आघात
एक प्रेम कथा
परशुराम माळी
(24)
यावर सर म्हणाले, जाधव साहेब तुमच्या मुलगीचं आणि प्रशांत कदम नावाच्या मुलाचं प्रेम प्रकरण चालू आहे. ते संबंध कॉलेजभर गाजत आहे. बेधडक कॉलेज परिसरात गप्पा मारत फिरणं, तास रेग्युलर अटेन्ड न करणं,बेशिस्त वर्तन करणं चालू आहे. मान्य आहे, तु ची मुलगी अभ्यासात प्रगतीवर आहे, पण प्रथम क्रमांकाचा मुलगा यावेळी दुसरा, तिसराही क्रमांक मिळवू शकलेला नाही. तो चक्क चार विषयात नापास झालेला आहे. या दोघांनाही सरळ मार्गावर आणणं जरूरीचं आहे. तेव्हा तुमच्या मुलीला ताकीद देऊन बघा.
आमच्या परीने आम्ही मुलाला ताकीद करू. कुणाचंही शैक्षणिक नुकसान होता कामा नये.
तशी सुमैयाची आई म्हणाली,
‘‘हा! आता माझ्या ध्यानात आले, अभ्यासाचं कारण सांगून ही सुट्टी असतानाही दिवसदिवसभर कुठं हिंडत होती ते? संध्याकाळी कॉलेज सुटलं तरी यायला तिला होणारा वेळ याची सगळी कारणं समजली. शांत शांत बसणं, अचानक चिडणं, जेवणाला टाळाटाळ करणं, कशात म्हणून लक्ष नसायचं तिचं सांगायला गेलं एक तर तिसरचं काहीतरी करायची. सतत अस्वस्थ असल्यासारखी असायची, चोरून चोरून रडायची या सगळया कारणांची उकल आता झालेली आहे मला. माझ्याही मनात असे कधी आलेच नाही. पोरगी असं करेल.
विश्वासघात केलाय हिनं आमचा.’’
सुमैयाच्या आईचं बोलणं संपलं, तसं तिचे वडील म्हणाले, ‘‘आता समजलं नव्हं सगळं. मग आता इथून पुढं कडक शिस्त आणिलक्ष ठेवा. आता इज्जत जायची ती जाणारच. जगाचं तोंड काय दाबता येणार, हाय? लोक काय बोलायचं ते बोलणारचं!’’
‘‘ए उठून बस रे लगेच काही मरत नाहीस.’’
सुमैयाच्या बाबाने हाताला हिसका दिला आणि उठवून बसविले. मी कण्हत उठून बसलो. तसा तिचा बाप पुन्हा गरजला.
‘‘आजच्या आज इथून तुझा बोजा हालवायचा. नाही तर सगळं साहित्य रस्त्यावर फेकण्यात येईल लक्षात ठेव.’’
‘‘पण बाबा दोन दिवस तरी त्याला मुदत द्या. तो बाहेर कुठेतरी व्यवस्था करेपर्यंत इथं राहू दे.’’
‘‘तू गप्प बसं नाही तर कानाखाली बसेल. तिला घेऊन जा इथून!’’
तसं सुमैया आणि तिची आई तिथून निघून गेल्या आणि पुन्हा तिच्या बापाचं बोलणं सुरू झालं. ‘‘पुन्हा या परिसरात दिसू नकोस. परिणाम खूप वाईट होईल. तुला जिथे राहायचंय तिथं जाऊन रहा.’’
मी आपला मुकाटपणे केविलवाणा चेहरा करून नुसतं ऐकत होतो, मानहालवित होतो. थोड्या वेळाने तिचे बाबाही तिथून निघून गेले.
