५) शेतकरी माझा भोळा!
कोंडबा मोटारीतून उतरला आन् पायी पायी घराकडं निघाला. स्टँडपासून गाव चार फरलांग दूर व्हत. तेव्हढ अंतर पायी चालाय लागायच. न्हाई म्हणाया दोन ऑटो व्हते पर त्ये मान्सी पाच रुपै घेयाचे. तेव्हढे पैयसे कोंडबापाशी नसायचे त्यो हमेशा पायीच निघायचा. त्या दिशीबी त्यो पायीच सीतापूरकडं निंघला. दोन-आडीच फरलांग आला आन् त्येच ध्यान सडकेला चिकटून असलेल्या त्येच्या जिमिनीकड गेलं. दोन-आडीच येकरचा त्यो तुकडा नुस्ता खडकाळ व्हता. ह्ये मोठाले धोंडे पडले व्हते. कोंडबाच्या घरी आठरा-ईस्व दरिद्री असल्यामुळे त्येच्या आज्ज्यापासून म्हंजी जवळ-जवळ पन्नास येक साल ती जिमीन पडीक व्हती. गणपत हमेशाच मंजुरी करायचा. कव्हा बव्हा ऊपासी बी निजायचा पर ती वांजुटी जिमीन ईकायचा ईचारबी त्याच्या मनात यायचा न्हाई. सोत्ताच्याच ईच्चारात गुंग असताना त्योच्याजवळून येक जीब धूळ उडवीत गेली. सीतापूरच्या येका मान्साची ती जीप व्हती. पैंसजर भरून पळत व्हती. रोडपासून सीतापुरपस्तोर मान्सी च्यार रुपै घेयाचा. ती जीप फुड गेली आन् कोंडबाचं ध्यान पुना वावराकडं गेलं. तव्हा त्येच्या डोस्क्यात येक ईचार ईजेवानी चमकली.
'आपण बी जीब घेत्ली तर?' येका मनानं इचारलं.
'खुळ्या दात पाडून ईकले तरी बी जीब काय पर तिच्च टायर बी मिळाचं न्हाई.." दुसरे मन म्हन्लं.
'आर ही वाझुंटी जिमीन कवा कामी यील?' पैयल्या मनान सवाल केला.
'बापू परमिसन देयाचा न्हाई रे.' दुसऱ्या मनान सोत्ताच म्हणण फुड रेटल. आशा परकारात...दोन मनायच्या भांडणात कोंडबा घरी पोचला. गणपत बाहीर गावी गेल्ता. त्यो आन दुसरे चार पाच कास्तकार येका कारखान्यावर गेलते. त्यो कारखाना बेण पुरवत व्हता.
कोंडबा हातपाय धुवून जेवाय बसताना यस्वदीन ईचारल, "पोरा, तू काय म्हन्त्यात त्यो झाला हास ना? तेरे गिरगुट !"
"माय, गिरगुट न्हाई ग.. ग्रेजुएट!"
"तेच ते! तुहं शिक्शान झाल मग आत्ता नवकरीच काही फाणार हायेस का न्हाई? तुला नोकरी तं मिळल ना?"
"माय, शिक्षण झालं म्हंजी का नौकरी तैयार आसती व्हय ?"
"मग?"
"आग जागा निघल्या फायजेत. शिवाय इंटरव्ह्यू व्हत्यात. वर आणिक पैका बी देवाव लागतो."
"पैका? त्यो कहाला? तू तर लै शिकलास न्हव? तुहे बापू त म्हणत व्हते. कोंडबाबानी गावात कोन्हीच न्हाई शिकलं. येव्हढा मोठ्ठा सरपंच पर त्यो बी शिकला न्हाई म्हणं."
"त्ये समद ठीक हाय गं, पर नौकरी आशी सहजासजी मिळत न्हाई." म्हन्ता म्हन्ता कोंडबा हात धुवून त्येच्या संदुकाजवळ गेला. संदकातून त्येनं येक जाडजूड फाईल काढली. फायलीतले कागद फाता-फाता त्यातून येक कागुद बाहीर पडला. त्यो कागोद फावून कोंडबाला लै आनंद झाला. त्ये कागुद म्हंजली त्येच ड्रावीग लैन्सस व्हतं. त्या लैसन्सचा त्येनं येक जोराचा मुक्का घेतला. त्याला आठवल की, तो कालीजात असताना त्येचा रवी नावाचा येक मैतर व्हता. रवी लै शिरीमंत व्हता. रवीकडं कार बी व्हती. सुट्टी असली म्हंजी रवी कोंडबाला कारीतून शेहराबाहीरच्या त्येच्या मळ्यात घेऊन जायचा. दोघायची लै घट मैतरी व्हती. रवीच्या ड्रावरने दोघायलाबी कार शिकवली. रविच्या बापाच्या वळखीनं त्येंना ड्रायविंग लायसन्स बी मिळाली....
"माय, बापू कव्हा येणार हात गं?" कोंडबानं इचारलं.
"येतील रातच्याला न्हाई तर उद्या दुपारी"
दुसऱ्या दिशी कोंडबा शेहरात पोचला. कैक जीपवाल्या आन् कारवाल्यायला त्येनं त्ये लैयसन्स दाखवून ड्रायवर ठिवा म्हून ईनवल पण वळख नसलेल्या पोराला नौकरी देयाला कोन बी तैयार न्हवतं. हिंडून हिंडून थकलेल्या कोंडबानं येका नळावर पाणी पिलं आन् त्यो बाजुच्या गवतावर बसला. तव्हा त्येच येक मन म्हन्लं, 'ह्ये सम्द अनोभव हाय का आस कावून ईचारत असतील?'
'त्येंचं बरुबर हाय रे तीन-पाच लाख रुपैयाची गाडी बिनवळखीच्या मान्साच्या हातात कोण दील?'
'कोन्ही नवकरी देल्यासिवा अनोभव त्यो कसा येवाव? आडाणी हाईत समदे.' दुसरं मन म्हणालं.
'आरं, आनुभवी मान्स गाडी लै सांबाळून चालवलात. नवसिक्याच्या हातात गाड़ी देली आन् त्येनं कोन्ला उडीवलं म्हंजी? बाब्या बी गेला आग दशम्या बी..'
'बेकार लोकायला जिवंत जाळणारा सबाल म्हंजे आनुबव! ईच्या मायला... उंद्या माईने पोटातल्या पोरालं ईच्चारलं म्हंजे... तुला आनुबव हाय का? तर कस व्हाव?'
दोन्ही मनायच्या आश्या सवाल-जबाबात कोंडबा ऊठला आन् सीतापूरला निघायच्या ईचारात आसताना रस्त्याच्या कडच्या ईमारतीवर असलेल्या बोरडानं त्येच लक्ष येधलं. त्यो पळत पळत त्या हापिसात जावून म्हन्ला, "साहेब, मला कर्ज..."
"काय? तुम्ही कर्ज मागताय की माझ्याकडं असलेली बाकी मागता? बसा. कशासाठी पाहिजेत कर्ज?"
"कशासाठी? कशासाठी बी !"
"अस भांबाबू नका. शांत बसा. दोन-चार मिनिटे विचार करुन मग बोला."
"साहेब मी बी.ए.पास आहे. मला धंद्यासाठी कर्ज पाहिजे."
"शाब्बास! आम्ही किराणा, कपडा, कुकटपालन, वराहपालन, बेकरी, डेयरी आणि जीपसाठी कर्ज देतो."
"जीपसाठी देता? साहेब, हे बघा माझं लायसन्स."
"ते ठीक आहे. जीपसाठी देवू कर्ज पण त्यासाठी.... म्हणजे जीपच्या किंमतीच्या काही टक्के रकम भरावी लागेल."
"तरी किती?"
"अंदाजे पस्तीस हजार."
"काय? पस्तीस हजार?"
"अस दचकू नका. हे माहितीपत्रक घेवून जा. आणि नीट विचार करुन या."
"थँक्यू साहेब." म्हणत कोंडबा हापीसाच्या बाहीर पडला. येस्टीत बसल्या बरुबर त्येन त्ये पुस्तक चाळलं पर त्येच्या आवाक्यात बसणारी येक बी योजना नव्हती. कोन्त्या बी योजनेसाठी धा-पाच हजार रुपै लागणारच व्हते. त्ये फावून त्येचा पारा खरकन खाली आला. स्टेंडवर कोंडबा उतरला आन् गावाकडं चालू लागला. आटो आन् जीपीत बसायला खिसा परवानगी देत न्हवता. त्यो घराची वाट चालू लागला. पंद्रा-ईस मिन्ट चालल्यावर त्या उज्याड वावरान त्येचं स्वागत केलं. कोंडबाच्या मनात ईच्चार मावत नव्हते. जीप पस्तीस हजार...माळरान...ईस्टेट... ईचारा-ईचारात त्यो घरी पोचला. गणपत बी आला व्हता. त्यो यस्वदेला सांगत व्हता,
"बेणं मिळायची काय बी चिन्न दिसत न्हाईत.''
