लाटांवर लाट जोरात आपटत होती. जस की प्रत्येक लाट ही समुद्राशी भांडत असावी त्या किनाऱ्याला भेटण्यासाठी...
तो आज ही आलेला. पण एकटाच. दुरवर पसरलेल्या समुद्रामध्ये हरवलेला. डोक्यात ना कसले भाव होते, नाही चेहऱ्यावर हसु. एकटक शांतपणे तो वाळुमध्ये बसुन होता. दूरवर पसरलेल्या समुद्राला बघत.
चौपाटीवर वारा वाहत होता. रोज तोच वारा जीवाला शांत करणारा ठरत असला तरी आज मात्र तोच वारा नकोसा झालेला.
हळु- हळु सूर्याचे साम्राज्य संपत, त्यावर काळोखाने मात केलेली. जसा सूर्याने समुद्रात उडी घ्यावी तसच काहीसं वाटत होतं. तो त्या जाणाऱ्या सूर्याकडे आपले डोळे लावून बसलेला. जसा सूर्यास्त झाला, याने ही आपले डोळे बंद केले आणि अचानक पाणी गालावर येऊन थांबले.
तसा तो उठला आणि जाऊ लागला. पाणी-पुरीवाल्याने आवाज ही दिला. पण त्याने तो ऐकून न ऐकल्या सारख करत तो आपल्या बाईक जवळ येता झाला. ती सुरू करून वाऱ्याच्या वेगाने तो निघून गेला.
घरी आला आणि तसाच बेडरूमध्ये येऊन त्याने दार बंद केले. वॉशरूममध्ये जाऊन शॉवरखाली उभा राहून रडु लागला. पण आपला आवाज बाहेर जाऊ नये याची मात्र तो काळजी घेत होता. खुप वेळाने बाहेर आला. कपडे बदलुन तसाच बेडवर आडवा झाला.
आणि डोळ्यासमोरून सगळं दृष्य सर्रकन निघून गेलं.
कॉलेजचा पहिला दिवस. त्याने ही सर्वसामान्य मुलांसारखं कॉमर्समध्ये ऍडमिशन घेतले. तसा तो शाळेपासूनच हुशार नेहमी टॉप पाचमधला. पण बोलतात ना कॉलेजमध्ये आलं की डोक्यात हवा भरते तसच काहीसं त्याच ही झालं.
त्याने ठरवल होत की आपण ही कॉलेजमध्ये प्रेम करायचं. बंक मारून सिनेमाला जायचं. एन्जॉय करायच लाईफ. पण आई- बाबांनी आधीच सांगून ठेवलं होतं. "बाबा रे कॉलेजमध्ये मारामारी करू नकोस, नको ते धंदे ही नको करूस. मज्जा कर, मस्ती कर. पण वाईट संगत लावुन वैगेरे नको घेऊस."
प्रेमाला विरोध नव्हताच त्यांचा, कारण त्याच्या आई-बाबांचा ही प्रेम विवाह होता. त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नव्हताच.
आज तो कॉलेजमध्ये लवकर आला. नवीन फ्रेंड्स बनले होते त्याचे. बोलत बसला त्यांच्याशी. तोच एक मुलगी त्याला गेटमधुन येताना दिसली. तिचे शॉर्ट हेअर त्यावर ग्रीन कलर ने केलेले हायलाईट्स. पिंक क्रॉप-टॉप, आणि खाली ब्लॅक जीन्स. त्याला शोभुन व्हाईट शूज. ती सरळ आणि क्लासरूमध्ये निघून गेली.
तशा अजून काही सुंदर, अशा मुली येत होत्या जात होत्या. पण त्याला ती दिसत नव्हती.
ती,..जेव्हा तो पहिल्यांदाच ऍडमिशन लाईनमध्ये उभा होता. आणि ती त्याच्या पुढे. स्ट्रेट हेअर्समुळे ती अजूनच छान दिसत होती. त्यांची जुजबी ओळख झाली. फॉर्मभरून ते गेले. परत भेटण्यासाठी...
त्याला तेच कॉलेज लागलं होतं. आता आतुरता होती ती तिच्या येण्याची. कारण त्याने आधीच तीच नाव लिस्टमध्ये बघितल होत आणि मुद्दाम त्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन ही घेतल होतं.
बेलचा आवाज येताच ते क्लासरूमध्ये गेले. पहिला लेक्चर चालु झाला आणि त्याच तोंड पडलं. आजही ती काही आली नव्हती. कदाचित तिने दुसरीकडे ऍडमिशन घेतलं असावं.
तोच अचानक कुठुन तरी वारा यावा तशी ती आली. हो तीच.. त्याची ती. तिला बघताच तो बघतच राहिला. ती क्लासरूमध्ये येत तिने बेंच पकडला व ती बसली. हे सर्व तो मागुन निरीक्षण करत होता. एक एक करत लेक्चर झाले आणि मधल्या सुट्टीची बेल झाली. तसा तो जाऊन तिला भेटला.
तो- हेय...!! ओळखलस का...??!
आधी ती दचकली कारण तो अचानकपणे तिच्या समोर येऊन उभा राहिला होता. मग स्वतःच्या डोक्यावर खूप वेळ ताण दिल्यावर तिला तो आठवला.
ती- हॅलो. आपण ऍडमिशनच्या वेळी भेटलो होतो ना...?!
तो- हो. मला वाटल तु दुसऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंस.
ती- अरे नाही. खर तर माझी तब्बेत ठीक नव्हती म्हणुन आले नाही. सो आज आले.
तो- मग ठीक आहे ना आता तब्बेत..?
ती- हो आता उत्तम आहे. बाय द वे मी.. आसावरी.
तो- सॉरी स्वतःची ओळखच करून नाही दिली. मी हर्ष.
काही वेळ बोलुन परत लेक्चर सुरू झाले.
आता ते छान मित्र झालेले एक- मेकांचे. एकच वर्गात असल्याने नोट्स घेणे, लायब्ररीत एकत्र अभ्यास करत बसणे. एकत्र कॅन्टीनमध्ये डब्बा खाणे. तिला कंटाळा आला की हाच तिचा होमवर्क करून देई.
त्याच्या बाबांनी त्याला बाईक घेऊन दिलेली. त्यामुळे आता ते लॉंग ड्राईव्हला ही जाऊ लागले होते. नेहमी तिला हवं म्हणून ते चौपाटीवर जायचे. पाणी-पुरी खायचे. चौपाटी भले ही त्याच्या घरापासून फार लांब होती तरीही तो फक्त तिच्यासाठी जायचा. पण ती मात्र त्याच्याकडून स्वतःची सगळी काम करून घेत असे. कधी कधी तर ती स्वतःच्या मोबाईलचा रिचार्ज ही त्यालाच करायला सांगे. ....
To be continued