नको चंद्र तारे, फुलांचे पसारे....
(1)
तालुक्याला सोपानचे आरशे विकायचे दुकान होते. धंदा जोरात चालू होता. हाताखाली दोन तीन कामगार होते. तरीही स्वतः सोपान काम करायचा. त्याला ते आवडायचं. वेगवेगळ्या आकाराचे, नक्षीदार आरशे बनवायचा. चौकोनी, त्रिकोणी, पंचकोनी, गोलाकार, अंडगोलाकृती, कापणीच्या आकाराचे असे विविध प्रकारचे आरशे त्याच्या दुकानात होते. शिवाय, ग्राहकांच्या इच्छेप्रमाणे तो हवे तसे आरशे तो त्यांना बनवून देई. त्याच्याकडे शहरातून आरशाच्या काचा यायच्या. तसेच, जुने विकलेले आणि भंगारातून मिळालेले. काहीशे तुटलेले पण चांगल्या स्थितीतले आरशे तो व्यवस्थित कापून त्यांना वापरण्यायोग्य बनवायचा.
दर दोन तीन महिन्यात जुन्या समानांचा ट्रक येत असे. त्यातून वापरण्यायोग्य समान सोपान घेत असे. एकदा एका टेम्पो मधून जुन्या आरश्यांचा माल आला. त्याच्या मागच्या पत्र्याच्या शेडमध्ये सामान खाली करण्यात आलं. नेहमी प्रमाणे सोपानने उपयोगाचे सामान ठेऊन घेतले. असेच काही दिवस गेले. दुपार टळून गेली होती. चहावाला चहा देऊन गेला होता. चहाचा एक घोट घेत सोपान मागच्या शेड मध्ये काही उपयोगाचं मिळतंय का पाहत होता. लाकडी फळ्यांचा, कुठे कुठे तुटलेल्या आरश्यांचा, काचांचा कसा उपयोग करता येईल विचार करत होता. त्याला काहीतरी कामाचं आठवलं, तसं तो वळणार तोच अचानक, काहीतरी चमकल्या सारख वाटलं. त्याने पुन्हा जवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात, कुणीतरी त्याला आवाज दिला.
"सोपानराव ssss ओss सोपानराव, कुठं गेलाईसा??"
आपण कशासाठी वळलो हा विचार झटकन विरून गेला. सोपान झरझर दुकानाच्या समोर गेला. जुन्या सामानांचे वाहतूक करणारे बबनराव दुकानात आले होते. मुलीचं नुकतंच लग्न ठरलं होतं. त्यामुळे तिला देण्यासाठी गृहोपयोगी सामानाची खरेदी चालू होती.
"नमस्कार, बबनराव. लय दिवसांनी येणं केलं?", सोपान त्यांना सामोरा जात म्हणाला.
"काय सोपानराव? हिकडं गिऱ्हाईक सोडून तिकडं गोडवणात काय करताय."
"काही नाही. जरा जुनं सामान पाहत होतो."
"बरं, ते जाऊद्या. ही आमची मुलगी. निता. लग्न काढलंय बगा. पुढच्या महिन्यातली तारीख ठरलीय."
"वाह वाह बबनराव. अभिनंदन अभिनंदन"
"हां हां.. सामानाची खरेदी चालू आहे. तर तिला आवडीचा एक मोठा आरसा पाहिजे बगा."
"मग आपलंच दुकान आहे की, बघा तुम्हाला जो आवडतोय तो."
"बरं निता. बघून घे तुला जे पसंत पडतंय ते."
बबनराव सोफ्यावर बसून पेपर वाचण्यात मग्न झाले. सोपान निताला वेगवेगळे आरशे दाखवत होता. गोल, चौकोनी, उभे, नक्षीदार कमान असलेले. एक पेक्षा एक सरस. पण तिला त्यातील एकही पसंत पडत नव्हता. निराश होऊन निता आणि पाठोपाठ सोपान सगळं दुकान फिरून बबनरावांच्या दिशेने येत होते. तोच पाठीमागच्या दारातून एक मोठा लाकडी नक्षीदार आरसा घेऊन कामगार आत येता होता.
"मालक, याचं काय करू? हे वरच्या बाजूला जरा फुटलंय बगा."
निता आणि सोपान मागे वळले. तिचं लक्ष त्या आरशावर पडताच ती आनंदली. सोपान काही बोलणार तोच निता म्हणाली,
"काका, हाच आरसा हवाय मला."
दोन अडीच फूट लांब आणि चार पाच फूट उंच असा तो जुन्या काळातील आरसा होता. आरशाच्या काचेवर केलेलं नाजूक कोरीवकाम तर खूपच सुंदर होतं. त्याच्या आजूबाजूला लाकडी चौकटीचं नक्षीदार सुबक काम पाहताच निता एकदम खुश झाली.
"अगं, तो जुना आहे. आणि फुटलाही आहे.", सोपान पटकन म्हणाला.
"असू द्या, पण मला तोच हवाय."
"बरं, ठीक आहे. मी तसाच तुला नवीन बनवून देईन, मग तर झालं."
"नाही काका, मला तोच आरसा हवाय. फक्त तुम्ही त्याला व्यवस्थित करा."
"बरं...", काहीतरी विचार करून सोपान म्हणाला.
"बरं. सोपानराव आम्हाला पुढं आणखी समान पाहायला जायचंय. तेव्हा येतो आम्ही.", बबनराव नमस्कार करून म्हणाले.
"हो. या आपण. लग्नाची तारीख आणि ठिकाण सांगा. म्हणजे मी आरसा वेळेत पाठवून देईन."
"बरं बरं. फोन करून कळवतो."
मंडळी निघून गेली. कामगार आरसा तसाच धरून उभा होता. त्या आरश्याकडे पाहताच काहीतरी वेगळं वाटत होतं. काहीतरी चुकल्यासारखं, काहीतरी अनामिक अकल्पित असं पाहिल्यासारखं. म्हणून तो निताला नको म्हणत होता. मागच्या शेडमध्ये गेल्यावर सुद्धा त्याला असे काहीसे वाटले होते.
"मालक."
विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत सोपान म्हणाला,
"शाब्बास, तुला पण नेमका हाच वेळ मिळाला का! तो आरसा दाखवायला."
"काय झालं मालक??"
"काही नाही."
बोट दाखवून सोपान म्हणाला,
"ठेव तो आरसा पलीकडे. आणि पुन्हा हात लावू नको त्याला."
साडे सहा झाले होते. संधीप्रकाश पडू लागला होता. कामगार निघून गेले तसं सोपानही आपली पिशवी घेऊन निघाला. पण आज त्याला निघू वाटेना. दुकान बंद करू वाटेना. आपण कुणालातरी बंद करून चाललो आहोत! अशी हुरहूर वाटत होती. असे कधी झाले नव्हते. मग आजच असे का वाटते आहे? मनातला विचार बाजूला सारून त्याने दुकान बंद केले. समोरच्या रस्त्यावरून लोकांची तुरळक ये जा चालू होती. बाजारातून जाताना भाजीपाला घेऊन जायचं होतं. तो चालू लागला पण पाय जड झाले होते. त्याला निघू वाटेना. काहीतरी विसरल्यासारखं वाटत होतं. पण काय? हेच कळत नव्हतं. बराच वेळ तो तिथंच घुटमळत होता.
"ओ सोपानराव... येताय का? चला सोडतो घरी."
रस्तावरून जाणाऱ्या एक ओळखीच्या इसमाने हाक मारली.
"हो हो चला. येतोच.", असे म्हणत सोपान त्याच्याबरोबर घरी गेला.
*****