"कावून जी? समदं गाव तर टेक्टरनं बेणं आणायलय की."
"आगं, तेथल्या कारकुनाचे हात भरल्यासिवा त्यो बेण देत न्हाई."
"हो तर अन्याव हाय."
"हां हाये. पर समदेच पैका देवू देवू बेणं आणायलेत..."
"अव्हो, मग आबासायेबाला सांगा की त्यो काळतोंड्या कव्हा कामाला येणार हाय?"
"काही फायदा न्हाई. आमी समदे कारखान्याच्या चेरमनला भेटलो तर म्हन्ला बेणच न्हाई व्हो. त्येचा बी हिस्सा असेल तेव्हाच त्यो कारकून एव्हढा डेरींग करतो हाय."
"अव्हो, पैका तरी किती देयाचा हाय?"
"सात हजारा सिवा येक पैका बी कमी घेत न्हाई."
"आबासायेबाले द्या म्हणाव की. आपला क्यानालचा पैका हाईच की त्येंच्याकडं. या वक्ती निंघला तं निघला. न्हाई तं जलमभर काय बी देणार नाई."
"गेल्तो त्येंच्याकडं बी पर त्यो गेला हाय बंबईला...आमदाराच तिकट आणाय."
"जलमात कव्हा आमदार व्हणार न्हाई. माझा तळतळाट लागल्याबिगर ऱ्हाणार न्हाई"
"बापू..."
"काय र..."
"बापू, आपली स्टेंडजवळची जिमीन ईकली तर?"
"कोंऽड्या ...लै शिकलास म्हून काही बाही बोलू नगस.ती जिमीन हाय म्हून काही तरी रुबाब हाय रं. ती जिमीन म्हंजी बाप-दाद्याची ईस्टेट हाय "
"मिळकत हाय पर वांझोटी. पायलीभर भी जेवारी..."
"कोंड्या, तू बी त्या जिमीनीवाणीच ना ! ती पायलीभर धान देत न्हाई आन् तू येक पैका कमावत न्हाईस. काय कामाचं रे तुहं शिक्शान? आर, पोटाला चिमटा घिऊनशानी तुला शिकवले. तुह्या माईन दांड भरु भरु लुगड लेवल. पर तुला नये कापड घेत्ले. येव्हढं शिकून बी... चार म्हैने जालं तुझ्या शिक्शनाला मिळाली रे तुला नौकरी? त्या जिमिनीसंग ईकू का तुला बी?" गणपतच्या ईखारी बोलण्याकड दुर्लक्स करीत कोंडबा म्हन्ला,
"बापू, मव्ह ऐका, जिमिन ईकली तर चाळीस येक हज्जार रुपै मिळतील त्यातून सात हजार देवून बेण घिऊन या आन् उरलेला पैका बैंकेत भरून आपण जीव घेवूत..."
"वा रं वा! म्हण जीप घेऊत. शिकशनानं माणूस पागल व्हतो म्हणत्यात ते खर हाय. घरात न्हाई अडका आन् बाजारात मारा धडका. अव्हो, नबाब सायेब, जरा खाली उतरा आन सांगा जीबीत बसूनशानी भीक मागायचा ईचार हाय की काय? आणिक येक सांगा त्या जीपीत काय टाकणार हायेसा? तुहा की महा मूत?"
"तस न्हाई बापू, जिमीन ईकायची म्हणताना मला तुमचा आपमान करायचा न्हाई पर बापू जरा शांत डोस्क्यानं ईच्चार करा... पन्नास एक सालापासून तो जिमीन पडीक हाय का न्हाई? काय उपेग हाय तिचा? ती इकली तर बेणं बी घेता यील. दुसरा इचार आसा करा, गावातून स्टेंडपस्तोर जायाला आटोवाले पाच रुपै तर जीपला च्यार रुपै पडत्यात का न्हाई? जीप घेतली तर दिसाकाठी डिझेलचा खर्चा जावून बी दोन येकशे रुपै मिळतील "
"दोनशे रुपै? खर हाय की व्हो. हरवक्ताला ती जीब फुल्ल भरुन जाती. पाच-पाच मान्सबी लोंबकळतात फा. कोंड्या म्हण्तो ते दोनसे रुपै सोडा पर शंबर रुपै मिळाले तर बी लै चांगलं व्हईल. आस झालं तर त्या माळरानापरीस लै चांगली जिमीन बी घेता यील. जरा राग कमी करुन ईचार तं करा." यस्वदा म्हन्ली.
