२)शेतकरी माझा भोळा!
फाटेची साडे आठ-नवाची येळ आसल, समदं सीतापूर जागं झालं व्हतं. जो तो आपापल्या कामामध्ये गुंग होता. गडी-मान्स ढोरायच्या मांघ व्हती. शेण काढणं, झाडझूड करणं ही कामही चालली व्हती. मालक आपापल्या गडयाला दिसभरात काय काम करायची त्ये सांगत व्हते. बाया-मान्स सैपाक-पाण्याच्या माघ लागल्या व्हत्या.
गणपत बी ईचार करत बसला व्हता, बिडी फुकत व्हता. दिसभर काय कराव आन् काय न्हाई या विचारात पडला व्हता. पर काय करावं त्ये ठरत न्हवतं. येकदा वाटायचं शेतामधी जावं पर दुसरे मन म्हणायचं नग त्या परीस शेहरात जावून कोंडबाला पैका देवाव.
गणपत म्हंजी पक्का मराठमोळा गडी. लेहण्या वाचण्याचं, त्याचं आन् आक्शराचं साता जलमाचं वैर. गडी उच्ची पुरा, ताठ आन् रोड. गाल मंदी बसलेले. पंद्रा-पंद्रा दीस दाढी करायचा न्हाई. सदानकदा बिडी फुक्कायचा त्यामुळं सदा खोकलत राहायचा अन् बेडकं टाकायचा. पावलोपावली थुकायचा. गणपत तस्सा ईच्चारात दडलेला असताना त्येची बायकु यस्वदा बाहीर आली. यस्वदाबी उच्ची पुरी पर अंगानं भर्लेली व्हती. नाकान सरळ व्हती, रंग गोरा व्हता. हमेस्या काम करत राहिल्यामुळे चेहऱ्यावर लाली असायची. कपाळावर भलं मोठ्ठ ठसठसीत कुंकू लेवलेलं असायचं! डोक्यावर पदर घिवूनच काम कराची. कस्टाळू आन् कन्वाळू बी ! सोभावान मातर लै जिद्दी बाय. कोणाशी पटलं न्हाई तर फाडफाड बोलून मोकळं व्हणारी, मातर मनात काय बी ऱ्हायाचं न्हाई.
जेव्हढी जिद्दीची बाय तेव्हढीच सपनाळू बी. हमेशा काय बाय इचारात, सपान पाहण्यात गुंग असायची.
"अहो, काय कर्ता?"
"काय करावं त्येच इच्चार कर्तो."
"बस्सा ईच्चार करतच. आख्खी जिंदगानी चाल्लीय ईच्चारा ईच्चारातच. जिमिनीच तेव्हढा तुकडा नुस्ता वांझोट्या बाईवानी पडला हाय. दर साली उन्हाळ्यात म्हन्ते अव्हो त्या जिमिनीत काय तरी पेरा व्हो पर न्हाई जव्हा फाव तव्हा दुसऱ्यायच्या जिमिनीत ढोर म्हेनत करायची आन् त्यांच्या तिजोऱ्या भरायच्या. काय येकेकाच स्वभाव म्हणायाचा."
"यस्वदे, येडी का खुळी ग तू. आता शेती कराची म्हंजी का देवीच्या घटाम्होर धान पेरण्याइत्क सोपं हाय व्हय? हाईब्रीड लावाची म्हन्ली तरी बी बियाण, औसदी, फवारणी कराय पैका नग?" पचकन थुकत गणपत म्हन्ला.
"सम्दे लोक करत्यात ना?"
"करत आस्तील, पैकेवाल्याची करामत हाय सारी. तुला सांगतो आजूक का किती बी पैका लावला तरी बी माल घरात येजोस्तर काय खर न्हाई."
"तुमच आपलं येकच रडगाणं. आज काय कर्णार हायसा?"
"त्योच ईच्चार कर्तो हाय. काल कोंडबाचा सांगावा आला हाय. तालुक्याला जावूनशानी त्येला पैका देवाव म्हन्तो."
