव्हते. त्याच्या डोळ्यात दाटलेली चिंता तिला उमगून गेली.

" काळजी करू नका... काही होत नाही. मला सवय आहे आणी ह्या गावात कोणाचीही माझ्या अंगावर हात टाकायची हिम्मत नाही." त्याला धीर देत ती म्हणाली.

" अग पण जंगली जनावर ? "

" त्यांची ही नाही.... येऊ मी ? "

" ह्म्म्म... " दोघांनी ती गेल्यावर दरवाजा पुन्हा लावून घेतला.

" तु खरोखर जाणार आहेस? "

" जावेच लागेल... ती काय म्हणाली ते ऐकलेस नाही. जर आजीची इच्छा नसेल तर आपण इथून जाऊ शकत नाही. आणी माझ्या मुळे तुला काही त्रास व्हावा अशी माझी इच्छा नाही. मी लगेच जाऊन येतो. " किशोर त्याला समजावत म्हणाला. त्यावर श्याम काही म्हणाला नाही. तो आपल्याच मनात काही विचार करत होता.

दुसऱ्या दिवशी संपत आला. तेव्हा दोघांची तयारी झाली होती.

" निघाले काय ? " दोघांची तयारी बघून संपत ने विचारले.

" नाही जरा गावात जाऊन येतोय... " किशोर म्हणाला. संपत ला सांगून काही उपयोग नव्हता. त्याने पण त्याला जाऊ नये म्हणून गाऱ्हाणं घातले असते.

" मी जाऊन येतो..." किशोर श्यामला म्हणाला..

" थांब मी पण येतो... "

" तु कशाला ? "

" आता जे होईल ते सोबतच... " श्याम म्हणाला..

" तुम्ही नक्की कुठे जाताय ? " संपत ने जरा शंका घेत विचारले.

" ह्याच्या आजी कडे... "

" काय ? अहो साहेब माझे एका नका जाऊ... "

" संपत... आम्हाला जावेच लागेल... तु एक काम कर... समजा काही विपरीत घडले तर आमच्या घरापर्यंत निरोप कळवं... ठीक आहे... "
आता ते ऐकणार नाहीत हे लक्षात आल्यावर संपत ने मान डोलावली. आणी किशोर आणी श्याम दोघे निघाले.
अर्ध्या तासाच्या पायपीटी नंतर ते त्याच घरच्या समोर उभे होते. भक्कम दरवाजा , मोठ्या भिंती...

किशोरने पुढे होत दरवाजा वाजवला... आणी काही वेळातच मंदाकिनी ने दरवाजा उघडला... आज ती चांगलीच टवटवीत दिसत होती . सुहास्य मुद्रेने तिने दोघांना आंत यायचा इशारा केला. किती वर्षानंतर आज पुन्हा किशोरने त्या घरात पाय ठेवला होता. घर होते तसेच होते. दोन पावले चालून किशोर स्तब्ध उभा राहिला.

दरवाज्या समोर एक छोटेशी मोकळी जागा.. त्या जागेला चारी बाजूने बांधलेला ओटा... ओट्यावर ठराविक अंतराने असलेले खांब त्यांच्या आधारावर ओट्याच्या वर असलेले छप्पर... ओट्याला लागून दोन्ही बाजूला असलेल्या चार चार खोल्या... समोर मुख्य घराचे दार... आंत आणखीन खोल्या.... किशोर ला सगळे आठवत होते.... तो जणू बालपणात परत आला होता. लहान असताना तो आणी इतर मुले इथेच खेळत असत...

" काय झाले ? " मंदाकिनीच्या मंजुळ आवाजाने त्याची तंद्री तुटली...

" काही नाही... जसं आहे तसेच अजून आहे... काही बदल नाही... " तो स्वगत म्हणाल्या सारखा पुटपुटला..
" आजी कुठेय ? "

" आहे आंत... तुझीच वाट बघतेय..." ती म्हणाली आणी ओट्यावरून चालत मुख्य घराकडे निघाली... आपसुख हे दोघे तिच्या मागे निघाले...

आजी एका खुर्चीत बसली होती. अतिशय जर्ज्जर अवस्थेत ती होती. सगळे अंग सुरकुत्याने भरले होते. तोंडात एखादा दात असेल... मिचमिच्या डोळ्याने ती दरवाज्याकडेच बघत होती. किशोरला बघताच तिच्या डोळ्यात जरा चमक आली.

" बाबू.... आलास का रे ? " आपल्या थरथरत्या आवाजात तीने विचारले. बाबू हे त्याचे टोपण नाव पण तिनेच ठेवले होते. ह्या नावानी फक्त तीच किशोरला बोलवायची. किशोर तिच्या पायापाशी बसला... तिने प्रेमाने त्याच्या डोक्यावरून आपला थरथरता हात फिरवला.

" कशी आहेस आजी ? "

" जगतेय अजून... तुम्ही कोणीतरी याल म्हणून आस होती. शेवटी तु आलास... " ती म्हणाली..

" मी तर विसरूनच गेलो होतो की आपले पण एक गाव आहे. इथे आलो आणी सगळे आठवायला लागले... "

" बरं झाले आलास ते... नाहीतर ह्या म्हातारीला काही सुटका मिळाली नसती... " ती खिन्न आवाजात म्हणाली.

" मी काही समजलो नाही... "

" खूप मोठी कहाणी आहे. तु तेव्हा खूप लहान होतास. त्यामुळे तुला माहित नाही. तुझ्या आई, बाबा, काका, काकी, आत्या सगळ्यांना माहित आहे. म्हणून तर ते हा गाव सोडून गेले... " ती एव्हडे म्हणाली आणी तिला दम लागला... मंदाकिनी ने लगेचच बाजूच्या पेल्यातील पाणी तिला पाजले....

" काय झाले ते मला नीट सांग..." किशोरचीं उत्सुखता चाळवली गेली.

" हा कोण आहे ? " अचानक आजीने श्याम कडे बघत विचारले...

" माझा मित्र आहे... आम्ही दोघे फिरायला आलो होतो. आणी आपल्याच गावात आलो. "

" ह्म्म्म... तुला गावात सगळ्यानी सांगितले असेल की ह्या घरात जायचे नाही , बघायचे पण नाही..." आजीने विचारले...

" ह्म्म्म लोक बोलत होते..." संपत चे नाव न घेता किशोर म्हणाला.

" बरोबर आहे...आपल्या घरावर त्याची नजर असते म्हणून ते सगळे घाबरतात... "

" त्याची? त्याची म्हणजे कोणाची ? मला नीट कळेल असे सांग नां आजी... " किशोर आजीचा हात आपल्या हातात पकडून म्हणाला. त्याच्या आवाजात अधीरता होती. आजीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.

" तु पण मला इतरांसारखा चुकीचा समजणार नाहीस ना ? "
आपल्या थरथरत्या आवाजात तिने विचारले. तिचे मिचमिचे डोळे काहीसे पाणावले. किशोरने तिचे डोळे पुसत मान हलवली.


पुढील भाग लवकरच....


© सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित...