Aaghat - Ek Pramkatha - 26 in Marathi Love Stories by parashuram mali books and stories PDF | आघात - एक प्रेम कथा - 26

Featured Books
Categories
Share

आघात - एक प्रेम कथा - 26

आघात

एक प्रेम कथा

परशुराम माळी

(26)

मला काहीच समजेना. सरांची परवानगी घेतली आणि गावची एस.टी.धरली. आजीला निपाणीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. मी पुरता घाबरू गेलो होतो. आजोबांशिवाय जवळ कोणीच नव्हतं. आजीला सलाइन लावले होते. नुकतीच तिला झोप लागली होती. मी आजोबांकडे आजीच्या तब्येतीची विचारपूस केली.

‘‘असं अचानक कशी आजारी पडली आजी?’’

‘‘काय सांगायचं पोरा, बरं वाटत नसताना घरात बाजाराला पैसा नाही म्हणून कामाला गेली. आजारी असल्याचं मला लवकर सांगितले नाही.

दवाखान्याला कुठला पैसा आणायचा म्हणून अंगावरच काढली. जास्त त्रास व्हायला लागल्यावर मग सांगितले. ताप-थंडी वाढला होता. म्हणूनच एवढ्या मोठ्या हॉस्पिटलात घेऊन यायची वेळ आली.’’

‘‘मग पैशाचं कसं काय जोडणी केलायसा?’’

‘‘गल्लीतल्या चौगुले मास्तरकडून ५०० रुपये उसने मागून घेतल्यात.” जरासा सोयाबीन हाय त्यो विकला की देऊन टाकतो म्हणून सांगितलंय.’’

‘‘आता हाय न्हवं जरासं बरं?’’

‘‘हाय आता जरा कमी आलाया ताप.’’

‘‘कवा आणलंय हॉस्पिटलात या?’’

‘‘चार दिसं झालं आता.’’

‘‘मग मला का नाही कळविलं लवकर?’’

‘‘कशाला कळवावं पोरा. अगुदर तुझं महत्त्वाचं वर्ष हाय तुझ्या आणि अभ्यासात फरक पडायला नगो म्हणून.’’

‘‘अभ्यास बरा हाय न्हवं पोरा?’’

‘‘हाय.’’

‘‘बोर्डिंगचं सर, ती तुझ्या खोलीतली पोरं,आपल्या गावचा अनिल हाय का बरा?”

‘‘होय, हायत की.’’

‘‘आणि कॉलेजात मास्तर काय म्हणत्याती ते पण हाय ती काय बरी?’’

‘‘तुला काय बक्षीस बिक्षीस मिळालं काय. अलिकडं कुठल्या परीक्षेत नंबर आला काय?’’

‘‘होय, आला की बक्षीस पण मिळालं.’’

‘‘मला माहीत हाय माझा नातू एकदा पण नंबर सोडणार नाय म्हणून.’’

आजोबांना आता कुठे बाहेर जायचं होतं नव्हतं. त्यामुळे महिना, पंधरा दिवसात मला पाहिला येणारे आजोबा अलिकडे त्यांचं यायचं पूर्ण बंद झालं होतं. कॉलेजातल्या शिपाईपासून प्राचार्यांपर्यंत सगळयांची आजोबांना ओळख होती, तर बोर्डिंगमध्ये भाकऱ्या करणाऱ्या मावशीपासून ते बोर्डिंगच्या अधिक्षकांपर्यंत सगळयांशी ओळख झाली होती. त्यांच्या बोलण्याचं वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या बोलण्यात, स्वभावात एक प्रकारचा ओलावा होता,आपलंपण होतं. एकदा आजोबांबरोबर एखादा माणूस बोलला की तो त्यांचा होऊन जात होता. जरी मला भेटायला ते अलिकडे कोल्हापूरला येत नसले तरी मी ज्या ज्या वेळी गावी जाईन त्या त्या वेळी सगळयांची विचारपूस करायचे, चौकशी करायचे.यावेळी मात्र मी त्यांना खोटं सांगत होतो. हॉस्टेल सोडले होतं, तरीही हॉस्टेलच सर बरे आहेत म्हणून सांगत होतो. अभ्यासातील प्रगती शून्य होती,पण बक्षिसे मिळविली म्हणून सांगत होतो. महाविद्यालयातील शिक्षकांकडून कौतुक होतंय म्हणून सांगत होतो. बेधडक साफ खोटं सांगत होतो तेही पहिल्यांदाच. ज्यानं आपल्यासाठी जीवाचं रान केलं होतं त्यांना असं अंधारात किती दिवस ठेवणार होतो मी? किती तळमळीनं विचारपूस करत होते आजोबा? त्यांची माझ्याबद्दलची तळमळ, धडपड किंचितही कमी झाली नव्हती.आमच बोलणं सुरू होतं, इतक्यात आजीला जाग आली. आजीनं भोवताली एक कटाक्ष टाकला. माझ्याकडे पाहत म्हणाली,

