Chinu - 2 in Marathi Thriller by Sangita Mahajan books and stories PDF | चिनू - 2

Featured Books
Categories
Share

चिनू - 2

चिनू

Sangita Mahajan

(2)

असेच दिवस निघून जात होते, चिनू आता १५ वर्षांची झाली. आई-बाबा गेल्यापासून ती थोडी शांत झाली होती पण हळूहळू ती आता सगळ्या गोष्टीत रमू लागली. आता तर जास्तच समंजसपणे वागत होती. रोज ती शाळेतल्या गमती-जमती रकमा आणि आपल्या काकीला सांगायची, ती शाळेतून घरी आली कि घर कसं अगदी भरून जायचं, काकी पण तिला बघून खूपच खुश असायची. तिला वेगवेगळे पदार्थ बनवून खायला द्यायची. तिची वेणी-फणी करायची. तिचे खूप लाड करायची. उल्हासला मात्र चिनू घाबरायची. चिनू चा वाढदिवस जवळ आला होता, त्याची तयारी घरी सुरु झाली. रकमा, रागिणी, उल्हास आणि चिनू असे सगळे मिळून जाऊन कपड्यांची खरेदी करून आले. दोन दिवसावर वाढदिवस आला, घराची सजावट झाली, सगळ्यांना निमंत्रण देण्यात आलं, जेवणाचे मेनू ठरले, cake ची ऑर्डर पण देण्यात आली. वाढदिवस अगदी जोरात झाला. रागिणीचे डोळे भरून आले तिला मीना ची आठवण झाली.

शाळेचं स्नेहसंमेलन पण जवळ आलं होतं. चिनुची तयारी पण जोरात सुरु होती. ती नेहमीप्रमाणे डान्स करणार होती. रोज प्रॅक्टिस साठी ती थांबत होती. आपटे बाई तिला डान्स शिकवत होत्या. ८ दिवसांनीच स्नेहसंमेलन होतं. घरी गेल्यावर मात्र रागिणी आणि रकमा चिनुला खूप सांभाळायच्या कारण ती खूप थकत होती शाळा, अभ्यास आणि डान्स प्रॅक्टिस. स्नेहसंमेलनाचा दिवस उजाडला, घरचे सगळे आज जाणार होते बघायला, चिनू लवकर गेली होती. कार्यक्रमाची वेळ झाली. चिनुचा पाचवा डान्स होता. कार्यक्रम सुरु झाला. चिनुचा नंबर आला, तीने एका गणपतीच्या गाण्यावर डान्स केला, खूपच मस्त झाला डान्स. टाळ्यांचा कडकडाट झाला नुसता. सगळे आश्चर्य करत होते तिचा डान्स बघून. रागिणीला भेटून सगळे डान्स छान झाल्याचं सांगून जात होते. त्यामुळं रकमा आणि रागिणीला तर खूपच कौतुक वाटत होतं. घरी गेल्यावर रागिणीने तर चिनुची दृष्टच काढली.

वाढदिवस झाला, स्नेहसंमेलन झालं आता चिनूचं लक्ष्य फक्त अभ्यासाकडे होतं. कारण यावर्षी १० विची परीक्षा होती. चिनूचा अभ्यास आता जोरात सुरु झाला होता कारण परीक्षा जवळ आली होती. ती अभ्यासात पण फार हुशार होती. खूप मेहनत पण घेत होती. तिच्या शाळेतले सगळे शिक्षक पण तिच्यावर खूप खुश होते. चिनू तिचा अभ्यास अगदी वेळेत पूर्ण करायची. कधीही ती शाळा चुकवत नसे. आता तिच्या मैत्रिणी पण खूप झाल्या होत्या. ती तर सगळ्यांचीच लाडकी होती, कारण तिचा स्वभाव खूप लाघवी होता आणि प्रत्येक गोष्टीत ती पुढे असायची. परीक्षा ८ दिवसावर आली चिनू आणि तिच्या मैत्रिणींचा अभ्यास जोरदार सुरु झाला. शेवटी परीक्षेचा दिवस उजाडला, चिनू लवकर उठून आवरली आणि थोडी उजळणी केली, काकीचा आशीर्वाद घेऊन ती पेपर साठी बाहेर पडली, रकमा पण तिच्यासोबत परीक्षा संपे पर्यंत सोबत जात राहिली. आज रकमाला मीनाची खूपच आठवण येत होती, मीना परीक्षेच्या वेळी चिनूची खूप काळजी घ्यायची, तिच्यावर सारखी लक्ष ठेऊन असायची. १५ दिवसांनी परीक्षा संपली, सारे पेपर छान गेले. सुट्टी सुरु झाली. सुट्टीत ती मामाच्या गावी जाऊन आली ८ दिवस. तिचे मामा तिला येऊन घेऊन गेले होते. तिकडे जायला पण तिला खूप आवडत होतं, तिथे खूप प्रकारच्या बागा होत्या फळांच्या आणि फुलांच्या. तिथे ती खूप रमायची, मामाकडे गेली कि ती जास्तीत जास्त वेळ तिथेच घालवायची. तिची मामी पण तिचे खूप लाड करत होती. चिनुच्या सगळ्या सवयी बघून तिच्या मामला मीनाची खूप आठवण व्हायची. मामाच्या घरी एक छोटं मांजर होतं, त्याच्याशी तर चिनू दिवसभर खेळायची. जाईल तिथे त्याला घेऊन जायची. मामाच्या गावी पण तिच्या खूप ओळखी झाल्या होत्या.