आभाळ कोसळल्यागत झालं होतं. डोळयासमोर अंधार होता. काय करायला गेलो आणि काय झालं? खिशात तर चार पैसेही नव्हते. संध्याकाळपर्यंत तर इथून सगळं हलवायला सांगितलेलं आहे. आता कुठे जायचं हा माझ्यासमोर मोठा प्रश्न होता. हॉस्टेलचं दार तर माझ्यासाठी कायमचं बंद झालं होतं. आता सुमैयाचं दारही माझ्यासाठी कायमचं बंद झालं होतं. आणि अजाणतेपणी कितीतरी दारं मला बंद झाली होती. सगळयांशी असलेली जिव्हाळयाची, प्रेमाची नाती तुटली होती. त्याची जागा तिरस्काराने घेतली होती. प्रत्येकाच्या मनात एक प्रकारचा राग साठलेला होता. कुणाच्याही मनात माझ्याबद्दल पूर्वीसारखं प्रेम नव्हतं. सगळयांना तोडलं होतं मी. किती नाजुक असतात ही नाती.
नाती निर्माण व्हायला कित्येक दिवसांचा कालावधी जात असतो, पण नाती तुटायला क्षणाचाही विलंब लागत नाही. कित्येकजण माझ्यापासून दुरावले होते. कित्येकांपासून मी दुरावला होतो. आता माझ्या डोळयासमोर रात्र नाचत होती. कोल्हापूरसारख्या शहराच्या ठिकाणी मंदिराशिवाय किंवा एखाद्या बागेतल्या आडोशाशिवाय दुसरा कुठं मिळणार होता निवारा? अखेरीस बोजा गुंडाळला. संध्याकाळचे सात वाजले होते. पेटीत सगळे साहित्य भरले आणि हुतात्मा पार्कमध्ये आलो होतो. तिथंच आजची रात्र काढायच्या इराद्याने. पण आणखीन विचार आला. आकाशच्या घरी गेलो तर बरं होईल. आकाश माझा वर्गमित्र. पण आमची जास्त जवळीक नव्हती. आकाश कुणाच्यात न मिसळणारा. एकटं एकटं राहायचा. त्यातल्या त्यात माझ्याबरोबर असायचा. पण क्वचितच, पुन्हा तिथून मंगळवार पेठेत गेलो. आकाश घरीच होता. माझा अवतार पाहून तो म्हणाला,
‘‘अरे, प्रशांत कुठे चाललायसं आणि हा असा रडवा चेहरा का केलायसं?”
‘‘काही नाही आकाश, थोडं काम होतं तुझ्याकडे.’’
‘‘कोणतं काम सांग ना?’’
‘‘मला तुझ्या घरी दोन दिवस राहिला मिळेल का? फक्त झोपण्यासाठी. बाकी जेवणखाण्याचं माझं मी बघेन.’’
‘‘नको बाबा, मला घरातली रागवतील. तुझं तू कुठंही बघ. माझ्या घरी काही ते शक्य नाही.’’
‘‘अरे आकाश, असं बोलू नको. फक्त दोन दिवसांचा तर प्रश्न आहे. आणि आता तरी रात्रीचे आठ वाजलेत. हे सारं साहित्य घेऊन मी कुठं जाऊ? तूच सांग.”
‘‘तुला जायचं तिकडं जा पण इथं नको बाबा. अगोदरच तुझ्याबाबत सगळेच कॉलेजातील शिक्षक चिडून आहेत आणि ही गोष्ट समजली तर मलाही तुझ्यामुळे वाईट व्हायची वेळ येईल?’’
‘‘पण ही गोष्ट कुणाला समजणार नाही, याची दक्षता मी घेईन. आकाश तू काही काळजी करू नकोस. मला तुझ्या घरी झोपण्याची जरी व्यवस्था झाली नसली तरी चालेल. हे साहित्य तरी दोन दिवस ठेवून घे.’’
साहित्य ठेवून घेण्यास शेवटी आकाश तयार झाला. भूक तरी पोटात होती. पण खिशात तरी काहीच नव्हते. करणार काय? शेवटी उपाशीच जाऊन हुतात्मा पार्कात झोपलो. खूप वाईट वाटत होतं मनाला. राहिलेले दोन तीन महिने कसे घालवायचे मोठा प्रश्नच वाटत होता. दुसऱ्या दिवशी ठरविलं. कॉलेजच्या मधल्या रस्त्यातच तिला गाठायचं, कॉलेजच्या परिसरात तिला भेटणं म्हणजे पुन्हा सगळयांचा रोष पत्करणं असह्य व्हायचं.
