निर्णय - भाग ५
घरी आल्यापासून गप्प गप्प बसलेल्या तिला बघून आईने ताडल की नक्कीच हीच काहितरी बिनसलय. रोज देवाकडे ती सगळं नीट होण्यासाठी प्रार्थना करायची पण तरीही देव काही तीच साकडं ऐकत नव्हता. आज पुन्हा काय नवीन घडलं असावं आणि का...?? आईच्या मायेपोटी तिने हळूच कानोसा घ्यायचा प्रयत्न केला.
" त्याच्याशी काही बोलणं झालं का..??" पदराला घाईघाईने हात पुसत आईने विचारलं.
ती सोफ्यावर तशीच बसून होती....हतबुद्ध..... सर्व जाणीवा हरवल्यासारखी... तिचे डोळे कुठेतरी भिंतीवर रोखलेले होते... कोणत्यातरी विचारांचं जाळं ती गुंफत होती. आईच बोलणं तर तिच्या गावीही नव्हतं.
आपल्या लेकीला अस शून्यात हरवलेलं पाहून आईच्या काळजाचाही ठोका चुकला. अशी ती कधीच नव्हती. भग्न वाड्याच्या उरलेल्या अवशेषाप्रमाणे ती आपल्या तुटक्या मनात डोकावत असावी. आईने तिच्या थकलेल्या खांद्यावर हात ठेवून तिला हलवलं. एखादा विजेचा झटका बसावा तशी ती थरारली.
" अं..." आईकडे ती पाहतच राहिली. आपल्या विचारांच्या गर्द जंगलात ती अशी हरवली होती की आईची उपस्थिती अनपेक्षित असावी.
" अग काहीतरी विचारतेय मगापासून..."
" काही नाही..... मला जरा आराम करु दे " आईपासून नजर चुकत ती बेडरूम मध्ये पळाली.
पुन्हा तोच बेडरूम... सगळ्या आठवणी एकांतातच तर छळत होत्या. त्याची आस, त्याची स्वप्न, त्यांच्या संसाराची स्वप्नं सगळं काही ह्याच बेडरूम मध्ये रंगवलेल तिने. त्याच्या विरहात देखील इथेच मनसोक्त रडली. किती तो विरोधाभास.... सगळ्या कटू गोडं आठवणी तिथेच. काल रात्री उशिरापर्यंत सकाळी त्याला भेटल्यावर कसं बोलायच ह्याची प्रॅक्टिस पण तर इथेच केली होती.
पण काय बोलायचं तेच विसरली नेमक्या वेळी. कधी नव्हे ते आज तो वेळेच्या आधी तिची वाट बघत थांबला होता. कॉफी शॉप मध्ये एंटर करायच्या आधीच तिने त्याला पाहिलं... सवयीप्रमाणे... रेड अँड ब्लॅक चेक्स मध्ये कसला क्युट दिसत होता तो. त्याच चार्मिंग स्माईल त्याच्या चेहऱ्यावर खुलून आलं होतं. त्याचे हृदयाचे ठाव घेणारे तपकिरी डोळे मोबाईल मध्ये काहीतरी शोधत होते. थ्री फोर्थ स्लीवज मधून त्याचे पिळदार दंड उठून दिसत होते. पुन्हा एकदा त्याला पाहता क्षणी तिने आपलं हृदय त्याच्याकडे गहाण ठेवलं.हाय..... हा रोजच मला असा मारतो. पण क्षणातच ती भानावर आली.... नाही... रोज तेज ज्याच्यासाठी वेडी व्हायची तो हा नव्हे....नाही... किंवा तो तोच आहे पण फक्त माझा नाहीये.... तिचे डोळे काठोकाठ भरून आले. तो आता आपला नाही हा विचारच सहन होईना. पुढे जावं की मागे ह्या तंद्रीत ती तिथेच खिळून उभी होती. काहीही होऊन का काळच गोठून जावा अथवा सर्व पूर्वस्थितीत यावं नाहीतर ह्या धरणीने मला ओढून घ्यावं पण.. पण.. काहीतरी होऊन हे पुढचं सगळं थांबावं. मी नाही देऊ शकत त्याला कोणाला... फक्त आणि फक्त माझा आहे तो. पण त्याच्या मनाच काय. त्याला काय आवडत... मी त्याची आवड नक्कीच नाहीये. असती तर..... हे असं.... काट्याचा नायटा होणं म्हणतात ते हेच ते.... नुसत्या विचारांनीच तीच डोकं फुटायची वेळ आली. तिचा लालबुंद चेहरा कुणी पहिला असता तर तिची घालमेल न बोलताही समजली असती. एन्ट्रान्सवरच्या चेअरवर बसूनच ती त्याला एकटक पापणीही न लवता बघत होती. त्याला तर जाणीवही नव्हती की ती जवळपास असेल. जवळ गेली तर उडणाऱ्या फुलपाखराप्रमाणे तोपन उडून जाईल ह्या भीतीनं तीच काळीज धडधडू लागलं.... तो खुश तर असेल ना तिच्यासोबत.... तसही भरपूर वेडाच होता तो तिच्यासाठी. नशिबाने आता ते भेटलेत तर ....आपण नको मध्ये यायला... पण माझ्या मनाच काय... दुसरं मन लगेचउसळल.....माझं पण तर प्रेम होतं आणि त्याला ऍक्सेप्ट पण होत.... म्हणून तर लग्नाचा घाट घातला ना... अचानक कुणीतरी यावं आणि माझ्या होऊ घातलेल्या संसाराचा सारीपाट उधळून लावावा.. नाही... हे मी का सहन करू..??..... पण माझा जोडीदारच माझ्या बाजूने नाहीये इथे..... आह नको हे विचार.... नकोच काही....
त्याला न भेटताच ती आल्या वाटेने परतली. खूप काही बोलायचं होत तिला पण न बोलताच सगळं तिच्या मनातच राहील. त्यानंतर त्याचे काही फोन कॉल्स येऊन गेले. तो ही बरेचदा तिच्या घरी येऊन गेला.पण ती टाळतच राहिली.... आता ज्या गावी जायचंच नाही त्याचा रस्ता तरी का विचारायचा...????