"अव्हो मग जावा की. त्येचाबी काय ईच्चार करता? पोरगं दूर हाय. त्येला पैक्याचं काय तरी काम पडल आसल तव्हाच त्येन सांगावा धाडलाय. येस्टीचा टैम झाला हाय. बिगीनं आवरा. वा र वा. म्हणं ईच्चार कर्तो."
"बार...बार." गणपत म्हन्ला आन त्यो ऊठणार तेव्हढ्यात सरपंचाचा गडी आला.
"गणपत, गणपत.... आर चाल. सरपंचानं बलीवलय.''
"आर, पर काम काय हाय?" गणपतनं इच्चारलं
"त्ये मला काय ठाव न्हाई बा. म्या पाण्याची कावड पिवून आल्तो. तव्हा सरपंच म्हणले आंदी पळ आन गणपतला बलीव. म्या काय इच्चारलं न्हाई. आपून सांगकाम्या गडी. धनी सांगतील तेवढं करायचं. "
"काय काम आसल बोवा? बार... बार चल. काय काम हाय ते बघुता." बिडी ईझवत गणपत म्हन्ला.
गड्याच्या बरुबर गणपत सरपंचाच्या बैठकीत पोचला. सरपंचाच्या बैठकीम्होरं दोन जीपा ऊभ्या व्हत्या. गावातली बरीच मान्स बी जमल्याली फावून गणपत गोंधळला.
"काय भानगड झाली म्हणावं? आबासायेबान कावून बलीवलं आसल? ह्यो सरपंच म्हंजी लै कावेबाज माणुस हाय. मिठ्ठी छुरी हाय. व्हटावर येक आन् पोटात येक!"
"ये-ये गणपत ये." आबासाब झुबकेदार मिश्या पिळत म्हन्ला. आबासाब म्हंजी आबासाबच ! चेहरा गुळगुळीत, कवाबी दाढीचा येक खुट कोठ दिसणार न्हाई. बलुत्याचा वारीक रोज फाटे-फाटे त्यांची दाडी घोटून जायचा. सरपंचाचे डोळे बी घारे व्हते. घाऱ्या डोळ्याचा माणूस म्हंजी लै कावेबाज, बेरका आन चालाक बी! नाक मातर बसकं, चेहऱ्यालं न सोबणारं! पांडऱ्या सुफेद कपड्यावरच्या काळ्या डागावाणी. गडी उच्ची आन धिप्पाड ! दाणकट शरीरयस्टी. आख्खी कोबडी येकटाच फस्त कराचा. त्येची रग त्येच्या शरीरात मावाची न्हाई. मॅट्रीकपस्तोर शिकल्याला पर वागणं पक्क आडाणी. लै स्वार्थी. गावामंदी नंबर येकचा कास्तकार. दोन चारस्ये येकर जिमिनीचा येकुलता येक वारीस. सालागणिक जिमिन वाढायची. आडल्या नडल्या लोकायची काम कराचा पर पैक्याच्या आगर जिमिनीच्या रुपात धा पट वसुलीबी करायचा.
गणपत बैठकीत शिरला. तेथ दोन-चार सायेब लोक बसलेले फावून मनामंदी चरकला. मनात म्हन्ला, 'म्या तर कोन्चबी रिन काढलं न्हाई. दरसाली कारभारीन लई माघ लागते रिन काढून शेत पिकवा पर रिन काढण मले कव्हाच जमल न्हाई. रोजीन जाईन पर कोन्हाच्या करजात जाणार न्हाई. तर मग सायेब कहाला आलेत? आन् वसुलीला आले आस्तील तर मग मले कहाला बलीवलंय?'
"साहेब, ह्यो गणपत. आपून आत्ता बोल्लो त्योच." सरपंचानं वळख करून दिली.
"मालक, सम्द ठीक हाय न्हवं? तुमास्नी तं ठाय हायेच म्या मरल पर कोन्हाचं रिन काढाचा न्हाई."
"गणपत घाबरु नगस, आरं ये वसुलीचे सायेब न्हाईत. सायेब, गणपतीची धा-पंद्रा येकर जिमीन पडीक हाय. आमी सम्दे सांगून दमलो पर ह्यो पठ्ठया कोन्हाचा पाच पैयसा उध्धार घिणार न्हाई. रोजाना काम मिळालं न्हाई तं ऊपासी ऱ्हाईल पर कोन्हा फुड हात पसरणार न्हाई."