सुमैया आज एकटीच दिसत होती. थोडंसं हायसं वाटलं, धावत तिच्याकडे गेलो.
‘‘काय रे, असं अचानक इथेच कुठे आलास?’’
‘‘काय करणार मग कॉलेजवर तरी भेटून चालणार नाही. मग कुठे भेटणार तुला मी?’’
‘‘बरं ते जाऊ दे. मी कालपासून किती काळजीत आहे माहीत आहे तुला? कुठे राहिला असशील? कुठे गेला असशील? कुठे जेवला असशील? असे अनेक प्रश्न माझ्या मनाला सतावत होते. मी रात्रभर खूप बैचेन होते.’’
‘‘तरी तुला माझी आठवण झाली म्हणायची. मला वाटलं, आईवडिलांना घाबरून बिचारी मला विसरून जाते की काय?” मी हसत चेष्टेच्या स्वरात म्हणालो.
‘‘ए असं मनाला लागण्यासारखं बोलू नको. आईवडील काय, दुसरं कोणीही मला विरोध करायला लागले तरीही मी त्यांच्या विरोधाला जुमानणार नाही.’’
‘‘मला खात्री आहे सुमैया. मी तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलोय. तू ही माझ्यासाठी सारं काही करशील.’’
‘‘तू माझा श्वास आहेस. माझं हे जगणं आहे ते फक्त तुझ्या आधारावरच.’’
‘‘होय प्रशांत, मला जाणीव आहे. तू माझ्यासाठी सारं काही सोसलयसं माझ्यापेक्षाही जास्त त्याचा विसर मला कधीच पडणार नाही. तुझं जे साहित्य होतं ते तू कुठे ठेवलयसं?’’
‘‘मित्राच्या घरी ठेवलंय. आकाशकडे.’’
‘‘जेवलास कुठे?’’
‘‘कुठलं आलंय जेवण. झोपलो तसाच.’’
‘‘कुठे?”
‘‘हुतात्मा पार्कात.’’
‘‘अरे बापरे! म्हणजे तू मित्राच्या घरी झोपलास नाही.’’
‘‘जेवलाही नाहीस. रात्रभर उपाशी. चल आपण काहीतरी खाऊया.’’
मी आणि ती जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये गेलो. मिसळ आणि चहा घेतला आणि तिथून निघालो.
‘‘बरं, तू आता राहणार कुठे? तुझ्याजवळ आता पैसेही नाहीत. परीक्षेला अवघे दोन महिनेच राहिलेत. कुठेतरी बघायलाच हवी एखादी रुम. त्याशिवाय पर्यायच नाही. हे शंभर रुपये घे. कुठेतरी रुम बघ. तिथे तुझे साहित्य नेऊन ठेव.मग तुझ्या जेवणाचं वगैरे बघू. दोन महिन्यांचं बिल मी एकदमच देऊन टाकीन खानावळीवाल्याला. मग तर तुझा प्रश्नच मिटला, झाले समाधान!’’
‘‘हो, किती करशील गं माझ्यासाठी. मी काय केलंय असे तुझ्यासाठी?’’
‘‘तू तर माझ्यापेक्षाही खूप काही केलयसं प्रशांत. तू तर साऱ्यांचा त्याग करुन मला स्वीकारलयस. मी जाते मला वेळ होतोय बघ.’’
‘‘रुम कुठे मिळते का बघ आणि मला कळव.’’
सुमैया कॉलेजवर गेली. मी मात्र कॉलेजला न जाता तिथून मागे फिरलो. रुमचा शोध घ्यायला लागलो. अखेर रुम मिळाली, पण दीडशे रुपये भाडे म्हणत होते. मी शंभर रुपये अँडव्हान्स देऊन रुम फिक्स केली. रविवारपेठेत होती ती रूम. साळुंखे अपार्टमेंटच्या पाठीमागच्या बाजूला साळुंखेच्या मालकीची जुनी खोली होती. आकाशच्या घराकडे जाऊन साहित्य घेतले आणि रुमवर आणून ठेवले. घरातल्यांचे आणि आकाशचे आभार मानले.
*****