सुट्टी असली कि चिनूची नुसती धमाल. ती रोज मैत्रिणींबरोबर खूप खेळायची, फिरायची, नवीन-नवीन गोष्टी शिकायची, घरी सगळ्यांशी खूप खूप गप्पा मारायची. चिनू आज सकाळी लवकर उठली तिने रकमाला पण उठवले, कारण आज चिनू मैत्रिणींबरोबर भूल-भुलैया फिरायला जाणार होती. सोबत रकमा पण जाणार होती, कारण त्याच अटीवर रागिणीने तिला जाण्याची परवानगी दिली होती. दोघींची आवरा-आवर सुरु झाली. बॅग तर रात्रीच भरून ठेवली होती. दोघींचं आटपलं, नाश्ता झाला. आणि दोघी जायला निघाल्या, सोबत खाऊचे डबे आणि पाणी घेतले होते. काकीने रात्रीच चिनुच्या आवडीचे पदार्थ करून ठेवले होते. रागिणी ने दोघींना बऱ्याच सूचना केल्या. चिनूला बजावून सांगितले एकटी कुठे जाऊ नकोस दीदी सोबतच राहा. (चिनू रकमाला दीदी म्हणायची) बाय बाय म्हणत चिनू आणि रकमा बाहेर पडल्या सुद्धा.

दुपार झाली होती, रागिणीला घर अगदी खायला उठले होते. तिचं मन आज कशात लागत नव्हतं. झोप पण लागत नव्हती. उल्हास काही कामा निमित्तानं बाहेरगावी गेला होता त्यामुळं रागिणी आज एकटीच होती. इकडे चिनुची मात्र धमाल सुरु होती. खाणं-पिणं, फिरणं आणि सोबत मैत्रिणी आणि लाडकी दीदी. मग काय तिची मजाच मजा. काय करू नि काय नको असं तिला झालं होतं. सगळ्याजणी भूल-भुलैयाचा आनंद घेऊ लागल्या. थोड्या वेळाने सगळ्यांना चांगली भूक लागली. सगळ्यांनी बसून छान जेवण केलं. भूल-भुलैया फिरून झाला होता. आता सगळे गार्डनला जायला निघाले. तिथे पोचल्यावर तर त्यांना काय बघू नि काय नको असं झालं. गार्डन तर एकदम मस्त होती. गार्डन फिरणं झाल्यावर सगळे प्राणिसंग्रहालयात गेले. तिथे त्यांनी सगळ्या प्रकारचे प्राणी बघितले, वाघ बघितला, साप बघितले, सिंह बघितला, अजगर बघितला, मोर पण होता आणि बरेच प्राणी होते.

संध्याकाळ झाली तशी रागिणीचे डोळे फक्त दाराकडे लागून राहिले. ६ वाजले होते एव्हाना सगळ्यांना यायला हवं होतं. थोड्याच वेळात उल्हास आला त्याने विचारलं "चिनू अजून नाही आली?" ६ चे ७ झाले तरी अजून कोणाचा पत्ता नव्हता. रागिणीला जास्तच काळजी वाटायला लागली. वाट बघता बघता ७:३० झाले. रागिणीचा उर धडधडायला लागलं. ८ झाले तरी कोणाचा पत्ता नाही. उल्हास रागिणीला ओरडू लागला "तरी मी सांगत होतो मोलकरणीवर जास्त विश्वास टाकू नको, डोक्यावर चढवून ठेवलात नुसते. सतत तिच्यासोबत भटकत असते नेहमी. काय बरं वाईट झालं म्हणजे कोण जबाबदार? ती एक लहान आहे तुला पण नाही का समजत." दोघेही कावरे बावरे झाले. उल्हासने चिनूच्या मैत्रिणींना फोन केला, त्या तर सगळ्या घरी पोचल्या होत्या. आणि त्यांनी सांगितलं कि चिनू आणि रकमा पण त्यांच्याबरोबरच निघाल्या होत्या. हे ऐकून तर रागिणी जास्तच घाबरली. काय करावं दोघांना हि आता सुचेना. रकमाचा फोन पण बंद येत होता. रागिणीला तर रडू आवरेना. दोघेही धावत पळत पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना सगळी हकीकत सांगितली, चिनुचा आणि रकमाचा फोटो देखील दिला. सगळी हकीकत ऐकल्यावर पोलिसांनी रक्माबद्दल पूर्ण चौकशी केली. तसंच पैशासाठी कोणाचा फोन आला होता का? किवा तुम्हाला कोणावर संशय आहे का? असंही विचारलं. "साहेब कोणाचा फोन तरी नाही आला पण मला वाटतं हे रक्माचच काहीतरी कारस्थान असलं पाहिजे." उल्हास. पोलिसांना किडनॅपिंग ची केस वाटत होती, कारण हे कुटुंब खूप श्रीमंत असल्यामुळे पैशासाठी असं करण्याची शक्यता होती. ताबडतोब त्यांनी बरेच फोन केले आणि चिनुबद्दल सांगितले आणि तिचा आणि रक्माचा फोटो फॅक्स ने सगळीकडे पाठवला. रागिणी आणि उल्हासला त्यांनी घरी जायला सांगितलं तपास लागल्यावर फोन करू असे आश्वासन दिले. परत जाण्याशिवाय दोघांकडे दुसरा पर्याय पण नव्हता. दोघांनीही पोलिसांना चिनुला शोधण्यासाठी कळकळीची विनंती केली आणि दोघेही घरी परतले. रागिणी तर ओक्सबोक्शी रडत होती. सारखा चिनुचा चेहरा तिला दिसत होता. कुठे गेली असेल आणि कशी असेल पोर हेच तिला सारखं आठवू लागलं. ती जास्तच अस्वस्थ होऊ लागली. तिने काहीच खाल्लं पिलं नाही. रात्री तिला झोप पण लागत नव्हती. कशी-बशी रात्र गेली, सकाळी उठून ती रोजच्या कामाला लागली. पण कामात पण तिचं काही लक्ष्य लागेना.

******