"वा ! वा! गणपत फार छान. बरे, आम्ही ऐकलय गावाबाहेर..."
"हाय, सायेब हाय. धा येकर जिमिन हाय आन् गावाच्या वरच्या कडला फाट्यास्नी भिडून पाच येक्कर माळरान हाय. आमी दोघं नौरा-बायकू आन् येक पोरगं, येक पोरगी हाय. पोरगं कालीजात हाय. औंदा आखरी वरीस हाय. साहेब, म्या त्येला तुमच्यावानी सायेब करणार हाय. पोटालं चिम्टा घिवूनशानी त्येला शिकवलं हाय. पोरगं बी लै हुश्शार हाय. दरसाली पैयल्या नंब्रानं पास झालाय. म्या म्हन्तो...बर ते जावू द्या. सायेब, जिमिनीचं काय म्हन्लासा? मालकानं तं सांग्लच आसल, म्या जिमिनीवर कोन्ताच बोज्या काढला न्हाई. काम न्हाई मिळालं तं ऊपासी..."
"गणपतराव, आम्ही कर्जासाठी आलो नाहीत. त्याचं असं आहे, तुमच्या गावी आपले सरकार कॅनॉल बांधणार आहे."
"ह्यो क्यानाल म्हंजी काय व्हो सरपंच? आपणून तं काही सिकलो न्हाई पर तुमी मॅटरीकपस्तोर सिकल्यात आन् सरपंच बी हाईता. तुमाला ठाऊक आसणार..."
"सांगतो..." मिश्यावर पीळ देत आबासाहेब फुडं म्हन्ले, "आरं, क्यानाल म्हंजी बंधारा रे. त्या तिकडे.... जिल्याच्याजवळ मोठ्ठा बंधारा... भित बांधून पावसाचं पाणी आडविणार हाईत..."
"हात्तीच्या मायला, सरपंच ! मला वाटलं तुमी सिकल्याले तुमाला तरी कळलं. ह्ये सरकार बी याड आन तुमी फुडारी सातयेडे ! सरपंच, पावसाचं पाणी म्हंजी तुमाला काय वाटलं काय? व्हय व्हो सायेब, ल्हानं ल्हानं पोरास्नी पावसाचं पाणी आडविताना आपन फातो..."
"आता कस बोलले? गणपतराव लहान मुले पाणी अडविण्याचा प्रयत्न करतात.
घरासमोरून वाहणा-या पाण्यात माती, खडे टाकून त्याला आडवू पाहतात पण ते काही वेळाने वाहून जाते. सरकार सिंमेटची फार मोठी भिंत बांधून ते पाणी तिथे अडविणार आहे. फार मोठी म्हणजे दोन-तीन पुरुष उंचीची भिंत बांधणार आहे."
"दोन-तीन पुरुष उची.... सिमिटची भिंत....बर मंग फुड?"
"आर गणपती, त्याचं आसं हाय, पावसाळ्यात पडलेल पाणी तेथेच आडवील जाईल. आत्ता आपून म्हजी कोरडवाहू शेतकरी उन्हाळ्यात कव्हा आपल्याकड पाणी ऱ्हाते काय? तर मग ह्ये भित बांधून तेथं आडविलेल पाणी ऊन्हाळ्यात आपल्या शिवारात यील. त्यासाठी आपल्या वावरात मोठी नाली बांधायची. झाला क्यानाल. या क्यानालातलं पाणी मोटार लावून पाईपानं आपल्या रानात घिवूनशानी आपून केळं, ऊस, गहू आन् कापूस लावूत."
"ह्ये सम्द मझ्या टकुऱ्यात आलं. पर मला येक सांगा, ती भीत बांधाची तिकड, पाणी पिणार तुमी तर मंग मझा आन् मह्या वावराचा संबंध आला कुठ्ठ?" बिंडलातून बिडी काढत गणपत म्हन्ला.
"गणपत्या, आगुदर सांग्ल न्हाई का, आर ह्यो क्यानाल आपल्या शिवारातून जाणार हाय."