‘‘कवा आलास रं लेका?’’

‘‘आताच आलोय, बरं वाटत नसताना कशाला गेलीस कामाला?’’

‘‘काय करू लेका? चालाया नगो व्हयं घर.’’

‘‘आगं मग असा आजार अंगावर काढायचं नाही. पैशाची अडचण होती तर कुणाकडून तर चार पैसे उसनं घ्यायचं होतासा. आस आजार अंगावर घेऊन काम धंद्याला जायाची काय जरुरी हुती काय?’’

‘‘आता माझं काय खरं नाही पोरा, आज हाय उद्या नाय. तुझी तू चांगली काळजी घे. पोटाला खाईत जा. कुणाला दुखवू नको. शिस्तीनं रहा.’’

पुन्हा तिच्या या कायमच्या सूचना, पण या सूचनांचं काही माझ्याकडून पालन मात्र होत नव्हतं.

‘‘आजी आसं बोलू नको. तुझ्याशिवाय मला कोण हाय?’’

‘‘काय करू पोरा? काय हुत नाही आता, पावलापावलाला तोल जातुया.अंगात रगत नाही. जेवण जात नाही. डोळयानं दिसत नाही नीट. आमची काळजी आता सोडून दे बाळा.’’

आजी आता खूप थकल्यासारखी दिसत होती. तिचं हे बोलणं ऐकून माझ्या डोळयात पाणी आलं. माझं इथपर्यंत शिक्षण होण्यामध्ये आजीचा वाटा महत्त्वाचा होता. मला हॉस्टेलला सणवाराचं गोडधोड पाठविल्याशिवाय तिचा सण पूर्ण होत नव्हता. बिचारी अडाणी. आजोबा थोडं शिकलेलं, सवरलेले,शहाणं होतं. पण माझी आजी अडाणी, भोळी भाबडी, जिवाचं रान करून आयुष्यभर राब राब राबली. कधीच कधाची अपेक्षा केली नाही. अंगावर फाटकं ठिगळं लावलेलं पातळ, गळयात फुटका डोर्ल्याचा मणी हा सगळा अवतार बघितल्यावर वाटायचं एक ना एक दिवस माझ्या आजीला मी नवं डोर्ले करणार, नवी साडी घेणार, तिला सुखात ठेवणार ही स्वप्न मी पहायचो. पण त्या भोळया भाबड्या मातेनं कधीच कुणाची अपेक्षा केली नाही, कुणापुढं हात पसरली नाही जे मिळालं ते खाल्लं. प्रसंगी उपाशी राहून आमची पोटं तिनं भरली पण कुणाच्या दारात लाचारपणानं वागली नाही की कुणापुढं हात पसरली नाही. स्वाभिमानी वृत्तीची माझी आजी होती. उभ्या आयुष्यात तिनं तिचा स्वाभिमान कधी ढळू दिला नाही. सगळयांनी तिला नाकारलं, लाथाडलं, झिडकारलं खुद्द लेकानंही पण ती खचली नाही. काळजावर घाव सोसत ती खंबीरपणे उभी राहिली.मोडका संसार ढासळू दिला नाही. तो सावरत राहिली. एखाद्याच्या जगण्याला बळ देणारं तिचं जगणं होतं. व्यक्तिमत्त्व होतं. चटणी भाकरी असेल ते गोड मानून खायाची. जेवणाला नाव ठेवायचं नाही. ही तिची कायमची शिकवण होती. कारण इतभर पोटाच्या खळग्यासाठी किती कष्ट आणि किती दाह सोसावा लागतो हे तिनं अनुभवलं होतं. भोगलं होतं अशी माझी आजी करारी बाण्याची होती. सहज बोलता बोलता आजोबांनी विचारलं.