गणपतने रातभर ईच्चार केला आन् त्येला कोंडबाचे बोल पटले. फाटे उठून त्येन यस्वदा आन् कोंडबासंग वावराच्या भावाचा ईचार केला. त्येच्या माळरानाला लागून सीतापुरचे जिमीनदार तात्यासायेबाची जिमीन व्हती पैयले त्येंनाच ईच्यारावं आस यस्वदा म्हन्ली आन् गणपत तात्यासायेबाकड गेला.
"कोण गणपत? फाट-फाट काय काम काढले?"
"पाटील, त्यो माळरानाचा..."
"काय झालं त्येच? आर साफसूप करुन..."
"पाटील, त्येत घालाय काही आसत तर आसी सालानू-साल पडीक ऱ्हायली आसती का? म्या दुसराच ईच्यार कर्तो. "
"कोन्ता ईचार?"
"मालक, क्यानालला लागून आसलेल्या जिमीनीत औंदा ऊस लावायचा ईचार हाय. बेणं आणाय काल कारखान्यात गेल्तो."
"वा ! झ्याक ईचार हाय की. मग मिळाले का बेण?"
"पाटील, मझ्या गरिबाची डाळ कोण शिजू देणार? त्यो कारकून पाच हजार रूपै मागतो."
"ह्यो तर आपमान हाय. तू चेअरमनला..."
"भेटलो. पर काही उपेग न्हाई. त्येंच्याच आशीरवादाने समद चालू हाय"
"आस्स का? मंग तू काय करायचं ठरवलंस?"
"त्या माळरानाचा तुकडा ईकून त्येंचे हात भरावे म्हन्तो."
"आर, जायदाद ईकून कसे चालल?"
"मालक, त्या परीस दुसरा मार्गच न्हाई. माळरान तुमच्या बाजुला हाय. तव्हा म्हण्ल, पैले तुमच्या कामावर घालावं..."
"गणपत, तुला ठाव हायेच .गेल साली काय बी हाती आलं न्हाई. पावसान धोका आन् त्वांडासी आलेला घास गेला. औंदा बी शेती साथ दील आसं वाटत न्हाई. शिवाय त्ये माळरान, त्येला साफ कराया जिमीनीची किंमत मोजाय लागल..."
"मालक, त्ये खर हाय. पर तुमच्या शेतात हिरी हायेता. त्येंचं पाणी देल तर त्या माळरानात सोन पिकलं आन् मझी बी नड धकल."
"त्ये खर हाय..."
"तुमची बी इस्टेट बी वाढल."
"बर. सांग काय भाव सांगतोस ?"
"आता मला कळते हो? तुम्ही सांगाव आन् म्या मान डोलवाव."
"तसं न्हाई रे. शेती तुझी हाय. तुझ्या मनापरमानं झालं म्हंजी ठीक. न्हाई तं आपलं गाव तं ठावच हाय. तात्यानं गणप्याला लुटलं आस कोण्ही..."
"गाव गेलं चुलाण्यात. चार दिस झाले बेण्यासाठी फिर्तोय पण कोन्ही...जावू द्या. तुमी कोन्हाची फिकीर करु नगसा."
"गणपत, समदा ईचार केला.... तसं फायलं तर परस्थिती जिमीन घेण्यासारखी न्हाई पर आता तू लईच आग्र्योव कर्तो म्हून मी पस्तेचाळीस हजार रुपै दील."
"मालक, लईच कमी झाले व्हो. येक ठाव ईचार करा आन् जास्ती न्हाई पर पन्नास हजार रुपै द्या."
"गणपत, मी बरुबर किंमत केली हाय."
"मालक, पाच हजाराचा तं सवाल हाय."
"बर जावू दे. तू काय दुसरा न्हाईस. आपलाच हायेस. येक हाय, तुला चाळीस हजार आत्ता देतो, बैयनामा करुन दे.धा हजार हंगामावर घे.''
"ठीक हाव. कव्हा जायाचं बयनाम्याला?"
"कव्हा मंजी काय? आज आन् आत्ता!" म्हन्ता म्हन्ता तात्यासायेब ऊठले. तात्या आन् गणपत त्यांच्या फटफटीवर शेहरात गेले...
०००नागेश शेवाळकर