"आच्छा ! म्हणजे मंग मह्या वावरातून बी जाणार हाय का?" काडी डब्बीवर वढत गणपतनं इच्चारलं.
"अगदी बरोबर." सायेब सिगारेट शिलगावून म्हन्ले.
"न्हाई. सायेब न्हाई ! ती मह्या बाप दाद्याची इश्टेट हाय. ती जिमीन म्या देणार न्हाई म्हंजे देणार न्हाई."
"गणपत..."
"न्हाई सरपंच न्हाई. अव्हो, या सरकारी लोकायचा काय बी भरोसा न्हाई. उद्या ह्ये सायेब लोक तिला खन्तील आन् खड़डे बी करतील. न्हाई त्ये जमायच न्हाई. ती जिमीन मला मह्या आवलादीपरमानं हाय. तिची तस्सी धूळधाण मला खपायची न्हाई. म्या ऊघड्या डोळ्यानं ते फावू शकणार न्हाई."
"हे बघ गणपत, आस्स वेड्याप्रमाणे बोलू नकोस. तुझे जमिनीवरचे प्रेम आम्ही समजू शकतो. परंतु तू थोडा विचार कर. तुझी सर्व जमिन सरकार घेणार आहे का? तर नाही. फार तर एक-दोन एक्कर. शिवाय घेतलेली जमिन फुकट घेणार नाही. तू, आबासाहेब, गावातले काही लोक ठरवाल ती रक्कम सरकार देईल. का हो आबासाहेब?"
"व्हय. सायब येकदम खर्र बोल्ले रे! ह्ये फा गणपत, आर, पैका मिळणार हाय. त्या पैक्यातून तू मोटार आन् पाईप घेशील ना तर ऊसाचा फड आन् केळीच्या बनामदून लखपती व्हशील लखपती! हायेस कोठ? दोन-तीन सालानं पोरीला बी ऊजवाव लागणार हाय. तव्हा कोठून आणशील एव्हडा पैका? तिचं लगीन व्हण्याइतका पैका तुला मिळल म्हंजी मंग पोरीच्या लगीनाला बी कोन्हा फुड हात फैलावायची येळ तुह्यावर येणार न्हाई."
"पर सरपंच..."
"आता आणिक कहाचं पर बीर आलय. त्या वांझाड जिमिनीला प्वाटच्या पोरावाणी सांबाळतूस आन् उंद्या प्वाटच्या पोरीला कहान ऊजविणार हायेस?"
"गणपत, सरपंच म्हणतात ते खरं आहे. सरकारने दिलेल्या पैशातून तू पोरीचं लग्न करु शकतोस. शिवाय केळी, ऊस अशी पिक लावून..."
"सायेब, त्ये खरं हाय वो. पर त्यासाठी हीर खंदावी लागलं की?"
"आरं गणप्या, क्यानाल वावरातून गेला म्हन्ल्यावर हिरीची काय गरज रे? दोन च्यार पाईप आन् मोटार आसली की सम्द्या वावरात पाणीच पाणी व्हईल की रे. शिवार सम्द हिरवंगार. तीन-तीन पुरुष उच्चीचा फड उबा ऱ्हाईल उसाचा. हायेस कोठं? पोरीचं लगीन बी कसं धूमधडाक्यात करसील का न्हाई? पोराला मोठा अधिकारी बी करशीला. गणप्या, आजकाल नुस्ती डिगरी आसून चालत न्हाई."
"तर मंग?"
"सांगा हो साहेब..."
"गणपत, नोकरी लागण्यासाठी नुसती डिग्री असून चालत नाही रे तर लाख-दोन लाख रुपये द्यावे लागतात तेव्हा कुठे आमच्यासारखी नोकरी मिळते."
येनकेन परकारे अधिकारी आन् सरपंचानं दावलेल्या मव्हाच्या गाजराला गणपती न्हाई तं गरिबीच्या जाळ्यात फडफडणारे लई शेतकरी भुलले आन् फडातल्या ऊसांनी माना डोलवाव्यात तशा माना डोलवत सया आन् आंगुठे करुन बसले...
०००