आश्रमाकडे...
अरविंदाला आज पहाटेच जाग आली.
तो रात्रभर तसा तळमळतच होता.पहाटे थोडाफार डोळा लागला तेव्हढाच, नाहीतर तो रात्रभर जागाच होता.
“श्रीहरी विठ्ठला पांडुरंगा!”
नेहमीप्रमाणे पांडुरंगाच्या नावाचा गजर करत त्याने आकाशाकडे पाहून हात जोडले.
आजचा दिवस त्याच्यासाठी फार मोठ्या परीक्षेचा होता.
आज खूप घाई करावी लागणार होती.आश्रमातल्या लोकांनी सकाळी दहाची वेळ दिलेली होती. वसंताला घेऊन दिलेल्या वेळेत आश्रमात पोहोचा असे आवटे साहेबांनी-आश्रम चालकांनी, चार चार वेळा बजावले होते. अजून स्वत:च सगळ उरकून वसंताला उठवायचं होत, त्याचं उरकून द्यायचं!
"बापरे, हात उचलायला हवा...खूपच घाई करावी लागणार..."
त्याने भराभर दात घासले,आंघोळ उरकली, देवपूजा उरकून घेतली आणि वसंताकडे वळला....
वसंता अजून शांतपणे झोपला होता.त्याला हलवून उठवायचं खर तर अरविंदाच्या जीवावर आलं होत; पण आज नाईलाज होता.त्याला आज एकदाच शेवटच हे अप्रिय काम करावं लागणार होत.
शांतपणे झोपलेल्या वसंताकडे बघून त्याचे डोळे भरून आले.आपले वाहणारे डोळे कसेबसे पुसून त्याने आपल्या भावनांना आवर घातला....
त्याने वसंताला हलकेच हाक मारली.
” वसंता बाळा उठ रे आता, आपल्याला दहा वाजता आश्रमात पोचायला हवं.”
गाढ साखरझोपेत असलेल्या वसंतापर्यंत ती हाक पोहोचणे शक्यच नव्हत....
अरविंदा आता वसंताजवळ पोहोचला आणि त्याने हलकेच त्याला हलवले.
वसंता जागा झाला.आपल्या निर्जीव डोळ्यांवर दोन्ही हात चोळले, बाजूला हात पसरून आळस दिला.
त्याला अचानक आठवले...
“ अरे,आजपासून आपल्याला आश्रमात जायचंय...”
अरविंदाने हात पकडून त्याला आधार दिला,पायावर उभं केलं, आधार देत त्याला ओढत बाथरूमकडे नेलं. त्याचं तोंड धुवायला त्याने मदत केली, तोंड पुसून दिले.आपल्या हाताने त्याला नुकताच तयार करून ठेवलेला चहा पाजला.
आज वसंताने तोंडातून उठल्यापासून एकही शब्द उच्चारला नव्हता. निमूटपणे अरविंदाच्या इशाऱ्याप्रमाणे तो वागत होता.आतून त्याला अत्यंत उदास वाटत होत....
लहानपणापासून ज्या घरात तो राहिला ते घर आज त्याला सोडावं लागणार होत, त्याला खूप वाईट वाटत होत.ज्या वडीलांनी त्याचे लहानपणापासून कोडकौतुक केले, भरपूर लाड पुरवले,त्याला जीवापाड जपले तेच वडील आज त्याला आश्रमात सोडायला घेऊन जाणार होते!
आजपासून या घराची,त्यातल्या माणसांची साथ कायमसाठी सुटणार होती.त्याला हे सुध्दा समजत होते की, आपल्या बाबांचाही आता नाईलाज झालाय, त्यामुळेच त्यांनी हा कठोर निर्णय घेतला आहे.
घरातल्या सर्वांच्या सुखासाठी त्याला हा त्याग करावाच लागणार आहे.
आपल्या वडीलांची हतबलता त्याला डोळे नसूनही जाणवत होती.वरवर अरविंदा कितीही कोरडेपणाने वागत असला तरी आत असलेलं त्याचं बापाचं हृदय हळहळत असणारच; पण त्याला त्यांचाही नाईलाज झालाय, हे वसंताला समजत होते. त्यामुळेच उठल्यापासून त्याचे वडील सांगतील त्याप्रमाणे तो शांतपणे वागत होता....
आपल्या मनातली खळबळ आपल्या वडीलांना समजू नये म्हणून वसंता जरी काळजी घेत होता तरी आपल्या या काळजाच्या तुकड्याच्या मनात काय काय विचार चालले असतील याचा अरविंदाला अंदाज होता.
आपण वागतोय ते बरोबर नाही हे अरविंदाला समजत होते त्याच्या डोक्यात अनेक विचारांनी थैमान घातले होते....
“ आपण स्वार्थात आंधळे झालो आहोत, आपल्या सुखात याची अडचण झाली म्हणून आपल्या एकेकाळी जीव की प्राण असलेल्या या लाडक्या लेकाला स्वत:च्या हाताने घरातून बाहेर सोडायला चाललोय. त्याला अनाथ अंधअपंगाच्या आश्रमात सोडतोय.
जे करतोय ते योग्य आहे की अयोग्य मला माहीत नाही;पण एवढ मात्र नक्की आहे की,माझ्यासमोर आजतरी दुसरा पर्याय नाही.याला आश्रमात सोडलं तरच आपलं पुढच जगण सुकर होणार आहे! वसंताबद्दल कितीही प्रेम वाटत असलं तरी त्याला आपल्यापासून दूर करणे ही आज काळाची गरज आहे, निर्णय तर झालेलाच आहे,आणि तसेही आश्रमाच्या आवटेसाहेबांनी "त्याला घराची आठवण येणार नाही" अशी वसंताची काळजी घेऊ असा शब्द दिलायच की!
अगदीच बेवारस नाही करत आपण त्याला,शिवाय महिन्याच्या महिन्याला आश्रमाला रक्कम देणारच आहोत की! आता याच्या मोहात अडकायला नको नाहीतर पुढे जगायचं अवघड होउन जाईल.छे,आता मुळीच पुन्हा पुन्हा विचार करायला नको.”
एका संवेदनशील बापाच्या मनावर त्याच्यातल्या व्यवहारी माणसाने कुरघोडी केली होती!
आणि तसाही त्याच्याकडे दुसरा कोणता पर्यायच नव्हता...
सुनंदाने त्याच्या बायकोने घर सोडताना त्याला दिलेली शेवटची वार्निंग आठवली ....
“आजपासून या आंधळ्याला मी बिलकूल सांभाळणार नाही. सोडून या कुठंही! यापुढे मला याच तोंडही बघायचं नाही! जोपर्यंत हा आंधळा घरात आहे तोपर्यंत मी या घरात पाउल ठेवणार नाही!”.........
(क्रमश:)
©प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020