‘‘परीक्षा, कवा हाय रं पोरा?’’

‘‘परीक्षा पाच ते सहा दिवसात.’’

हे ऐकल्यानंतर आजोबांना आश्चर्य वाटलं, तु पुन्हा म्हणाले,

‘‘कवा हाय परीक्षा?’’

‘‘पाच ते सहा दिवसात.’’

‘‘आरे, फरसाण्या, मग तू हितं काय करतुया? मी हाय हित. तू तिची काय काळजी करू नकोस. निवांतपणी परीक्षा लिही जा.’’

एवढ्यात आजी म्हणाली, ‘‘जा लेका, तुझी परीक्षा महत्त्वाची हायं. कष्ट वाया जाया नको आमच्यामुळं.आम्ही काय तुझ्या आयुष्याला पुरणार हाय व्हयं? जा तुझं शिक्षण महत्त्वाचं हाय.’’

तसं मी तिथून बाहेर पडलो. पाय उचलत नव्हतं पण काय करणार? जड पावलांनी तिथून मी बाहेर पडलो. वाटलं होतं महाविद्यालयात गेल्यानंतर सगळीजण माझ्याकडे आजीच्या निमित्तानं का असेना विचारपूस करतील. पण माझा समज पार फोल ठरला. मला आजीच्या आजोबांच्या तब्येतीबद्दल कोणीच विचारलं नाही. वाटलं एका चुकीमुळे माणसं किती कठोर होतात? याचं ज्वलंत उदाहरण मी स्वत: अनुभवत होतो. आजीची थोडी काळजीही वाटत होती. इकडे परीक्षेचीही धास्ती होतीच. अखेर एकदाची परीक्षा सुरू झाली. परीक्षा संपल्याशिवाय भेटायचं नाही असं ठरल्यामुळे सुमैयाची आणि माझी भेट होणं अशक्य होतं.

पूर्वीसारखं पेपर चांगले जात नव्हते. कुठल्यातरी दबावात असल्यासारखं वाटत होतं. बिनधास्तपणा नव्हता, पेपर लिहायला सुरू झालं की हात कापायचे, अंगाला घाम फुटायचा, असं कधी होत नव्हतं. पण आता घडत होतं याचं मुख्य कारण होतं, माझा असलेला अपूर्ण अभ्यास आणि कमजोर व्यक्तिमत्त्व. पेपर संपत होते. एकेक पेपर संपेल तसं टेन्शन वाढत होतं. अतिशय अवघड गेले होते पेपर. जे आजपर्यंत कधीच इतके अवघड गेले नसतील तितके अवघड गेले होते. मी माझ्या कर्माला सोडून शेवटी दोष कुणाला देणार होतो? हे सारं झालं होतं ते तिच्यामुळेच पण उघडपणे बोलण्याचं धाडस तर होतंच नव्हतं. सगळं कळत होतं पण वळत नव्हतं. जे घडायचच तेच हातून घडत होतं. जे व्हायचं तेचं झालं होतं. आता विचार करून काही उपयोग नव्हता. परीक्षा संपली आणि मग डोक्यात प्रकाश पडू लागला. आपण खूप मोठी चूक केली आहे, असं वाटू लागलं आणि ते खरं होतं. पेपर सगळे अवघड गेले होते. निराश मनाने खोलीवर परतलो, खूप रडलो. कॉलेज जीवनातला शेवट आपण चांगला केला नाही, याची खंत तर होतीच पण नापास झालो तर काय करायचं हाही प्रश्न होताच.

*****